व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय १

“हीच देवावरची प्रीती आहे”

“हीच देवावरची प्रीती आहे”

“हीच देवावरची प्रीती आहे की आपण त्याच्या आज्ञा पाळाव्या; आणि त्याच्या आज्ञा भारी नाहीत.”—१ योहान ५:३, पं.र.भा.

१, २. तुम्ही यहोवावर प्रेम का करता?

तुम्ही देवावर प्रेम करता का? तुम्ही यहोवाचे समर्पित सेवक असल्यास या प्रश्‍नाचे उत्तर नक्कीच ‘होय’ असे द्याल. देवावर आपले प्रेम असणे साहजिक आहे. कारण खरे तर देवाने प्रथम आपल्यावर प्रेम केले म्हणून आपण त्याच्यावर प्रेम करतो. याबद्दल बायबल म्हणते: “पहिल्याने [यहोवाने] आपणावर प्रीति केली, म्हणून आपण प्रीति करतो.”—१ योहान ४:१९.

यहोवाने त्याचे प्रेम व्यक्त करण्यासाठी पुढाकार देखील घेतला. उदाहरणार्थ, राहण्यासाठी त्याने ही सुंदर पृथ्वी आपल्याला दिली आहे. तो आपल्या शारीरिक व भौतिक गरजा पूर्ण करतो. (मत्तय ५:४३-४८) मुख्य म्हणजे, तो आपल्या आध्यात्मिक गरजाही पूर्ण करतो. त्याने त्याचे वचन अर्थात बायबल आपल्याला दिले आहे. याशिवाय, प्रार्थनेद्वारे त्याच्याजवळ येण्याचे आमंत्रणही तो आपल्याला देतो. आपण त्याला प्रार्थना केली तर तो नक्कीच ती ऐकेल व पवित्र आत्म्याद्वारे आपली मदत करील असे आश्वासन तो आपल्याला देतो. (स्तोत्र ६५:२; लूक ११:१३) आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, पाप आणि मृत्यूपासून आपली सुटका करण्याकरता त्याने आपल्या परमप्रिय पुत्राची खंडणी दिली. यहोवाचे खरोखरच आपल्यावर किती प्रेम आहे!—योहान ३:१६; रोमकर ५:८.

३. (क) स्वतःला देवाच्या प्रीतीत राखण्यामध्ये काय सामावलेले आहे? (ख) आपण स्वतःला कोणता महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला पाहिजे आणि याचे उत्तर आपल्याला कोठे मिळेल?

यहोवाच्या प्रेमाचा आपण सदैव लाभ घेत राहावा अशी त्याची इच्छा आहे. अर्थात, देवाच्या प्रेमाचा लाभ घेणे वा न घेणे हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. देवाचे वचन आपल्याला प्रोत्साहन देते: “सार्वकालिक जीवनासाठी . . . आपणांस देवाच्या प्रीतिमध्ये राखा.” (यहूदा २१) ‘आपणास देवाच्या प्रीतीमध्ये राखा’ या वाक्यांशात, कार्य करण्याचा अर्थ सामावलेला आहे. देवावर आपले प्रेम आहे हे आपण आपल्या कार्यांद्वारे व्यक्त केले पाहिजे. म्हणून आपण स्वतःला एक महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला पाहिजे: ‘देवावर माझे प्रेम आहे हे मी कसे व्यक्त करू शकतो?’ या प्रश्‍नाचे उत्तर प्रेषित योहानाच्या प्रेरित शब्दांत आढळते: “देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.” (१ योहान ५:३) देवावर आपले किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी आपण योहानाच्या वरील शब्दांचे बारकाईने परीक्षण करणे जरूरीचे आहे.

“हीच देवावरची प्रीती आहे”

समर्पण व बाप्तिस्मा घेऊन आपण दाखवतो की इथून पुढे आपण यहोवावरील प्रेमापोटी त्याच्या आज्ञांचे पालन करणार आहोत

४. तुमच्या मनात देवाविषयीचे प्रेम कसे बहरू लागले ते सांगा?

प्रेषित योहानाने वर उल्लेखित शब्दांची सुरुवात, “हीच देवावरची प्रीती आहे” अशी केली आहे. तेव्हा, देवावर प्रेम करणे म्हणजे काय याचे स्पष्टीकरण त्याने कसे दिले ते आपण पाहू या. पण, या प्रश्‍नाचा विचार करण्याआधी, तुमच्या हृदयात पहिल्यांदाच यहोवाविषयीचे प्रेम बहरू लागले त्या क्षणाची आठवण करा. तुम्ही प्रथमच, यहोवा व त्याचे उद्देश यांविषयीचे सत्य ऐकले व त्यांवर तुमचा विश्वास बसू लागला. देवापासून विभक्त झालेली एक पापी व्यक्ती म्हणून तुमचा जन्म झाला, तरीपण यहोवाने ख्रिस्तामार्फत आदामाने गमावलेली परिपूर्णता व सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याचा मार्ग तुमच्याकरता मोकळा केला हे तुम्हाला समजले. (मत्तय २०:२८; रोमकर ५:१२, १८) देवाने तुमच्यासाठी आपल्या परमप्रिय पुत्राचे अर्पण देऊन जो महान त्याग केला त्याची हळूहळू तुम्हाला जाणीव होऊ लागली. आणि याबद्दल कृतज्ञता वाटून तुमच्यावर अपार प्रेम करणाऱ्या देवाबद्दल तुमच्या मनात प्रेम बहरू लागले.—१ योहान ४:९, १०.

५. खरे प्रेम कसे व्यक्त केले जाते व देवावरील प्रेमापोटी तुम्ही काय करण्यास प्रवृत्त झाला?

अर्थात, ही भावना, यहोवावरील तुमच्या निखळ प्रेमाची केवळ एक सुरुवात होती. पण, प्रेम म्हणजे निव्वळ शब्दांतून व्यक्त होणारी भावना नाही. ‘मी देवावर खूप प्रेम करतो’ केवळ असे म्हणून देवावरचे खरे प्रेम आपण सिद्ध करू शकत नाही. विश्वासाप्रमाणेच खरे प्रेमही आपल्या कृतीतून व्यक्त झाले पाहिजे. (याकोब २:२६) आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तिला संतुष्ट करणारी कार्ये करून तिच्यावरील आपले प्रेम व्यक्त करत असतो. यास्तव, तुमच्या मनात यहोवाविषयीचे प्रेम मुळावले तेव्हा तुमचा स्वर्गीय पिता संतुष्ट होईल अशा पद्धतीने जीवन जगण्याची इच्छा तुमच्यात निर्माण झाली. तुम्ही बाप्तिस्मा घेतलेले साक्षीदार आहात का? असल्यास, यहोवावरील या अतीव प्रेमामुळे व निष्ठेमुळेच तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय घेण्यास तुम्ही प्रवृत्त झाला. यहोवाच्या इच्छेप्रमाणे जीवन व्यतीत करण्यासाठी तुम्ही त्याला आपले जीवन समर्पित केले आणि बाप्तिस्मा घेऊन हे समर्पण जाहीर केले. (रोमकर १४:७, ८) तुम्ही मनापासून केलेल्या या समर्पणात, प्रेषित योहानाने पुढे जे काही म्हटले त्याचा समावेश होतो.

“आपण त्याच्या आज्ञा पाळाव्या”

६. देवाच्या काही आज्ञा कोणत्या आहेत आणि त्यांचे पालन करणे म्हणजे काय ते सांगा.

देवावर प्रेम करणे म्हणजे ‘आपण त्याच्या आज्ञा पाळणे’ असे स्पष्टीकरण योहान देतो. पण मग देवाच्या आज्ञा काय आहेत? त्याचे वचन बायबल यात यहोवाने आपल्याला अनेक सुस्पष्ट आज्ञा दिल्या आहेत. उदाहरणार्थ, दारूबाजी, जारकर्म, चोरी आणि लबाडी यांसारख्या गोष्टींचा तो निषेध करतो. (१ करिंथकर ५:११; ६:१८; १०:१४; इफिसकर ४:२८; कलस्सैकर ३:९) तेव्हा, देवाच्या आज्ञा पाळण्याचा अर्थ, त्याने घालून दिलेल्या सुस्पष्ट नैतिक दर्जांनुसार जीवन जगणे, असा होतो.

७, ८. ज्या बाबतीत बायबलमध्ये स्पष्ट व सरळ नियम दिलेले नाहीत त्यांबाबतीत काय केल्याने यहोवा संतुष्ट होईल हे आपण कसे समजू शकतो? याचे एक उदाहरण द्या.

बायबलमध्ये काही गोष्टींविषयी अगदी स्पष्ट व सरळ नियम दिलेले आहेत. परंतु, यहोवाला संतुष्ट करण्यासाठी केवळ अशाच नियमांचे पालन करणे पुरेसे नाही. आपल्या दैनंदिन जीवनातील हरएक पैलूविषयी असंख्य नियम देऊन यहोवा आपल्याला या नियमांमध्ये जखडून ठेवत नाही. दिवसभरात असे अनेक प्रसंग आपल्यासमोर येतात ज्यांविषयी बायबलमध्ये विशिष्ट नियम दिलेले नाहीत. अशा वेळेस, काय केल्याने यहोवा संतुष्ट होतो हे आपल्याला कसे कळेल? एखाद्या गोष्टीबद्दल देवाची विचारसरणी काय हे पुष्कळदा बायबलमधून स्पष्टपणे सूचित होते. आपण बायबलचा अभ्यास करतो तेव्हा देवाला काय आवडते किंवा तो कोणत्या गोष्टींचा द्वेष करतो याची समज आपल्याला प्राप्त होते. (स्तोत्र ९७:१०; नीतिसूत्रे ६:१६-१९) त्याला कोणती प्रवृत्ती किंवा कार्ये स्वीकृत आहेत हेही आपल्याला समजते. देवाच्या व्यक्तिमत्वाविषयी आपण जितके अधिक शिकू तितका त्याच्या विचारसरणीचा आपल्या निर्णयांवर व वागणुकीवर प्रभाव पडू लागतो. त्यामुळे, एखाद्या गोष्टीवर बायबलमध्ये स्पष्ट असा नियम दिलेला नसला तरी “प्रभूची इच्छा काय आहे” हे आपण समजू शकतो.—इफिसकर ५:१७.

उदाहरणार्थ, हिंसाचाराने व लैंगिक अनैतिकतेने बरबटलेले चित्रपट अथवा टीव्ही कार्यक्रम पाहू नका असा थेट नियम बायबलमध्ये दिलेला नाही. पण मग, अशा गोष्टी आपण पाहू नयेत असे सांगणारा विशिष्ट नियम आपल्याला हवा आहे का? या गोष्टींबद्दल देवाचा काय दृष्टिकोन आहे ते आपल्याला माहीत आहे. त्याच्या वचनात अगदी स्पष्टपणे असे सांगितले आहे: ‘यहोवा जुलमाची आवड धरणाऱ्यांचा द्वेष करतो.’ (स्तोत्र ११:५, पं.र.भा.) तसेच, “जारकर्मी व व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील,” असेही बायबलमध्ये सांगितलेले आहे. (इब्री लोकांस १३:४) या प्रेरित वचनांवर मनन केल्याने देवाची इच्छा काय आहे हे समजणे मुळीच कठीण नाही. त्यामुळे हिंसा व अश्‍लील दृश्ये उघडपणे दाखवणारे काहीही पाहण्याचे आपण कटाक्षाने टाळले पाहिजे कारण या गोष्टींचा देवाला वीट आहे. जग ज्याला निरुपद्रवी मनोरंजन असल्याचे भासवून लोकांची दिशाभूल करते असे मनोरंजन आपण टाळतो तेव्हा आपण यहोवाला संतुष्ट करत असतो. *

९, १०. आपण देवाच्या आज्ञा का पाळतो व त्याला कोणत्या प्रकारची आज्ञाधारकता दाखवतो?

पण, कोणत्या प्रमुख कारणामुळे आपण देवाच्या आज्ञा पाळतो? दररोज देवाच्या इच्छेनुसार जगण्याचा आपण प्रयत्न का करू इच्छितो? आपल्याला शिक्षा होऊ नये किंवा देवाच्या आज्ञांचे उल्लंघन केल्यामुळे दुष्परिणाम भोगावे लागू नयेत म्हणून आपण हा मार्ग निवडत नाही. (गलतीकर ६:७) तर देवाच्या आज्ञांचे पालन केल्याने त्याच्यावरील आपले प्रेम व्यक्त करण्याची एक अनमोल संधी आपल्याला लाभते यासाठी आपण हा मार्ग निवडतो. ज्याप्रमाणे एखादे मूल आपल्या पित्याची मर्जी मिळवण्यास उत्सुक असते त्याचप्रमाणे आपणही यहोवाची मर्जी प्राप्त करू इच्छितो. (स्तोत्र ५:१२) यहोवा आपला पिता असल्यामुळे आपण त्याच्यावर प्रेम करतो. आपल्या जीवनशैलीमुळे आपल्याला “परमेश्वराचा प्रसाद” अर्थात कृपा प्राप्त होते हे जाणून जो आनंद व जे समाधान मिळते त्याची तुलना कशासोबतही करता येत नाही.—नीतिसूत्रे १२:२.

१० तर मग, आपण रडतखडत देवाच्या आज्ञा पाळत नाही अथवा देवाच्या आज्ञा पाळताना आपण निवडक नसतो किंवा काही अटीही ठेवत नाही. * कोणत्या आज्ञा पाळायच्या किंवा कोणत्या नाहीत हे आपण आपल्या सोयीनुसार ठरवत नाही. तर देवाच्या आज्ञांचे आपण ‘मनापासून पालन’ करतो. (रोमकर ६:१७) आपल्यालाही बायबलमधील स्तोत्रकर्त्याप्रमाणेच वाटते ज्याने लिहिले: “मी तुझ्या आज्ञात आनंद मानीन, त्या मला प्रिय आहेत.” (स्तोत्र ११९:४७) आपल्याला देखील देवाच्या आज्ञा प्रिय वाटतात म्हणून आपण त्यांचे पालन करतो. यहोवा आपल्याकडून पूर्ण व बिनशर्त आज्ञाधारकतेची अपेक्षा करतो व ही अपेक्षा करण्याचा त्याचा हक्क आहे हे आपण मान्य करतो. (अनुवाद १२:३२) यहोवाने त्याच्या वचनात नोहाबद्दल जे म्हटले तेच त्याने आपल्याबद्दलही म्हणावे अशी आपली इच्छा आहे. त्या विश्वासू कुलपित्याने शेवटपर्यंत देवाच्या आज्ञांचे पालन करून देवावर आपले प्रेम असल्याचे सिद्ध केले. त्याच्याविषयी बायबल म्हणते: “देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले.”—उत्पत्ति ६:२२.

११. कशा प्रकारची आज्ञाधारकता यहोवाला संतुष्ट करते?

११ आपण स्वखुशीने यहोवाला आज्ञाधारकता दाखवतो तेव्हा त्याला कसे वाटते? त्याचे वचन म्हणते, की आपण मनापासून त्याच्या आज्ञांचे पालन करतो तेव्हा त्याचे “मन आनंदित” होते. (नीतिसूत्रे २७:११) पण, आपल्या आज्ञाधारकतेमुळे विश्वावर प्रभुत्व गाजवणाऱ्याचे मन खरोखरच आनंदित होत असेल का? नक्कीच होत असेल! आणि त्यामागे एक सबळ कारण आहे. यहोवाने आपली निर्मिती केली तेव्हा आपल्याला इच्छा-स्वातंत्र्य दिले. याचा अर्थ, आपल्याला निवड करण्याचे स्वातंत्र्य आहे; यामुळे देवाच्या आज्ञांचे पालन करण्याची अथवा न करण्याची निवड आपण करू शकतो. (अनुवाद ३०:१५, १६, १९, २०) देवावरील मनःपूर्वक प्रेमामुळे प्रवृत्त होऊन आपण स्वखुशीने त्याच्या आज्ञा पाळतो तेव्हा आपला स्वर्गीय पिता नक्कीच खूप संतुष्ट व आनंदी होतो. (नीतिसूत्रे ११:२०) आणि असे करण्याद्वारे आपण जीवनाचा सर्वोत्तम मार्ग निवडत असतो.

“त्याच्या आज्ञा भारी नाहीत”

१२, १३. देवाच्या “आज्ञा भारी नाहीत” असे आपण का म्हणू शकतो व हे कोणत्या उदाहरणावरून सांगता येईल?

१२ देव आपल्याकडून काय अपेक्षा करतो याबद्दल अत्यंत दिलासा देणारी गोष्ट प्रेषित योहान आपल्याला सांगतो: “त्याच्या आज्ञा भारी नाहीत.” १ योहान ५:३ (पं.र.भा.) या वचनात “भारी” असे भाषांतरीत केलेल्या ग्रीक शब्दाचा शब्दशः अर्थ “जड” * असा होतो. आणखीन एक बायबल भाषांतर याच वचनाचा अनुवाद: “त्याच्या आज्ञा आपल्यावर दडपण आणत नाहीत,” असा करते. (न्यू इंग्लिश ट्रान्स्लेशन) होय, देव आपल्याकडून ज्या काही अपेक्षा करतो त्या मुळीच अवाजवी किंवा दडपण आणणाऱ्या नाहीत. अपरिपूर्ण मानव पाळू शकणार नाहीत अशा त्याच्या आज्ञा नाहीत.

१३ याचे एक उदाहरण आपण पाहू या. तुमचा जवळचा मित्र दुसरीकडे राहायला जात आहे आणि सामान हलवण्यासाठी त्याला तुमच्या मदतीची गरज आहे. सामानाची अनेक खोकी आहेत. त्यापैकी काही खोकी एकजण सहज वाहून नेऊ शकेल इतकी हलकी आहेत तर काही जड असून ती वाहून नेण्यासाठी दोन माणसांची गरज आहे. तुम्ही कुठली खोकी उचलावीत हे तुमचा मित्र तुम्हाला सांगतो. तुम्हाला एकट्याने नेता येणार नाही अशी अवजड खोकी तो तुम्हाला उचलायला सांगेल का? मुळीच नाही. तुम्हाला काही इजा व्हावी अशी त्याची मुळीच इच्छा नसेल. त्याचप्रमाणे आपला प्रेमळ व दयाळू पिता आपल्याला पाळता येणार नाहीत अशा अवघड आज्ञा पाळायला सांगत नाही व सांगणारही नाही. (अनुवाद ३०:११-१४) आपल्या मर्यादा काय आहेत हे तो जाणतो कारण “तो आमची प्रकृति जाणतो; आम्ही केवळ माती आहो हे तो आठवितो.”—स्तोत्र १०३:१४.

१४. देवाच्या आज्ञा आपल्या भल्याकरता आहेत असे आपण का म्हणू शकतो?

१४ देवाच्या आज्ञा मुळीच कठीण नाहीत. उलट, त्या आपल्या भल्याकरताच आहेत. (यशया ४८:१७) म्हणूनच मोशे प्राचीन इस्राएल लोकांना म्हणू शकला: “आपण आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळगावे, आपले निरंतरचे कल्याण व्हावे आणि परमेश्वराने आपणाला आजच्याप्रमाणेच जिवंत राखावे म्हणून त्याने हे सर्व विधि पाळण्याची आपणाला आज्ञा दिली.” (अनुवाद ६:२४) यावरून यहोवा आपल्या भल्याचा, किंबहुना, आपल्या दीर्घकालीन, निरंतर भल्याचा विचार करतो याची आपणही खात्री बाळगू शकतो. आपले नुकसान होईल असे काही करण्यास यहोवा आपल्याला सांगेल अशी कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही. यहोवा देवाकडे अमर्याद बुद्धी आहे. (रोमकर ११:३३) त्यामुळे आपल्यासाठी सगळ्यात चांगले काय आहे हे तो जाणतो. तसेच तो, प्रेमाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. (१ योहान ४:८) प्रेम हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य भाग असल्यामुळे तो जे काही करतो व सांगतो त्यामागे त्याची प्रेम-भावना असते. त्याने आपल्या सेवकांना दिलेल्या सर्व आज्ञा देखील प्रेमावर आधारित आहेत.

१५. रसातळाला गेलेल्या या जगाचा प्रभाव तसेच आपले अपरिपूर्ण शरीर असूनही आपण आज्ञाधारक का राहू शकतो?

१५ पण, याचा अर्थ देवाला आज्ञाधारक राहणे सोपे आहे असे नाही. ‘त्या दुष्टाला वश असलेल्या’ व अगदी रसातळाला गेलेल्या या जगाच्या प्रभावांचा प्रतिकार करण्यासाठी आपल्याला आटोकाट प्रयत्न करावे लागतात. (१ योहान ५:१९) देवाच्या आज्ञांचे उल्लंघन करण्यास प्रवृत्त करणाऱ्या आपल्या अपरिपूर्ण शरीराशी देखील आपल्याला लढत द्यावी लागते. (रोमकर ७:२१-२५) पण, देवावर प्रेम असल्यास यांवर आपण यशस्वीरित्या मात करू शकतो. यहोवाच्या आज्ञांचे पालन करून त्याच्यावरील आपले प्रेम शाबीत करणाऱ्या लोकांना तो आशीर्वादित करतो. तो शासक आहे हे मान्य करून त्याच्या “आज्ञा पाळणाऱ्यांना” तो पवित्र आत्मा देतो. (प्रेषितांची कृत्ये ५:३२) यामुळे त्यांच्यात आत्म्याचे उत्कृष्ट फळ म्हणजे सतत आज्ञाधारक राहण्यास मदत करणारे अनमोल गुण उत्पन्न होतात.—गलतीकर ५:२२, २३.

१६, १७. (क) या प्रकाशनात आपण कशाचे परीक्षण करणार आहोत व असे करत असताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? (ख) पुढच्या अध्यायात कोणत्या गोष्टीची चर्चा केली जाईल?

१६ या प्रकाशनात आपण देवाचे सिद्धान्त, त्याचे नैतिक दर्जे तसेच त्याची इच्छा काय आहे, या गोष्टींचे परीक्षण करणार आहोत. असे करत असताना, अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी आपण ध्यानात ठेवल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, यहोवा आपल्यावर त्याच्या आज्ञा व सिद्धान्त पाळण्याची सक्ती करत नाही. तर आपण मनापासून व स्वखुशीने त्याच्या आज्ञा पाळाव्यात अशी त्याची इच्छा आहे. यहोवाने सांगितलेल्या पद्धतीने जीवन व्यतीत केल्यामुळे आपल्याला आताही विपुल आशीर्वाद मिळतात व भवितव्यातही सार्वकालिक जीवन मिळू शकेल हे आपण कधीही विसरू नये. आणि यहोवाच्या आज्ञांचे मनःपूर्वक पालन करून त्याच्यावर आपले किती प्रेम आहे हे दाखवण्याची एक अनमोल संधी आपल्याला लाभते हेही आपण लक्षात ठेवू या.

१७ आपल्याला बऱ्यावाईटाचा फरक करता यावा म्हणून देवाने आपल्याला विवेकाची देणगी दिली आहे. परंतु, आपल्या विवेकाने आपले उचित मार्गदर्शन करावे अशी आपली इच्छा असल्यास आपण त्याला प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. ते कसे करता येईल याची चर्चा आपण पुढच्या अध्यायात करणार आहोत.

^ परि. 10 दुरात्मे देखील रडतखडत आज्ञा पाळतात असे म्हणता येईल. येशूने भूतग्रस्त लोकांमधून भुतांना निघून जाण्याची आज्ञा केली तेव्हा त्यांना त्याचा अधिकार मान्य करावा लागला व अनिच्छेने का होईना त्याच्या आज्ञेचे पालन करावे लागले.—मार्क १:२७; ५:७-१३.

^ परि. 12 मत्तय २३:४ मध्ये, ‘जड ओझ्यांचे’ अर्थात शास्त्री व परूशी यांनी सामान्य माणसांवर लादलेल्या बारीकसारीक नियमांचे व मानव निर्मित रूढीपरंपरांचे वर्णन करण्याकरता या शब्दाचा प्रयोग करण्यात आला आहे. प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३० या ठिकाणी याच शब्दाचा अनुवाद “क्रूर” असा केला आहे. इतरांची दिशाभूल करण्यासाठी “विपरित गोष्टी” सांगून दडपशाही करणाऱ्या धर्मत्यागी लोकांना हा शब्द सूचित करतो.