व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

परिशिष्ट

आद्यदेवदूत मीखाएल कोण आहे?

आद्यदेवदूत मीखाएल कोण आहे?

मीखाएल नावाच्या आत्मिक प्राण्याचा बायबलमध्ये सर्रास उल्लेख केलेला आढळत नाही. परंतु, जेव्हा त्याचा उल्लेख करण्यात आला आहे तेव्हा तो काहीतरी कार्यवाही करत असल्याचा उल्लेख आहे. दानीएलाच्या पुस्तकात, मीखाएल दुष्ट देवदूतांबरोबर युद्ध करत असल्याचा उल्लेख आहे; यहूदाच्या पुस्तकात तो सैतानाबरोबर वादविवाद करत असल्याचा उल्लेख आहे आणि प्रकटीकरण पुस्तकात तो दियाबल आणि त्याच्या दुरात्म्यांबरोबर युद्ध करत असल्याचा उल्लेख आहे. यहोवाच्या शासनाचे समर्थन करण्याद्वारे व देवाच्या शत्रूंविरुद्ध लढण्याद्वारे मीखाएल आपल्या नावाप्रमाणे कार्य करतो. त्याच्या नावाचा अर्थ होतो: “देवासारखा कोण आहे?” पण मीखाएल आहे कोण?

कधीकधी, काही व्यक्तींना अनेक नावांनी ओळखले जाते. उदाहरणार्थ, कुलपिता याकोब याला इस्राएल या नावानेही ओळखले जाते आणि प्रेषित पेत्राला शिमोन या नावानेही ओळखले जाते. (उत्पत्ति ४९:​१, २; मत्तय १०:२) तसेच, बायबल सूचित करते, की मीखाएल हे येशू ख्रिस्ताचे दुसरे नाव आहे. त्याचे हे नाव पृथ्वीवर येण्याआधी आणि पृथ्वीवरील त्याचे जीवन संपुष्टात आल्यानंतरचे आहे. या निष्कर्षास पोहंचण्याकरता आपण काही शास्त्रवचनीय कारणांचा विचार करू.

आद्यदेवदूत. देवाचे वचन “आद्यदेवदूत” मीखाएल असा उल्लेख करते. (यहुदा ९) “आद्यदेवदूत” हा शब्द बायबलमध्ये नेहमी एकवचनी आढळतो, अनेकवचनी कधीच नाही. यावरून असे सूचित होते की एकच आद्यदेवदूत आहे. शिवाय, येशूचा संबंध आद्यदेवदूताच्या हुद्द्‌याशी लावण्यात आला आहे. पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताविषयी १ थेस्सलनीकाकर ४:१६ [पं.र.भा.] म्हणते: “प्रभू स्वतः आज्ञा करणाऱ्या गर्जनेसुद्धा, आद्यदूताच्या वाणीसुद्धा . . . आकाशातून उतरेल.” यास्तव, येशूची वाणी आद्यदूताची वाणी आहे असे या वचनात वर्णन केले आहे. यास्तव, या शास्त्रवचनावरून असे सूचित होते, की खुद्द येशूच आद्यदेवदूत मीखाएल आहे.

सेनापती. बायबल म्हणते, की “मीखाएल व त्याचे दूत . . . अजगर व त्याचे दूत [यांच्याबरोबर] लढले.” (प्रकटीकरण १२:७) यास्तव, मीखाएल विश्वासू देवदूतांच्या सैन्याचा अधिपती आहे. प्रकटीकरणाचे पुस्तक येशूचेही वर्णन, विश्वासू देवदूतांच्या सैन्याचा अधिपती असे करते. (प्रकटीकरण १९:​१४-१६) आणि प्रेषित पौल विशेषकरून “प्रभु येशू” आणि त्याचे ‘सामर्थ्यवान दूत’ यांचा उल्लेख करतो. (२ थेस्सलनीकाकर १:७; मत्तय १६:२७; २४:३१; १ पेत्र ३:२२) यास्तव, बायबल मीखाएल आणि ‘त्याचे दूत’ आणि येशू व ‘त्याचे दूत’ अशा दोघांचा उल्लेख करते. (मत्तय १३:४१) मीखाएलची एक सेना आणि येशू ख्रिस्ताची एक सेना अशी विश्वासू देवदूतांची दोन सैन्ये स्वर्गात आहेत असा देवाच्या वचनात कोठेही उल्लेख नसल्यामुळे मीखाएल हा दुसरा तिसरा कोणी नसून तो स्वर्गीय भूमिकेतील येशू ख्रिस्तच आहे, असा आपण तर्कशुद्ध निष्कर्ष काढू शकतो. *

^ परि. 1 मीखाएल हे नाव देवाच्या पुत्राला लागू होते, याबद्दलची अधिक माहिती यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी, (इंग्रजी) खंड २, पृष्ठे ३९३-४ पाहा.