व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय बारा

देव संतुष्ट होईल अशाप्रकारे जगणे

देव संतुष्ट होईल अशाप्रकारे जगणे
  • आपण देवाचे मित्र कसे होऊ शकतो?

  • सैतानाने केलेल्या आव्हानात तुमचाही समावेश कसा आहे?

  • कोणत्या प्रकारच्या वर्तनामुळे यहोवा नाराज होतो?

  • यहोवा संतुष्ट होईल अशाप्रकारे तुम्ही कसे जगू शकता?

१, २. देवाने आपले जिवलग मित्र होण्यास निवडलेल्या काही मानवांची उदाहरणे द्या.

तुम्ही कोणाशी मैत्री कराल? साहजिकच, तुमच्यासारखेच दृष्टिकोन, आवडी-निवडी आणि मूल्ये बाळगणाऱ्यासोबत तुम्ही मैत्री कराल. शिवाय प्रामाणिक व दयाळू असलेल्या व्यक्तीकडे तुम्ही लगेच आकर्षित व्हाल.

संपूर्ण इतिहासात, देवाने विशिष्ट मानवांना आपले जिवलग मित्र होण्यास निवडले. जसे की, यहोवाने अब्राहामाला आपला मित्र म्हटले. (यशया ४१:८; याकोब २:२३) देवाने दाविदाविषयी बोलताना, “माझ्या मनासारखा,” असा त्याचा उल्लेख केला, कारण यहोवाला ज्याप्रकारचे लोक आवडतात तसाच तो होता. (प्रेषितांची कृत्ये १३:२२) तसेच, दानीएल संदेष्टा यहोवाला “परमप्रिय” होता.​—दानीएल ९:२३.

३. यहोवा काही मानवांना आपले मित्र होण्यास का निवडतो?

यहोवाने, अब्राहाम, दावीद, दानीएल यांना आपले मित्र का मानले? “तू माझा शब्द ऐकला,” असे यहोवाने अब्राहामाला म्हटले. (उत्पत्ति २२:१८) यहोवा जे सांगतो त्याप्रमाणे नम्रपणे वागणाऱ्यांना तो जवळ करतो. यहोवाने इस्राएलच्या लोकांना सांगितले: “माझे वचन ऐका, म्हणजे मी तुमचा देव होईन व तुम्ही माझे लोक व्हाल.” (यिर्मया ७:२३) तुम्ही यहोवाचे ऐकले तर तुम्ही देखील त्याचे मित्र होऊ शकता!

यहोवा आपल्या मित्रांना शक्ती देतो

४, ५. यहोवा आपल्या लोकांच्या वतीने आपले सामर्थ्य कसे दाखवतो?

देवाबरोबर मैत्री! जरा यावर विचार करा. बायबल म्हणते, की “जे कोणी सात्विक चित्ताने [अर्थात “पूर्ण हृदयाने”] त्याच्याशी वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात तो [यहोवा] आपले सामथ्र्यं प्रगट” करण्यासाठी संधी शोधत असतो. (२ इतिहास १६:९) तुमच्या वतीने यहोवा आपले सामर्थ्य कसे प्रकट करू शकतो? स्तोत्र ३२:८ मध्ये एक मार्ग सांगितला आहे. तिथे असे म्हटले आहे: “मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन; मी आपली दृष्टि तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन.”

यहोवाला आपल्याबद्दल असलेल्या काळजीची ही एक हृदयस्पर्शी अभिव्यक्ती आहे. तो तुम्हाला लागणारे मार्गदर्शन देईल आणि तुम्ही या मार्गदर्शनाचा अवलंब करत असताना तो तुमचे संरक्षण करील. तुमच्यावर येणाऱ्या परीक्षांमधून तुम्ही यशस्वीरीत्या पार व्हावे अशी यहोवाची इच्छा आहे. (स्तोत्र ५५:२२) पूर्ण हृदयाने तुम्ही यहोवाची सेवा केली तर, “मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेविले आहे; तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही,” असे ज्या स्तोत्रकर्त्याने म्हटले त्याच्याप्रमाणे तुम्हीही खात्री बाळगू शकता. (स्तोत्र १६:८; ६३:८) होय, यहोवा संतुष्ट होईल अशाप्रकारे जगण्यास तो तुम्हाला मदत करू शकतो. पण, असे करताना त्याचा शत्रू तुम्हाला आडकाठी आणेल, हे तुम्हाला माहीत आहे.

सैतानाचा दावा

६. मानवांविषयी सैतानाने काय आरोप लावला?

दियाबल सैतानाने यहोवाच्या सार्वभौमत्वाला कसे ललकारले आहे, हे आपण या पुस्तकाच्या अकराव्या अध्यायात पाहिले होते. तो खोटे बोलत आहे आणि आदाम व हव्वेला बरोबर काय व चूक काय हे ठरवू न दिल्यामुळे तो वाईट आहे, असा सैतानाने त्याच्यावर आरोप लावला. आदाम आणि हव्वेने पाप केल्यानंतर व संपूर्ण पृथ्वीवर त्यांची संतती वाढल्यावर, सैतानाने सर्व मानवांच्या हेतूवर संशय घेतला. सैतानाने असा आरोप लावला, की “लोक देवावरील प्रेमापोटी त्याची सेवा करत नाहीत.” तो म्हणतो “मला एखादी संधी तर देऊन पाहा मी कोणालाही देवाच्या विरुद्ध करू शकतो.” सैतानाला असे वाटते हे ईयोब नावाच्या मनुष्याच्या अहवालावरून दिसून येते. ईयोब कोण होता, आणि सैतानाने केलेल्या आव्हानात तो कसा गोवलेला होता?

७, ८. (क) कोणत्या कारणामुळे, त्या काळच्या मानवांमध्ये ईयोब इतरांपेक्षा वेगळा होता? (ख) सैतानाने ईयोबाच्या हेतूवर संशय कसा घेतला?

ईयोब ३,६०० वर्षांआधी हयात होता. तो एक सत्‌पुरूष होता; कारण यहोवा त्याच्याविषयी असे म्हणाला: “भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिऊन वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही.” (ईयोब १:८) ईयोब देवाच्या पसंतीस उतरला होता.

ईयोब देवाची सेवा का करत आहे याबद्दलही सैतानाने शंका घेतली. दियाबल यहोवाला म्हणाला: “तो, त्याचे घर व त्याचे सर्वस्व याभोवती तू कुंपण घातले आहे ना? तू त्याच्या हातास यश दिले आहे ना? व देशात त्याचे धन वृद्धि पावत आहे ना? तू आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्वास लावून तर पाहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करील.”​—ईयोब १:१०, ११.

९. यहोवाने सैतानाच्या आव्हानाला कसे उत्तर दिले, व का?

अशाप्रकारे सैतानाने आरोप लावला, की ईयोब देवाकडून त्याला मिळत असलेल्या प्रतिफळासाठीच त्याची सेवा करत आहे. दियाबलाने असाही आरोप केला की, ईयोबावर परीक्षा आली तर तो देवाकडे पाठ फिरवेल. यहोवाने सैतानाच्या या आव्हानाला कसे उत्तर दिले? या वादविषयात, ईयोबाचा देवाची सेवा करण्यामागचा काय हेतू आहे हा प्रश्न गोवलेला असल्यामुळे यहोवाने सैतानास ईयोबाची परीक्षा घेऊ दिली. यावरून, ईयोबाला देवाबद्दल प्रेम आहे की नाही हे स्पष्टपणे दिसून येणार होते.

ईयोबाची परीक्षा होते

१०. ईयोबावर कोणत्या परीक्षा आल्या, आणि त्याने कशी प्रतिक्रिया दाखवली?

१० सैतानाने लगेच वेगवेगळ्या मार्गांनी ईयोबाची परीक्षा घेतली. ईयोबाची काही गुरेढोरे चोरीला गेली तर काही मारली गेली. त्याच्या बहुतेक सेवकांची हत्या झाली. यामुळे त्याला आर्थिक फटका बसला. मग ईयोबाची दहाही मुले एका वादळात ठार झाली तेव्हा जणू काय त्याच्यावर आभाळच कोसळले. या सर्व भयंकर घटना घडल्या तरीपण “सर्व प्रसंगात ईयोबाच्या हातून पाप झाले नाही; व अनुचित कृत्य केल्याचा आरोप त्याने देवावर केला नाही.”​—ईयोब १:२२.

११. (क) सैतानाने ईयोबावर कोणता दुसरा आरोप लावला, व यहोवाने काय घडू दिले? (ख) ईयोबाला वेदनादायक आजार झाला तरी त्याची प्रतिक्रिया काय होती?

११ सैतान इतक्यावरच थांबला नाही. त्याला वाटले असावे, की ईयोब, आपली मालमत्ता, सेवक, मुले गमावल्याचे दुःख सहन करू शकला असला तरी त्याला एखादा आजार झाल्यावर मात्र तो देवाकडे पाठ फिरवेल. यहोवाने सैतानाला, ईयोबास एक अतिशय किळसवाण्या, वेदनादायक आजाराने पीडण्याची परवानगी दिली. पण एवढे होऊनही ईयोबाने देवावरील आपला विश्वास गमावला नाही. उलट तो अगदी ठामपणे म्हणाला: “माझा प्राण जाईतोवर मी आपले सत्वसमर्थन सोडणार नाही.”​—ईयोब २७:५.

ईयोब विश्वासू राहिल्यामुळे त्याला प्रतिफळ मिळाले

१२. ईयोबाने दियाबलाच्या आव्हानाला कसे उत्तर दिले?

१२ आपल्यावर आलेल्या संकटांसाठी सैतान जबाबदार आहे, याची ईयोबाला जराही कल्पना नव्हती. दियाबलाने यहोवाच्या सार्वभौमत्वाला ललकारले होते याविषयीची पुसटशी कल्पनाही ईयोबाला नसल्यामुळे त्याला वाटले, की देवामुळेच त्याच्यावर हे संकट कोसळले होते. (ईयोब ६:४; १६:​११-१४) तरीपण तो यहोवाशी एकनिष्ठ राहिला. आणि ईयोब देवाची सेवा स्वार्थी कारणांसाठी करत होता हा सैतानाचा दावा, ईयोबाच्या विश्वासूपणामुळे खोटा ठरला!

१३. ईयोब देवाला विश्वासू राहिल्यामुळे काय झाले?

१३ ईयोबाच्या विश्वासूपणामुळे यहोवाला, सैतानाच्या अपमानजनक आव्हानाला एक जोरदार उत्तर देण्याची संधी मिळाली. ईयोब खरोखरच देवाचा मित्र होता आणि देवाने त्याला त्याच्या विश्वासूपणाचे प्रतिफळ दिले.​—ईयोब ४२:​१२-१७.

तुम्ही कसे सामील आहात

१४, १५. सैतानाने लावलेला दोषारोप केवळ ईयोबावरच नव्हे तर सर्व मानवांवर होता, असे आपण का म्हणू शकतो?

१४ देवाला एकनिष्ठ राहण्याच्या बाबतीत सैतानाने प्रस्तुत केलेला वादविषय एकट्या ईयोबाविषयीच नव्हता. तुम्हीही त्यात सामील आहात. नीतिसूत्रे २७:११ मध्ये हे स्पष्टपणे दाखवण्यात आले आहे; तेथे यहोवाचे वचन म्हणते: “माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणाऱ्यास मी प्रत्युत्तर देईन.” ईयोबाचा मृत्यू होऊन शेकडो वर्षे उलटल्यानंतर लिहिण्यात आलेले हे शब्द दाखवून देतात, की सैतान अद्यापही देवाला टोमणे मारून त्याच्या सेवकांवर आरोप लावत होता. यहोवा संतुष्ट होईल अशाप्रकारे आपण जगतो तेव्हा खरे तर सैतानाच्या खोट्या आरोपांना उत्तर देण्यासाठी यहोवाला एक संधी आपण देत असतो आणि अशाप्रकारे आपण त्याचे मन आनंदित करतो. हे ऐकून तुम्हाला कसे वाटते? दियाबलाच्या खोट्या आरोपांना उत्तर देण्यात आपलाही भाग आहे, हे ऐकून आपल्याला कृतकृत्य वाटत नाही का? यासाठी आपल्याला काही बदल करावे लागले तरी आपण ते आनंदाने करू.

१५ सैतानाने काय म्हटले याकडे लक्ष द्या: “मनुष्य आपल्या प्राणासाठी आपले सर्वस्व देईल.” (ईयोब २:४) सैतानाने, “मनुष्य” असे संबोधून हे स्पष्ट केले, की त्याचा आरोप केवळ ईयोबावर नव्हे तर सर्व मानवांवर होता. हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. सैतानाने, तुमच्या एकनिष्ठेवर शंका घेतली आहे. सैतान हे पाहू इच्छितो, की तुम्ही कधी एकदाची देवाची आज्ञा मोडता व संकट येते तेव्हा धार्मिक जीवनाक्रमण सोडून देता. असे घडवून आणण्यासाठी सैतान काय करण्याचा प्रयत्न करील?

१६. (क) सैतान कोणकोणत्या मार्गांनी लोकांना देवापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो? (ख) दियाबल या पद्धतींचा तुमच्याबाबतीत कसा उपयोग करू शकतो?

१६ दहाव्या अध्यायात आपण चर्चा केली, की सैतान लोकांना देवापासून दूर नेण्यासाठी विविध पद्धतींचा उपयोग करतो. एकीकडे तो “गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो.” (१ पेत्र ५:८) त्यामुळे, मित्रजन, नातेवाईक किंवा इतरजण तुम्हाला बायबलचा अभ्यास करण्यास व तुम्ही शिकत असलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यास विरोध करत असतात तेव्हा सैतानाचा प्रभाव दिसू शकतो. * (योहान १५:​१९, २०) तर दुसरीकडे, सैतान “स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो.” (२ करिंथकर ११:१४) तुम्हाला बहकवण्यासाठी व देव संतुष्ट होईल अशाप्रकारे तुम्हाला जगता येऊ नये म्हणून आमिष दाखवण्यासाठी दियाबल धूर्त मार्गांचा उपयोग करू शकतो. आपण देवाला संतुष्ट करू शकत नाही असे वाटायला लावून तो तुम्हाला निराश करू शकतो. (नीतिसूत्रे २४:१०) सैतान ‘गर्जणाऱ्या सिंहासारखा’ वागत असला काय किंवा “तेजस्वी देवदूताचे” सोंग घेत असला काय; त्याचा दावा मात्र तोच आहे: तुमच्यावर परीक्षा येतात किंवा तुमच्यासमोर मोह येतात तेव्हा तुम्ही देवाची सेवा करण्याचे थांबवाल, असे तो म्हणतो. ईयोबाप्रमाणे तुम्ही दियाबलाच्या आव्हानाला कसे उत्तर द्याल आणि देवाशी तुम्ही एकनिष्ठ आहात हे कसे दाखवाल?

यहोवाच्या आज्ञांचे पालन करणे

१७. कोणत्या मुख्य कारणामुळे आपण यहोवाच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे?

१७ देव संतुष्ट होईल अशाप्रकारे जगण्याद्वारे तुम्ही सैतानाच्या आव्हानाला उत्तर देऊ शकता. हे तुम्ही कसे करू शकता? बायबल म्हणते: “तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तीने प्रीति कर.” (अनुवाद ६:५) देवाबद्दल तुमच्या मनात जसजसे प्रेम वाढत जाईल तसतसे तुमच्यात, त्याच्या अपेक्षेप्रमाणे वागण्याची इच्छा निर्माण होईल. प्रेषित योहानाने लिहिले: “देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय.” तुम्ही जर पूर्ण हृदयाने यहोवावर प्रेम केले तर तुम्हाला दिसून येईल की “त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.”​—१ योहान ५:३.

१८, १९. (क) यहोवाच्या आज्ञांतील काही आज्ञा कोणत्या आहेत? (पृष्ठ १२२ वरील चौकोन पाहा.) (ख) देव आपल्याकडून अवाजवी अपेक्षा करीत नाही, असे आपण का म्हणू शकतो?

१८ यहोवाच्या आज्ञा कोणत्या आहेत? यांतील काही आज्ञा अशा वर्तनाविषयी आहेत की जे आपण टाळले पाहिजे. जसे की, पृष्ठ १२२ वरील, “ यहोवाला वीट आणणाऱ्या गोष्टी टाळा” असे शीर्षक असलेला चौकोन पाहा. बायबल ज्या गोष्टींचा स्पष्टपणे निषेध करते त्यांची यादी तुम्हाला यात वाचायला मिळेल. वरवर नजर टाकल्यावर, यातील काही प्रथा तुम्हाला आक्षेपार्ह वाटणार नाहीत. पण दिलेल्या शास्त्रवचनांवर मनन केल्यावर तुम्हाला कदाचित यहोवाच्या नियमांतील सुज्ञता दिसून येईल. तुमच्या वर्तनात तुम्हाला बदल करावे लागतील तेव्हा ते तुम्हाला सर्वात जड जाईल. तरीपण, देव संतुष्ट होईल अशाप्रकारे जगल्याने तुम्हाला खूप समाधान व आनंद मिळेल. (यशया ४८:​१७, १८) आणि असे करणे तुमच्या आवाक्याबाहेर नाही. असे आपण का म्हणू शकतो?

१९ आपल्याला जितके करता येते त्याच्याहून अधिक यहोवा आपल्याकडून अपेक्षा करीत नाही. (अनुवाद ३०:​११-१४) त्याला आपल्या क्षमतेची, आपल्या शक्तीची आपल्यापेक्षाही अधिक जाणीव आहे. (स्तोत्र १०३:१४) शिवाय, यहोवा त्याच्या आज्ञांचे पालन करण्याची शक्ती आपल्याला देऊ शकतो. प्रेषित पौलाने लिहिले: “देव विश्वसनीय आहे तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायहि करील, ह्यासाठी की, तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे.” (१ करिंथकर १०:१३) तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून यहोवा तुम्हाला ‘पराकोटीचे सामर्थ्य’ देऊ शकतो. (२ करिंथकर ४:७) अनेक परीक्षांचा सामना केल्यानंतर पौल म्हणू शकला: “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे.”​—फिलिप्पैकर ४:१३.

देवाला प्रिय असलेले गुण विकसित करणे

२०. देवाला प्रिय असलेले कोणते गुण तुम्ही विकसित केले पाहिजेत, आणि हे महत्त्वपूर्ण का आहे?

२० पण यहोवाला संतुष्ट करण्यात त्याला ज्या गोष्टींची घृणा वाटते त्या टाळणे, इतकेच गोवलेले नाही. त्याला ज्या गोष्टी प्रिय वाटतात त्या तुम्हाला देखील प्रिय वाटल्या पाहिजेत. (रोमकर १२:९) ज्यांचा तुमच्यासारखाच दृष्टिकोन आहे, तुमच्यासारख्याच आवडी-निवडी आणि मूल्ये आहेत अशा लोकांकडेच तुम्ही आकर्षित होत नाही का? यहोवाच्या बाबतीत देखील असेच आहे. तेव्हा, यहोवाला प्रिय वाटणाऱ्या गोष्टींवर प्रेम करायला शिका. यांतील काहींचे वर्णन स्तोत्र १५:​१-५ मध्ये दिले आहे; यहोवा ज्यांना आपले मित्र समजतो त्यांच्याविषयी त्यात सांगितले आहे. यहोवाचे मित्र, बायबलमध्ये ‘आत्म्याचे फळ’ म्हटलेले गुण दाखवतात. यांत, “प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन” या गुणांचा समावेश होतो.​—गलतीकर ५:२२, २३.

२१. देवाला प्रिय असलेले गुण विकसित करण्यासाठी तुम्हाला मदत कशी मिळू शकेल?

२१ नियमितरीत्या बायबलचे वाचन व त्याचा अभ्यास केल्याने तुम्हाला देवाला प्रिय असलेले गुण विकसित करण्यास मदत मिळेल. आणि देव आपल्याकडून काय अपेक्षितो हे शिकून घेतल्यामुळे तुम्हाला, तुमचे विचार देवाच्या विचारांबरोबर जुळवता येतील. (यशया ३०:​२०, २१) यहोवावर तुम्ही जसजसे प्रेम वाढवत जाल तसतसे तुम्हाला त्याला संतुष्ट करणारे जीवन जगावेसे वाटेल.

२२. देव संतुष्ट होईल अशाप्रकारे जगण्याद्वारे तुम्ही काय साध्य कराल?

२२ यहोवा संतुष्ट होईल अशाप्रकारे जगण्याकरता तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. जीवनात तुम्ही बदल करता तेव्हा ते, जुने मनुष्यत्व काढून टाकून नवे मनुष्यत्व धारण करण्यासारखे आहे, अशी तुलना बायबल करते. (कलस्सैकर ३:​९, १०) पण यहोवाच्या आज्ञांविषयी स्तोत्रकर्त्याने लिहिले, की त्या “पाळिल्याने मोठी फलप्राप्ति होते.” (स्तोत्र १९:११) देव संतुष्ट होईल अशाप्रकारे जगल्याने खूप प्रतिफळ मिळते, याचा तुम्हालाही प्रत्यय येईल. असे केल्याने तुम्ही सैतानाच्या आव्हानाला उत्तर द्याल आणि यहोवाचे मन आनंदित कराल!

^ परि. 16 याचा अर्थ असा होत नाही, की जे तुमचा विरोध करतात त्या प्रत्येक व्यक्तीवर सैतानाचा कब्जा आहे. पण सैतान या युगाचा देव आहे आणि संपूर्ण जग त्याच्या मुठीत आहे. (२ करिंथकर ४:४; १ योहान ५:१९) त्यामुळे, देव संतुष्ट होईल अशाप्रकारे जगणे म्हणजे प्रवाहाच्या उलट दिशेने पोहणे; आणि काहीजण तुमचा विरोध करतील हे अपेक्षितच आहे.