व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

परिशिष्ट

देवाचे नाव​—त्याचा वापर आणि अर्थ

देवाचे नाव​—त्याचा वापर आणि अर्थ

तुमच्या बायबलमध्ये स्तोत्र ८३:१८ या वचनाचे भाषांतर कशाप्रकारे करण्यात आले आहे? पंडिता रमाबाई भाषांतरात या वचनाचे भाषांतर पुढीलप्रकारे करण्यात आले आहे: “ज्या तुझे नाव यहोवा असे आहे तो तूच मात्र अवघ्या पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांनी जाणावे.” इतर अनेक बायबल अनुवादांमध्ये या वचनाचे अशाचप्रकारे भाषांतर करण्यात आले आहे. परंतु, पुष्कळ भाषांतरे यहोवा या नावाचा वापर करत नाहीत. त्याऐवजी ते पदव्यांचा वापर करतात जसे की “प्रभू” किंवा “सनातन.” पण या वचनात नेमके काय असले पाहिजे? पदवी की यहोवा हे नाव?

हिब्रू अक्षरांत देवाचे नाव

या वचनात नावाविषयी सांगितले आहे. बायबलचा बहुतेक भाग ज्या भाषेत लिहिण्यात आला होता त्या मूळ हिब्रू भाषेतील या वचनात एक अनोखे व्यक्तिगत नाव दिले आहे. ते יהוה (YHWH) या इब्री अक्षरांत आहे. मराठीत या नावाचे सर्वसाधारण भाषांतर “यहोवा” असे होते. पण हे नाव फक्त बायबलमधील केवळ या एकाच वचनात आहे का? नाही. मूळ हिब्रू शास्त्रवचनांत ते जवळजवळ ७,००० वेळा आढळते!

पण देवाचे नाव इतके महत्त्वपूर्ण आहे का? येशू ख्रिस्ताने शिकवलेल्या आदर्श प्रार्थनेचा विचार करा. या प्रार्थनेची सुरुवात या शब्दांनी होते: “हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो.” (मत्तय ६:९) नंतर, येशूने देवाला अशी प्रार्थना केली: “हे बापा, तू आपल्या नावाचे गौरव कर.” यावर स्वर्गातून देवाची ही वाणी ऐकू आली: “मी ते गौरविले आहे आणि पुन्हाहि गौरवीन.” (योहान १२:२८) तेव्हा, देवाचे नाव हे सर्वात महत्त्वाचे आहे, हे स्पष्टच आहे. पण मग काही भाषांतरकारांनी बायबलच्या त्यांच्या अनुवादांमधून ते नाव काढून त्याऐवजी पदव्या का घातल्या?

याची दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले कारण, पुष्कळ जण असा दावा करतात, की या नावाचा आपण उच्चार करू नये कारण मूळ भाषेत त्याचा उच्चार कसा केला जात होता हे आज कोणालाच माहीत नाही. प्राचीन हिब्रू भाषा स्वरांविना लिहिली जात होती. त्यामुळे, बायबल काळांतील लोक YHWH याचा नेमका कसा उच्चार करायचे हे आज कोणीच सांगू शकत नाही. परंतु याचा अर्थ, मग आपण देवाच्या नावाचा वापरच करू नये का? बायबल काळांत, येशू हे नाव येशूआ की येहोशुवा असे उच्चारले जात असावे हे आज कोणालाच निश्‍चितपणे सांगता येत नाही. तरीपण, आज संपूर्ण जगात लोक येशू या नावाचा वेगवेगळ्या रूपात उपयोग करतात; त्यांच्या भाषेत सामान्य असलेल्या पद्धतीने ते त्याचा उच्चार करतात. पहिल्या शतकातील लोक कसा उच्चार करत होते हे माहीत नसले म्हणून ते त्याचे नाव घेणे सोडत नाहीत. तसेच, समजा तुम्ही एका वेगळ्या देशात जाता. तिथे तुम्हाला दिसेल, की दुसऱ्या भाषेत तुमच्या नावाचा उच्चार वेगळ्या प्रकारे केला जातो. तेव्हा, देवाच्या नावाचा मूळ उच्चार कसा केला जात होता याविषयी आपल्याला खात्री नाही म्हणून त्याच्या नावाचा वापर न करणे हे कारण रास्त नाही.

बायबलमधून देवाचे नाव काढून टाकण्याचे दुसरे कारण म्हणजे, यहुद्यांची पिढ्यांपिढ्यांपासून चालत आलेली एक पारंपरिक धारणा. पुष्कळ लोक असा विश्वास करतात, की देवाचे नाव कधीच उच्चारण्यात येऊ नये. हा विश्वास, बायबलमधील एका नियमाच्या चुकीच्या अर्थावर आधारित आहे; त्या नियमात असे म्हटले आहे: “यहोवा तुझा देव याचे नाव तू व्यर्थ घेऊ नको, कारण जो त्याचे नाव घेतो त्याला यहोवा निर्दोष मानणार नाही.”​—निर्गम २०:​७, पं.र.भा.

या नियमानुसार, देवाच्या नावाचा गैरवापर करण्यास मनाई आहे. पण हा नियम, देवाच्या नावाचा आदरणीय पद्धतीने वापर करण्यासही मनाई करतो का? मुळीच नाही. हिब्रू बायबलचे (‘जुन्या कराराचे’) सर्व लेखक विश्वासू पुरूष होते. ते देवाने प्राचीन इस्राएलांना दिलेल्या नियमशास्त्रानुसार जगणारे होते. तरीसुद्धा, त्यांनी देवाच्या नावाचा सर्रासपणे वापर केला. उदाहरणार्थ, देवाच्या उपासकांनी मोठ्याने गायिलेल्या स्तोत्रांमध्ये या नावाचा समावेश केला. स्वतः यहोवा देवाने आपल्या उपासकांना त्याच्या नावाचा धावा करण्यास सांगितले; आणि जे आज्ञाधारक होते त्यांनी देवाची आज्ञा पाळली. (योएल २:​३२, पं.र.भा.; प्रेषितांची कृत्ये २:​२१, पं.र.भा. समास) म्हणूनच, ख्रिश्चनांना आज येशूने केले त्याप्रमाणे देवाचे नाव आदराने घेण्यात काहीही गैर वाटत नाही.​—योहान १७:२६.

देवाच्या नावाऐवजी पदव्यांचा उपयोग करून बायबल भाषांतरकार एक घोडचूक करतात. देव फार दूर आहे, तो व्यक्तिभावरहित आहे, असे ते भासवतात. परंतु बायबल तर मानवांना ‘परमेश्वराशी सख्य’ करण्यास आर्जवते. (स्तोत्र २५:१४) तुमच्या जिवलग मित्राचा विचार करा. तुम्हाला जर त्याचे नावच माहीत नसेल तर तुम्हाला तो जवळचा वाटेल का? तसेच, लोकांना अंधारात ठेवले जाते, यहोवा हे देवाचे नाव आहे असे त्यांना सांगितले जात नाही मग त्यांना देवाशी सख्य कसेकाय जोडता येईल? शिवाय, लोक देवाच्या नावाचा उपयोग करीत नसल्यामुळे त्यांना या नावाचा किती अद्‌भुत अर्थ होतो ते माहीत नाही. या नावाचा काय अर्थ होतो?

स्वतः देवानेच आपल्या नावाच्या अर्थाचे स्पष्टीकरण आपला विश्वासू सेवक मोशे याला दिले. मोशेने जेव्हा देवाच्या नावाविषयी विचारले तेव्हा यहोवाने त्याला उत्तर दिले: “मी जे होईन ते मी होईन.” (निर्गम ३:१४, NW) रॉदरहॅमच्या भाषांतरात असे म्हटले आहे: “मला वाटेल ते मी बनेन.” याचा अर्थ, आपले उद्देश वास्तवात उतरवण्यासाठी जी भूमिका घ्यावी लागते, ती भूमिका घेण्यास यहोवा समर्थ आहे.

तुमच्याकडे समजा, तुम्हाला जे वाटेल ते बनण्याची शक्ती असती तर? तुम्ही तुमच्या मित्रांसाठी काय केले असते? तुमच्या मित्रांपैकी एकजण खूप आजारी पडला तर तुम्ही एक कुशल डॉक्टर बनून त्याला बरे केले असते. तुमच्या दुसऱ्या मित्राला खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे, तर तुम्ही एक धनाढ्य दाता बनून त्याला आर्थिक मदत दिली असती. पण वास्तविकतेत असे आपण बनू शकत नाही कारण आपल्याजवळ मर्यादित क्षमता आहेत. तुम्ही बायबलचा जसजसा अभ्यास कराल तसतसे तुम्हाला हे पाहून आश्चर्य वाटेल, की यहोवा आपले उद्देश पूर्ण करण्याकरता जे आवश्यक होते ते तो कसा बनला. जे त्याच्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी आपल्या शक्तीचा उपयोग करण्यात त्याला आनंद वाटतो. (२ इतिहास १६:९) यहोवाचे नाव ज्यांना माहीत नाही त्यांना त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे हे सुंदर पैलू समजू शकत नाहीत.

तेव्हा, यहोवा हे नाव बायबलमध्ये असलेच पाहिजे. त्याच्या नावाचा अर्थ माहीत झाल्यामुळे व आपल्या उपासनेत त्याचा मुक्तपणे उपयोग केल्यामुळे आपल्याला आपला स्वर्गीय पिता यहोवा याच्या आणखी जवळ जाण्याची जबरदस्त प्रेरणा मिळते. *

^ परि. 3 देवाचे नाव, त्याच्या नावाचा अर्थ, या नावाचा उपासनेत वापर का केला पाहिजे त्याची कारणे यांबद्दलच्या अधिक माहितीकरता, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले सर्वकाळ टिकणारे ईश्वरी नाव (इंग्रजी) हे माहितीपत्रक पाहा.