व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय अठरा

बाप्तिस्मा आणि देवाबरोबर तुमचा नातेसंबंध

बाप्तिस्मा आणि देवाबरोबर तुमचा नातेसंबंध
  • ख्रिस्ती बाप्तिस्मा कसा दिला जातो?

  • बाप्तिस्मा घेण्याच्या पात्रतेचे होण्याकरता तुम्ही कोणती पावले उचलली पाहिजेत?

  • एखादी व्यक्ती देवाला आपले जीवन समर्पित कशी करते?

  • बाप्तिस्मा घेण्याचे खास कारण काय आहे?

१. एका इथियोपियन अधिकाऱ्याने बाप्तिस्मा घेण्याची इच्छा का व्यक्त केली?

“पाहा हे पाणी; मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे?” पहिल्या शतकातील एका इथियोपियन अधिकाऱ्याने हा प्रश्न विचारला होता. फिलिप्प नावाच्या एका ख्रिश्चनाने त्याला येशू वचनयुक्त मशीहा आहे हे शाबीत करून दाखवले होते. शास्त्रवचनांतून शिकलेल्या गोष्टींनी भारावून जाऊन या इथियोपियन मनुष्याने लगेच कार्य केले. आपण बाप्तिस्मा घेऊ इच्छितो, असे त्याने बोलून दाखवले.​—प्रेषितांची कृत्ये ८:​२६-३६.

२. बाप्तिस्म्याविषयी तुम्ही गंभीरपणे का विचार केला पाहिजे?

तुम्ही जर यहोवाच्या साक्षीदारांबरोबर या पुस्तकाच्या आधीच्या अध्यायांचा लक्षपूर्वक अभ्यास केला असेल, तर ‘मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे?’ हा प्रश्न विचारायला आपणही तयार आहोत असे कदाचित तुम्हाला वाटत असेल. आतापर्यंत तुम्ही परादीसमधील सार्वकालिक जीवनाबद्दल बायबलच्या अभिवचनांविषयी शिकला आहात. (प्रकटीकरण २१:​३, ४) मृतांची खरी स्थिती आणि पुनरुत्थानाची आशा, यांच्याविषयी देखील तुम्ही शिकला आहात. (उपदेशक ९:५; योहान ५:​२८, २९) तुम्ही कदाचित यहोवाच्या साक्षीदारांशी त्यांच्या मंडळीच्या सभांमध्ये संगती करू लागला असाल आणि ते खऱ्या धर्माचे आचरण कसे करतात हे आपल्या डोळ्यांनी पाहिले असेल. (योहान १३:३५) आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही यहोवा देवाबरोबर एक व्यक्तिगत नातेसंबंध जोडण्यास सुरुवात केली असेल.

३. (क) येशूने आपल्या अनुयायांना कोणती आज्ञा दिली? (ख) पाण्याचा बाप्तिस्मा कसा दिला जातो?

तुम्ही देवाची सेवा करू इच्छिता हे कसे दाखवू शकता? येशूने आपल्या अनुयायांना सांगितले: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस . . . बािप्तस्मा द्या.” (मत्तय २८:१९) येशूने स्वतः पाण्याचा बाप्तिस्मा घेऊन एक उदाहरण मांडले. त्याच्यावर पाणी शिंपडण्यात आले नाही किंवा त्याने त्याच्या डोक्यावर थोडेसे पाणी ओतून घेतले नाही. (मत्तय ३:१६) “बाप्तिस्मा” हा शब्द “बुडवणे” असा अर्थ असलेल्या ग्रीक शब्दापासून आला आहे. त्यामुळे ख्रिस्ती बाप्तिस्मा म्हणजे पाण्याखाली पूर्णपणे बुडणे.

४. पाण्याने बाप्तिस्मा घेण्याद्वारे काय दिसून येते?

यहोवा देवाबरोबर नातेसंबंध जोडू इच्छिणाऱ्या सर्वांनी बाप्तिस्मा घेतला पाहिजे. तुम्ही बाप्तिस्मा घेता तेव्हा, आपण देवाची सेवा करू इच्छितो हे तुम्ही जाहीररित्या व्यक्त करता. यहोवाची इच्छा पूर्ण करण्यास तुम्ही आनंदी आहात हेही त्यावरून दिसते. (स्तोत्र ४०:​७, ८) परंतु, बाप्तिस्मा घेण्याच्या पात्रतेचे होण्यासाठी काही निश्‍चित पावले उचलण्याची गरज आहे.

ज्ञान आणि विश्वासाची गरज आहे

५. (क) बाप्तिस्मा घेण्यासाठी पहिले पाऊल कोणते आहे? (ख) ख्रिस्ती सभा महत्त्वाच्या का आहेत?

तुम्ही पहिले पाऊल उचलले देखील आहे. ते कसे? कदाचित बायबलचा पद्धतशीर अभ्यास करून तुम्ही यहोवा देव आणि येशू ख्रिस्त यांच्याविषयीचे ज्ञान घेऊ लागला आहात. (योहान १७:३) पण इतकेच ज्ञान पुरेसे नाही. ख्रिश्चनांनी “[देवाच्या] इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे.” (कलस्सैकर १:९) यासाठी, यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीच्या सभांना उपस्थित राहिल्याने तुम्हाला बरीच मदत मिळू शकेल. अशा सभांना उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे. (इब्री लोकांस १०:​२४, २५) नियमितरीत्या सभांना उपस्थित राहिल्याने देवाबद्दलच्या तुमच्या ज्ञानात वृद्धी होईल.

बाप्तिस्मा घेण्याच्या पात्रतेचे ठरण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे देवाच्या वचनाचे अचूक ज्ञान घेणे

६. बाप्तिस्मा घेण्याच्या पात्रतेचे होण्याकरता तुम्हाला बायबलचे किती ज्ञान असले पाहिजे?

अर्थात बाप्तिस्मा घेण्यासाठी तुम्हाला बायबलमधली सगळी माहिती असली पाहिजे, असे नाही. इथियोपियन अधिकाऱ्याला थोडेच ज्ञान होते, परंतु शास्त्रवचनांतील काही भाग समजण्यासाठी त्याला मदत हवी होती. (प्रेषितांची कृत्ये ८:​३०, ३१) तसेच, तुम्हालाही पुष्कळ शिकायचे आहे. तसे पाहायला गेल्यास, तुम्ही देवाबद्दलचे ज्ञान घेत राहणे कधीच थांबवणार नाही. (उपदेशक ३:११) परंतु बाप्तिस्म्याआधी तुम्हाला बायबलच्या मूलभूत शिकवणुकी माहीत असल्या पाहिजेत व तुम्ही त्या स्वीकारल्या पाहिजेत. (इब्री लोकांस ५:१२) या शिकवणुकींपैकी काही, मृतांच्या स्थितीविषयीचे सत्य, देवाच्या नावाविषयी आणि त्याच्या राज्याविषयीचे महत्त्व, या आहेत.

७. बायबलच्या अभ्यासाचा तुमच्यावर काय परिणाम झाला पाहिजे?

परंतु, केवळ ज्ञान असणे पुरेसे नाही; कारण, “विश्वासावाचून [देवाला] संतोषविणे अशक्य आहे.” (इब्री लोकांस ११:६) बायबल आपल्याला सांगते, की करिंथ या प्राचीन शहरातील काही लोकांनी येशूचे अनुयायी प्रचार करीत असलेला संदेश ऐकला तेव्हा ते ‘विश्वास ठेवू लागले व बाप्तिस्मा घेऊ लागले.’ (प्रेषितांची कृत्ये १८:८) तसेच, बायबलच्या अभ्यासाने तुमचा असा पक्का विश्वास झाला पाहिजे, की बायबल हे देवाच्या आत्म्याने प्रेरित केलेले वचन आहे. बायबल अभ्यासाने तुम्हाला, देवाच्या अभिवचनांवर व येशूचे बलिदान तुम्हाला वाचवू शकते, यावर विश्वास ठेवण्यास मदत मिळाली पाहिजे.​—यहोशवा २३:१४; प्रेषितांची कृत्ये ४:१२; २ तीमथ्य ३:​१६, १७.

इतरांना बायबलमधील सत्य सांगणे

८. तुम्ही जे शिकत आहात ते इतरांना सांगण्यास तुम्हाला काय प्रवृत्त करेल?

तुमच्या अंतःकरणात जसजसा विश्वास वाढत जाईल तसतसे तुमच्यामध्ये, शिकत असलेल्या गोष्टी इतरांना सांगण्याची उत्सुकता निर्माण होईल. (यिर्मया २०:९) देव आणि त्याचे उद्देश यांच्याबद्दल इतरांना सांगण्याची तुम्हाला तीव्र प्रेरणा मिळेल.​—२ करिंथकर ४:१३.

तुमच्या विश्वासाने तुम्हाला, तुम्ही मानत असलेल्या गोष्टी इतरांना सांगण्यास प्रवृत्त केले पाहिजे

९, १०. (क) बायबलमधील सत्य तुम्ही कोणाला सांगाल? (ख) यहोवाच्या साक्षीदारांच्या संघटित प्रचार कार्यात तुम्ही भाग घेऊ इच्छित असाल तर तुम्ही काय केले पाहिजे?

तुम्ही व्यवहारचातुर्याचा उपयोग करून बायबलमधील सत्य आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, शेजाऱ्यांना, सहकर्मींना सांगाल. कालांतराने तुम्हाला यहोवाच्या साक्षीदारांच्या संघटित प्रचार कार्यातही भाग घ्यावासा वाटेल. अशावेळी तुमची ही इच्छा, तुम्हाला बायबल शिकवत असलेल्या साक्षीदाराला मनमोकळेपणाने सांगा. सार्वजनिक सेवेत तुम्ही भाग घेण्यास पात्र आहात, असे दिसत असल्यास, मंडळीचे वडील तुमची आणि जे तुम्हाला बायबल शिकवत आहेत त्यांची भेट घेण्याची व्यवस्था करतील.

१० यामुळे तुम्ही, देवाच्या कळपाची काळजी घेणाऱ्या मंडळीतील काही ख्रिस्ती वडिलांबरोबर परिचित व्हाल. (प्रेषितांची कृत्ये २०:२८; १ पेत्र ५:​२, ३) या वडिलांना जर दिसून आले, की तुम्हाला बायबलच्या मूलभूत शिकवणुकी समजल्या आहेत, तुम्ही देवाच्या तत्त्वांनुसार जीवन जगत आहात, व यहोवाचे साक्षीदार होण्याची तुमची मनापासून इच्छा आहे तर ते, तुम्ही बाप्तिस्मा न घेतलेला सुवार्तेचा प्रचारक म्हणून सार्वजनिक सेवेत भाग घेण्यास पात्र आहात असे तुम्हाला सांगतील.

११. सार्वजनिक सेवेत भाग घेण्याच्या पात्रतेचे ठरण्याआधी काहींना कोणते फेरबदल करावे लागतील?

११ किंवा, वडिलांना असेही वाटेल, की सार्वजनिक सेवेत भाग घेण्याच्या पात्रतेचे ठरण्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत आणि सवयींत काही फेरबदल करण्याची गरज आहे. यांमध्ये अशाही सवयींचा समावेश आहे ज्या कदाचित तुम्ही इतरांपासून लपवून ठेवल्या आहेत. यास्तव, बाप्तिस्मा न घेतलेला प्रचारक होण्याविषयी विचारण्याआधी, लैंगिक अनैतिकता, दारूबाजी, मादक पदार्थांचे सेवन यासारख्या गंभीर पापांपासून तुम्ही मुक्त झाले पाहिजे.​—१ करिंथकर ६:​९, १०; गलतीकर ५:​१९-२१.

पश्‍चात्ताप आणि परिवर्तन

१२. पश्‍चात्तापाची गरज का आहे?

१२ बाप्तिस्मा घेण्याच्या पात्रतेचे ठरण्याआधी तुम्हाला काही पावले उचलावी लागतील. प्रेषित पेत्राने म्हटले: “तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्‍चात्ताप करा व वळा.” (प्रेषितांची कृत्ये ३:१९) पश्‍चात्ताप करण्याचा अर्थ, तुम्ही केलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल मनापासून पस्तावा वाटणे. एखादी व्यक्ती अनैतिक जीवन शैली आचरत होती तर अशावेळी पश्‍चात्ताप करणे अगदी उचित आहे; परंतु एखादी व्यक्ती नैतिकरीत्या शुद्ध जीवन जगत असली तरीसुद्धा तिने पश्‍चात्ताप केला पाहिजे. का? कारण, सर्व मानव पापी आहेत आणि त्यांना देवाच्या क्षमेची गरज आहे. (रोमकर ३:२३; ५:१२) बायबलचा अभ्यास करण्याआधी तुम्हाला देवाची काय इच्छा आहे हे माहीत नव्हते. त्यामुळे तुम्ही त्याच्या इच्छेच्या सुसंगतेत जीवन व्यतित करत होता, असे तुम्ही कसे काय म्हणू शकता बरे? यासाठीच, पश्‍चात्तापाची गरज आहे.

१३. परिवर्तन म्हणजे काय?

१३ पश्‍चात्तापानंतर परिवर्तन अर्थात ‘मागे वळण्याची’ गरज आहे. तुम्हाला फक्तच पस्तावा वाटणे पुरेसे नाही. तुम्ही तुमची पूर्वीची जीवनशैली आचरण्याचे सोडून दिले पाहिजे आणि इथूनपुढे जे बरोबर ते करण्याचा दृढनिश्चय केला पाहिजे. पश्‍चात्ताप आणि परिवर्तन ही दोन पावले तुम्ही बाप्तिस्म्याआधी उचलली पाहिजेत.

व्यक्तिगत समर्पण करणे

१४. बाप्तिस्म्याआधी कोणते महत्त्वाचे पाऊल उचलण्याची गरज आहे?

१४ बाप्तिस्म्याआधी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे जे तुम्ही उचलले पाहिजे. तुम्ही यहोवा देवाला स्वतःचे समर्पण केले पाहिजे.

प्रार्थनेद्वारे तुम्ही यहोवा देवाला आपले जीवन समर्पित केले का?

१५, १६. देवाला तुमचे जीवन समर्पण करण्याचा काय अर्थ होतो, आणि कोणत्या गोष्टीमुळे एक व्यक्ती असे करण्यास प्रवृत्त होते?

१५ मनापासून प्रार्थना करण्याद्वारे तुम्ही यहोवा देवाला आपले जीवन समर्पण करता तेव्हा, चिरकालासाठी तुम्ही यहोवाची अनन्य भक्ती कराल, असे त्याला वचन देता. (अनुवाद ६:१५) पण आपण असे का करू इच्छितो? या प्रश्‍नाचे उत्तर मिळण्यासाठी आपण एका उदाहरणाचा विचार करू. समजा एक तरुण एखाद्या तरुणीकडे आकर्षित झाला आहे. तो जितका तिच्याशी परिचित होतो आणि तिच्या अंगी असलेले उत्तम गुण पाहतो तितकी अधिक ती त्याला आवडू लागते. कालांतराने, साहजिकच तो तिला लग्नाची मागणी घालतो. अर्थात, लग्न केल्याने आपल्यावर आणखी जबाबदाऱ्या येणार, हे या तरुणाला माहीत असते. पण तरीसुद्धा प्रेमाने प्रवृत्त होऊन तो लग्न करण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल अवश्य उचलेल.

१६ तुम्ही जेव्हा यहोवाविषयी जाणून घेता आणि त्याच्यावर प्रेम करू लागता तेव्हा तुम्ही कोणत्याही अटी न ठेवता, त्याची सेवा करण्यास प्रवृत्त होता. जो कोणी देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याचा अनुयायी होऊ इच्छितो त्याने “आत्मत्याग” केला पाहिजे. (मार्क ८:३४) व्यक्तिगत इच्छा आणि ध्येये आपल्याला, देवाच्या पूर्णपणे आज्ञेत राहताना आडकाठी आणणार नाही, याची खात्री करून आपण आत्मत्याग करतो. त्यामुळे, बाप्तिस्मा घेण्याआधी यहोवा देवाची इच्छा पूर्ण करणे, हे तुमच्या जीवनाचे मुख्य ध्येय असले पाहिजे.​—१ पेत्र ४:२.

अपयशी ठरण्याच्या भीतीवर मात करणे

१७. काही जण देवाला आपले जीवन समर्पित करण्यास का कचरतात?

१७ काही जण यहोवाला आपले जीवन समर्पित करण्यास कचरतात कारण त्यांना, इतके गंभीर पाऊल उचलण्यास भीती वाटते. समर्पित ख्रिस्ती झालो तर आपण देवाला जबाबदार ठरतो, अशी त्यांना भीती वाटते. अपयशी ठरून यहोवाला नाराज करण्यापेक्षा आपले जीवन त्याला समर्पित न केलेलेच उत्तम, असा विचार ते करतात.

१८. कोणत्या गोष्टीने प्रवृत्त होऊन तुम्ही तुमचे जीवन यहोवाला समर्पण कराल?

१८ तुम्ही जसजसे यहोवावर प्रेम करू लागता तसतसे तुम्ही त्याला तुमचे जीवन समर्पित करण्यास व शक्य तितके या समर्पणानुसार जीवन जगण्यास प्रवृत्त होता. (उपदेशक ५:४) समर्पणानंतर, तुम्हाला ‘सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरीता त्याला शोभेल असे वागावेसे’ वाटेल. (कलस्सैकर १:१०) देवावर प्रेम असल्यामुळे तुम्हाला त्याची इच्छा पूर्ण करणे कठीण आहे, असे वाटणार नाही. तुम्ही प्रेषित योहानाशी सहमत व्हाल, ज्याने असे लिहिले: “देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.”​—१ योहान ५:३.

१९. देवाला तुम्ही तुमचे जीवन समर्पित करता तेव्हा तुम्हाला भिण्याचे काही कारण का नाही?

१९ तुमचे जीवन देवाला समर्पण करण्याकरता तुम्हाला परिपूर्ण असण्याची गरज नाही. यहोवा तुमच्या मर्यादा जाणतो आणि तुम्ही जितके करू शकता त्याच्यापेक्षा अधिक तो तुमच्याकडून अपेक्षा करीत नाही. (स्तोत्र १०३:१४) तुम्ही यशस्वी व्हावे अशी त्याची इच्छा आहे आणि तो तुम्हाला पाठबळ देईल, तुम्हाला साहाय्य करील. (यशया ४१:१०) तुम्ही जर पूर्ण अंतःकरणाने यहोवावर भरवसा ठेवला तर तो तुमचा “मार्गदर्शक होईल,” अशी तुम्ही पक्की खात्री बाळगू शकता.​—नीतिसूत्रे ३:​५, ६.

समर्पणाचे द्योतक म्हणून बाप्तिस्मा घेणे

२०. यहोवाला तुम्ही तुमचे जीवन समर्पित केल्यावर तुम्ही ही गोष्ट तुमच्या मनातच का ठेवू शकत नाही?

२० आत्ताच आपण ज्या गोष्टींची चर्चा केली त्यांवर विचार केल्याने तुम्हाला, प्रार्थनेद्वारे स्वतःचे जीवन देवाला समर्पण करण्यास मदत होईल. जो कोणी देवावर खरोखरच प्रेम करतो त्याने ‘तारणासाठी मुखाने कबूली’ दिली पाहिजे. (रोमकर १०:१०) मुखाने कबूली कशी काय देता येईल?

बाप्तिस्मा घेतल्याने असे सूचित होते की एका अर्थाने तुमचा मृत्यू होतो, म्हणजेच, तुमची पूर्वीची जीवनशैली संपुष्टात येते व तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी जिवंत होता

२१, २२. तुम्ही तुमच्या विश्वासाची ‘मुखाने कबुली’ कशी देऊ शकता?

२१ तुम्ही बाप्तिस्मा घेऊ इच्छिता हे तुमच्या मंडळीच्या अध्यक्ष पर्यवेक्षकांना सांगा. ते काही वडिलांना, बायबलच्या मूलभूत शिकवणुकींसंबंधी तुम्हाला काही प्रश्नांची उजळणी करण्यासाठी व्यवस्था करतील. तुम्ही बाप्तिस्म्याकरता पात्र आहात, असे जर या वडिलांना वाटत असेल तर ते तुम्हाला येत्या संमेलनात किंवा अधिवेशनात तुम्ही बाप्तिस्मा घेऊ शकता असे सांगतील. * अशा प्रसंगी सहसा, बाप्तिस्म्याचा अर्थ सांगणारे एक भाषण दिले जाते. या भाषणाच्या शेवटी वक्ता बाप्तिस्मा घेणाऱ्या सर्व उमेदवारांना उभे राहून दोन साध्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगतो; आपल्या विश्वासाची ‘मुखाने कबुली’ देण्याचा हा एक मार्ग होय.

२२ बाप्तिस्म्याद्वारेच तुम्ही, देवाला आपले जीवन समर्पित केलेली व्यक्ती म्हणून व यहोवाचा साक्षीदार म्हणून जाहीररीत्या ओळखले जाल. बाप्तिस्मा घेणारे उमेदवार, यहोवाला आपले जीवन समर्पित करीत आहेत हे दाखवण्यासाठी त्यांना पाण्याखाली पूर्णपणे बुडवले जाते.

तुमच्या बाप्तिस्म्याचा अर्थ

२३. “पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बािप्तस्मा” घेण्याचा काय अर्थ होतो?

२३ येशूने म्हटले, की त्याचे शिष्य “पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बािप्तस्मा” घेतील. (मत्तय २८:१९) याचा अर्थ, बाप्तिस्मा घेणारा उमेदवार यहोवा देवाचा आणि येशू ख्रिस्ताचा अधिकार मान्य करतो. (स्तोत्र ८३:१८; मत्तय २८:१८) तो, देवाच्या पवित्र आत्म्याचे अर्थात कार्यकारी शक्तीचे कार्य मान्य करतो.​—गलतीकर ५:​२२, २३; २ पेत्र १:२१.

२४, २५. (क) बाप्तिस्मा कशाचे द्योतक आहे? (ख) कोणत्या प्रश्‍नाचे उत्तर मिळाले पाहिजे?

२४ परंतु, बाप्तिस्मा म्हणजे फक्त बुडवणे नव्हे. ते एका महत्त्वपूर्ण गोष्टीचे द्योतक आहे. पाण्याखाली जाण्याचा अर्थ असा होतो, की एका अर्थाने तुमचा मृत्यू होतो. म्हणजेच, तुमची पूर्वीची जीवनशैली संपुष्टात येते. पाण्यातून वर येण्याचा अर्थ, तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी जिवंत होता. हेही लक्षात ठेवा, की तुम्ही कोणत्याही कार्याला, एखाद्या मनुष्याला किंवा एखाद्या संघटनेला नव्हे तर स्वतः यहोवा देवाला तुमचे जीवन समर्पित केले आहे. समर्पण आणि बाप्तिस्म्याद्वारे तुम्ही देवाबरोबर निकट मैत्री करण्यास सुरुवात करता अर्थात एक घनिष्ठ नातेसंबंध जोडता.​—स्तोत्र २५:१४.

२५ पण बाप्तिस्मा झाला म्हणजे तुम्हाला तारण मिळाले असे नाही. प्रेषित पौलाने लिहिले: “भीत व कापत आपले तारण साधून घ्या.” (फिलिप्पैकर २:१२) बाप्तिस्मा ही केवळ एक सुरुवात आहे. तेव्हा प्रश्न असा येतो, की तुम्ही देवाच्या प्रीतीत कसे टिकून राहू शकता? शेवटल्या अध्यायात या प्रश्‍नाचे उत्तर दिले आहे.

^ परि. 21 दर वर्षी यहोवाचे साक्षीदार भरवत असलेल्या संमेलनांमध्ये व अधिवेशनांमध्ये बाप्तिस्म्यांची योजना केली जाते.