व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय आठ

देवाचे राज्य काय आहे?

देवाचे राज्य काय आहे?
  • देवाच्या राज्याविषयी बायबल आपल्याला काय सांगते?

  • देवाचे राज्य काय करणार आहे?

  • हे राज्य पृथ्वीवर देवाची इच्छा केव्हा पूर्ण करणार आहे?

१. आपण कोणत्या सुप्रसिद्ध प्रार्थनेची चर्चा करणार आहोत?

जगभरातील लक्षावधी लोकांना एक प्रार्थना माहीत आहे, जिला ‘हे आमच्या स्वर्गातील बापा’, किंवा प्रभूची प्रार्थना असे म्हटले जाते. प्रार्थनेचा नमुना म्हणून स्वतः येशू ख्रिस्ताने ती शिकवली होती. ही प्रार्थना अतिशय अर्थभरित आहे. या प्रार्थनेच्या पहिल्या तीन विनंत्यांची चर्चा केल्यामुळे तुम्हाला, बायबल नेमके काय शिकवते त्याविषयी अधिक शिकायला मिळेल.

२. येशूने ज्या गोष्टींसाठी प्रार्थना करायला शिकवले त्यांपैकी तीन गोष्टी कोणत्या होत्या?

या आदर्श प्रार्थनेच्या सुरुवातीला येशूने आपल्या श्रोत्यांना अशी सूचना दिली: “ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा: हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.” (मत्तय ६:९-१३) या तीन विनंत्यांचा काय अर्थ होतो?

३. देवाच्या राज्याविषयी आपल्याला काय माहीत असणे महत्त्वाचे आहे?

आपण देवाचे नाव यहोवा याविषयी आधीच बरेच शिकलो आहोत. तसेच देवाची काय इच्छा आहे, म्हणजे त्याने मानवजातीसाठी काय केले व पुढे काय करणार आहे याविषयी देखील काही प्रमाणात चर्चा केली आहे. पण येशूने जेव्हा आपल्याला “तुझे राज्य येवो,” अशी प्रार्थना करायला शिकवले तेव्हा तो काय सूचित करत होता? देवाचे राज्य काय आहे? ते राज्य आल्याने देवाचे नाव पवित्र कसे होईल? आणि या राज्याच्या येण्याचा देवाची इच्छा पूर्ण होण्याशी काय संबंध आहे?

देवाचे राज्य काय आहे

४. देवाचे राज्य काय आहे आणि या राज्याचा राजा कोण आहे?

देवाचे राज्य एक सरकार आहे जे यहोवा देवाने स्थापित केले आहे. आणि त्याने एक राजा देखील निवडला आहे. कोण आहे हा राजा? येशू ख्रिस्त. राजा येशू सर्व मानवी शासकांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि त्याला “राजांचा राजा व प्रभूंचा प्रभु” म्हटले आहे. (१ तीमथ्य ६:१५) कोणताही मानवी शासक, किंबहुना सर्वात चांगला शासकही जे करू शकतो त्यापेक्षा कितीतरी पटीने मानवांचे कल्याण करण्याची ताकद येशूकडे आहे.

५. देवाचे राज्य कोठून राज्य करेल आणि ते कोणावर राज्य करेल?

देवाचे राज्य कोठून राज्य करेल? शिवाय, सध्या येशू कोठे आहे? तुम्हाला हे शिकल्याचे आठवत असेल, की त्याला एका खांबावर ठार मारण्यात आले आणि नंतर त्याचे पुनरुत्थान झाले. त्यानंतर काही दिवसांनी तो स्वर्गात पुन्हा गेला. (प्रेषितांची कृत्ये २:३३) तेव्हा, देवाचे राज्य तिथेच अर्थात स्वर्गात आहे. म्हणूनच बायबलमध्ये त्याला ‘स्वर्गीय राज्य’ म्हटले आहे. (२ तीमथ्य ४:१८) देवाचे राज्य स्वर्गात असले तरी, ते पृथ्वीवर राज्य करील.​—प्रकटीकरण ११:१५.

६, ७. कोणत्या कारणामुळे येशू एक सर्वोत्तम राजा आहे?

कोणत्या कारणामुळे येशू एक सर्वोत्तम राजा आहे? एक कारण आहे, की तो केव्हाही मरणार नाही. मानवी राजांबरोबर येशूची तुलना करीत बायबल त्याच्याविषयी म्हणते, की त्या “एकालाच अमरत्व आहे, तो अगम्य प्रकाशात राहतो.” (१ तीमथ्य ६:१५) याचा अर्थ, लोकांच्या भल्याकरता येशू जे काही करेल ते कायम राहील. आणि आपल्याला खात्री आहे, की तो लोकांच्या फायद्यास्तव पुष्कळ गोष्टी करेल.

येशूविषयीच्या या भविष्यवाणीवर जरा विचार करा: “परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याजवर राहील; परमेश्वराचे भय त्याला सुगंधमय होईल; तो डोळ्यांनी पाहील तेवढ्यावरूनच न्याय करणार नाही. कानांनी ऐकेल तेवढ्यावरूनच न्याय करणार नाही, तर तो दुबळ्यांचा न्याय यथार्थतेने करील, पृथ्वीवरील दीनांच्या वादाचा यथार्थ निर्णय करील.” (यशया ११:२-४) या वचनांवरून दिसून येते, की येशू पृथ्वीवरील लोकांवर धार्मिक आणि दयाळू राजा म्हणून राज्य करणार आहे. अशा राजाच्या राज्यात तुम्हाला राहायला आवडेल का?

८. येशूसोबत कोण राज्य करतील?

देवाच्या राज्याविषयीचे आणखी एक सत्य म्हणजे येशू एकटाच राज्य करणार नाही. त्याच्याबरोबर सहराजेही असतील. जसे की प्रेषित पौलाने तीमथ्याला सांगितले: “जर आपण धीराने सोसतो, तर त्याच्याबरोबर राज्यहि करू.” (२ तीमथ्य २:१२) होय, पौल, तीमथ्य आणि देवाने निवडलेले इतर विश्वासू जन येशूबरोबर स्वर्गीय राज्यात राज्य करतील. हा अनोखा विशेषाधिकार किती लोकांना मिळेल?

९. येशूबरोबर किती जण राज्य करतील, आणि देवाने त्यांची निवड करायला केव्हा सुरू केले?

या पुस्तकाच्या ७ व्या अध्यायात प्रेषित योहानाला एक दृष्टान्त देण्यात आल्याचे दाखवले आहे. या दृष्टान्तात, “कोकरा सीयोन डोंगरावर उभा राहिलेला [त्याच्या] दृष्टीस पडला; त्याच्याबरोबर त्याचे नाव व त्याच्या पित्याचे नाव कपाळावर लिहिलेले एक लक्ष चव्वेचाळीस हजार इसम होते,” असे त्याने पाहिले. हे १,४४,००० इसम कोण आहेत? योहानच याविषयी सांगतो: “जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याच्यामागे जाणारे ते हे आहेत. ते देवासाठी व कोकऱ्यासाठी प्रथमफळ असे माणसातून विकत घेतलेले आहेत.” (प्रकटीकरण १४:१,) होय, ते येशू ख्रिस्ताचे विश्वासू अनुयायी आहेत व त्यांना त्याच्याबरोबर स्वर्गात राज्य करण्यासाठी खास निवडण्यात आले आहे. मृत्यूतून स्वर्गीय जीवनासाठी पुनरुत्थित केल्यानंतर ते येशूसोबत “राज्य व याजक” म्हणून “पृथ्वीवर राज्य करितील.” (प्रकटीकरण ५:१०) १,४४,००० ही संख्या पूर्ण होण्याकरता प्रेषितांच्या दिवसांपासूनच देवाने विश्वासू ख्रिश्चनांची निवड करायला सुरू केले आहे.

१०. येशूने व १,४४,००० जणांनी मानवजातीवर राज्य करण्याची व्यवस्था प्रेमळ आहे असे आपण का म्हणतो?

१० येशू आणि १,४४,००० जण मानवजातीवर राज्य करतील, ही खरोखरच खूप प्रेमळ व्यवस्था आहे. याचे एक कारण म्हणजे येशूला मानव असण्याचा व दुःख सहन करण्याचा काय अर्थ होतो हे माहीत आहे. पौलाने म्हटले, की येशू “आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूति वाटत नाही, असा आपला प्रमुख याजक नाही, तर सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता; तरी निष्पाप राहिला.” (इब्री लोकांस ४:१५; ५:८) त्याच्या सहराजांनी देखील मानव असताना पुष्कळ दुःख व हालअपेष्टा सहन केल्या आहेत. शिवाय, अपरिपूर्णतेशी देखील ते झगडले आहेत व सर्वप्रकारच्या आजारांचा त्यांनी सामना केला आहे. निश्‍चितच मानवजात तोंड देत असलेल्या समस्या त्यांना चांगल्याप्रकारे समजतील.

देवाचे राज्य काय करील?

११. देवाची इच्छा स्वर्गातही पूर्ण होवो, अशी आपल्या शिष्यांनी प्रार्थना केली पाहिजे, असे येशू का म्हणाला?

११ येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, की ते जेव्हा देवाचे राज्य येवो, अशी प्रार्थना करतील तेव्हा त्यांनी, “जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो,” अशी देखील प्रार्थना करावी. देव स्वर्गात आहे आणि तेथे विश्वासू देवदूत नेहमी त्याची इच्छा पूर्ण करतात. पण या पुस्तकाच्या तिसऱ्या अध्यायात आपण शिकलो, की एका दुष्ट देवदूताने देवाची इच्छा पूर्ण होण्यास अडथळा आणल्यामुळे आदाम व हव्वेने पाप केले. दहाव्या अध्यायात आपण या दुष्ट देवदूताविषयी बायबल काय शिकवते ते पाहणार आहोत. या दुष्ट देवदूताला आपण दियाबल सैतान म्हणून ओळखतो. सैतान आणि त्याचे अनुकरण करण्याची निवड केलेल्या इतर आत्मिक देवदूतांना, ज्यांना दुरात्मे म्हटले जाते त्यांना काही काळपर्यंत स्वर्गात राहण्याची अनुमती देण्यात आली होती. त्यामुळे, या काळादरम्यान स्वर्गात सर्वच आत्मिक प्राणी देवाच्या इच्छेप्रमाणे करत नव्हते. देवाच्या राज्याने शासन सुरू केल्यावर हे सर्वकाही बदलणार होते. नव्याने गादीवर आलेला राजा येशू ख्रिस्त सैतानाबरोबर युद्ध करणार होता.​—प्रकटीकरण १२:​७-९.

१२. प्रकटीकरण १२:१० मध्ये कोणत्या दोन महत्त्वपूर्ण घटनांचे वर्णन करण्यात आले आहे?

१२ स्वर्गात काय होणार होते त्याचे वर्णन पुढील भविष्यसूचक शब्दांवरून मिळते: “मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली; ती म्हणाली: ‘आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही प्रगट झाली आहेत; कारण आमच्या बंधूंना दोष देणारा आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा, खाली टाकण्यात आला आहे.’” (प्रकटीकरण १२:१०) या बायबल वचनात वर्णन केलेल्या दोन महत्त्वपूर्ण घटना तुमच्या लक्षात आल्या का? एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजे, ज्याचा राजा येशू ख्रिस्त आहे ते देवाचे राज्य शासन सुरू करते. दुसरी घटना म्हणजे, सैतानाला स्वर्गातून खाली पृथ्वीवर टाकले जाते.

१३. सैतानाला स्वर्गातून हाकलून लावण्यात आल्यामुळे काय झाले आहे?

१३ या दोन घटनांचा परिणाम काय झाला आहे? स्वर्गात जे घडले त्याविषयी आपण असे वाचतो: “म्हणून स्वर्गांनो व त्यात राहणाऱ्यांनो, उल्लास करा.” (प्रकटीकरण १२:१२) होय, स्वर्गात विश्वासू देवदूत उल्लास करतात कारण सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांना स्वर्गातून हाकलून लावण्यात आले आहे आणि स्वर्गात असलेले सर्वजण यहोवा देवाशी विश्वासू आहेत. तेथे संपूर्ण, अखंड शांती व एकता आहे. आता स्वर्गात देवाची इच्छा पूर्ण होत आहे.

सैतानाला व त्याच्या दुरात्म्यांना स्वर्गातून बाहेर टाकण्यात आल्यामुळे पृथ्वीवर अनर्थ ओढवला आहे. अशाप्रकारच्या सर्व पीडांचा लवकरच अंत होईल

१४. सैतानाला पृथ्वीवर फेकून देण्यात आल्यामुळे काय घडले आहे?

१४ पण मग पृथ्वीविषयी काय? बायबल म्हणते: “पृथ्वी व समुद्र ह्यांवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हाकडे आला आहे.” (प्रकटीकरण १२:१२) सैतानाला स्वर्गातून हाकलून लावण्यात आल्यामुळे व आता त्याचा खूप कमी वेळ उरल्यामुळे तो अतिशय क्रोधित झाला आहे. क्रोधामुळे तो पृथ्वीवर पीडा, किंवा “अनर्थ” आणत आहे. पुढील अध्यायात आपण त्या ‘अनर्थांविषयी’ आणखी शिकू या. हे लक्षात ठेवून आपण हा प्रश्न विचारू शकतो, की देवाचे राज्य पृथ्वीवर देवाची इच्छा कशी काय पूर्ण करेल?

१५. पृथ्वीबद्दल देवाची इच्छा काय आहे?

१५ तुम्हाला आठवते का, पृथ्वीबद्दल देवाची काय इच्छा आहे? याविषयी तुम्ही तिसऱ्या अध्यायात शिकला होता, नाही का? एदेनमध्ये देवाने दाखवून दिले, की ही पृथ्वी परादीस बनावी आणि ती चिरकाल जगणाऱ्या धार्मिक मनुष्यांनी भरावी, अशी त्याची इच्छा आहे. सैतानाने आदाम आणि हव्वेला पाप करायला लावले. यामुळे पृथ्वीबद्दल देवाची इच्छा पूर्ण होण्यात जरा उशीर झाला खरा परंतु त्याची इच्छा बदलली नाही. “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील” हा यहोवाचा उद्देश अजूनही आहे. (स्तोत्र ३७:२९) आणि देवाचे राज्य हा उद्देश पूर्ण करेल. ते कसे?

१६, १७. दानीएल २:४४ आपल्याला देवाच्या राज्याविषयी काय सांगते?

१६ दानीएल २:४४ मधील भविष्यवाणीचा विचार करा. तेथे आपण असे वाचतो: “त्या राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसऱ्याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.” ही भविष्यवाणी आपल्याला देवाच्या राज्याविषयी काय सांगते?

१७ एक गोष्ट म्हणजे, देवाचे राज्य “त्या राजांच्या अमदानीत” अर्थात इतर राज्ये अस्तित्वात असतानाच स्थापन होईल. दुसरी गोष्ट म्हणजे, हे राज्य सर्वकाळ टिकेल. त्यावर कोणी कब्जा करणार नाही किंवा इतर कोणते सरकार त्याची जागा घेणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे, देवाचे राज्य आणि जगाच्या राज्यांमध्ये लढाई होईल. देवाच्या राज्याचा विजय होईल. आणि शेवटी, तेच एकमेव सरकार मानवजातीवर राज्य करील. मग मानव एका उत्तम शासनाच्या अधीन राहण्याचा आनंद अनुभवतील, जो त्यांनी पूर्वी कधीही अनुभवला नव्हता.

१८. देवाचे राज्य आणि जगातील सरकारे यांच्यामध्ये होणाऱ्या शेवटल्या लढाईचे नाव काय आहे?

१८ देवाचे राज्य आणि जगाच्या सरकारांमध्ये होणाऱ्या युद्धाविषयी बायबलमध्ये बरेच काही सांगितले आहे. उदाहरणार्थ, बायबलची शिकवण अशी आहे की अंत जसजसा जवळ येईल तसतसे दुरात्मे “संपूर्ण जगातील राजांस” फसवण्यासाठी अफवा पसरवतील. का? ‘सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी . . . [त्यांना] एकत्र करण्यासाठी.’ पृथ्वीवरील राजांना “इब्री भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी एकत्र केले” जाईल. (प्रकटीकरण १६:१४, १६) या दोन वचनात सांगितल्याप्रमाणे, मानवी सरकारे आणि देवाचे राज्य यांच्यामध्ये होणाऱ्या शेवटल्या लढाईला हर्मगिदोन म्हटले आहे.

१९, २०. कोणत्या कारणांमुळे आज देवाची इच्छा पृथ्वीवर पूर्ण होत नाही?

१९ हर्मगिदोनाद्वारे देवाचे राज्य काय साध्य करील? पृथ्वीबद्दल देवाची काय इच्छा आहे, याचा पुन्हा विचार करा. यहोवा देवाचा उद्देश आहे की या पृथ्वीवर धार्मिक, परिपूर्ण मानवजातीने वस्ती करावी व तिने बागेसमान परादिसात त्याची सेवा करावी. पण कोणत्या कारणामुळे आज या उद्देशाची पूर्ती होत नाही? एक कारण, आपण पापी आहोत, आपण आजारी पडतो व मरतो. पण पाचव्या अध्यायात आपण शिकलो, की आपण सदासर्वकाळ जिवंत राहावे म्हणून येशू आपल्यासाठी मरण पावला. तुम्हाला कदाचित योहानाच्या शुभवर्तमानातील शब्द आठवत असतील जेथे म्हटले आहे: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.”​—योहान ३:१६.

२० दुसरे कारण, पुष्कळ लोक दुष्कृत्ये करतात. ते लबाडी, फसवाफसवी करतात आणि अनैतिक कृत्ये करतात. त्यांना देवाच्या इच्छेनुसार वागायला आवडत नाही. दुष्कृत्ये करणाऱ्या अशा लोकांचा हर्मगिदोन या देवाच्या लढाईत नाश होईल. (स्तोत्र ३७:१०) पृथ्वीवर देवाची इच्छा पूर्ण का होत नाही यासाठी आणखी एक कारण आहे, ते म्हणजे सरकारे लोकांना देवाच्या इच्छेनुसार वागण्याचे प्रोत्साहन देत नाहीत. पुष्कळ सरकारे दुबळी, क्रूर व भ्रष्ट बनली आहेत. बायबल अगदी उघडपणे सांगते: “एक मनुष्य दुसऱ्यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करितो.”​—उपदेशक ८:९.

२१. देवाचे राज्य पृथ्वीवर त्याची इच्छा पूर्ण कसे करेल?

२१ हर्मगिदोनानंतर, मानवजातीवर एकच सरकार अर्थात देवाचे राज्य शासन करील. हे राज्य देवाची इच्छा पूर्ण करील आणि अद्‌भुत आशीर्वाद आणेल. जसे की, ते सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांना काढून टाकेल. (प्रकटीकरण २०:​१-३) त्यानंतर येशूच्या बलिदानाचे फायदे लागू केले जातील. यामुळे विश्वासू मानव आजारी पडणार नाहीत, मरण पावणार नाहीत. उलट, देवाच्या राज्य शासनाखाली ते सदासर्वकाळ जिवंत राहतील. (प्रकटीकरण २२:​१-३) पृथ्वीला परादीस बनवले जाईल. अशाप्रकारे, हे देवाचे राज्य पृथ्वीवर त्याची इच्छा पूर्ण करील आणि त्याचे नाव पवित्र करील. म्हणजे काय? म्हणजे, यहोवाच्या राज्यात प्रत्येक व्यक्ती त्याच्या नावाचा आदर करेल.

देवाचे राज्य आपला कारभार केव्हा सुरू करेल?

२२. येशू पृथ्वीवर होता तेव्हा किंवा त्याचे पुनरुत्थान झाल्यानंतर लगेच देवाचे राज्य आले नाही हे आपल्याला कशावरून समजते?

२२ येशूने आपल्या अनुयायांना, “तुझे राज्य येवो,” अशी प्रार्थना करायला शिकवले तेव्हा देवाचे राज्य अद्याप आले नव्हते हे स्पष्ट आहे. मग येशू स्वर्गात गेला तेव्हा आले का? नाही. कारण पेत्र आणि पौल या दोघांनी म्हटले, की येशूचे पुनरुत्थान झाल्यानंतर स्तोत्र ११०:१ मधील भविष्यवाणी त्याच्याबाबतीत पूर्ण झाली. त्या वचनात म्हटले आहे: “माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो, ‘मी तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस.’” (प्रेषितांची कृत्ये २:३२-३५; इब्री लोकांस १०:१२, १३) तर हा एक प्रतिक्षेचा काळ होता.

देवाच्या राज्य शासनात, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही देवाची इच्छा पूर्ण केली जाईल

२३. (क) देवाचे राज्य शासन केव्हा सुरू झाले? (ब) पुढील अध्यायात कशाची चर्चा केली जाईल?

२३ पण मग हा प्रतिक्षेचा काळ किती मोठा होता? एकोणीसाव्या शतकादरम्यान प्रामाणिक बायबल विद्यार्थ्यांनी वर्षांची मोजणी करून असे सांगितले, की हा प्रतिक्षेचा काळ १९१४ मध्ये समाप्त होईल. (या तारखेविषयी, पृष्ठे २१५-१८ वरील परिशिष्ट पाहा.) या प्रामाणिक बायबल विद्यार्थ्यांनी काढलेला अंदाज बरोबर होता याला, १९१४ मध्ये जागतिक पातळीवर सुरू झालेल्या घटना पुष्टी देतात. बायबल भविष्यवाणीची पूर्णता दाखवून देते, की १९१४ मध्ये येशू राजा बनला आणि तेव्हा देवाच्या स्वर्गीय राज्याचे शासन सुरू झाले. म्हणजे, आता आपण सैतानाच्या उरलेल्या ‘त्या थोड्या काळादरम्यान’ जगत आहोत. (प्रकटीकरण १२:१२; स्तोत्र ११०:२) देवाचे राज्य, पृथ्वीवर त्याची इच्छा पूर्ण करण्यास लवकरच कार्य करील, असे आपण पूर्ण खात्रीनिशी म्हणू शकतो. तुम्हाला ही बातमी आश्चर्यकारक वाटते का? हे खरे आहे, असे तुम्ही मानता का? पुढील अध्यायात तुम्हाला शिकायला मिळेल, की बायबल खरोखरच या गोष्टी शिकवते.