व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

परिशिष्ट

शेओल आणि हेडीस काय आहेत?

शेओल आणि हेडीस काय आहेत?

मूळ भाषेतील बायबलमध्ये शिओहल हा हिब्रू शब्द आणि हायडीस हा त्याचा समानार्थी ग्रीक शब्द, ७० पेक्षा अधिक वेळा वापरण्यात आला आहे. हे दोन्ही शब्द मृत्यूशी संबंधित आहेत. काही मराठी बायबल अनुवाद या शब्दांचे भाषांतर “अधोलोक,” “नरक” किंवा “मृतलोक” असे करतात. परंतु, बहुतेक भाषांत या हिब्रू व ग्रीक शब्दांचा अचूक अर्थ देणारे शब्द नाहीत. या शब्दांचा नेमका काय अर्थ होतो? बायबलच्या विविध वचनांत या शब्दांचा कशाप्रकारे वापर करण्यात आला आहे, ते आपण पाहू या.

उपदेशक ९:१० म्हणते: “ज्या अधोलोकाकडे [“शेओलात,” पं.र.भा. समास] तू जावयाचा आहेस तेथे काही उद्योग, युक्ति-प्रयुक्ति, बुद्धि व ज्ञान यांचे नाव नाही.” मग, शेओल, आपण आपल्या प्रिय व्यक्तीला जिथे पुरले आहे त्या विशिष्ट किंवा एकाच कबरेला सूचित करते का? नाही. बायबल जेव्हा एका विशिष्ट कबरेविषयी बोलते तेव्हा ते शिओहल किंवा हायडीस हे शब्द नव्हे तर इतर हिब्रू व ग्रीक शब्द वापरते. (उत्पत्ति २३:​७-९; मत्तय २८:१) तसेच, जिथे अनेक व्यक्तींना एकत्र पुरण्यात आले आहे त्या कौटुंबिक कबरेचा किंवा अनेक व्यक्तींना पुरण्यात आलेल्या कबरस्तानाचा उल्लेख करताना बायबल “शेओल” हा शब्द वापरत नाही.​—उत्पत्ति ४९:​३०, ३१.

मग, “शेओल” अर्थात अधोलोक कोणत्या प्रकारच्या स्थानाला सूचित करते? देवाचे वचन असे सूचित करते, की “शेओल” किंवा “हेडीस,” हे शब्द फक्त एका मोठ्या कबरस्तानापेक्षा आणखी प्रचंड असलेल्या कशालातरी सूचित करते. जसे की, यशया ५:१४ म्हणते, की अधोलोकाचे “तोंड अमर्याद पसरिले आहे.” अधोलोकाने असंख्य मृत लोकांना गिळून टाकले आहे आणि तरीपण ते तृप्त झालेले नाही, असे दिसते. (नीतिसूत्रे ३०:​१५, १६) एका खऱ्या कबरस्तानात केवळ मर्यादित मृतांना पुरले जाऊ शकते; परंतु “अधोलोक . . . कधी तृप्त होत नाहीत.” (नीतिसूत्रे २७:२०) याचा अर्थ शेओल कधी भरत नाही. त्याला मर्यादा नाहीत. त्यामुळे शेओल किंवा हेडीस एका विशिष्ट ठिकाणी असलेली खरीखुरी जागा नाही. तर ती मानवजातीची सर्वसाधारण कबर अर्थात बहुतेक मानवजात मृत्यूची झोप घेत असलेले लाक्षणिक ठिकाण आहे.

बायबलमधील पुनरुत्थानाची शिकवण आपल्याला “शेओल” व “हेडीस” या शब्दांच्या अर्थाबाबत आणखी समज प्राप्त करण्यास मदत करते. देवाचे वचन, शेओल आणि हेडीसचा संबंध, ज्यातून पुनरुत्थान शक्य आहे अशा मृत्यूशी लावते. * (ईयोब १४:१३; प्रेषितांची कृत्ये २:३१; प्रकटीकरण २०:१३) देवाचे वचन असेही दाखवते, की शेओल किंवा हेडीसमध्ये, जे यहोवाची सेवा करत होते फक्त अशांचा समावेश नाही तर जे यहोवाची सेवा करत नव्हते अशांचाही समावेश आहे. (उत्पत्ति ३७:३५; स्तोत्र ५५:१५) यास्तव, बायबल असे शिकवते, की ‘नीतिमान व अनीतिमान’ अशा दोघांचे “पुनरुत्थान होईल.”​—प्रेषितांची कृत्ये २४:१५.

^ परि. 4 उलट, ज्या मृतांचे पुनरुत्थान केले जाणार नाही ते शेओल किंवा हेडीसमध्ये नसून “गेहेन्नात” आहेत. (मत्तय ५:३०; १०:२८; २३:​३३, पं.र.भा.) शेओल आणि हेडीसप्रमाणे गेहेन्ना देखील एक खरोखरचे ठिकाण नाही.