व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय चार

येशू ख्रिस्त कोण आहे?

येशू ख्रिस्त कोण आहे?
  • येशूची खास भूमिका काय आहे?

  • तो कोठून आला?

  • त्याचे व्यक्तिमत्त्व कसे होते?

१, २. (क) एखाद्या नामवंत व्यक्तीचे नाव माहीत असण्याचा अर्थ त्याला खरोखर ओळखणे असा का होत नाही? (ख) येशूविषयी आज काय गोंधळ आहे?

जगात असंख्य नामवंत व्यक्ती आहेत. काही त्यांच्या समाजात, शहरात किंवा देशांत नामांकित आहेत. तर काही संपूर्ण जगभरात. परंतु, तुम्हाला एखाद्या नामवंत व्यक्तीचे केवळ नाव माहीत आहे याचा अर्थ तुम्ही त्या व्यक्तीला खरोखरच ओळखता असे नाही. कारण तुम्हाला त्या व्यक्तीच्या पार्श्वभूमीचे बारकावे, तिचे व्यक्तिमत्त्व कसे आहे हे माहीत नसते.

येशू ख्रिस्त सुमारे २,००० वर्षांपूर्वी या पृथ्वीवर होऊन गेला तरीसुद्धा संपूर्ण जगभरातील लोकांनी येशू ख्रिस्ताविषयी काही न काही माहिती ऐकली आहे. तरीपण तो कोण होता याबाबतीत पुष्कळजण गोंधळात आहेत. काही म्हणतात, की तो फक्त एक सत्‌पुरुष होता. काही म्हणतात, की तो केवळ एक संदेष्टा होता. दुसरे म्हणतात, की तो देव होता म्हणून त्याची उपासना केली पाहिजे. मग, त्याची उपासना केली पाहिजे का?

३. तुम्ही येशूविषयीचे सत्य जाणून घेणे महत्त्वाचे का आहे?

तुम्ही येशूविषयीचे सत्य जाणून घेणे महत्त्वाचे आहे. का? कारण बायबल म्हणते: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.” (योहान १७:३) होय, यहोवा देव आणि येशू ख्रिस्त यांच्याविषयीचे सत्य जाणून घेतल्याने आपल्याला परादीस पृथ्वीवर सार्वकालिक जीवन मिळू शकते. (योहान १४:६) शिवाय, आपण जीवन कसे व्यतीत केले पाहिजे, इतरांशी कसे वागले पाहिजे, याबाबतीत येशूने सर्वोत्तम उदाहरण मांडले. (योहान १३:​३४, ३५) या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायात, आपण देवाविषयी सत्य काय आहे याची चर्चा केली. आता आपण येशू ख्रिस्ताविषयी बायबल काय शिकवते त्याची चर्चा करू या.

वचनयुक्त मशीहा

४. “मशीहा” आणि “ख्रिस्त” या पदव्यांचा काय अर्थ होतो?

येशूचा जन्म होण्याच्या कित्येक वर्षांआधी, बायबलमध्ये देव ज्याला मशीहा किंवा ख्रिस्त म्हणून पाठवणार होता त्याच्याविषयी भाकीत करण्यात आले. “मशीहा” (हिब्रू शब्द) व “ख्रिस्त” (ग्रीक शब्द) या दोन्ही पदव्यांचा अर्थ “अभिषिक्त” असा होतो. याचा अर्थ एका खास पदवीसाठी देव त्याला नियुक्त अथवा अभिषिक्त करणार होता. या पुस्तकाच्या नंतरच्या अध्यायांत आपण देवाच्या अभिवचनांच्या पूर्ततेत मशीहाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेविषयी अधिक शिकणार आहोत. येशूला जाणून घेतल्यामुळे आजही आपल्याला कोणकोणते आशीर्वाद मिळू शकतात, हेही आपण शिकणार आहोत. येशूचा जन्म होण्याआधी पुष्कळ लोकांच्या मनात, ‘मशीहा कोण असेल?’ हा प्रश्न नक्कीच आला असावा.

५. येशूच्या शिष्यांची त्याच्याविषयी कोणती खात्री पटली होती?

सा.यु. पहिल्या शतकात, नासोरी येशूच्या शिष्यांची पूर्ण खात्री पटली होती की ज्याच्याविषयी भाकीत केले होते तो मशीहा हाच आहे. (योहान १:४१) शिमोन पेत्र नावाच्या एका शिष्याने तर येशूला उघडपणे म्हटले: “आपण ख्रिस्त, . . . आहा.” (मत्तय १६:१६) पण, येशू खरोखरच वचनयुक्त मशीहा आहे याची ते शिष्य खात्री कशी बाळगू शकले? आणि आज आपणही कशी बाळगू शकतो?

६. मशीहाला ओळखण्यासाठी यहोवाने विश्वासू जणांना कशाप्रकारे मदत दिली हे समजण्यासाठी उदाहरण द्या.

येशूआधी हयात असलेल्या देवाच्या संदेष्ट्यांनी मशीहाबद्दल अनेक बारकावे भाकीत केले. या बारकाव्यांच्या आधारे त्याची ओळख पटण्यास इतरांना मदत होणार होती. हे समजायला आपण या उदाहरणाचा विचार करू या: समजा तुम्हाला, लोकांची सतत वर्दळ असलेल्या एका बस स्टॅण्डवर, रेल्वे स्थानकावर किंवा विमानतळावर जाऊन अशा एका व्यक्तीला घरी घेऊन येण्यास सांगितले जाते, की जिला तुम्ही पूर्वी कधीच भेटला नाहीत. पण तुम्हाला त्या अनोळखी व्यक्तिविषयी थोडीफार माहिती दिली असेल तर, तुम्हाला या व्यक्तीला शोधून काढणे सोपे जाणार नाही का? तसेच, बायबलमधील संदेष्ट्यांद्वारे यहोवाने, मशीहा काय करेल आणि त्याला काय अनुभवावे लागेल त्याचे अगदी सविस्तर वर्णन दिले. या अनेक भविष्यवाण्यांच्या पूर्णतेवरून, विश्वासू जण मशीहाला स्पष्टरीत्या ओळखू शकणार होते.

७. येशूसंबंधी कोणत्या दोन भविष्यवाण्या पूर्ण झाल्या?

फक्त दोन उदाहरणांचा विचार करा. पहिले उदाहरण, ७०० पेक्षा अधिक वर्षांपूर्वी संदेष्टा मीखा याने वचनयुक्त मशीहाविषयी असे भाकीत केले की यहुदा राष्ट्रातील एका लहानशा गावी अर्थात बेथलेहेममध्ये त्याचा जन्म होईल. (मीखा ५:२) आणि प्रत्यक्षात येशूचा जन्म कोठे झाला? अगदी त्याच गावात! (मत्तय २:​१, ३-९) दुसरे उदाहरण, अनेक शतकांआधी दानीएल ९:२५ मधील भविष्यवाणीने, मशीहा सा.यु. २९ साली तो प्रकट होईल असे स्पष्टपणे दर्शवले. * या आणि इतर भविष्यवाणींची पूर्तता सिद्ध करते, की येशूच वचनयुक्त मशीहा होता.

बाप्तिस्म्याच्या वेळी येशू मशीहा किंवा ख्रिस्त बनला

८, ९. येशू मशीहा असल्याचा कोणता पुरावा त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळी स्पष्ट झाला?

येशू मशीहा आहे याचा आणखी एक पुरावा, सा.यु. २९ साल संपत आले तेव्हा घडलेल्या एका घटनेवरून मिळाला. येशू तेव्हा बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाकडे यार्देन नदीत बाप्तिस्मा घेण्यासाठी गेला. मशीहाला ओळखण्यासाठी यहोवाने योहानाला एक चिन्ह दिले होते. येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी योहानाने ते चिन्ह पाहिले. त्या प्रसंगी काय घडले याविषयी बायबल सांगते: “मग बािप्तस्मा घेतल्यावर येशू लागलाच पाण्यातून वर आला आणि पाहा, आकाश उघडले तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला, आणि पाहा, आकाशातून अशी वाणी झाली की, हा माझा ‘पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.’” (मत्तय ३:१६, १७) योहानाने जे पाहिले व जे ऐकले त्यावरून, येशूला देवाने पाठवले आहे, याबद्दल त्याच्या मनात कसलीच शंका उरली नाही. (योहान १:​३२-३४) ज्या दिवशी देवाचा पवित्र आत्मा किंवा कार्यकारी शक्ती येशूवर ओतण्यात आली त्या दिवशी तो मशीहा किंवा ख्रिस्त बनला; नेता व शासक म्हणून त्याला नियुक्त करण्यात आले.​—यशया ५५:४.

बायबल भविष्यवाणीची पूर्णता आणि खुद्द यहोवा देवाची साक्ष, स्पष्टपणे दाखवते की येशू हा वचनयुक्त मशीहा होता. पण बायबलमध्ये, येशू ख्रिस्ताविषयीच्या आणखी दोन महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे देखील दिली आहेत: तो कोठून आला, आणि त्याचे व्यक्तिमत्त्व कसे होते?

येशू कोठून आला?

१०. पृथ्वीवर येण्याआधी येशू कोठे अस्तित्वात होता, याविषयी बायबल काय शिकवते?

१० पृथ्वीवर येण्याआधी येशू स्वर्गात होता असे बायबल शिकवते. मीखाने भाकीत केले, की मशीहाचा जन्म बेथलेहेमात होईल आणि असेही म्हटले, की “त्याचा उद्‌भव प्राचीन काळापासून” होता. (मीखा ५:२) अनेक प्रसंगी स्वतः येशूने म्हटले, की पृथ्वीवर मानव म्हणून जन्म होण्याआधी तो स्वर्गात होता. (योहान ३:१३; ६:​३८, ६२; १७:​४, ५) स्वर्गात आत्मिक प्राणी या नात्याने येशूचा यहोवाबरोबर एक खास नातेसंबंध होता.

११. येशू यहोवाचा परमप्रिय पुत्र आहे, हे बायबल कसे दाखवते?

११ येशू यहोवाचा परमप्रिय पुत्र आहे. यासाठी कारण आहे. त्याला “सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे” असे म्हटले आहे कारण तो देवाच्या सृष्टीत सर्वात पहिला होता. * (कलस्सैकर १:​१५) आणखी एका कारणामुळे हा पुत्र प्रिय आहे. तो “एकुलता एक पुत्र” आहे. (योहान ३:१६) याचा अर्थ, येशूच असा आहे, की ज्याला स्वतः यहोवाने निर्माण केले. आणि यहोवाने फक्त येशूद्वारेच इतर गोष्टींची निर्मिती केली. (कलस्सैकर १:१६) शिवाय, येशूला “शब्द” म्हटले आहे. (योहान १:१४) यावरून आपल्याला समजते, की तो देवाच्या वतीने बोलला. आपल्या पित्याच्या इतर पुत्रांना मग ते आत्मिक असोत अथवा मानवी, त्यांना त्याने देवाचे संदेश व सूचना कळवल्या.

१२. ज्येष्ठ पुत्र देवाच्या बरोबरीचा नाही, हे आपल्याला कसे समजते?

१२ काहीजण विश्वास करतात त्याप्रमाणे हा ज्येष्ठ पुत्र देवाच्या बरोबरीचा आहे का? बायबल तर असे शिकवत नाही. मागच्या परिच्छेदांमध्ये आपण पाहिले, की पुत्राला निर्माण करण्यात आले आहे. म्हणजेच, त्याला सुरुवात आहे. परंतु यहोवा देवाला सुरुवातही नाही आणि अंतही नाही. (स्तोत्र ९०:२) एकुलत्या एका पुत्राने कधीही आपल्या पित्याच्या बरोबरीचे असण्याचा विचार देखील मनात आणला नाही. बायबल स्पष्टपणे शिकवते, की पिता पुत्रापेक्षा श्रेष्ठ आहे. (योहान १४:२८; १ करिंथकर ११:३) केवळ यहोवाच “सर्वसमर्थ देव” आहे. (उत्पत्ति १७:१) यास्तव, त्याच्या बरोबरीचे कोणी नाही. *

१३. बायबल जेव्हा पुत्राला “अदृश्य देवाचे प्रतिरूप” संबोधते तेव्हा त्याचा काय अर्थ होतो?

१३ यहोवा आणि त्याचा ज्येष्ठ पुत्र कोट्यवधी वर्षांपासून अर्थात चांदण्यांनी डवरलेले आकाश आणि पृथ्वी यांची निर्मिती होण्याच्या अनेकानेक वर्षांआधीपासून ते एकमेकांच्या निकट सहवासात होते. त्यांचे एकमेकांवर किती प्रेम असेल! (योहान ३:३५; १४:३१) हा प्रिय पुत्र अगदी आपल्या पित्याप्रमाणे होता. म्हणून बायबल त्याला “अदृश्य देवाचे प्रतिरूप” असे संबोधते. (कलस्सैकर १:१५) एक मुलगा आणि त्याचे वडील यांच्यात जसे बऱ्याच गोष्टीत साम्य असते तसेच येशूने आपल्या स्वर्गीय पित्याचे गुण व व्यक्तिमत्त्व हुबेहूब प्रदर्शित केले.

१४. यहोवाचा एकुलता एक पुत्र मानव म्हणून जन्माला कसा आला?

१४ यहोवाचा हा एकुलता एक पुत्र, अगदी आनंदाने स्वर्गातील आपले वास्तव्य सोडून मानव म्हणून पृथ्वीवर आला. पण तुम्ही विचार कराल, ‘एक आत्मिक प्राणी, मानव म्हणून कसा जन्माला आला?’ असे करण्यासाठी यहोवाने एक चमत्कार केला. त्याने स्वर्गातून आपल्या ज्येष्ठ पुत्राचे जीवन मरीया नावाच्या एका यहुदी कुमारिकेच्या गर्भाशयात स्थलांतरीत केले. यात कोणत्याही मानवी पित्याचा संबंध नव्हता. अशाप्रकारे मरीयेने एका परिपूर्ण पुत्राला जन्म दिला व त्याचे नाव येशू ठेवले.​—लूक १:​३०-३५.

येशूचे व्यक्तिमत्त्व कसे होते?

१५. येशूद्वारे आपण यहोवाला आणखी चांगल्याप्रकारे ओळखू शकतो, असे आपण का म्हणू शकतो?

१५ पृथ्वीवर असताना येशू जे बोलला आणि त्याने जी कार्ये केली त्यावरून आपल्याला त्याच्याविषयी आणखी माहिती मिळते. याहूनही महत्त्वाचे म्हणजे, येशूद्वारे आपण यहोवाला आणखी चांगल्याप्रकारे ओळखू शकतो. असे का? पुत्र आपल्या पित्याचे हुबेहूब अर्थात परिपूर्ण प्रतिरूप आहे, हे आठवते का तुम्हाला? म्हणूनच तर येशूने आपल्या शिष्यांपैकी एकाला असे म्हटले: “ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे.” (योहान १४:९) शुभवर्तमान म्हटली जाणारी बायबलमधील चार पुस्तके आपल्याला येशू ख्रिस्ताचे जीवन, त्याची कार्ये आणि त्याचे व्यक्तिमत्त्व यांच्याविषयी बरेच काही सांगतात. ही चार पुस्तके मत्तय, मार्क, लूक आणि योहान ही आहेत.

१६. येशूचा मुख्य संदेश काय होता, आणि त्याची शिकवण कोठून होती?

१६ येशूला “गुरुजी” म्हणून ओळखले जायचे. (योहान १:३८; १३:१३) त्याने काय शिकवले? त्याने प्रामुख्याने ‘राज्याच्या सुवार्तेचा’ अर्थात देवाच्या राज्याचा संदेश सांगितला. हे राज्य स्वर्गीय सरकार आहे जे संपूर्ण पृथ्वीवर राज्य करील आणि आज्ञाधारक मानवजातीवर अनंत आशीर्वादांचा वर्षाव करील. (मत्तय ४:२३) हा संदेश कोणाचा होता? स्वतः येशू याच्याविषयी म्हणाला: “माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठविले त्याची” अर्थात यहोवाची आहे. (योहान ७:१६) मानवांनी राज्याची सुवार्ता ऐकावी, अशी आपल्या पित्याची इच्छा आहे, हे येशूला माहीत होते. आठव्या अध्यायात आपण देवाचे राज्य आणि ते राज्य काय साध्य करील याविषयी अधिक शिकणार आहोत.

१७. येशू कुठे कुठे शिकवायचा, आणि लोकांना शिकवण्यासाठी तो इतका का झटला?

१७ येशू कुठे कुठे शिकवायचा? जेथेकोठे लोक भेटायचे तेथे​—ग्रामीण भागात, शहरात, गावांत, बाजारपेठेत, लोकांच्या घरी. लोकांनी आपल्याकडे यावे, अशी येशूने अपेक्षा केली नाही. तर तो त्यांच्याकडे गेला. (मार्क ६:५६; लूक १९:​५, ६) येशू इतका का झटायचा व त्याने आपला बहुतेक वेळ प्रचार व शिकवण्यात का खर्च केला? कारण त्याने असे करावे, ही देवाची इच्छा होती. येशूने नेहमी आपल्या पित्याची इच्छा पूर्ण केली. (योहान ८:​२८, २९) पण त्याने आणखी एका कारणासाठी प्रचार केला. त्याला भेटायला येणाऱ्या लोकसमूहाबद्दल त्याला कळवळा वाटायचा. (मत्तय ९:​३५, ३६) लोकांना देवाबद्दल आणि त्याच्या उद्देशांबद्दल ज्यांनी शिकवायला हवे होते त्या धार्मिक नेत्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते. लोकांनी राज्याचा संदेश ऐकणे किती अगत्याचे आहे हे येशूला ठाऊक होते.

१८. येशूचे कोणते गुण तुम्हाला खासकरून आकर्षक वाटतात?

१८ येशू स्वभावाने मायाळू होता, त्याला लोकांबद्दल कळकळ वाटायची. लोकांना दिसून आले, की आपण मदतीसाठी त्याच्याजवळ केव्हाही जाऊ शकतो. तो दयाळू होता. लहान मुलांनाही त्याच्याजवळ यायला संकोच वाटत नव्हता. (मार्क १०:​१३-१६) तो निःपक्षपाती होता. त्याला भ्रष्टाचार आणि अन्यायाचा वीट होता. (मत्तय २१:​१२, १३) त्याच्या काळात स्त्रियांचा कमी आदर केला जायचा, त्यांना फार कमी अधिकार दिले जायचे, पण येशूने त्यांना आदराने वागवले. (योहान ४:​९, २७) येशू खरोखरच नम्र होता. एके प्रसंगी, जे काम सहसा दास करीत ते त्याने केले; त्याने आपल्या शिष्यांचे पाय धुतले.

लोक जेथे कोठे भेटायचे तेथे येशू त्यांना प्रचार करायचा

१९. येशूला इतरांच्या गरजांची जाणीव होती, हे कोणत्या उदाहरणावरून दिसून येते?

१९ येशूला इतरांच्या गरजांची जाणीव होती. त्याने जेव्हा देवाच्या आत्म्याद्वारे चमत्कार करून लोकांना बरे केले तेव्हा हे खासकरून दिसून आले. (मत्तय १४:१४) उदाहरणार्थ, कुष्ठरोग झालेला एक मनुष्य येशूजवळ येऊन म्हणाला: “आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहा.” या मनुष्याच्या वेदना, त्याचे दुःख जणू काय आपल्याला होत आहे, असे येशूला जाणवले. त्याला त्याचा कळवळा आला आणि त्याने आपला हात पुढे करून त्याला स्पर्श करीत म्हटले: “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.” आणि हा मनुष्य बरा झाला! (मार्क १:​४०-४२) या मनुष्याला कसे वाटले असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता का?

शेवटपर्यंत विश्वासू

२०, २१. येशूने एकनिष्ठ आज्ञाधारकपणा दाखवण्याच्या बाबतीत उदाहरण कसे मांडले?

२० येशूने देवाला एकनिष्ठपणे आज्ञाधारक राहण्यात सर्वात श्रेष्ठ उदाहरण मांडले. तो सर्व परिस्थितीत आणि सर्व प्रकारच्या विरोधाच्या व दुःखाच्या प्रसंगी आपल्या पित्याला विश्वासू राहिला. सैतानाने आणलेल्या मोहांचा येशूने ठामपणे विरोध केला व तो यात यशस्वी ठरला. (मत्तय ४:​१-११) एकदा, येशूच्या काही नातेवाईकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. त्याला “वेड लागले आहे” असेही ते म्हणाले. (मार्क ३:२१) पण याचा येशूवर कसलाच परिणाम झाला नाही; तो देवाचे कार्य करीत राहिला. अपमान, शिवीगाळ सहन करावी लागली तरी त्याने आत्मसंयम बाळगला. त्याचा विरोध करणाऱ्यांचा त्याने कधी बदला घेण्याचा प्रयत्न केला नाही.​—१ पेत्र २:​२१-२३.

२१ येशूला त्याच्या शत्रूंच्या हातून क्रूर, यातनामय मृत्यू आला तेव्हा तो त्याच्या शेवटल्या श्वासापर्यंत विश्वासू राहिला. (फिलिप्पैकर २:८) मानवी जीवनाच्या शेवटल्या दिवशी त्याला काय काय सहन करावे लागले होते, याचा विचार करा. त्याला अटक करण्यात आली, खोट्या साक्षीदारांनी त्याच्यावर दोषारोप लावले, भ्रष्ट न्यायाधीशांनी त्याला शिक्षा ठोठावली, लोकसमूहाने त्याची थट्‌टा केली, सैनिकांनी त्याला छळले. खांबावर खिळ्यांनी ठोकलेले असताना शेवटचा श्वास घेत तो ओरडला: “पूर्ण झाले आहे.” (योहान १९:३०) परंतु येशूला मरून तीन दिवस झाल्यावर त्याच्या स्वर्गीय पित्याने त्याला पुन्हा आत्मिक जीवन देऊन पुनरुत्थित केले. (१ पेत्र ३:१८) काही आठवड्यांनंतर, तो पुन्हा स्वर्गात गेला. तेथे तो “देवाच्या उजवीकडे बसला” आणि राज्याधिकार मिळण्याची प्रतीक्षा करू लागला.​—इब्री लोकांस १०:१२, १३.

२२. मृत्यूपर्यंत विश्वासू राहून येशूने काय साध्य केले?

२२ मृत्यूपर्यंत विश्वासू राहून येशूने काय साध्य केले? येशूच्या मृत्यूमुळे आपल्यासाठी, परादीस पृथ्वीवर सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याची संधी खुली झाली आहे. यहोवाचा हाच मूळ उद्देश होता. येशूच्या मृत्यूमुळे हे कसे शक्य होते त्याची चर्चा पुढील अध्यायात केलेली आहे.

^ परि. 7 येशूसंबंधी पूर्ण झालेल्या दानीएलाच्या भविष्यवाणीच्या स्पष्टीकरणासाठी पृष्ठे १९७-९ वरील परिशिष्ट पाहा.

^ परि. 11 यहोवाला पिता म्हटले आहे कारण तो निर्माणकर्ता आहे. (यशया ६४:८) येशूला देवाने निर्माण केले असल्यामुळे त्याला देवाचा पुत्र म्हटले आहे. याच कारणांमुळे इतर आत्मिक प्राण्यांना आणि पहिला मनुष्य आदाम यालाही देवाचा पुत्र म्हटले आहे.​—ईयोब १:६; लूक ३:३८.

^ परि. 12 ज्येष्ठ पुत्र देवाच्या बरोबरीचा नाही, याच्या आणखी पुराव्यासाठी पृष्ठे २०१-४ वरील परिशिष्ट पाहा.