व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

परिशिष्ट

पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्याबद्दलचे सत्य

पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्याबद्दलचे सत्य

त्रैक्याची शिकवण मानणारे लोक असे म्हणतात, की देव तीन व्यक्तींचा​—पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा मिळून बनलेला आहे. या तिन्ही व्यक्ती एकमेकांच्या बरोबरीच्या आहेत, सर्वसमर्थ आहेत आणि त्यांना सुरुवात नाही. यास्तव, त्रैक्याच्या शिकवणुकीनुसार, पिता देव आहे, पुत्र देव आणि पवित्र आत्माही देव आहे आणि तरीपण एकच देव आहे.

त्रैक्यावर विश्वास ठेवणारे पुष्कळ जण कबूल करतात, की त्यांना या शिकवणुकीचा उलगडा करता येत नाही. तरीपण ती बायबलची शिकवण आहे असे त्यांना वाटते. पण, एक लक्ष देण्याजोगी गोष्ट म्हणजे, “त्रैक्य” हा शब्द बायबलमध्ये कुठेच आढळत नाही. पण त्रैक्याची शिकवण तरी त्यात आहे का? या प्रश्‍नाचे उत्तर मिळण्यासाठी आपण एका शास्त्रवचनाची चर्चा करू या, की जे त्रैक्य मानणारे लोक सहसा त्रैक्याची शिकवण बायबलमध्ये आहे हे शाबीत करण्यासाठी दाखवतात.

“शब्द देव होता”

योहान १:१ म्हणते: “प्रारंभी शब्द होता, आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता.” त्याच अध्यायात पुढे प्रेषित योहान स्पष्टपणे दाखवतो, की हा “शब्द” म्हणजे येशू. (योहान १:१४) तथापि, शब्दाला देव म्हटल्यामुळे काही जण असा निष्कर्ष काढतात, की पुत्र आणि पिता एकाच देवाचे भाग असावेत.

पण एक गोष्ट लक्षात ठेवा. बायबलचा हा भाग मुळात ग्रीक भाषेत लिहिण्यात आला होता. नंतर, भाषांतरकारांनी ग्रीक भाषेतून तो इतर भाषांमध्ये अनुवादित केला. पण अनेक बायबल भाषांतरकारांनी, “शब्द देव होता,” हा वाक्यांश वापरला नाही. का नाही? या अनुवादकांना बायबल लिहिण्याकरता वापरलेल्या ग्रीक भाषेचे ज्ञान असल्यामुळे त्यांनी असा निष्कर्ष काढला, की “शब्द देव होता” या वाक्यांशाचे भाषांतर वेगळ्या प्रकारे केले पाहिजे. वेगळ्या प्रकारे म्हणजे कसे? इथे काही उदाहरणे आहेत: “लोगोस [शब्द] ईश्वरी होता.” (अ न्यू ट्रान्सलेशन ऑफ द बायबल) “शब्द एक देव होता.” (द न्यू टेस्टमेंट इन अॅन इंप्रूव्हड व्हर्शन) “शब्द देवाबरोबर होता आणि देवासारखाच त्याचा स्वभाव होता.” (द ट्रान्सलेटर्स न्यू टेस्टमेंट) या अनुवादांनुसार, शब्द स्वतः देव नव्हता. * उलट, यहोवाच्या आत्मिक प्राण्यांमध्ये शब्दाचे पद सर्वात उच्च असल्यामुळे त्याला “एक देव” असे संबोधण्यात आले आहे. येथे, “देव” या संज्ञेचा अर्थ “शक्तिशाली” असा होतो.

आणखी पुरावे

पुष्कळ लोकांना बायबलची ग्रीक भाषा येत नाही. मग, प्रेषित योहानाला नेमके काय म्हणायचे होते, हे आपल्याला कसे काय माहीत होऊ शकेल? या उदाहरणावर विचार करा: एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना एक विषय समजावून सांगतो. नंतर, विद्यार्थ्यांमध्ये, त्या विषयाचे स्पष्टीकरण कसे समजावे यावर मतभेद होतात. मग विद्यार्थी हा मतभेद कसा सोडवू शकतात? ते अधिक माहितीसाठी शिक्षकालाच विचारू शकतात. आणखी पुरावे जाणून घेतल्यामुळे त्यांना तो विषय अधिक चांगल्याप्रकारे समजेल. तसेच, योहान १:१ या वचनाचा अर्थ समजण्यासाठी तुम्ही योहानाच्या शुभवर्तमानात येशूच्या पदाविषयी अधिक माहिती पाहू शकता. या विषयावर अधिक पुरावे मिळाल्यामुळे तुम्हाला उचित निष्कर्ष काढायला मदत होईल.

जसे की, योहान पुढे अध्याय १ आणि वचन १८ मध्ये काय लिहितो ते पाहा. तो लिहितो: “[सर्वसमर्थ] देवाला कोणीहि कधीच पाहिले नाही.” पण मानवांनी तर येशूला अर्थात पुत्राला पाहिले आहे; कारण योहान म्हणतो: “शब्द देही झाला, आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली, आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले.” (योहान १:१४) मग, पुत्र सर्वसमर्थ देवाचा भाग कसा काय होऊ शकेल? योहान असेही म्हणतो, की शब्द “देवासह होता.” एक व्यक्ती एकाच वेळी, दुसऱ्या व्यक्तीसह असताना स्वतः तीच व्यक्ती कशी असू शकते? (योहान १:३४) शिवाय, योहान १७:३ मध्ये लिहिल्यानुसार, येशू स्वतः, तो आणि त्याचा स्वर्गीय पिता या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत हा फरक दाखवतो. तो आपल्या पित्याला “एकच खरा देव” म्हणतो. तसेच, योहान आपल्या शुभवर्तमानाच्या शेवटी असे म्हणून सारांश देतो: “येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा.” (योहान २०:३१) येशूला देव नव्हे तर देवाचा पुत्र म्हटले आहे, याची नोंद घ्या. योहानाच्या शुभवर्तमानात पुरवलेली ही ज्यादा माहिती, योहान १:१ हे वचन आपण कसे समजावे हे दाखवते. येशू अर्थात शब्द “देव” आहे पण तो या अर्थाने की त्याला उच्च पद आहे परंतु ते सर्वसमर्थ देवाच्या बरोबरीचे पद नाही.

पुराव्यांची पुष्टी

पुन्हा एकदा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे उदाहरण घ्या. समजा, शिक्षकाने ज्यादा स्पष्टीकरण दिल्यावरही काही विद्यार्थ्यांच्या मनात अजूनही शंका आहेत. मग हे विद्यार्थी काय करू शकतात? ते त्याच विषयावर अधिक माहिती देऊ शकणाऱ्या दुसऱ्या शिक्षकाकडे जाऊ शकतात. दुसऱ्या शिक्षकाने जर पहिल्या शिक्षकाच्या स्पष्टीकरणांना दुजोरा दिला तर बहुतेक विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर होऊ शकतील. तसेच, बायबल लेखक योहान, येशू आणि सर्वसमर्थ देव यांच्यातील नातेसंबंधाविषयी नेमके काय म्हणू इच्छितो याची तुम्हाला खात्री वाटत नसेल तर आणखी माहितीसाठी तुम्ही दुसरा बायबल लेखक काय म्हणतो ते पाहू शकता. जसे की, मत्तय या लेखकाने काय लिहिले त्याचा विचार करा. या युगाच्या समाप्तीविषयी येशूने काय म्हटले ते तो सांगतो: “त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतास नाही, पुत्रालाहि नाही.” (मत्तय २४:३६) येशू सर्वसमर्थ देव नाही, हे या शब्दांवरून कसे सिद्ध होते?

येशू म्हणतो, की पुत्रापेक्षा पित्याला जास्त माहीत आहे. पण येशू जर सर्वसमर्थ देवाचा भाग असता तर पित्याप्रमाणे त्यालाही वस्तुस्थिती माहीत असती. याचा अर्थ, पुत्र आणि पिता हे समान नाहीत. पण काहीजण म्हणतील: ‘येशूचे दोन स्वभाव होते. येथे तो मानव म्हणून बोलतोय.’ हे आपण खरे म्हणून चाललो तरी, पवित्र आत्म्याविषयी काय? पित्याप्रमाणे पवित्र आत्माही एकाच देवाचा भाग असता तर मग, पित्याला जे माहीत आहे ते पवित्र आत्म्यालाही माहीत आहे, असे येशू का नाही म्हणाला?

तुम्ही तुमचा बायबल अभ्यास चालू ठेवला तर तुम्हाला, या विषयाशी संबंधित असलेली अनेक बायबल वचने वाचायला मिळतील. ही वचने, पित्याविषयी, पुत्राविषयी आणि पवित्र आत्म्याविषयीची सत्यता सिद्ध करतात.​—स्तोत्र ९०:२; प्रेषितांची कृत्ये ७:५५; कलस्सैकर १:१५.

^ परि. 2 योहान १:१ या वचनाला लागू होणाऱ्या ग्रीक भाषेच्या व्याकरणाच्या नियमांविषयी अधिक माहितीसाठी, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले तुम्ही त्रैक्य मानावे का? या माहितीपत्रकाची पृष्ठे २६-९ पाहा.