व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय अकरा

देव दुःख काढून का टाकत नाही?

देव दुःख काढून का टाकत नाही?
  • जगातील दुःखासाठी देव जबाबदार आहे का?

  • एदेन बागेत कोणता वादविषय उपस्थित झाला?

  • देव मानवाच्या दुःखाचे परिणाम कसे नाहीसे करणार आहे?

१, २. आज लोक कोणकोणत्या प्रकारच्या दुःखाला तोंड देत आहेत, यामुळे पुष्कळ लोक कोणता प्रश्न विचारतात?

एका युद्धग्रस्त देशात झालेल्या एका भयंकर युद्धानंतर, मरण पावलेल्या हजारो स्त्रियांना व मुलांना एकाच मोठ्या खड्‌ड्यात पुरण्यात आले. आणि या कबरेभोवती चिन्हे रोवण्यात आली होती. प्रत्येक चिन्हावर, “का?” असे लिहिले होते. कधीकधी हा प्रश्न सर्वात यातनादायक असतो. लोक सहसा विव्हळ होऊन हा प्रश्न तेव्हा विचारतात जेव्हा युद्ध, संकट, आजारपण किंवा गुन्हेगारी यांमुळे त्यांच्या प्रिय निष्पाप लोकांचा बळी जातो, त्यांच्या घरांची नासधूस होते किंवा इतर मार्गांनी त्यांच्यावर नाना प्रकारची संकटे कोसळतात. अशाप्रकारची संकटे आपल्यावर का कोसळत आहेत, हे त्यांना माहीत करून घ्यायचे असते.

देवाने दुःख का राहू दिले आहे? यहोवा देव सर्वशक्तिमान, प्रेमळ, सर्वज्ञानी, न्यायी आहे तर या जगात इतका द्वेष, इतका अन्याय का? तुमच्या मनात कधी असे प्रश्न आले आहेत का?

३, ४. (क) देवाने दुःखाला आजपर्यंत का राहू दिले आहे, असा प्रश्न विचारण्यात काही गैर नाही हे आपण कशावरून म्हणू शकतो? (ख) दुष्टाई आणि त्यामुळे येणाऱ्या दुःखाबद्दल यहोवाला कसे वाटते?

देवाने दुःखाला आजपर्यंत का राहू दिले आहे, असा प्रश्न विचारण्यात काही चूक आहे का? काहींना भीती वाटते, की असा प्रश्न विचारला तर, आपला देवावर विश्वास नाही किंवा आपण देवाचा आदर करत नाही, असा अर्थ होतो. परंतु, बायबल वाचताना तुम्हाला दिसून येईल, की विश्वासू, देव-भीरू लोकांच्या मनात देखील असेच प्रश्न आले होते. जसे की, संदेष्टा हबक्कूकने यहोवाला विचारले: “मला अधर्म का पाहावयास लावितोस? विपत्ति मला का दाखवितोस? लुटालूट व जुलूम माझ्यासमोर आहेत; कलह चालला आहे, वाद उपस्थित झाला आहे.”​—हबक्कूक १:३.

यहोवा सर्व दुःखांचा अंत करील

असे प्रश्न विचारल्याबद्दल यहोवाने विश्वासू संदेष्टा हबक्कूक याला रागवले का? नाही. उलट, यहोवाने हबक्कूकचे हे प्रामाणिक मनोगत बायबलमध्ये लिखित करून ठेवले. देवाने त्याला अधिक स्पष्ट समज मिळवण्यास व विश्वास मजबूत करण्यास मदत केली. तुमच्यासाठी देखील यहोवा हेच करू इच्छितो. बायबल काय म्हणते ते पाहा: यहोवा “तुमची काळजी घेतो.” (१ पेत्र ५:७) मानवांपेक्षा देवाला, दुष्टाईचा आणि दुष्टाईमुळे होणाऱ्या परिणामांचा वीट आहे. (यशया ५५:​८, ९) मग तरीपण जगात इतके दुःख का आहे?

इतके दुःख का?

५. मानवावर आलेल्या दुःखाचे कधीकधी काय कारण सांगितले जाते, पण बायबलची शिकवण काय आहे?

विविध धर्माच्या लोकांनी आपल्या धार्मिक नेत्यांकडे व गुरूंकडे जाऊन, आज इतके दुःख का आहे, हा प्रश्न विचारला आहे. पुष्कळदा त्यांना असे उत्तर देण्यात आले, की आज जे काही दुःख आहे ते सर्व देवाच्या इच्छेमुळे आहे व आज घडणाऱ्या सर्व घटना मग त्या दुःखद असल्या तरी देवाने आधीच ठरवल्या होत्या. पुष्कळ लोकांना असे सांगितले जाते, की देवाचे मार्ग अनाकलनीय आहेत किंवा लोकांच्या आणि लहान मुलांच्याही मृत्यूला तोच कारणीभूत आहे जेणेकरून ते त्याच्याबरोबर स्वर्गात राहू शकतील. परंतु, तुम्ही शिकलात की यहोवा देव कधीच काही दुष्टपणे करत नाही. बायबल म्हणते: “देवाकडून दुष्कर्म व्हावे, सर्वसमर्थाकडून अन्याय व्हावा, ही कल्पनाहि करावयाला नको.”​—ईयोब ३४:१०.

६. पुष्कळ लोक, जगात चाललेल्या दुःखाबद्दल देवाला जबाबदार धरण्याची चूक का करतात?

जगात होत असलेल्या दुःखाबद्दल देवाला जबाबदार धरण्याची चूक लोक का करतात, हे तुम्हाला माहीत आहे का? ते सर्वसमर्थ देवाला दोषी ठरवतात कारण त्यांना वाटते, की तो या जगाचा खरा शासक आहे. त्यांना बायबलमधील एक साधी परंतु महत्त्वाची शिकवण माहीत नाही. या पुस्तकाच्या तिसऱ्या अध्यायात तुम्ही ती शिकवण शिकलात. या जगाचा शासक दियाबल सैतान आहे.

७, ८. (क) या जगात, जगावर राज्य करणाऱ्याचे गुण कसे दिसून येतात? (ब) मानवी अपरिपूर्णता आणि “समय व प्रसंग” यांची दुःखात आणखी भर कशी पडली आहे?

बायबल स्पष्टपणे म्हणते: “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहान ५:१९) हे खरे नाही का? या जगात, ‘सर्व जगाला जो ठकवित आहे’ त्या अदृश्य आत्मिक प्राण्याचेच गुण दिसून येतात. (प्रकटीकरण १२:९) सैतानाच्या मनात द्वेष ठासून भरला आहे, तो महाठक व अतिशय क्रूर आहे. त्यामुळे त्याच्या प्रभावाखाली असलेले जगही द्वेष, ठकबाजी, क्रूरता यांनीच भरले आहे. आज इतके दुःख का आहे याचे हे एक कारण आहे.

दुसऱ्या कारणाची चर्चा आपण तिसऱ्या अध्यायात केली होती. एदेन बागेत बंडाळी झाल्यापासून मानवजात अपरिपूर्ण आणि पापी बनली आहे. पापी मानव, सत्ता मिळवण्यासाठी वेडेपिसे झाले आहेत. यामुळे मानवावर युद्धे, जुलूम आणि दुःख ओढवले आहे. (उपदेशक ४:१; ८:९) आज जगात असलेल्या दुःखाचे तिसरे कारण आहे, सर्वांवर येणारे “समय व प्रसंग.” (उपदेशक ९:​११, पं.र.भा.) यहोवा या जगाचा संरक्षण करणारा शासक नाही. म्हणून, चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी असल्यामुळे लोकांवर दुःख ओढवू शकते.

९. यहोवाने दुःख आजपर्यंत का राहू दिले आहे याबद्दल त्याच्याजवळ रास्त कारण आहे, अशी आपण खात्री का बाळगू शकतो?

देव दुःखाला कारणीभूत नाही, हे जाणणे किती सांत्वनदायक आहे. युद्धे, गुन्हेगारी, जुलूम किंवा लोक ज्यामुळे पीडित होतात ती नैसर्गिक संकटे, यांसाठी तो जबाबदार नाही. तरीपण आपल्या मनात हा प्रश्न येतच राहतो, की मग यहोवाने दुःख अजूनपर्यंत का राहू दिले आहे? तो सर्वशक्तिमान आहे तर, दुःखाचा अंत करण्याची त्याच्याकडे शक्ती आहे. तरीपण तो असा शांत का आहे? आपण ज्याच्याशी परिचित झालो आहोत त्या प्रेमळ देवाकडे नक्कीच याचे काहीतरी रास्त कारण असावे.​—१ योहान ४:८.

महत्त्वपूर्ण वादविषय

१०. सैतानाने कशाविषयी शंका घेतली व कशी?

१० यहोवाने दुःख आजपर्यंत का राहू दिले आहे ते माहीत करून घेण्यासाठी आपण, दुःखाची सुरुवात झाली त्या काळचा विचार केला पाहिजे. सैतानाने आदाम आणि हव्वेला यहोवाची आज्ञा मोडण्यास प्रवृत्त केले तेव्हा एक महत्त्वपूर्ण वादविषय उभा राहिला. सैतानाने यहोवाच्या सामर्थ्याविषयी शंका घेतली नाही. सैतानाला देखील माहीत आहे, की यहोवाकडे अमर्याद सामर्थ्य आहे. त्याने, यहोवाच्या शासन करण्याच्या अधिकाराविषयी शंका घेतली. देव आपल्या प्रजेशी खोटे बोलून त्यांना चांगल्या गोष्टींपासून वंचित ठेवतो असे म्हणून सैतानाने आरोप लावला की यहोवा एक वाईट शासक आहे. (उत्पत्ति ३:​२-५) देवाच्या शासनाशिवाय राहणे हे मानवजातीकरता जास्त हिताचे आहे, असे सैतानाने सुचवले. सैतानाने यहोवाच्या सार्वभौमत्वावर अर्थात राज्य करण्याच्या यहोवाच्या अधिकारावर घाला घातला होता.

११. एदेन बागेतील बंडखोरांचा यहोवाने लगेच नाश का केला नाही?

११ आदाम आणि हव्वेने यहोवाविरुद्ध बंड केले. त्यांनी जणू काय आपल्या कार्यांद्वारे असे म्हटले: “आम्हाला यहोवा शासक म्हणून नकोय. बरोबर काय आणि चूक काय हे आम्ही स्वतः ठरवू शकतो.” यहोवा हा वादविषय कसा सोडवणार होता? ज्यांनी बंड केले होते ते चूक करत होते आणि आपले मार्ग खरोखरच उत्तम आहेत, हे तो सर्व बुद्धिमान प्राण्यांना कसे सांगणार होता? काही लोक म्हणतील, ‘ज्यांनी बंड केलं त्यांचा देवानं नाश करायचा असता आणि पुन्हा नव्यानं सुरुवात करायची असती!’ यहोवा देवाने आपला उद्देश बोलून दाखवला होता, की आदाम आणि हव्वेच्या संततीने पृथ्वी व्यापून टाकावी व त्यांनी पृथ्वीवरील या परादीसात अनंतकाळ जगावे. (उत्पत्ति १:२८) यहोवा नेहमीच आपले उद्देश पूर्ण करतो. (यशया ५५:​१०, ११) शिवाय, एदेन बागेतील बंडखोरांचा नाश केल्याने, यहोवाच्या राज्य करण्याच्या अधिकाराच्या संबंधाने उभे राहिलेले प्रश्न सुटले नसते.

१२, १३. यहोवाने सैतानाला या जगाचा शासक का बनू दिले आहे आणि मानवांना स्वतःवर राज्य का करू दिले आहे ते समजावण्यासाठी उदाहरण द्या.

१२ आपण एका उदाहरणाचा विचार करू या. समजा एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना, एक गणित कसे सोडवायचे ते सांगतो. एक हुशार परंतु बंडखोर विद्यार्थी उभा राहून म्हणतो, की शिक्षकांची गणित सोडवण्याची पद्धत चुकीची आहे. शिक्षकाला गणित सोडवता येत नाही, असे सुचवून हा बंडखोर विद्यार्थी हे दाखवण्याचा प्रयत्न करतो, की शिक्षकापेक्षा त्याच्याजवळ गणित सोडवण्याचा उत्तम मार्ग आहे. काही विद्यार्थी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात, त्यांना वाटते तो बरोबर बोलतो आणि मग तेही त्याच्याप्रमाणे बंडखोर बनतात. अशावेळी शिक्षकाने काय करायला हवे? त्याने जर बंडखोरांना वर्गाच्या बाहेर काढले तर वर्गातील इतर विद्यार्थ्यांवर याचा काय परिणाम होईल? तो विद्यार्थी आणि त्याच्याबरोबरचे त्याचे साथीदार बरोबरच बोलले होते, असा ते विचार करणार नाहीत का? अशाने वर्गातील इतर विद्यार्थ्यांचा शिक्षकांबद्दलचा आदर कमी होऊ शकतो. त्यांना वाटेल, की शिक्षकांना त्यांची चूक शाबीत होण्याची भीती वाटते. पण समजा, शिक्षकाने या बंडखोराला, ते गणित तो कसे सोडवील हे दाखवण्याची परवानगी दिली.

शिक्षकापेक्षा या विद्यार्थ्याकडे जास्त कुवत आहे का?

१३ या शिक्षकाने जे केले, ते यहोवाने जे केले आहे त्याच्यासारखे आहे. हे लक्षात घ्या, की एदेन बागेत फक्त बंडखोरच उपस्थित नव्हते. कोट्यवधी देवदूतही त्यांना पाहत होते. (ईयोब ३८:७; दानीएल ७:​१०, पं.र.भा.) यहोवा या बंडाळीला ज्याप्रकारे सोडवील त्याचा या सर्व देवदूतांवर आणि कालांतराने सर्व बुद्धिमान प्राण्यांवर परिणाम होणार होता. यास्तव, यहोवाने काय केले? त्याने सैतानाला, तो मानवजातीवर कसा राज्य करेल हे दाखवण्याची अनुमती दिली आहे. तसेच, देवाने मानवांना, सैतानाच्या मार्गदर्शनाखाली स्वतःवर राज्य करू देण्याची अनुमती दिली आहे.

१४. यहोवाने मानवांना राज्य करण्याची परवानगी देण्याचे ठरवल्यामुळे काय फायदा होईल?

१४ आपल्या उदाहरणातील शिक्षकाला पूर्णपणे माहीत आहे, की त्या बंडखोर विद्यार्थ्याचे आणि त्याला मिळालेल्या इतर विद्यार्थ्यांचे चुकत आहे. पण त्याला हेही माहीत आहे, की त्यांना आपली बाजू खरी आहे हे मांडण्याची संधी दिल्याने संपूर्ण वर्गाला फायदा होईल. बंडखोर विद्यार्थी जेव्हा अपयशी ठरतील तेव्हा सर्व प्रामाणिक विद्यार्थ्यांना कळेल, की खरे तर शिक्षकच वर्गाला योग्य दिशा दाखवू शकतो. यानंतर शिक्षक जेव्हा या बंडखोरांना वर्गातून काढून टाकेल तेव्हा याचे कारण त्या सर्वांना पटण्याजोगे असेल. अशाचप्रकारे, सैतान आणि त्याचे बंडखोर साथीदार अपयशी ठरले आहेत आणि मानव स्वतःच्या हिकमतीवर राज्य करू शकत नाहीत, हे पाहिल्यानंतर सर्व प्रामाणिक अंतःकरणाच्या मानवांचा आणि देवदूतांचा फायदा होईल, हे यहोवाला माहीत आहे. प्राचीन काळच्या यिर्मयाप्रमाणे त्यांना हे महत्त्वपूर्ण सत्य शिकायला मिळेल: “हे परमेश्वरा, मला ठाऊक आहे की मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही.”​—यिर्मया १०:२३.

पण इतका उशीर का?

१५, १६. (क) यहोवाने इतके दिवस दुःख का राहू दिले आहे? (ब) भयंकर गुन्हे यांसारख्या गोष्टी होण्यास यहोवाने प्रतिबंध का केलेला नाही?

१५ पण यहोवाने इतके दिवस दुःख का राहू दिले आहे? वाईट गोष्टी घडतात तेव्हा तो प्रतिबंध का करत नाही? आपल्या उदाहरणातील शिक्षक कोणत्या दोन गोष्टी करणार नाही, कृपया त्याकडे लक्ष द्या. पहिली गोष्ट, बंडखोर विद्यार्थी जेव्हा समस्येवरील उपाय सांगत असतो तेव्हा शिक्षक त्याला अडवणार नाही. दुसरी गोष्ट, बंडखोर जेव्हा उपाय सांगत असतो तेव्हा शिक्षक त्याला मदत करणार नाही. तसेच, यहोवानेही दोन गोष्टी न करण्याचे ठरवले आहे. पहिली गोष्ट, आपण बरोबर आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सैतानाला व त्याचा पक्ष घेणाऱ्यांना तो अडवत नाही. यासाठी त्याला त्यांना वेळ द्यावा लागला आहे. मानव इतिहासाच्या हजारो वर्षांच्या कालावधीत, मानवजातीने स्व-शासनाचा किंवा सर्व प्रकारच्या मानव सरकारांचा प्रयोग करून पाहिला. मानवजातीने एकीकडे, विज्ञान व इतर क्षेत्रांत काही प्रमाणात प्रगती केली आहे परंतु दुसरीकडे अन्याय, दारिद्र्य, गुन्हेगारी, युद्धे यांत कमालीची वाढ झाली आहे. मानव शासन ठार अपयशी असल्याचे सिद्ध झाले आहे.

१६ दुसरी गोष्ट, यहोवाने सैतानाला या जगावर शासन करण्यास मदत केली नाही. देवाने जर भयंकर गुन्हे होण्यापासून थांबवले तर तो जणू काय बंडखोरांना मदत करतोय, असे होणार नाही का? देव लोकांना असा विचार करायला लावणार नाही का, की मानव घातक परिणामांविना राज्य करू शकतात? यहोवाने असे केले तर तो खोट्याची बाजू घेत असल्यासारखे होईल. परंतु, “खोटे बोलणे देवाला अशक्य आहे.”​—इब्री लोकांस ६:१८.

१७, १८. मानवी शासनाच्या परिणामांमुळे आणि सैतानाच्या प्रभावामुळे झालेल्या हानीविषयी यहोवा काय करणार आहे?

१७ परंतु देवाविरुद्ध केल्या जाणाऱ्या या बंडाळीच्या काळादरम्यान झालेल्या हानीचे काय? आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे; ती ही की यहोवा सर्वसमर्थ देव आहे. तेव्हा, तो दुःखामुळे मानवजातीला झालेली हानी काढू शकतो, नव्हे काढणारच आहे. आपण आधी शिकलो, की आपल्या पृथ्वी ग्रहाचा नाश थांबवला जाईल आणि त्याऐवजी पृथ्वीला परादीस बनवले जाईल. येशूच्या खंडणी बलिदानावरील विश्वासाच्याद्वारे पापाचे परिणाम आणि पुनरुत्थानाद्वारे, मृत्यूमुळे झालेले परिणाम काढून टाकले जातील. अशाप्रकारे देव, ‘सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठी’ येशूचा उपयोग करील. (१ योहान ३:८) यहोवा हे सर्व अगदी योग्य वेळी करील. यहोवाने हे याआधीच केले नाही म्हणून खरे तर आपण त्याचे आभार मानू शकतो. त्याने धीर धरल्यामुळेच तर आपल्याला सत्य शिकून घेण्याची व त्याची सेवा करण्याची संधी मिळाली. (२ पेत्र ३:​९, १०) देव प्रांजळ उपासकांना सक्रियपणे शोधत आहे आणि या त्रस्त जगात त्यांच्यावर येणारे कोणतेही दुःख सहन करण्याची शक्ती त्यांना देत आहे.​—योहान ४:२३; १ करिंथकर १०:१३.

१८ काही जण विचार करतील, देवाने जर आदाम आणि हव्वेला, ते पाप करणार नाहीत अशाप्रकारे निर्माण केले असते तर हे सर्व दुःख टाळता आले नसते का? या प्रश्‍नाचे उत्तर मिळवण्याकरता, यहोवाने तुम्हाला दिलेल्या मौल्यवान देणगीची आठवण करा.

देवाने दिलेल्या देणगीचा तुम्ही कसा उपयोग कराल?

देव तुम्हाला दुःख सहन करण्याची शक्ती देईल

१९. देवाने आपल्याला कोणती मौल्यवान देणगी दिली आहे, आणि आपण या देणगीची कदर का बाळगली पाहिजे?

१९ अध्याय पाचमध्ये आपण शिकलो, की मानवांना निर्माण करताना देवाने त्यांना इच्छास्वातंत्र्य दिले. ही किती मौल्यवान देणगी आहे, याची तुम्हाला जाणीव आहे का? देवाने असंख्य प्राणी बनवले आहेत, आणि हे सर्व प्राणी बहुतेककरून उपजत बुद्धीने कार्य करतात. मानवाने काही यंत्रमानव बनवले आहेत ज्यांना दिलेल्या आज्ञेप्रमाणे कार्य करायला लावले जाऊ शकते. देवाने आपल्याला या यंत्रमानवांसारखे बनवले असते तर आपल्याला आनंद झाला असता का? मुळीच नाही; आपण कोणत्या प्रकारची व्यक्ती बनू इच्छितो, जीवनात काय करू इच्छितो, कोणाबरोबर मैत्री करू इच्छितो, वगैरे, या संबंधाने आपल्याला स्वातंत्र्य असल्यामुळे आपण आनंदी आहोत. आपल्याला स्वातंत्र्य आवडते आणि अशा स्वातंत्र्याचा आपण आनंद लुटावा अशी देवाची इच्छा आहे.

२०, २१. आपल्याला मिळालेल्या इच्छास्वातंत्र्याच्या देणगीचा आपण सर्वात उत्तम मार्गाने उपयोग कसा करू शकतो, आणि असे करण्याची आपण इच्छा का बाळगली पाहिजे?

२० बळजबरीने करवून घेतलेल्या सेवेने यहोवा संतुष्ट होत नाही. (२ करिंथकर ९:७) जसे की, पालकांना जास्त आनंद केव्हा होईल? त्यांच्या मुलाने कोणाच्या तरी सांगण्यावरून, “मला तुम्ही खूप आवडता” असे म्हटल्यावर की मनापासून म्हटल्यावर? यास्तव, प्रश्न असा उभा राहतो, की यहोवाने तुम्हाला दिलेल्या इच्छा स्वातंत्र्याचा तुम्ही कसा उपयोग कराल? सैतान, आदाम आणि हव्वा यांनी आपल्या इच्छा स्वातंत्र्याचा सर्वात वाईट मार्गाने उपयोग केला. त्यांनी यहोवा देवालाच नाकारले. तुम्ही काय कराल?

२१ तुम्हाला मिळालेल्या इच्छास्वातंत्र्याच्या मौल्यवान देणगीचा सर्वात उत्तम उपयोग करण्याची संधी तुमच्यासमोर आहे. तुम्ही देखील त्या लाखो लोकांमध्ये सामील होऊ शकता की ज्यांनी यहोवाचा पक्ष घेतला आहे. ते यहोवाचे मन आनंदित करतात कारण ते, सैतान लबाड आहे आणि शासक म्हणून तोच निखालस अपयशी ठरला आहे हे सिद्ध करण्यात सक्रिय भाग घेतात. (नीतिसूत्रे २७:११) उचित जीवनक्रम निवडून तुम्ही देखील असे करू शकता. याबद्दल पुढील अध्यायात आणखी माहिती दिली आहे.