व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

परिशिष्ट

१९१४​—बायबल भविष्यवाणीतील महत्त्वाचे वर्ष

१९१४​—बायबल भविष्यवाणीतील महत्त्वाचे वर्ष

सन १९१४ मध्ये अभूतपूर्व घटना घडतील हे बायबल विद्यार्थ्यांनी बऱ्याच दशकांआधी घोषित केले होते. या घटना कोणत्या होत्या आणि कोणता पुरावा, १९१४ हे एक महत्त्वाचे वर्ष असल्याचे दर्शवतो?

लूक २१:२४ मध्ये लिहिल्यानुसार, येशू म्हणाला: “परराष्ट्रीयांची सद्दी संपेल तोपर्यंत परराष्ट्रीय यरुशलेमेस पायांखाली तुडवितील.” जेरुसलेम यहुदी राष्ट्राचे राजधानी शहर होते. तेथेच राजा दावीदाच्या घराण्यातून आलेले राजे आपला राज्यकारभार सांभाळायचे. (स्तोत्र ४८:​१, २) परंतु, हे राजे इतर राष्ट्रांच्या नेत्यांपेक्षा वेगळे होते. ते स्वतः देवाचे प्रतिनिधी म्हणून “परमेश्वराच्या सिंहासनावर” विराजमान होते. (१ इतिहास २९:२३) अशाप्रकारे, जेरुसलेम यहोवाच्या शासनाचे प्रतीक होते.

परंतु, देवाच्या शासनाला ‘परराष्ट्रीयांनी पायांखाली तुडवण्यास’ कशी आणि केव्हा सुरुवात केली? सा.यु.पू. ६०७ मध्ये बॅबिलोन्यांनी जेरुसलेमवर कब्जा मिळवला तेव्हा हे घडले. ‘परमेश्वराचे सिंहासन’ रिकामे झाले आणि दावीदाच्या वंशातून येणाऱ्या राजांच्या वंशावळीत खंड पडला. (२ राजे २५:​१-२६) पण हे तुडविणे कायम चालणार होते का? नाही, कारण जेरुसलेमचा शेवटला राजा सिदकीया याच्याविषयी यहेज्केलाच्या भविष्यवाणीत असे म्हटले होते: “शिरोभूषण उतरीव, मुकुट काढून टाक; . . . ही स्थिति अशीच राहावयाची नाही; ज्याचा हक्क आहे तो आल्यावर त्यास मी सत्ता देईन.” (यहेज्केल २१:२६, २७) दावीदाच्या शिरोभूषणावर ज्याचा “हक्क आहे” तो आहे येशू ख्रिस्त. (लूक १:​३२, ३३) तेव्हा, येशू राजा झाल्यावर हे ‘तुडविणे’ थांबणार होते.

येशू राजा होण्याची भव्य घटना केव्हा घडणार होती? येशूने दाखवले, की परराष्ट्रीय एका मर्यादित कालावधीसाठी राज्य करणार होते. हा कालावधी किती असेल याचा हिशेब लावण्याकरता दानीएलाच्या चवथ्या अध्यायात काही सुगावे दिले आहेत. या अध्यायातील अहवाल, बॅबिलोनचा राजा नबुखनेस्सर याला पडलेल्या एका भविष्यसूचक स्वप्नाविषयी सांगतो. राजा नबुखदनेस्सरने एक प्रचंड वृक्ष पाहिला जो छाटला जातो. या वृक्षाचा बुंधा वाढू शकत नव्हता कारण त्याच्याभोवती लोखंड आणि पितळाच्या पट्ट्या बांधल्या होत्या. एका देवदूताने अशी घोषणा केली: “सात काळ त्याजवरून जावोत.”​—दानीएल ४:१०-१६.

बायबलमध्ये, राज्य शासनास सूचित करण्यासाठी कधीकधी वृक्षांचा उपयोग केला जातो. (यहेज्केल १७:​२२-२४; ३१:​२-५) तेव्हा, लाक्षणिक वृक्षाचे छाटले जाणे, हे देवाचे राज्य शासन जे जेरुसलेमच्या राजांच्या माध्यमातून चालवले जात होते, त्यात कसा खंड पडेल याला चित्रित करते. परंतु, या दृष्टान्ताद्वारे अशी सूचना मिळाली, की ‘जेरुसलेमला तुडवले जाणे’ तात्पुरत्या काळासाठी अर्थात “सात काळ” चालेल. हा काळ किती कालावधीचा असणार होता?

प्रकटीकरण १२:​६, १४ वरून असे सूचित होते, की साडेतीन काळ म्हणजे “एक हजार दोनशे साठ दिवस.” तेव्हा, सात काळ म्हणजे याच्या दुप्पट किंवा २,५२० दिवस. परंतु जेरुसलेमच्या पाडावानंतर केवळ २,५२० दिवसांत परराष्ट्रीयांनी देवाच्या शासनास तुडविण्याचे थांबवले नाही. याचाच अर्थ, या भविष्यवाणीत अधिक कालावधीचा समावेश होता. गणना १४:३४ आणि यहेज्केल ४:६ या वचनांनुसार, ‘प्रत्येक दिवस एक वर्षाप्रमाणे’ धरल्यास “सात काळ” म्हणजे २,५२० वर्षे होतील.

यास्तव, २,५२० वर्षांची सुरुवात सा.यु.पू. ६०७ सालच्या ऑक्टोबर महिन्यात झाली; तेव्हा जेरुसलेम बॅबिलोन्यांच्या हातात पडले आणि दावीदाच्या वंशावळीतून आलेल्या राजाला त्याच्या सिंहासनावरून उतरवण्यात आले. ऑक्टोबर १९१४ मध्ये या कालावधीचा अंत झाला. या वर्षी, “परराष्ट्रीयांची सद्दी” संपली आणि येशू ख्रिस्ताला देवाच्या स्वर्गीय राज्याचा राजा म्हणून सिंहासनाधिष्ठित करण्यात आले. *​—स्तोत्र २:​१-६; दानीएल ७:​१३, १४.

येशूने भाकीत केले त्याप्रमाणे, तो स्वर्गीय राजा झाल्यावर त्याची “उपस्थिती,” युद्ध, अन्नटंचाई, भूकंप, रोगराई यांसारख्या नाट्यमय जागतिक घटनांवरून दिसून येणार होती. (मत्तय २४:​३-८; लूक २१:११) या घटना या वस्तुस्थितीचा जबरदस्त पुरावा आहेत, की खरोखरच १९१४ साली देवाच्या स्वर्गीय राज्याची स्थापना होऊन सध्याच्या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या ‘शेवटल्या दिवसांची’ सुरुवात झाली.​—२ तीमथ्य ३:​१-५.

^ परि. 4 सा.यु.पू. ६०७ सालच्या ऑक्टोबरपासून सा.यु.पू. १ सालच्या ऑक्टोबरपर्यंत ६०६ वर्ष होतात. शून्य वर्ष नसल्यामुळे सा.यु.पू. १ सालच्या ऑक्टोबरपासून सा.यु. १९१४ सालच्या ऑक्टोबरपर्यंत १,९१४ वर्ष होतात. ६०६ वर्षे व १,९१४ वर्षे यांची बेरीज केल्यावर, २,५२० वर्षे होतात. सा.यु.पू. ६०७ साली झालेल्या जेरुसलेमेच्या पाडावाविषयीच्या अधिक माहितीकरता कृपया, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी, (इंग्रजी) यांतील “कालगणना” (क्रोनॉलॉजी) हा लेख पाहा.