व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भविष्यवाणीचे पुस्तक

भविष्यवाणीचे पुस्तक

भविष्यवाणीचे पुस्तक

लोकांना भविष्याविषयी कुतूहल असते. ते कित्येक विषयांवर, हवामान अंदाजांपासून आर्थिक निर्देशांकांपर्यंत निरनिराळ्या विश्‍वसनीय भाकितांच्या शोधात असतात. अशाप्रकारच्या भाकितांवर विश्‍वास ठेवून कृती केल्यावर मात्र कित्येकदा निराशाच त्यांच्या पदरी पडते. बायबलमध्ये अनेक भाकिते किंवा भविष्यवाण्या आहेत. या भविष्यवाण्यांमध्ये कितपत सत्य आहे? त्या घटना घडण्यापूर्वी लिहिलेला पूर्वेतिहास आहे? किंवा भविष्यवाण्यांच्या नावाखाली घडून गेलेल्या घटनांचा हवाला आहे?

रोमी मुत्सद्दी केटो (सा.यु.पू. २३४-१४९) याने एकदा असे म्हटल्याचे सांगितले जाते की, “भविष्य सांगणाऱ्‍याला कोणा दुसऱ्‍या भविष्य सांगणाऱ्‍याला पाहून हसू कसे येत नाही याचेच मला नवल वाटते.” खरोखरच, आजही अनेक लोक नशीब सांगणाऱ्‍यांकडे, ज्योतिष्यांकडे आणि इतर भविष्य सांगणाऱ्‍यांकडे संशयाने पाहतात. सहसा त्यांची भविष्यकथने अस्पष्ट शब्दांत व्यक्‍त केलेली असतात आणि त्यांचे कितीतरी वेगवेगळे अर्थ लावता येतात.

तथापि, बायबलच्या भविष्यवाण्यांविषयी काय? यांच्याकडे संशयाच्या दृष्टीने पाहावे का? की त्यांवर विश्‍वास ठेवण्यासाठी काही आधार आहे?

निव्वळ धूर्तपणे बांधलेले अंदाज नव्हेत

ज्ञानवान लोक घटनांचा झोक पाहता कदाचित भविष्याविषयी अचूक अंदाज बांधतीलही, पण त्यांची भाकिते नेहमीच सत्य नसतात. भविष्याचा हादरा (इंग्रजी) या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे: “प्रत्येक समाजाला भविष्यासंबंधी संभाव्य पर्यायांच्या एका श्रृंखलेचा सामना तर करावाच लागतो पण त्यासोबतच त्याच्यापुढे भविष्यासंबंधी निरनिराळे साध्य पर्याय असतात; शिवाय यांपैकी अधिक चांगला कोणता याविषयी दुविधा असते.” ते पुस्तक पुढे म्हणते: “अर्थात, कुणालाही भविष्याचे परिपूर्ण ‘ज्ञान’ असू शकत नाही. आपण केवळ आपल्या अनुमानांचे तर्कसंगत विश्‍लेषण करून, हे अनुमान बळकट करून त्यांना संभाव्यता जोडू शकतो, एवढेच.”

तथापि, बायबल लेखकांनी भविष्याविषयीच्या ‘अनुमानांना’ निव्वळ ‘संभाव्यता जोडल्या’ नाहीत. तसेच, त्यांची पूर्वकथने ही वेगवेगळे अर्थ लावता येण्याजोगी संदिग्ध विधाने आहेत असे म्हणूनही त्यांना दृष्टिआड करता येणार नाहीत. उलट त्यांच्या कित्येक भविष्यवाण्या असाधारणपणे स्पष्ट आणि सुविशिष्ट होत्या, कित्येकदा तर त्यांत सर्वसाधारण अपेक्षेपेक्षा अगदीच उलट भविष्यकथन केलेले असत. उदाहरणार्थ, बाबेल [बॅबिलोन] शहराविषयी बायबलने पूर्वीच काय सांगितले होते ते पाहा.

‘नाशरुप झाडूने झाडून टाकले’ जाईल

प्राचीन बाबेल “राष्ट्रांचा मुकुटमणि” बनले. (यशया १३:१९) हे गजबजलेले महानगर पर्शियन खाडी ते भूमध्य समुद्रापर्यंतच्या व्यापारी मार्गावर एका सोयीस्कर स्थानी वसलेले असल्यामुळे ते पूर्व आणि पश्‍चिमेमधील जमिनीवरच्या तसेच सागरी व्यापाराच्या दृष्टीनेही एक प्रमुख व्यापार केंद्र होते.

सा.यु.पू. सातव्या शतकापर्यंत बाबेल शहर बॅबिलोनी साम्राज्याची अभेद्य राजधानी भासू लागले. हे शहर फरात नदीच्या दोन्ही बाजूला वसलेले होते आणि या नदीचे पाणी वापरून एक मोठा, खोल खंदक आणि कालव्यांची एक व्यूहरचना निर्माण करण्यात आली होती. शिवाय, या शहराला भरभक्कम दुहेरी भितींच्या रांगांचे संरक्षण लाभले होते आणि या भिंतींवर असलेल्या असंख्य सुरक्षा बुरुजांमुळे तर यात आणखीनच भर पडली होती. साहजिकच, या शहरातील रहिवाशी निश्‍चिंतपणे जगत होते.

तथापि, सा.यु.पू. आठव्या शतकात, बाबेल आपल्या उत्कर्षाचा कळस गाठण्याच्या मार्गावर असताना, यशया संदेष्ट्याने भाकीत केले की बाबेलला ‘नाशरूप झाडूने झाडून टाकले जाईल.’ (यशया १३:१९; १४:२२, २३) बाबेलचा नेमक्या कोणत्या पद्धतीने पाडाव होईल याचे देखील यशयाने वर्णन केले. हल्लेखोर आधी तिच्या सभोवताली संरक्षक खंदकाप्रमाणे असणाऱ्‍या नद्या ‘आटवतील’—यामुळे अर्थातच शहराचे संरक्षण नाहीसे होईल. एवढेच काय तर यशयाने या शहरावर विजय मिळवणाऱ्‍याचे नाव देखील दिले—एक पराक्रमी पर्शियन राजा, “कोरेश,” ज्याच्यापुढे “दरवाजे उघडतील, वेशी बंद राहणार नाहीत.”—यशया ४४:२७–४५:२.

ही अत्यंत धाडसी पूर्वकथने होती. पण ती पूर्ण झाली का? इतिहास उत्तर देतो.

“युद्ध न करता”

यशयाने त्याची ही भविष्यवाणी अभिलिखित केल्याच्या दोन शतकांनंतर, ऑक्टोबर ५, सा.यु.पू. ५३९ च्या रात्री कोरेशच्या नेतृत्वाखाली मेद व पारसच्या सैन्याने बाबेलजवळ तळ ठोकलेले होते. पण बाबेलचे रहिवाशी मात्र निश्‍चिंत होते. ग्रीक इतिहासकार हेरोडोटसच्या (सा.यु.पू. पाचवे शतक) मते बाबेलच्या लोकांजवळ कितीतरी वर्षे पुरेल इतकी अन्‍नसामुग्री होती. शिवाय, त्यांच्या संरक्षणासाठी फरात नदी आणि बाबेलच्या मजबूत भिंती तर होत्याच. पण हे सर्व खरे असले तरीसुद्धा, नबोनिडस क्रॉनिकलमधील माहितीनुसार, “कोरेशच्या सैन्यांनी युद्ध न करता बाबेलमध्ये प्रवेश केला.” हे कसे शक्य होते?

हेरोडोटस खुलासा करतो की शहराच्या वेशीच्या आत लोक “सणाच्या निमित्ताने नाचगाणी आणि मौजमजा करण्यात दंग होते.” बाहेर, कोरेशने फरात नदीचा प्रवाह दुसऱ्‍या दिशेला वळवला तरी त्यांना पत्ता लागला नाही. पाण्याची पातळी कमी कमी होऊ लागली तसतसे कोरेशचे सैन्य नदीचा प्रवाह चिरत पुढे जाऊ लागले; एव्हाना पाणी त्यांच्या मांड्यापर्यंत उतरले होते. शहराला वेढणाऱ्‍या त्या गगनचुंबी भिंतींच्या कडेकडेने त्यांचा मोर्चा पुढे सरसावला आणि शेवटी त्यांनी हेरोडिटसच्या शब्दांत, “नदीकडे उघडणाऱ्‍या वेशींतून,” शहरात प्रवेश केला; या वेशी निष्काळजीपणे उघड्याच ठेवण्यात आल्या होत्या. (पडताळा दानीएल ५:१-४; यिर्मया ५०:२४; ५१:३१, ३२.) झेनोफॉनसहित (सा.यु.पू. सु. ४३१-सु. ३५२) इतर इतिहासकारांनी आणि पुरातत्त्ववेत्त्यांना गवसलेल्या इष्टिकालेखांनीही कोरेशच्या हातून झालेल्या बाबेलच्या आकस्मिक पतनाला दुजोरा दिला.

अशारितीने बाबेलविषयी यशयाची भविष्यवाणी पूर्ण झाली. पण खरोखरच झाली का? पूर्वभाकीत नसून ती खरे तर घटना घडल्यानंतर लिहिण्यात आली असण्याची शक्यता आहे का? वास्तविकतः, हाच प्रश्‍न बायबलच्या इतर भविष्यवाण्यांविषयीही विचारता येईल.

भविष्यवाणीचे सोंग घेतलेला इतिहास?

यशयासहित—इतर बायबल भविष्यवक्‍त्‌यांनी देखील—निव्वळ इतिहासाची नक्कल करून आपल्या लिखाणाला भविष्यवाणीचे रूप दिले असल्यास यांना कुशल कावेबाज म्हणावे लागेल. पण असा कपटीपणा करण्यामागे त्यांचा उद्देश? खऱ्‍या भविष्यवक्‍त्‌यांनी तर आपण लाच घेणार नाही हे खंबीरपणे स्पष्ट केले होते. (१ शमुवेल १२:३; दानीएल ५:१७) शिवाय, बायबलचे लेखक (ज्यांपैकी पुष्कळजण भविष्यवक्‍ते होते) स्वतःच्या लाजिरवाण्या चुकांविषयी लिहितानाही मागेपुढे न पाहणारे भरवसालायक सज्जन होते याविषयीचा सबळ पुरावा आपण आधीच विचारात घेतलेला आहे. त्यामुळे अशी ही माणसे भविष्यवाणीच्या वेषात, घडलेला इतिहासच लोकांपुढे मांडण्याचा भयंकर कावेबाजपणा करतील अशी शक्यता दिसत नाही.

आणखी एक विचारात घेण्याजोगा मुद्दा आहे. तो असा की, बायबलच्या भविष्यवाण्यांमध्ये भविष्यवक्‍त्‌यांच्या स्वतःच्या लोकांचे दोष, जळजळीत शब्दांत सडेतोडपणे प्रकट करण्यात आलेले आहेत; यांत याजकांच्या आणि राज्यकर्त्यांच्या दोषांचाही समावेश आहे. उदाहरणार्थ, यशयाने त्याच्या काळातल्या इस्राएली लोकांच्या शोचनीय नैतिक दैनावस्थेचा निषेध केला; त्याकाळात पुढारी आणि सामान्य लोकांचीही सारखीच गत होती. (यशया १:२-१०) इतर भविष्यवक्‍त्‌यांनी जोरदार शब्दांत याजकांची पातके उघडकीस आणली. (सफन्या ३:४; मलाखी २:१-९) पण, आपल्याच लोकांची एवढ्या झोंबणाऱ्‍या शब्दांत निर्भर्त्सना करणाऱ्‍या बनावट भविष्यवाण्या ते का तयार करतील आणि त्यातल्या त्यात याजकांनी असल्या गैरप्रकारात का म्हणून साथ दिली असेल याचा विचार केल्यास माणूस गोंधळात पडतो.

शिवाय, हे भविष्यवक्‍ते—केवळ तोतया होते असे आपण मानल्यास—त्यांचा हा बनावटीपणा निभावला कसा? इस्राएल राष्ट्रात साक्षरतेवर जोर दिला जात असे. लहानपणापासूनच मुलांना लिहायला वाचायला शिकवले जात असे. (अनुवाद ६:६-९) शास्त्रवचनांचे वैयक्‍तिक वाचन करण्याचे प्रोत्साहन दिले जात असे. (स्तोत्र १:२) शिवाय, दर आठवडी शब्बाथाच्या दिवशी सभास्थानांत शास्त्रवचनांचे सार्वजनिक वाचन केले जात असे. (प्रेषितांची कृत्ये १५:२१) हे सर्व असताना, शास्त्रवचनांत पारंगत असलेले एक सबंध साक्षर राष्ट्र अशा थोतांडाला बळी पडले असेल यावर विश्‍वास बसत नाही.

बाबेलच्या पतनाविषयी यशयाची भविष्यवाणी तेवढ्यावरच संपत नाही. त्यात एक अशी गोष्ट लिहिलेली आहे की जी भविष्यवाणीच्या पूर्णतेनंतर लिहिली जाणे शक्यच नव्हते.

“त्यात पुनः कधी वस्ती होणार नाही”

पतन झाल्यानंतर बाबेलचे काय भवितव्य होते? यशयाने भाकीत केले: “त्यात पुनः कधी वस्ती होणार नाही, पिढ्यान्‌पिढ्या त्यांत कोणी राहणार नाही; अरब आपले तंबू तेथे ठोकणार नाहीत; मेंढपाळ आपले कळप तेथे बसविणार नाहीत.” (यशया १३:२०) माफक शब्दांत बोलायचे झाल्यास, एवढ्या मोक्याच्या ठिकाणी वसलेले शहर कायमचे निर्मनुष्य होईल असे म्हणणे तेव्हा जरा विचित्रच भासले असावे. यशयाचे हे शब्द बाबेलची उजाड दशा पाहिल्यानंतर तर लिहिण्यात आले नसावेत?

कोरेशने बाबेल काबीज केल्यानंतर कितीतरी शतकांपर्यंत बाबेलमध्ये मनुष्यवस्ती होतीच—अर्थात हे बाबेल पूर्वीइतके समृद्ध नव्हते. तुम्हाला कदाचित आठवत असेल, मृत समुद्र गुंडाळ्यांमध्ये सा.यु.पू. दुसऱ्‍या शतकाच्या कालखंडातील यशयाच्या संपूर्ण पुस्तकाची एक प्रत आहे. या गुंडाळीची प्रतिकृती तयार केली जात होती त्याच सुमारास पार्थियन लोकांनी बाबेल हस्तगत केले. सा.यु. पहिल्या शतकात, बाबेलमध्ये यहुद्यांची एक वसाहत होती आणि बायबलचा लेखक पेत्र याला तेथे जाण्याचा योग आला. (१ पेत्र ५:१३) एव्हाना, यशयाची मृत समुद्र गुंडाळी तयार होऊन जवळजवळ दोन शतके होत आली होती. त्याअर्थी, सा.यु. पहिल्या शतकातही बाबेल पूर्णतः उजाड झालेले नव्हते, पण यशयाचे पुस्तक लिहून बराच काळ लोटला होता. a

पूर्वभाकीत केल्याप्रमाणे, बाबेल शेवटी निव्वळ “नासाडीचा ढिगार” बनले. (यिर्मया ५१:३७) इब्री विद्वान जेरमी (सा.यु. चौथे शतक) सांगतो की त्याच्या काळापर्यंत बाबेल हे विराण झाले होते, जेथे “सर्व प्रकारचे जंगली पशू” भटकायचे. आजतागायत बाबेल उजाडच आहे.

निर्मनुष्य झालेले बाबेल यशयाला आपल्या डोळ्यांनी पाहता आले नाही. पण अर्वाचीन काळातील इराकमधील बगदादच्या दक्षिणेला सुमारे ८० किलोमीटर अंतरावर, त्या एकेकाळच्या बलाढ्य शहराचे अवशेष, “त्यात पुनः कधी वस्ती होणार नाही,” या यशयाच्या शब्दांची मूकपणे ग्वाही देताहेत. पर्यटन स्थळ बनवण्याकरता बाबेलचे पुनर्वसन केल्यामुळे कदाचित पर्यटक त्याकडे आकर्षित होतीलही, पण बाबेलचे “पुत्रपौत्र” कायमचे नामशेष झाले आहेत.—यशया १३:२०; १४:२२, २३.

अशारितीने, यशया भविष्यवक्‍त्‌याने भविष्यातील कोणत्याही घटनेला लागू करता येतील अशाप्रकारची संदिग्ध भाकिते केली नाहीत. तसेच त्याने इतिहासाची नक्कल करून त्याला भविष्यवाणीचे नाव दिले नाही. जरा विचार करा: बाबेलसारख्या बलाढ्य शहरात पुन्हा कधीही मनुष्यवस्ती होणार नाही असे भाकीत करण्याची, दुसऱ्‍या शब्दांत, ज्या गोष्टीचे घडणे न घडणे कोणत्याच प्रकारे आपल्या हातात नाही अशा गोष्टीची “भविष्यवाणी” करण्याची जोखीम एखादा तोतया का पत्करील बरे?

बाबेलच्या पाडावाविषयीची ही भविष्यवाणी बायबलमधील भविष्यवाण्याचे केवळ एक उदाहरण आहे. b बायबलच्या भविष्यवाण्यांच्या पूर्णतेतून, बायबल मनुष्यापेक्षा श्रेष्ठ अशा उगमातून आले असले पाहिजे हा संकेत अनेकांच्या लक्षात येतो. तुम्ही निदान हे तर नक्कीच कबूल कराल की भविष्यवाण्यांचे हे पुस्तक परीक्षण करण्याजोगे आहे. एक मात्र निश्‍चित: आजच्या काळातल्या भविष्य सांगणाऱ्‍यांच्या अस्पष्ट किंवा खळबळजनक भाकितांमध्ये आणि बायबलच्या सुस्पष्ट, गंभीर आणि सुविशिष्ट भविष्यवाण्यांमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे.

[तळटीपा]

a यशयासहित—इब्री शास्त्रवचनांतील इतर पुस्तके—सा.यु. पहिल्या शतकाच्या कितीतरी आधी लिहिण्यात आली होती यासाठी ठोस पुरावा उपलब्ध आहे. इतिहासकार जोसीफस याने (सा.यु. पहिले शतक) सूचित केल्याप्रमाणे पवित्र शास्त्रवचने म्हणून स्वीकारलेली इब्री शास्त्रवचनांच्या पुस्तकांची यादी त्याच्या पुष्कळ काळाआधीच निश्‍चित करण्यात आली होती. शिवाय, ग्रीक सेप्ट्यूजेन्ट, अर्थात इब्री शास्त्रवचनांच्या ग्रीक भाषेत केलेल्या भाषांतराचे लेखन, सा.यु.पू. तिसऱ्‍या शतकात सुरू होऊन सा.यु.पू. दुसऱ्‍या शतकापर्यंत पूर्ण झाले.

b बायबलच्या भविष्यवाण्या आणि त्यांच्या पूर्णतेचा अहवाल दाखवणाऱ्‍या ऐतिहासिक घटना यांविषयी अतिरिक्‍त विवेचनाकरता वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी यांच्याद्वारे प्रकाशित बायबल—देवाचे वचन की मनुष्याचे? (इंग्रजी) यातील पृष्ठे ११७-३३ पाहा.

[२८ पानांवरील संक्षिप्त आशय]

बायबलचे लेखक विश्‍वसनीय भविष्यवक्‍ते होते की कुशल कावेबाज?

[२९ पानांवरील चित्र]

प्राचीन बाबेलचे अवशेष