व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

परिशिष्ट

येशूचा जन्म डिसेंबर महिन्यात झाला होता का?

येशूचा जन्म डिसेंबर महिन्यात झाला होता का?

येशूचा जन्म कधी झाला होता, याविषयी बायबल आपल्याला सांगत नाही. पण त्याचा जन्म डिसेंबर महिन्यात झाला नाही, असा निष्कर्ष काढण्यास मात्र ते आपल्याला उचित कारण देते.

येशूचा जन्म झाला त्या ठिकाणी म्हणजे बेथलेहेममध्ये डिसेंबर महिन्यात कोणत्या प्रकारचे हवामान होते त्याचा जरा विचार करा. किसलेव (नोव्हेंबर/डिसेंबरशी मिळताजुळता) या यहुदी महिन्यातले हवामान तेव्हा अतिशय थंड व पावसाळी होते. त्यानंतरचा तेबेथ महिना (जो डिसेंबर/जानेवारीशी जुळतो). या महिन्यात, तापमान वर्षभराच्या तुलनेत सर्वात खाली जायचे; कधीकधी तर डोंगराळ प्रदेशात हिमवृष्टी देखील व्हायची. या प्रदेशातील हवामानाविषयी बायबल आपल्याला काय सांगते ते आपण पाहू या.

एज्रा नामक एक बायबल लेखक दाखवतो, की किसलेव महिना खरोखरच थंड व पावसाळी वातावरण असलेला म्हणून ज्ञात होता. “नवव्या महिन्याच्या [किसलेव] विसाव्या दिवशी” लोकांचा एक समूह जेरुसलेममध्ये जमला होता असे म्हटल्यानंतर एज्रा म्हणतो, की लोक “पावसाच्या झडीमुळे थरथर कांपत” होते. त्या वर्षाच्या काळातील हवामानाविषयी जमलेले लोक स्वतः म्हणाले: “पावसाची झड लागली असून आम्हास बाहेर उभे राहता येत नाही.” (एज्रा १०:९, १३; यिर्मया ३६:२२) त्यामुळे डिसेंबर महिन्यात बेथलेहेमच्या आसपासच्या भागात राहणारे मेंढपाळ, आपल्या कळपाला घेऊन रात्रीच्या वेळी मुळीच बाहेर जात नसत.

परंतु, येशूचा जन्म झाला त्या रात्री तर मेंढपाळ आपला कळप राखण्यासाठी बाहेर शेतात होते, असे बायबलमध्ये म्हटले आहे. बायबलचा एक लेखक लूक म्हणतो, की येशूचा जन्म झाला त्यावेळी मेंढपाळ बेथलेहेमजवळ “रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते.” (लूक २:८-१२) मेंढपाळ रानात राहत होते; फक्त दिवसा बाहेर भटकत नव्हते. रात्रीच्या वेळी त्यांचा कळप रानात होता. रात्रीच्या वेळी बाहेर राहण्याविषयीचे हे वर्णन, आणि डिसेंबर महिन्यात बेथलेहेममधील थंड व पावसाळी हवामानाचे वर्णन यांजशी जुळते का? नाही. यास्तव, येशूचा जन्म झाला तेव्हा असलेल्या परिस्थितीवरून हेच सूचित होते, की डिसेंबर महिन्यात त्याचा जन्म झाला नव्हता. *

येशूचा मृत्यू कोणत्या तारखेला झाला याविषयी देवाचे वचन आपल्याला सांगते, परंतु त्याचा जन्म केव्हा झाला ती स्पष्ट तारीख ते आपल्याला सांगत नाही. यावरून आपल्याला राजा शलमोनाचे शब्द आठवतात: “सुवासिक अत्तरापेक्षा नावलौकिक बरा; जन्मदिनापेक्षा मृत्युदिन बरा.” (उपदेशक ७:१) म्हणूनच, बायबल येशूची सेवा आणि त्याचा मृत्यू यांबद्दल बरीच सविस्तर माहिती देते परंतु त्याच्या जन्माच्या तारखेविषयी फार कमी माहिती देते.

येशूचा जन्म झाला तेव्हा रात्रीच्या वेळी मेंढपाळ आपल्या कळपासह बाहेर रानात होते

^ परि. 2 अधिक माहितीसाठी, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले रीझनिंग फ्रॉम द स्क्रिप्चर्स पृष्ठे १७६-९ पाहा.