व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय एक

देवाबद्दलची खरी शिकवण काय आहे?

देवाबद्दलची खरी शिकवण काय आहे?
  • देवाला खरोखरच तुमची काळजी आहे का?

  • देव कसा दिसतो? त्याला नाव आहे का?

  • देवाच्या जवळ जाणे शक्य आहे का?

१, २. प्रश्न विचारणे सहसा चांगले का असते?

मुले प्रश्न कसे विचारतात हे तुम्ही कधी पाहिले आहे का? पुष्कळ मुले, बोलायला लागल्यापासूनच प्रश्न विचारू लागतात. भुवया उंच करून व आपले इवलेशे डोळे विस्फारून ते तुमच्याकडे पाहतात आणि आभाळाचा रंग निळा का असतो? तारे का लुकलुकतात? पक्ष्यांना गायला कुणी शिकवलं?, असे प्रश्न ते तुम्हाला विचारतात. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायचा तुम्ही खूप प्रयत्न करता, पण हे नेहमीच सोपे नसते. तुम्ही कितीही चांगले उत्तर दिले तरी, पण असं का, हा त्यांचा पुढचा प्रश्न तयारच असतो.

फक्त मुलेच प्रश्न विचारतात असे नाही. आपण जसजसे मोठे होतो तसतसे आपणही प्रश्न विचारू लागतो. मार्ग शोधण्यासाठी, धोके कसे टाळता येतील हे शिकण्यासाठी किंवा आपली जिज्ञासा शमविण्यासाठी आपण प्रश्न विचारतो. पण असे दिसते, की पुष्कळ लोक प्रश्न विचारायचे आणि खासकरून महत्त्वपूर्ण प्रश्न विचारायचेच सोडून देतात. निदान, ते उत्तरे शोधायचे सोडून देतात.

३. पुष्कळ लोक अगदी महत्त्वपूर्ण प्रश्नांची देखील उत्तरे शोधण्याचे का सोडून देतात?

या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील प्रश्‍नाचा किंवा मग प्रस्तावनेत विचारलेल्या प्रश्नांचा अथवा या अध्यायाच्या सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नांचा विचार करा. हे प्रश्न काही सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्नांपैकी आहेत जे कदाचित तुमच्याही मनात येतील. तरीही, पुष्कळ लोकांनी उत्तरे शोधण्याचे सोडून दिले आहे. का? बायबलमध्ये उत्तरे आहेत का? काहींना वाटते, की बायबलमधील उत्तरे समजण्यास कठीण आहेत. इतरांना ही काळजी असते, की आपण प्रश्न विचारला तर लोकांना काय वाटेल. आणि काही जण असे म्हणून मोकळे होतात, की अशाप्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देणे हे केवळ धार्मिक नेते व गुरू यांचेच काम आहे. तुमच्याबाबतीत काय?

४, ५. जीवनाविषयी आपण कोणते काही महत्त्वपूर्ण प्रश्न विचारू शकतो, आणि आपण या प्रश्नांची उत्तरे शोधून काढायचा प्रयत्न का केला पाहिजे?

तुम्हाला कदाचित जीवनाच्या अगदी महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे हवी असतील. तुमच्या मनात कदाचित असे प्रश्न येतील, जसे की: ‘जीवनाचा उद्देश काय आहे? केवळ जन्माला येणे, म्हातारे होणे आणि मरून जाणे, इतकाच जीवनाचा उद्देश आहे का? देव नेमका कसा आहे?’ असे प्रश्न विचारणे खरोखर चांगले आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जोपर्यंत तुम्हाला या प्रश्नांची समाधानकारक व विश्वसनीय उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत तुम्ही हार मानू नये. नामवंत शिक्षक येशू ख्रिस्त एकदा म्हणाला होता: “मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल.”​—मत्तय ७:​७.

तुम्ही जर महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे ‘मागत’ राहिला तर तुम्हाला हा शोध प्रतिफलदायी असल्याचे दिसून येईल. (नीतिसूत्रे २:​१-५) इतर लोकांनी तुम्हाला काहीही सांगितले असले तरी, बायबलमध्ये या प्रश्नांची उत्तरे आहेत आणि तुम्हाला ती सापडू शकतात. बायबलमधील उत्तरे समजण्यास कठीण नाहीत. शिवाय, त्यांमुळे तुम्हाला आशा मिळेल, आनंद होईल. आणि ती तुम्हाला सध्याचेही जीवन समाधानकारकरीतीने जगण्यास मदत करतील. तेव्हा, सर्वात आधी आपण अनेक लोक ज्यामुळे त्रासलेले आहेत अशा एका प्रश्‍नावर विचार करू या.

देव बेपर्वा आणि पाषाणहृदयी आहे का?

६. मानवाला जे दुःख सहन करावे लागते त्याबद्दल देव बेपर्वा आहे असे अनेकांना का वाटते?

पुष्कळ लोक या प्रश्‍नाचे उत्तर होय असे देतात. ते म्हणतात: ‘देवाला पर्वा असती तर या जगात इतकी वाईट परिस्थिती नसती.’ जगात कुठेही पाहिले तर, युद्धे, द्वेष, दुःख हेच चित्र दिसते. आपल्या वैयक्तिक जीवनातही, आजार, दुःख, प्रिय व्यक्तिंचा मृत्यू यासारख्या समस्या आपल्याला सहन कराव्या लागतात. त्यामुळे अनेक लोकांना असे वाटते, की ‘देवाला आपली आणि आपल्या समस्यांची पर्वा असती तर, त्याने या गोष्टी घडण्यापासून थांबवल्या नसत्या का?’

७. (क) धार्मिक गुरूंनी लोकांना, देव पाषाणहृदयी आहे असा विचार करायला कसे लावले आहे? (ख) आपल्यावर येणाऱ्या परीक्षांविषयी बायबल आपल्याला कोणती खरी शिकवण देते?

भरीत भर म्हणजे, कधीकधी तर धार्मिक गुरूही लोकांना असा विचार करायला लावतात, की देव पाषाणहृदयी आहे. ते कसे? एखादे संकट कोसळते तेव्हा ते लगेच म्हणतात, की ही देवाची इच्छा होती. असे म्हणून, हे गुरू जगात होणाऱ्या सर्व दुर्घटनांसाठी देवाला दोषी ठरवतात. पण हे खरे आहे का? बायबल याबाबतीत काय शिकवते? याकोब १:१३ [पं.र.भा.] म्हणते: “कोणाची परीक्षा होत असता, त्याने देवाकडून माझी परीक्षा होत आहे असे म्हणू नये; कारण वाईट गोष्टींनी देवाची परीक्षा होत नाही, आणि तो कोणाचीही परीक्षा तशी पाहत नाही.” तेव्हा, जगात तुम्ही पाहत असलेल्या दुष्टाईचा स्रोत देव कधीच नसतो. (ईयोब ३४:​१०-१२) हे कबूल आहे, की देव वाईट गोष्टी घडू देतो. पण एखादी गोष्ट घडू देणे आणि तिला कारणीभूत असणे यात जमीनअस्मानाचा फरक आहे.

८, ९. (क) दुष्टाईला अनुमती देणे आणि तिला कारणीभूत असणे यांतील फरक समजावण्यासाठी कोणते उदाहरण देता येईल? (ख) देवाने मानवजातीला वाईट मार्ग निवडण्यापासून अडवले नाही याबाबतीत आपण देवाला दोष देणे उचित का ठरणार नाही?

एका सुज्ञ आणि प्रेमळ पित्याचे उदाहरण घ्या. त्याला एक तरुण मुलगा आहे. पण मुलगा बंड करतो आणि घर सोडण्याचे ठरवतो तेव्हा त्याचा पिता त्याला अडवत नाही. हा मुलगा मग वाम मार्गाला लागून बरबाद होतो. मुलाचे जीवन बरबाद झाले त्यासाठी पिता कारणीभूत आहे का? निश्‍चितच नाही. (लूक १५:​११-१३) तसेच, मानवांनी जेव्हा वाईट मार्ग निवडला तेव्हा देवाने त्यांना अडवले नाही; पण वाईट मार्गाला लागल्यामुळे ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्यांना देव कारणीभूत नाही. यास्तव, मानवजातीच्या समस्यांसाठी देवाला दोष देणे योग्य नाही.

देव मानवाला वाईट मार्ग निवडण्यापासून का अडवत नाही यासाठी त्याच्याकडे सबळ कारणे आहेत. आपला सर्वज्ञानी व शक्तिशाली निर्माणकर्ता यानात्याने तो आपल्याला ती कारणे सांगण्यास बाध्य नाही. तरीपण, प्रेमापोटी तो आपल्याला ती कारणे सांगतो. या कारणांविषयी ११ व्या अध्यायात तुम्हाला जास्त माहिती मिळेल. परंतु आपल्याला तोंड द्याव्या लागत असलेल्या समस्यांसाठी देव कारणीभूत नाही ही खात्री बाळगा. उलट, तो यांवरील उपायाची एकमात्र आशा आपल्याला देतो.​—यशया ३३:२.

१०. देव दुष्टाईच्या परिणामांना नाहीसे करील असा भरवसा आपण का बाळगू शकतो?

१० शिवाय, देव पवित्र आहे. (यशया ६:३) याचा अर्थ तो शुद्ध आणि निर्मळ आहे. त्याच्यामध्ये वाईटपणाचा लवलेशही नाही. त्यामुळे आपण त्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहू शकतो. मानवांच्या बाबतीत आपण असे म्हणू शकत नाही, कारण मानव कधीकधी भ्रष्ट होतात. अधिकारपदावर असलेल्या सर्वात प्रामाणिक मनुष्याकडेसुद्धा सहसा, दुष्ट लोक करत असलेली हानी भरून काढण्याची ताकद नसते. परंतु देव सर्वशक्तिशाली आहे. तो, दुष्टाईमुळे मानवजातीवर झालेले वाईट परिणाम नाहीसे करू शकतो, नव्हे करणार आहे. तो सर्व दुष्कर्मांचा कायमचाच अंत करणार आहे.​—स्तोत्र ३७:​९-११.

आपल्यावर अन्याय होतो तेव्हा देवाला कसे वाटते?

११. (क) जगात होणाऱ्या अन्यायाबद्दल देवाला कसे वाटते? (ख) तुम्हाला सहन कराव्या लागत असलेल्या दुःखाबद्दल देवाला कसे वाटते?

११ पण सध्या या जगात आणि आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल देवाला कसे वाटते? यहोवाला “न्याय प्रिय आहे” असे बायबल आपल्याला शिकवते. (स्तोत्र ३७:२८) त्यामुळे, जे योग्य आहे व जे अयोग्य आहे याबाबतीत त्याला मनापासून काळजी वाटते. तो सर्व प्रकारच्या अन्यायाचा द्वेष करतो. गत काळात जेव्हा या जगात दुष्टाई फोफावली होती तेव्हा देवाच्या “चित्ताला खेद झाला” होता असे बायबल म्हणते. (उत्पत्ति ६:५, ६) देव बदललेला नाही. (मलाखी ३:६) संपूर्ण जगभरात असलेली दुःखद परिस्थिती पाहून देवाला आजही वाईट वाटते. लोकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात हेही देवाला पाहवत नाही. बायबल आपल्याला असे उत्तेजन देते: “त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो.”​—१ पेत्र ५:७.

यहोवा विश्वाचा प्रेमळ निर्माणकर्ता आहे, असे बायबल शिकवते

१२, १३. (क) आपल्यात, प्रेम यासारखे उत्तम गुण का आहेत आणि प्रेमामुळे, जगाकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनावर कसा परिणाम होतो? (ख) जगात दिसणाऱ्या समस्यांबाबत देव जरूर पाऊल उचलेल, अशी खात्री आपण का बाळगू शकतो?

१२ जगातली दुःखद परिस्थिती पाहून देवाला वाईट वाटते, असे आपण खात्रीने कसे म्हणू शकतो? हा घ्या आणखी एक पुरावा. बायबल म्हणते, की मानवाला देवाच्या प्रतिरुपात निर्माण करण्यात आले होते. (उत्पत्ति १:२६) देवात उत्तम गुण असल्यामुळे आपल्यातही चांगले गुण आहेत. जसे की, निष्पाप लोकांना दुःख सहन करावे लागते हे पाहून तुम्ही अस्वस्थ होता का? तुम्हाला जर अशा अन्यायांची हळहळ वाटते, तर तुम्ही ही खात्री बाळगू शकता, की तुमच्यापेक्षा देवाला कितीतरी अधिक पटीने वाटते.

१३ मानवांतील उत्तम गुणांपैकी एक आहे, प्रेम दाखवण्याची क्षमता. हा देखील देवाचाच गुण आहे. बायबल शिकवते, की “देव प्रीति आहे.” (१ योहान ४:८) देव प्रेम करतो म्हणून आपणही प्रेम करतो. प्रेमामुळे तुम्ही जगात पाहत असलेल्या अन्यायाचा किंवा दुःखाचा अंत कराल का? तुमच्यात तितकी शक्ती असती तर तुम्ही तसे केले असते का? अर्थात! म्हणूनच, तुम्ही ही खात्री बाळगू शकता, की देव दुःखाचा आणि अन्यायाचा अंत जरूर करेल. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत दिलेली अभिवचने, केवळ स्वप्ने किंवा पोकळ आशा नाहीत. देवाने दिलेली अभिवचने निश्‍चित पूर्ण होणार आहेत! परंतु या अभिवचनांवर विश्वास ठेवण्यासाठी तुम्हाला आधी त्या देवाला ओळखले पाहिजे ज्याने ही अभिवचने दिली आहेत.

तुम्ही देवाला ओळखावे अशी त्याची इच्छा आहे

एखाद्याने तुमच्याशी परिचित व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल, तर आधी तुम्ही तुमचे नाव त्या व्यक्तीला सांगणार नाही का? देवाने बायबलमध्ये आपले नाव सांगितले आहे

१४. देवाचे नाव काय आहे आणि आपण त्या नावाचा उपयोग का केला पाहिजे?

१४ एखाद्याने तुमच्याशी परिचित व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही काय कराल? आधी तुम्ही तुमचे नाव त्या व्यक्तीला सांगणार नाही का? देवाला नाव आहे का? पुष्कळ धर्मांत असे शिकवले जाते, की देवाचे नाव, “परमेश्वर” किंवा “प्रभू” आहे; परंतु परमेश्वर किंवा प्रभू ही नावे असू शकत नाहीत. “राजा,” “अध्यक्ष” या जशा पदव्या आहेत तशाच त्याही केवळ पदव्या आहेत. बायबल शिकवते, की देवाला अनेक पदव्या आहेत. “परमेश्वर” व “प्रभू” या त्यापैकीच आहेत. परंतु, देवाला एक व्यक्तिगत नाव आहे असे बायबल शिकवते आणि ते नाव आहे, यहोवा. स्तोत्र ८३:१८ (पं.र.भा.) मध्ये म्हटले आहे: “ज्या तुझे नाव यहोवा असे आहे तो तूच मात्र अवघ्या पृथ्वीवर परात्पर आहेस.” तुमच्याकडे असलेल्या बायबलमध्ये हे नाव नसेल तर याचे काय कारण असावे हे पाहण्यासाठी कृपया या पुस्तकाच्या १९५-७ पृष्ठांवरील परिशिष्ट पाहावे. खरे तर, प्राचीन बायबल हस्तलेखांमध्ये देवाचे नाव हजारो वेळा आले आहे. याचा अर्थ यहोवाची अशी इच्छा आहे, की तुम्ही त्याचे नाव माहीत करून घ्यावे आणि त्याचा उपयोग करावा. म्हणजे, बायबलद्वारे तो तुम्हाला स्वतःची ओळख करून देत आहे, असे म्हटले तरी चालेल.

१५. यहोवा या नावाचा काय अर्थ होतो?

१५ देवाने स्वतःला हे नाव दिले आहे आणि हे नाव अतिशय अर्थभरीत आहे. यहोवा या त्याच्या नावाचा असा अर्थ होतो, की त्याने केलेले कोणतेही अभिवचन तो पूर्ण करू शकतो आणि त्याच्या मनात असलेला कोणताही बेत किंवा संकल्प तो सफल करू शकतो. * देवाचे नाव अतुलनीय आहे. या नावावर केवळ त्याचाच हक्क आहे. अनेक प्रकारे यहोवा एकमेव आहे. ते कसे?

१६, १७. (क) ‘सर्वसमर्थ,’ (ख) “सर्वकालचा राजा,” (ग) “निर्माणकर्ता” या यहोवाच्या प्रत्येक पदवीवरून आपण त्याच्याविषयी काय शिकू शकतो?

१६ स्तोत्र ८३:१८ मध्ये आपण असे वाचले, की यहोवाच ‘मात्र अवघ्या पृथ्वीवर परात्पर आहे.’ तसेच, केवळ यहोवाच्याच बाबतीत असे म्हटले आहे, की तो ‘सर्वसमर्थ’ आहे. प्रकटीकरण १५:३ म्हणते: “हे प्रभु देवा, हे सर्वसमर्था, तुझी कृत्ये थोर व आश्चर्यकारक आहेत; हे राष्ट्राधिपते, तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत.” ‘सर्वसमर्थ’ ही पदवी आपल्याला हे शिकवते, की यहोवापेक्षा शक्तिशाली कोणीही नाही. त्याची शक्ती बेजोड व सर्वश्रेष्ठ आहे. पहिले तीमथ्य १:​१७ [पं.र.भा.] या वचनात यहोवाला “सर्वकालचा राजा” म्हटले आहे. ही पदवी आपल्याला याची आठवण करून देते, की यहोवा आणखी एका अर्थाने अद्वितीय आहे. तोच एकटा असा आहे जो अनादिकालापासून अस्तित्वात आहे. स्तोत्र ९०:२ म्हणते: “अनादिकालापासून अनंतकालापर्यंत तू देव आहेस.” नुसत्या विचारानेही आपण अवाक्‌ होतो, नाही का?

१७ यहोवा अद्वितीय आहे ते या अर्थाने देखील, की तोच एकटा निर्माणकर्ता आहे. प्रकटीकरण ४:११ मध्ये आपण असे वाचतो: “हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस; कारण तू सर्व काही निर्माण केले; तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.” कोणतेही उदाहरण घ्या​—स्वर्गातील अदृश्य प्राण्यांपासून रात्री आभाळात कोंदलेल्या ताऱ्यांपर्यत, झाडावर वाढणाऱ्या फळांपासून महासागरात व नद्यांमध्ये मुक्त विहार करणाऱ्या माशांपर्यंत​—सर्व अस्तित्वात आले कारण यहोवा त्यांचा निर्माणकर्ता आहे!

तुम्ही यहोवाच्या जवळ जाऊ शकता का?

१८. आपण देवाच्या जवळ कधीच जाऊ शकत नाही असे काही लोकांना का वाटते, पण बायबल काय शिकवते?

१८ यहोवाच्या विस्मयकारी गुणांविषयी वाचल्यावर काहीजण थोडे कचरतात. त्यांना वाटते, की देव इतका महान आहे, की आपण त्याच्यापुढे अगदी क्षुल्लक आहोत किंवा त्याच्यापुढे आपली काहीच किंमत नाही. पण हा विचार बरोबर आहे का? बायबल याच्या अगदी उलट शिकवते. ते यहोवाविषयी म्हणते: “तो आपल्यापैकी कोणापासूनहि दूर नाही.” (प्रेषितांची कृत्ये १७:२७) बायबल आपल्याला असेही आर्जवते: “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल.”​—याकोब ४:८.

१९. (क) आपण देवाच्या जवळ जाण्यास सुरुवात कशी करू शकतो, आणि याचा आपल्याला कसा फायदा होतो? (ख) देवाचे कोणते गुण तुम्हाला सर्वात आकर्षक वाटतात?

१९ तुम्ही देवाच्या जवळ जाण्यास सुरुवात कशी करू शकता? पहिल्यांदा तुम्ही, आता जे करत आहात ते पुढे चालू ठेवले पाहिजे; म्हणजे देवाविषयी शिकत राहिले पाहिजे. येशूने म्हटले: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.” (योहान १७:३) होय, बायबल असे शिकवते, की यहोवाला आणि येशूला ओळखल्याने, अर्थात त्यांच्याविषयी ज्ञान घेतल्याने आपल्याला “सार्वकालिक जीवन” मिळू शकते! आपण आधी पाहिले, की “देव प्रीति आहे.” (१ योहान ४:१६) यहोवाचे इतरही अनेक सुरेख व आकर्षक गुण आहेत. उदाहरणार्थ, यहोवा “दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर,” आहे असे बायबल सांगते. (निर्गम ३४:६) तो “उत्तम व क्षमाशील” आहे. (स्तोत्र ८६:५) तो “धीराने सहन” करणारा देव आहे. (२ पेत्र ३:९) तो विश्वसनीय आहे. (१ करिंथकर १:९) तुम्ही बायबलचे जसजसे वाचन कराल तसतसे तुम्हाला, यहोवाने हे आणि इतर अनेक आकर्षक गुण कसे प्रदर्शित केले ते दिसून येईल.

२०-२२. (क) देवाला आपण पाहू शकत नाही, त्यामुळे आपण त्याच्याजवळ जाऊ शकत नाही, असे समजावे का? स्पष्टीकरण द्या. (ख) काही सद्‌हेतू बाळगणारे लोक तुम्हाला काय करण्यास सांगतील, पण तुम्ही काय केले पाहिजे?

२० हे खरे आहे, की देव अदृश्य आत्मा असल्यामुळे आपण त्याला पाहू शकत नाही. (योहान १:​१८; ४:२४; १ तीमथ्य १:१७) पण बायबलमधून त्याच्याबद्दल आणखी शिकून घेतल्याने, तुम्हाला देवाच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख घडेल. स्तोत्रकर्त्याने म्हटल्याप्रमाणे तुम्ही ‘परमेश्वराचे मनोहर रूप पाहू’ शकाल. (स्तोत्र २७:४; रोमकर १:२०) यहोवाविषयी तुम्ही जितके अधिक जाणून घ्याल तितकाच अधिक तो तुम्हाला खरा वाटू लागेल आणि तुम्हाला त्याच्यावर प्रेम करावेसे, त्याच्या जवळ जावेसे वाटू लागेल.

एका चांगल्या पित्याला आपल्या मुलांवर प्रेम असते, पण याहून कितीतरी अधिक पटीने आपल्या स्वर्गीय पित्याला आपल्यावर प्रेम आहे

२१ आपण यहोवाला आपला पिता समजले पाहिजे, असे बायबल का शिकवते ते तुम्हाला हळूहळू समजू लागेल. (मत्तय ६:९) त्याने आपल्याला जीवन दिले आहे. शिवाय, जसे कोणत्याही प्रेमळ पित्याला आपल्या मुलांनी सर्वात उत्तम प्रकारचे जीवन उपभोगावे असे वाटते तसेच यहोवालाही आपल्याबद्दल वाटते. (स्तोत्र ३६:९) बायबल असेही शिकवते, की मानव देवाचे मित्र होऊ शकतात. (याकोब २:२३) कल्पना करा​—विश्वाच्या निर्माणकर्त्याचे तुम्ही मित्र होऊ शकता!

२२ बायबलविषयी अधिक शिकत असताना काही सद्‌हेतू बाळगणारे लोक तुम्हाला, अभ्यास थांबवण्याचा आग्रह करतील. तुम्ही तुमचा विश्वास बदलाल, अशी त्यांना काळजी वाटेल. पण कोणाच्या सांगण्यावरून, एक सर्वश्रेष्ठ मैत्री अर्थात देवासोबत मैत्री जोडण्याची उत्तम संधी गमवू नका.

२३, २४. (क) तुम्ही जे शिकत आहात त्यासंबंधाने तुम्ही प्रश्न का विचारत राहिले पाहिजे? (ख) पुढील अध्यायात कोणत्या विषयावर चर्चा करण्यात आली आहे?

२३ अर्थात, सुरुवातीला तुम्हाला सर्वच गोष्टी समजणार नाहीत. मदत मागण्यासाठी तुम्हाला नम्र व्हावे लागेल; परंतु संकोच वाटतो म्हणून शांत बसू नका. येशूने म्हटले, की बालकांप्रमाणे नम्र असणे कौतुकास्पद आहे. (मत्तय १८:​२-४) आणि आपल्याला माहीत आहे, मुले नाना प्रकारचे प्रश्न विचारतात. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे सापडावीत, अशी देवाची इच्छा आहे. देवाविषयी शिकून घेण्यास उत्सुक असलेल्यांचे बायबलमध्ये कौतुक करण्यात आले आहे. या लोकांनी, आपण जे शिकत आहोत ते सत्य आहे की नाही याची खात्री करून घेण्यासाठी शास्त्रवचनांचे परीक्षण केले.​—प्रेषितांची कृत्ये १७:११.

२४ यहोवाविषयी आणखी शिकून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे बायबलचे परीक्षण करणे. ते इतर कोणत्याही पुस्तकापेक्षा वेगळे आहे. कोणत्या अर्थी? पुढील अध्यायात याविषयावर चर्चा करण्यात आली आहे.

^ परि. 15 देवाच्या नावाचा अर्थ आणि त्याचा उच्चार यासंबंधाने, १९५-७ पृष्ठांवरील परिशिष्टात अधिक माहिती दिली आहे.