व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय दहा

आत्मिक प्राणी​—आपल्यावर यांचा काय प्रभाव आहे

आत्मिक प्राणी​—आपल्यावर यांचा काय प्रभाव आहे
  • देवदूत लोकांची मदत करतात का?

  • दुरात्म्यांनी लोकांवर कसा प्रभाव पाडला आहे?

  • आपण दुरात्म्यांचे भय बाळगले पाहिजे का?

१. आपण देवदूतांविषयी का शिकून घेतले पाहिजे?

एखाद्या व्यक्तिशी आपण परिचित होतो, तेव्हा तिच्या कुटुंबाविषयीही आपण थोडीफार माहिती करून घेतो. तसेच यहोवा देवाशी परिचित होताना आपण, स्वर्गातील त्याच्या कुटुंबाचे भाग असलेल्या देवदूतांविषयी देखील चांगल्याप्रकारे माहीत करून घेतले पाहिजे. बायबल या देवदूतांना ‘देवकुमार’ म्हणते. (ईयोब ३८:७) या देवकुमारांची देवाच्या उद्देशात काय भूमिका आहे? मानव इतिहासात त्यांचीही भूमिका होती का? तुमच्या जीवनावर देवदूतांचा प्रभाव आहे का? असल्यास, तो कसा?

२. देवदूत कोठून आले, आणि किती देवदूत आहेत?

बायबलमध्ये अनेकदा देवदूतांचा उल्लेख करण्यात आला आहे. यांतील काही उल्लेखांचा आपण विचार करू या जेणेकरून आपल्याला देवदूतांविषयी आणखी शिकता येईल. देवदूत आले कोठून? कलस्सैकर १:१६ म्हणते: “आकाशात व पृथ्वीवर असलेले, . . . सर्व काही त्याच्याद्वारे [येशू ख्रिस्ताद्वारे] . . . निर्माण झाले आहे.” यास्तव, देवदूत म्हटल्या जाणाऱ्या प्रत्येक आत्मिक प्राण्याला यहोवा देवाने आपल्या ज्येष्ठ पुत्राद्वारे निर्माण केले. किती देवदूत आहेत? बायबल म्हणते, की कोट्यवधी देवदूतांना निर्माण करण्यात आले, आणि हे सर्व शक्तिशाली आहेत.​—स्तोत्र १०३:२०. *

३. ईयोब ३८:​४-७ मध्ये आपण देवदूतांविषयी काय वाचतो?

देवाचे वचन बायबल आपल्याला सांगते, की पृथ्वीचा पाया रचण्यात आला तेव्हा “देवाच्या मुलांनी हर्षनाद केला.” (ईयोब ३८:४-७, पं.र.भा.) यावरून कळते की मानवाची आणि पृथ्वीचीही निर्मिती होण्याआधी बऱ्याच काळापासून देवदूत अस्तित्वात आहेत. बायबलमधील या उताऱ्यावरून हेही दिसते, की देवदूतांना भावना आहेत. कारण या उताऱ्यात म्हटले आहे, की त्यांनी “हर्षनाद केला.” त्यात असेही म्हटले आहे, की “देवाच्या मुलांनी” एकत्र मिळून जयजयकार केला. त्या वेळी सर्व देवदूत यहोवा देवाची सेवा करणाऱ्या एका संयुक्त कुटुंबाचा भाग होते.

देवदूतांचा पाठिंबा आणि संरक्षण

४. विश्वासू देवदूतांना मानवांच्या कल्याणाची काळजी आहे, हे बायबलमध्ये कशाप्रकारे दाखवले आहे?

पहिल्या मानवांच्या निर्मितीच्यावेळी हे विश्वासू आत्मिक प्राणी उपस्थित होते. तेव्हापासून त्यांनी वाढत चाललेल्या मानवी कुटुंबात आणि देवाच्या उद्देशाच्या पूर्णतेत रस घेतला आहे. (नीतिसूत्रे ८:​३०, ३१; १ पेत्र १:​११, १२) परंतु त्यांनी पाहिले, की जसजशी वर्षे सरत गेली तसतसे मानवी कुटुंबातील बहुतेकांनी त्यांच्या प्रेमळ निर्माणकर्त्याची सेवा करण्याचे सोडून दिले. हे पाहून या विश्वासू देवदूतांना अतिशय दुःख झाले. पण जेव्हा एक मनुष्य यहोवाकडे पुन्हा येतो तेव्हा “देवाच्या दूतांसमोर आनंद होतो.” (लूक १५:१०) देवाची सेवा करणाऱ्यांच्या कल्याणाची देवदूतांना मनापासून काळजी वाटत असल्यामुळेच तर यहोवाने पृथ्वीवरील आपल्या विश्वासू सेवकांना बळ देण्याकरता व त्यांचे संरक्षण करण्याकरता वारंवार त्यांचा उपयोग केला. (इब्री लोकांस १:​७, १४) काही उदाहरणांचा विचार करा.

“माझ्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सिंहांची तोंडे बंद केली आहेत.”—दानीएल ६:२२

५. देवदूतांनी साहाय्य दिल्याची कोणती उदाहरणे बायबलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात?

दोन देवदूतांनी धार्मिक मनुष्य लोट आणि त्याच्या मुलींना सदोम व गमोरा या दुष्ट नगराबाहेर काढून त्यांना नाशातून वाचवले. (उत्पत्ति १९:​१५, १६) यानंतर अनेक शतकांनंतर, संदेष्टा दानीएल याला सिंहांच्या एका गुहेत फेकण्यात आले. परंतु तो वाचला आणि म्हणाला: “माझ्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सिंहांची तोंडे बंद केली आहेत.” (दानीएल ६:२२) सा.यु. पहिल्या शतकात, एका देवदूताने प्रेषित पेत्राला एका तुरुंगातून बाहेर काढले. (प्रेषितांची कृत्ये १२:​६-११) शिवाय, येशूने पृथ्वीवर सेवा सुरू केली तेव्हा देवदूतांनी त्याला पाठिंबा दिला. (मार्क १:१३) येशूच्या मृत्यूच्या काही काळाआधी, एक देवदूत त्याच्यासमोर प्रकट झाला आणि त्याने त्याला ‘शक्ती दिली.’ (लूक २२:४३) येशूच्या जीवनाच्या त्या महत्त्वपूर्ण क्षणी देवदूतांनी दिलेल्या साहाय्यामुळे त्याला किती दिलासा मिळाला असेल!

६. (क) देवदूत आज देवाच्या लोकांचे संरक्षण कसे करतात? (ख) आपण कोणत्या प्रश्नांवर विचार करणार आहोत?

आज, पृथ्वीवरील देवाच्या लोकांसमोर दृश्यरूपात देवदूत प्रकट होत नाहीत. पण, अदृश्यरूपात देवाचे हे शक्तिशाली देवदूत आजही त्याच्या लोकांचे, खासकरून आध्यात्मिकरीत्या धोकादायक असलेल्या परिस्थितीत संरक्षण करतात. बायबल म्हणते: “परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांसभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करितो.” (स्तोत्र ३४:७) या वचनातून आपल्याला सांत्वन का मिळते? कारण, आपला नाश करू पाहणारे दुष्ट आत्मिक प्राणी आहेत. ते कोण आहेत? ते कोठून आले? ते आपल्याला इजा पोहंचवण्याचा कसा प्रयत्न करतात? या प्रश्नांची उत्तरे मिळण्याकरता आपण, मानव इतिहासाच्या अगदी सुरुवातीला जे घडले त्याचा थोडा विचार करू या.

आपले शत्रू असलेले आत्मिक प्राणी

७. लोकांना देवापासून दूर नेण्यात सैतानाला कितपत यश मिळाले आहे?

या पुस्तकाच्या तिसऱ्या अध्यायात आपण शिकलो, की एका देवदूताने आपल्या मनात, इतरांवर राज्य करण्याची इच्छा उत्पन्न केली आणि अशाप्रकारे तो देवाचा विरोधी बनला. याच देवदूताला नंतर दियाबल सैतान हे नाव पडले. (प्रकटीकरण १२:९) हव्वेला फसवल्यानंतर १,६०० वर्षांच्या काळात, हाबेल, हनोख व नोहा यांच्यासारख्या फार कमी विश्वासू जनांना वगळता, बाकीच्या जवळजवळ सर्वच मानवांना देवापासून दूर नेण्यात सैतान यशस्वी झाला.​—इब्री लोकांस ११:​४, ५, ७.

८. (क) काही देवदूत दुरात्मे कसे बनले? (ख) नोहाच्या दिवसांत आलेल्या जलप्रलयातून वाचण्यासाठी दुरात्म्यांना काय करावे लागले?

नोहाच्या दिवसांत, इतर देवदूतांनी यहोवाविरुद्ध बंड पुकारले. त्यांनी, देवाच्या स्वर्गीय कुटुंबातील स्थान सोडले. मानवांसारखे शरीर धारण करून ते पृथ्वीवर आले. का? उत्पत्ति ६:२ मध्ये आपण असे वाचतो: “मानवकन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले, व त्यातल्या ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या.” पण यहोवा देवाने या देवदूतांचे अशाप्रकारचे वागणे आणि यामुळे मानवजातीची भ्रष्टता खपवून घेतली नाही. त्याने पृथ्वीवर एका जलप्रलयाद्वारे सर्व दुष्ट मनुष्यांचा नाश केला. फक्त त्याच्या विश्वासू सेवकांना त्याने वाचवले. (उत्पत्ति ७:​१७, २३) तेव्हा या बंडखोर देवदूतांनी किंवा दुरात्म्यांनी, आपल्या दैहिक शरीराचा त्याग केला आणि ते स्वर्गात पुन्हा आत्मिक प्राणी म्हणून गेले. त्यांनी दियाबलाची कड घेतल्यामुळे दियाबल त्यांचा अर्थात ‘भूतांचा अधिपती’ झाला.​—मत्तय ९:३४.

९. (क) दुरात्मे जेव्हा स्वर्गात पुन्हा गेले तेव्हा काय घडले? (ख) दुरात्म्यांच्या संबंधाने आपण कशावर विचार करणार आहोत?

हे आज्ञाभंजक देवदूत पुन्हा स्वर्गात गेल्यानंतर त्यांना, त्यांचा शासक सैतान याच्यासारखेच वाळीत टाकण्यात आले. (यहूदा ६) आता या देवदूतांना मानवी शरीरे धारण करता येत नसली तरी, मानवांवर ते अतिशय वाईट प्रभाव पाडत आहेत. वास्तकविक पाहता, या दुरात्म्यांद्वारे सैतान ‘सर्व जगाला ठकवित’ आहे. (प्रकटीकरण १२:९; १ योहान ५:१९) ते कसे? लोकांना फसवण्यासाठी दुरात्मे वेगवेगळ्या कुयुक्त्यांचा उपयोग करतात. (२ करिंथकर २:११) यांतील काही कुयुक्त्यांचा आपण विचार करू या.

दुरात्म्यांचे ठकवण्याचे मार्ग

१०. भुताटकी काय आहे?

१० लोकांना ठकवण्यासाठी दुरात्मे भुताटकीचा उपयोग करतात. भुताटकीत, भूतांबरोबर एकतर थेटपणे किंवा एखाद्या मानवाच्या माध्यमाने संपर्क साधला जातो. बायबल भुताटकीचा निषेध करते आणि भुताटकीशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टींपासून स्वतःला मुक्त करण्याची ताकीद देते. (गलतीकर ५:​१९-२१) मासे धरणारा मनुष्य जसे आमिषांचा उपयोग करतो, तसेच भूते किंवा दुरात्मे भुताटकीचा उपयोग करतात. कोळी वेगवेगळे मासे धरण्यासाठी वेगवेगळ्या आमिषांचा उपयोग करतो. तसेच दुरात्मे, सर्व प्रकारच्या लोकांना आपल्या कह्यात घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भुताटकीचा उपयोग करतात.

११. शकुन पाहण्याचा काय अर्थ होतो, आणि आपण ते का टाळले पाहिजे?

११ दुरात्मे उपयोगात आणत असलेले एक आमिष म्हणजे शकुन पाहणे. शकुन, याचा काय अर्थ होतो? शकुन पाहण्याचा अर्थ, भविष्य किंवा जे अज्ञात ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणे. फलज्योतिष, टॅरट कार्ड, क्रिस्टल बॉल पाहणे, हस्तरेषा पाहणे, स्वप्नात गूढ शकून किंवा चिन्हे पाहणे, हे शकुनातील काही प्रकार आहेत. पुष्कळ लोकांना वाटते, की शकुन पाहणे हानीकारक नाही. परंतु बायबल सांगते, की भविष्य सांगणारे दुरात्म्यांच्या सोबत कार्य करतात. जसे की, प्रेषितांची कृत्ये १६:​१६-१८ (पं.र.भा.) मध्ये एका मुलीविषयी सांगितले आहे जिच्या अंगात “दैवप्रश्न सांगणारे भूत” होते. यामुळे ती मुलगी ‘दैवप्रश्न सांगायची.’ पण जेव्हा तिच्या अंगातून ते भूत काढून टाकण्यात आले, तेव्हा तिचे दैवप्रश्न सांगणे थांबले.

लोकांना फसवण्यासाठी दुरात्मे नाना प्रकारच्या कुयुक्त्यांचा उपयोग करतात

१२. मृतांबरोबर संभाषण करण्याचा प्रयत्न करणे घातक का आहे?

१२ दुरात्मे लोकांना आणखी एका मार्गाने फसवतात; ते त्यांना मृतांची विचारपूस करण्याचे उत्तेजन देतात. प्रिय व्यक्तीच्या मृत्यूचा शोक करणाऱ्या लोकांना पुष्कळदा, मृत व्यक्तीबद्दलच्या चुकीच्या माहितीद्वारे फसवले जाते. चेटूक करणारी व्यक्ती, कदाचित मृत व्यक्तीबद्दलची खास माहिती देईल किंवा मृत व्यक्तीसारखा आवाज काढून बोलेल. यामुळे बऱ्याच लोकांची खात्री पटते, की मृतजन जिवंत आहेत आणि त्यांच्याशी संपर्क साधल्याने आपले दुःख सहन करण्यास आपल्याला शक्ती मिळते. पण वास्तविक पाहता, अशाप्रकारचे “सांत्वन” खोटे आहे आणि घातकही. का? कारण, दुरात्मे किंवा भूते मृत व्यक्तीच्या आवाजाची नक्कल करू शकतात आणि मृत व्यक्तीविषयीची माहिती चेटकाला देऊ शकतात. (१ शमुवेल २८:​३-१९) शिवाय, आपण सहाव्या अध्यायात शिकल्याप्रमाणे, मृत अस्तित्वविरहीत होतात. (स्तोत्र ११५:१७) यास्तव, जो कोणी ‘मृतात्म्याला विचारतो,’ तो दुरात्म्यांनी फसवलेल्यांपैकी आहे व तो देवाच्या इच्छेच्या विरोधात काम करत आहे. (अनुवाद १८:​१०, ११; यशया ८:१९) यास्तव, दुरात्मे वापरत असलेल्या या घातक आमिषास तत्परतेने नकार द्या.

१३. एकेकाळी दुरात्म्यांच्या भयाच्या सावटाखाली जगणारे लोक काय करू शकले आहेत?

१३ दुरात्मे लोकांना फक्त फसवतच नाहीत तर त्यांना घाबरवतात देखील. आज, सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांना माहीत आहे, की ‘थोड्याच काळात’ त्यांना निष्क्रिय बनवले जाईल त्यामुळे ते अधिकच चवताळले आहेत. (प्रकटीकरण १२:​१२, १७) तरीपण एकेकाळी या दुरात्म्यांच्या भयाच्या सावटाखाली जगणाऱ्या हजारोंनी स्वतःला मुक्त केले आहे. कसे? एखादी व्यक्ती भुताटकी करत असली, तर ती स्वतःला मुक्त कशी करू शकते?

दुरात्म्यांना प्रतिकार कसा करायचा

१४. पहिल्या शतकातील इफिसस शहरातील ख्रिश्चनांप्रमाणे आपण दुरात्म्यांच्या प्रभावापासून स्वतःला मुक्त कसे करू शकतो?

१४ आपण दुरात्म्यांना प्रतिकार कसा करू शकतो आणि त्यांच्या तावडीतून कसे सुटू शकतो, हे बायबलमध्ये सांगण्यात आले आहे. पहिल्या शतकातील इफिसस शहरात राहणाऱ्या ख्रिश्चनांचे उदाहरण पाहा. त्यांच्यापैकी काही जण ख्रिश्चन होण्याआधी भुताटकी करायचे. त्यांनी भुताटकी करायचे सोडून द्यायचे ठरवले तेव्हा नेमके काय केले? बायबल म्हणते: “जादूटोणा करणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांनी आपली पुस्तके जमा करून सर्वांदेखत जाळून टाकिली.” (प्रेषितांची कृत्ये १९:१९) आपल्याजवळ असलेली जादूटोण्यावरील पुस्तके जाळून टाकण्याद्वारे या नवीन ख्रिश्चनांनी, आज दुरात्म्यांचा प्रतिकार करू इच्छिणाऱ्यांसाठी जणू काय एक उदाहरण मांडले. यहोवाची सेवा करू इच्छिणाऱ्यांनी, भुताटकीशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टींपासून स्वतःला मुक्त केले पाहिजे. या गोष्टींमध्ये, भुताटकी आचरण्याचे उत्तेजन देणारी आणि ते आकर्षक व मनोरंजक आहे, असे भासवणारी पुस्तके, मासिके, चित्रपट, पोस्टर, संगीत या सर्वांचा समावेश होतो. तसेच, दुष्टांपासून संरक्षण म्हणून घालावयाचे तावीज किंवा गंडेदोरे यांपासूनही आपण स्वतःला मुक्त केले पाहिजे.​—१ करिंथकर १०:२१.

१५. दुरात्म्यांचा प्रतिकार करण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

१५ इफिससमधील ख्रिश्चनांनी जादूटोण्याची पुस्तके नष्ट केल्याच्या काही वर्षांनंतर, प्रेषित पौलाने त्यांना लिहिले: “आपले झगडणे . . . दुरात्म्यांबरोबर आहे.” (इफिसकर ६:१२) म्हणजे दुरात्म्यांनी अजूनही हार मानली नव्हती. ते अजूनही इफिससमधील या ख्रिश्चनांवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे या ख्रिश्चनांना आणखी काय करावे लागले? प्रेषित पौलाने म्हटले: “ह्या सर्वांबरोबरच जिच्या योगे त्या दुष्टाचे [सैतानाचे] सगळे जळते बाण तुम्हाला विझविता येतील, ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा.” (इफिसकर ६:१६) आपल्या विश्वासाची ढाल जितकी भक्कम तितका आपल्याला दुरात्म्यांचा जोरदार प्रतिकार करता येईल.​—मत्तय १७:२०.

१६. आपण आपला विश्वास मजबूत कसा करू शकतो?

१६ आपण आपला विश्वास भक्कम कसा करू शकतो? बायबलचा अभ्यास करण्याद्वारे. भिंतीचा पाया भक्कम असेल तर भिंतही मजबूत असते. तसेच, देवाचे वचन बायबल यांतील आपले अचूक ज्ञान जितके भक्कम असेल तितकी आपल्या विश्वासाची भिंत मजबूत होईल. आपण दररोज जर बायबलचे वाचन केले आणि त्याचा अभ्यास केला तर आपला विश्वास भक्कम होईल. एका बळकट भिंतीप्रमाणे आपला विश्वास, दुरात्म्यांच्या प्रभावांपासून आपले संरक्षण करील.​—१ योहान ५:५.

१७. दुरात्म्यांचा प्रतिकार करण्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे?

१७ इफिससमधील ख्रिश्चनांना आणखी कोणती पावले उचलावी लागणार होती? त्यांना आणखी संरक्षणाची गरज होती कारण ते सर्वत्र दुरात्मिक प्रभाव असलेल्या शहरात राहत होते. म्हणूनच पौलाने त्यांना सांगितले: “सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा.” (इफिसकर ६:१८) आपणही सर्वत्र दुरात्म्यांचा प्रभाव असलेल्या जगात राहत असल्यामुळे, त्यांचा प्रतिकार करताना संरक्षण मिळावे म्हणून यहोवाला कळकळीने प्रार्थना केली पाहिजे. होय, आपल्या प्रार्थनांमध्ये आपण यहोवाच्या नावाचा उपयोग केला पाहिजे. (नीतिसूत्रे १८:१०) “आम्हास वाइटापासून सोडीव,” म्हणजेच दियाबल सैतानापासून सोडव अशी प्रार्थना आपण करीत राहिले पाहिजे. (मत्तय ६:१३) यहोवा अशा प्रार्थनांचे उत्तर देतो.​—स्तोत्र १४५:१९.

१८, १९. (क) दुष्ट आत्मिक प्राण्यांविरुद्धच्या लढाईत आपण शंभर टक्के विजयी होऊ, अशी आपण खात्री का बाळगू शकतो? (ख) पुढील अध्यायात कोणत्या प्रश्‍नाचे उत्तर दिले जाईल?

१८ दुरात्मे घातक आहेत, पण आपण जर सैतानाला अडवले आणि देवाची इच्छा पूर्ण करण्याद्वारे त्याच्याजवळ गेलो तर आपल्याला या दुरात्म्यांची भिती बाळण्याची काही गरज नाही. (याकोब ४:​७, ८) दुरात्म्यांची शक्ती मर्यादित आहे. नोहाच्या दिवसांत त्यांना शिक्षा करण्यात आली आणि भविष्यात त्यांचा शेवटचा न्याय केला जाणार आहे. (यहूदा ६) शिवाय, आपल्याला यहोवाच्या शक्तिशाली देवदूतांचे संरक्षण आहे, हे विसरू नका. (२ राजे ६:​१५-१७) आपण दुरात्म्यांचा प्रतिकार करण्यात यशस्वी व्हावे, अशी या देवदूतांची इच्छा आहे. असे करण्यासाठी ते जणू काय आपल्याला प्रोत्साहन देतात. तेव्हा, आपण यहोवाच्या आणि विश्वासू आत्मिक प्राण्यांचे मिळून बनलेल्या त्याच्या कुटुंबाच्या जवळ राहू या. आपण सर्वप्रकारची भुताटकी टाळू या आणि नेहमी देवाच्या वचनातील सल्ला अनुसरू या. (१ पेत्र ५:​६, ७; २ पेत्र २:९) असे केल्याने आपण दुरात्म्यांविरुद्धच्या आपल्या लढाईत शंभर टक्के विजयी होण्याची खात्री बाळगू शकतो.

१९ पण लोकांना ज्यांमुळे इतका त्रास होत आहे त्या दुरात्म्यांना व दुष्टाईला देवाने अद्याप राहू का दिले आहे? पुढील अध्यायात या प्रश्‍नाचे उत्तर दिले जाईल.

^ परि. 2 धार्मिक देवदूतांविषयी प्रकटीकरण ५:११ म्हणते: “त्याची संख्या अयुतांची अयुते” किंवा “सहस्त्रांची सहस्त्रे” आहेत. यावरून बायबल हे सुचवते, की कोट्यवधी देवदूतांना निर्माण करण्यात आले होते.