व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय ३

देव ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यावर प्रेम करा

देव ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यावर प्रेम करा

“सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.”—नीतिसूत्रे १३:२०.

१-३. (क) बायबल कोणते अटळ सत्य सांगते? (ख) आपल्यावर चांगला प्रभाव पाडू शकणारे मित्र आपण कसे निवडू शकतो?

लोक एका अर्थाने स्पंजसारखे असतात. स्पंज जसा त्याच्या आजूबाजूचे पाणी शोषून घेतो तसेच लोकही ते ज्यांच्यासोबत उठ-बस करतात त्यांचा स्वभाव, त्यांचे दर्जे व त्यांच्या सवयी नकळतपणे आपल्याशा करतात.

बायबल एक अटळ सत्य सांगते. ते म्हणते: “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.” (नीतिसूत्रे १३:२०) “सोबत धर” हे शब्द, ‘प्रेम व आपुलकी’ सूचित करतात, असे बायबलच्या एका संदर्भ ग्रंथात म्हटले आहे. आपले ज्यांच्यावर प्रेम असते त्यांच्यासारखे बनण्याचा आपला कल असतो, हे तुम्हीही मान्य कराल. म्हणूनच, आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्याशी आपले भावनिक सूत जमते. त्यामुळे त्यांचा आपल्यावर चांगला अथवा वाईट असा जबरदस्त परिणाम होऊ शकतो.

आपण जर देवाच्या प्रीतिमध्ये राहू इच्छित असू, तर आपल्यावर ज्यांचा चांगला प्रभाव पडू शकेल असे मित्र आपण शोधले पाहिजेत. हे आपण कसे करू शकतो? देव ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यावर प्रेम करण्याद्वारे व त्याचे मित्र असणाऱ्यांसोबत मैत्री करण्याद्वारे आपण असे करू शकतो. जरा विचार करा. यहोवा आपल्या मित्रांमध्ये ज्या गुणांची अपेक्षा करतो असेच गुण असलेले लोक आपले चांगले मित्र बनू शकतात. तेव्हा आपण, अशा लोकांची उदाहरणे पाहू या ज्यांच्यावर यहोवाचे प्रेम होते. यहोवाचा दृष्टिकोन आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत असेल तर आपल्यावर चांगला प्रभाव पाडू शकणारे मित्र आपण निवडू शकू.

ज्यांच्यावर देव प्रेम करतो

४. मित्र निवडण्याच्या बाबतीत यहोवाला चोखंदळ असण्याचा हक्क का आहे व यहोवाने अब्राहामाला “माझा मित्र” असे का संबोधले?

मैत्रीच्या बाबतीत यहोवा अगदी चोखंदळ आहे. असे असण्याचा त्याला पूर्ण हक्क आहे, नाही का? तो तर या विश्वाचा सार्वभौम प्रभू आहे आणि त्याच्याबरोबर मैत्री करणे म्हणजे किती मोठा बहुमान आहे. पण तो कोणाला आपले मित्र होण्यासाठी निवडतो? जे त्याच्यावर भरवसा व पूर्ण मनाने विश्वास ठेवतात अशांना जवळ करून त्यांना आपले मित्र होण्यासाठी तो निवडतो. उल्लेखनीय विश्वासाबद्दल प्रसिद्ध असलेला कुलपिता अब्राहाम याचे उदाहरण घ्या. त्याच्यासमोर एक मोठी परीक्षा होती. एका पित्याला अतिशय कठीण वाटू शकेल अशी गोष्ट यहोवाने त्याला करायला सांगितली. यहोवाने त्याला त्याच्या पुत्राचे अर्पण करण्यास सांगितले. * इसहाकाला ‘मेलेल्यातून उठवावयास देव समर्थ आहे,’ असा अब्राहामाला पूर्ण भरवसा असल्यामुळे तो त्याचे अर्पण करायला तयार झाला. (इब्री लोकांस ११:१७-१९) आणि अब्राहामाने इतका मोठा विश्वास व आज्ञाधारकता दाखवली म्हणून यहोवाने त्याला प्रेमाने “माझा मित्र” असे संबोधले.—यशया ४१:८; याकोब २:२१-२३.

५. एकनिष्ठपणे यहोवाच्या आज्ञांचे पालन करणाऱ्यांबद्दल त्याला काय वाटते?

एकनिष्ठेने दाखवलेल्या आज्ञाधारकतेला यहोवा खूप मोलाचे समजतो. जे लोक, दुसऱ्या कोणत्याही गोष्टीपेक्षा यहोवाला एकनिष्ठ राहू इच्छितात अशांवर त्याचे खूप प्रेम आहे. (२ शमुवेल २२:२६) या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायात आपण पाहिल्याप्रमाणे जे लोक यहोवावरील प्रेमापोटी त्याच्या आज्ञा पाळतात ते त्याला प्रिय आहेत. “जो नीतिमान आहे त्याला तो मित्र मानतो,” असे नीतिसूत्रे ३:३२ मध्ये (सुबोध भाषांतर) म्हटले आहे. यहोवाच्या आज्ञांचे एकनिष्ठपणे पालन करणाऱ्यांना तो एक प्रेमळ आमंत्रण देतो: ते त्याच्या “मंडपात” वस्ती करू शकतात; म्हणजे, ते त्याची उपासना करू शकतात आणि केव्हाही त्याला प्रार्थना करू शकतात.—स्तोत्र १५:१-५.

६. येशूवर आपले प्रेम आहे हे आपण कसे दाखवू शकतो आणि यहोवाला त्याच्या पुत्रावर प्रेम करणाऱ्यांबद्दल कसे वाटते?

यहोवा अशा लोकांवर देखील प्रेम करतो जे त्याचा एकुलता एक पुत्र येशू याच्यावर प्रेम करतात. येशूने असे म्हटले: “ज्याची माझ्यावर प्रीति असेल तो माझे वचन पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीति करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू.” (योहान १४:२३) येशूबद्दलचे प्रेम आपण कसे दाखवू शकतो? अर्थातच, त्याच्या आज्ञांचे पालन करण्याद्वारे. त्याने दिलेल्या आज्ञांपैकी एक, सुवार्तेचा प्रचार व शिष्य बनवण्याची आज्ञा आहे. (मत्तय २८:१९, २०; योहान १४:१५, २१) आपण ‘त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालतो’ अर्थात अपरिपूर्ण असतानाही आपल्याला जितके जमते तितके आपण आपल्या बोलण्यात व कार्यात त्याचे अनुकरण करतो. (१ पेत्र २:२१) ख्रिस्तावरील प्रेमामुळे जे त्याच्यासारखे वागण्याचा प्रयत्न करतात त्यांना पाहून यहोवाला आनंद होतो.

७. यहोवाने ज्यांना आपले मित्र बनवले आहे त्यांच्याशी मैत्री करणे शहाणपणाचे का ठरेल?

यहोवा त्याच्या मित्रांमध्ये, विश्वास, एकनिष्ठा, आज्ञाधारकपणा आणि येशू व त्याने शिकवलेल्या मार्गांबद्दल प्रेम, हे गुण पाहतो. त्यामुळे आपण प्रत्येकाने स्वतःला असे विचारले पाहिजे: ‘माझ्यात आणि मी ज्यांना माझे जवळचे मित्र समजतो त्यांच्यामध्ये हे गुण आहेत का? यहोवाने ज्यांना आपले मित्र बनवले आहे ते माझेही मित्र आहेत का?’ असे करणे शहाणपणाचे ठरेल. स्वतःमध्ये देवाचे गुण अंगी बाणवणाऱ्यांचा व राज्याच्या सुवार्तेचा आवेशाने प्रचार करणाऱ्यांचा आपल्यावर चांगला प्रभाव पडू शकतो. अशा मित्रांच्या सहवासात राहिल्यामुळे, यहोवाला संतुष्ट करण्याचा आपला निर्धार आपण कधीही विसरणार नाही.—“ चांगले मित्र कोण आहेत?” असे शीर्षक असलेला चौकोन पाहा.

बायबलमधील एका उदाहरणापासून शिकणे

८. (क) नामी आणि रूथ, (ख) तीन इब्री तरुण आणि (ग) पौल व तीमथ्य यांच्यात असलेल्या मैत्रीतील कोणती गोष्ट तुम्हाला अपीलकारक वाटते?

चांगल्या लोकांशी मैत्री केल्यामुळे फायदा झालेल्यांची अनेक उदाहरणे बायबलमध्ये दिली आहेत. जसे की, नामी आणि तिची सून रूथ या दोघीत असलेला नातेसंबंध, बॅबिलोनमध्ये असताना एकमेकांशी जडून राहिलेले तीन इब्री तरुण आणि पौल व तीमथ्य यांच्यातील बंधन. (रूथ १:१६; दानीएल ३:१७, १८; १ करिंथकर ४:१७; फिलिप्पैकर २:२०-२२) पण आपण आणखी एका उल्लेखनीय उदाहरणावर, दावीद व योनाथान यांच्यात असलेल्या मैत्रीवर विचार करू या.

९, १०. दावीद आणि योनाथान यांच्यातील मैत्री कोणत्या कारणामुळे इतकी घट्ट होती?

बायबलमध्ये म्हटले आहे, की दाविदाने गल्याथाचा वध केल्यानंतर, “योनाथानाचे मन दाविदाच्या मनाशी इतके जडले की तो त्याला प्राणाप्रमाणे प्रिय झाला.” (१ शमुवेल १८:१) तेव्हापासून दावीद आणि योनाथानाची मैत्री जमली. त्या दोघांत बऱ्याच वर्षांचे अंतर होते तरीपण ते एकमेकांचे जीवलग मित्र बनले. त्यांची ही मैत्री अगदी शेवटपर्यंत म्हणजे योनाथानाचा लढाईत मृत्यू होईपर्यंत टिकून राहिली. * (२ शमुवेल १:२६) या दोन मित्रांतील बंधन इतके घट्ट कशामुळे बनले?

१० दावीद आणि योनाथान, या दोघांचे यहोवावर अपार प्रेम होते. त्या दोघांनाही यहोवाशी विश्वासू राहण्याची इच्छा होती. या कारणामुळे त्यांची मैत्री घट्ट होती. दोघांनाही यहोवाला संतुष्ट करायचे होते. एकमेकांना आवडतील असे चांगले गुण दोघांमध्ये होते. यहोवाच्या नावाचे निर्भयतेने व जोमाने समर्थन करणाऱ्या तरुण दाविदाला पाहून योनाथान खूप प्रभावीत झाला होता. आणि दाविदाला, यहोवाच्या व्यवस्थेला एकनिष्ठपणे पाठबळ देणाऱ्या तसेच स्वतःच्या सुखाकडे न पाहता निःस्वार्थपणे दाविदाच्या सुखाचा विचार करणाऱ्या वृद्ध योनाथानाचा मनापासून आदर वाटत होता. दाविदाला योनाथानाचा बाप, राजा शौल याच्यापासून आपला जीव वाचवण्याकरता रानावनात एका आश्रितासारखे राहावे लागत होते. यामुळे, एकेप्रसंगी तो निरुत्साहित झाला होता तेव्हा काय घडले ते पाहा. योनाथानाची दाविदाप्रती उल्लेखनीय एकनिष्ठा असल्यामुळे तो स्वतः “दाविदाकडे . . . गेला; देवाच्या ठायी त्याचा भरवसा दृढ करून त्याच्या हाताला त्याने बळकटी दिली.” (१ शमुवेल २३:१६) जीवलग मित्राने येऊन आपल्याला पाठिंबा दिला, आपले मनोधैर्य वाढवले म्हणून दाविदाला किती आनंद झाला असेल याची कल्पना करा! *

११. योनाथान व दावीद यांच्या उदाहरणातून आपण मैत्रीविषयी कोणता महत्त्वाचा धडा शिकतो?

११ योनाथान व दाविदाच्या उदाहरणातून आपण काय शिकतो? यातून आपण एक महत्त्वाचा धडा शिकतो. तो म्हणजे, आपल्या मित्रांमध्ये आणि आपल्यामध्ये एक समान गोष्ट असली पहिजे. दोघांनाही यहोवाबरोबरचा त्यांचा नातेसंबंध टिकवून ठेवण्याची काळजी असली पाहिजे. आपल्याप्रमाणेच धार्मिक विश्वास, नीतिमूल्ये व देवाशी विश्वासू राहण्याची इच्छा असलेल्यांच्या आपण जवळ येतो तेव्हा आपल्या विचारांद्वारे, भावनांद्वारे व अनुभवांद्वारे आपण एकमेकांना उत्तेजन देऊ शकतो व एकमेकांची उभारणी करू शकतो. (रोमकर १:११, १२) देवाशी विश्वासू राहू इच्छिणारे असे लोक आपल्याला त्याच्या उपासकांमध्येच भेटतील. पण मग, राज्य सभागृहातील सभांना येणारी प्रत्येक व्यक्ती एक चांगला मित्र असते का? नेहमीच नसते.

जीवलग मित्र कसे निवडाल

१२, १३. (क) मंडळीतसुद्धा आपण निवडक लोकांबरोबरच मैत्री का केली पाहिजे? (ख) पहिल्या शतकातील मंडळ्यांपुढे कोणती परिस्थिती निर्माण झाली होती व यामुळे पौलाने कोणता कडक इशारा दिला?

१२ मंडळीतसुद्धा आपण अशा लोकांबरोबरच मैत्री केली पाहिजे जे आपल्याला यहोवा देवाबरोबर आपला नातेसंबंध वाढवण्यास मदत करतील. आपण निवडक लोकांबरोबरच मैत्री केली पाहिजे हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले का? पण हीच वस्तुस्थिती आहे. झाडावरील काही फळे पिकायला जसा वेळ लागतो तसेच मंडळीतल्या काही ख्रिश्चनांना ख्रिस्ती प्रौढतेप्रत पोहचायला वेळ लागतो. त्यामुळे आपण कोणत्याही मंडळीत गेलो तरी, आपल्याला असे बंधूभगिनी भेटतील ज्यांची आध्यात्मिक वाढीची पातळी वेगवेगळी असते. (इब्री लोकांस ५:१२–६:३) जे नवीन आहेत किंवा आध्यात्मिक रीत्या कमकुवत आहेत अशांना आध्यात्मिक मदत करण्याची आपली इच्छा असल्यामुळे त्यांच्याबरोबर वागताना आपण धीर व प्रेम दाखवतो.—रोमकर १४:१; १५:१.

१३ कधीकधी मंडळीत असा एखादा प्रसंग उद्‌भवू शकतो जेव्हा मित्रांबरोबर सहवास राखण्याच्या बाबतीत आपल्याला सावधगिरी बाळगावी लागेल. मंडळीतल्या काही जणांचे कदाचित आक्षेपार्ह वर्तन असेल. काही जण मनात राग बाळगत असतील किंवा कुरकुर करण्याचा त्यांचा स्वभाव झाला असेल. सा.यु. पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळ्यांमध्ये काहीशी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. मंडळ्यांतले बहुतेक बंधूभगिनी विश्वासू होते. पण काही जण नीट वागत नव्हते. करिंथ मंडळीतले काहीजण विशिष्ट शिकवणी आचरत नसल्यामुळे प्रेषित पौलाने अशी ताकीद दिली: “फसू नका, कुसंगतीने नीति बिघडते.” (१ करिंथकर १५:१२, ३३) पौलाने तीमथ्याला सावध केले, की सहख्रिश्चनांमध्येही काही जण अनादराने वागणारे असतील तेव्हा अशा लोकांपासून दूर राहा व त्यांच्या जास्त जवळ जाऊ नकोस.—२ तीमथ्य २:२०-२२.

१४. सहवास राखण्याविषयी पौलाने दिलेल्या इशाऱ्यातील तत्त्व आपण कसे लागू करू शकतो?

१४ पौलाने दिलेल्या इशाऱ्यातील तत्त्व आपण कसे लागू करू शकतो? मंडळीत हानीकारक प्रभाव पाडणाऱ्या कोणाबरोबरही, मग ती व्यक्ती साक्षीदार असो अथवा नसो, तिच्याबरोबर आपण जवळीक करू नये. (२ थेस्सलनीकाकर ३:६, ७, १४) यहोवाबरोबरचा आपला नातेसंबंध आपण जपलाच पाहिजे. आपण स्पंजसारखे आहोत हे लक्षात ठेवा. आपण ज्यांच्याबरोबर निकट सहवास ठेवतो त्यांची मनोवृत्ती व त्यांची जीवनशैली लगेच आत्मसात करतो. जसे की, घाणेरड्या पाण्यात स्पंज टाकल्यावर तो फक्त चांगलेच पाणी शोषून घेईल, अशी अपेक्षा आपण करू शकत नाही. तसेच, वाईट प्रभाव असलेल्यांबरोबर मैत्री करून आपण त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी शिकण्याची अपेक्षा करू शकत नाही.—१ करिंथकर ५:६.

सहउपासकांमध्येच तुम्हाला सर्वोत्तम मित्र भेटू शकतात

१५. मंडळीत आध्यात्मिक प्रवृत्तीचे मित्र शोधण्याकरता तुम्ही काय करू शकता?

१५ सहउपासकांमध्ये चांगले मित्र मिळण्याची अधिक शक्यता आहे म्हणून बरे! (स्तोत्र १३३:१) मंडळीत आपण आध्यात्मिक प्रवृत्तीचे मित्र कसे शोधू शकतो? देवासारखे गुण अंगी बाणवण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात हे पाहून, तुमच्यासारखाच प्रयत्न करणारे आपोआप तुमच्याकडे आकर्षित होतील. त्याचबरोबर तुम्ही नवीन मित्र शोधण्यासाठी काही व्यावहारिक पावले उचलली पाहिजेत. (“ चांगले मित्र आम्हाला कसे मिळाले?” असे शीर्षक असलेला चौकोन पाहा.) तुम्ही जे गुण दाखवू इच्छिता ते गुण दाखवत असलेल्यांना शोधा. बायबलमध्ये “आपली अंतःकरणे. . .विशाल करा” असा सल्ला दिला आहे म्हणजे, आपल्या मैत्रीचा विस्तार वाढवा. जात-पात, राष्ट्र किंवा संस्कृतीचा विचार न करता विशाल मनाने सहउपासकांमध्ये मित्र शोधा. (२ करिंथकर ६:१३; १ पेत्र २:१७) फक्त तुमच्याच वयाच्या लोकांबरोबर मैत्री करू नका. योनाथान दाविदापेक्षा कितीतरी वर्षांनी मोठा होता हे आठवा. वयाने मोठे असलेल्यांबरोबर मैत्री केल्याने तुम्हाला अनुभवाचा व बुद्धीचा साठाही मिळेल.

समस्या निर्माण होतात तेव्हा

१६, १७. एखाद्या भावाने अथवा बहिणीने आपले मन दुखावले असेल तर आपण मंडळीत यायचे का सोडून देणार नाही?

१६ व्यक्ती तितक्या प्रवृत्ती अशी एक म्हणच आहे. त्यामुळे मंडळीत कधीकधी समस्या उद्‌भवण्याची शक्यता आहे. एखादा भाऊ अथवा बहीण कदाचित काहीतरी बोलून जाईल किंवा करेल ज्यामुळे आपल्या भावना दुखावतील. (नीतिसूत्रे १२:१८) आणि कधीकधी तर, व्यक्तिमत्त्वामुळे होणारे वाद, गैरसमज किंवा मतभेद यांमुळे या समस्या आणखीच चिघळतात. अशा वेळी आपण नाराज होऊन मंडळीत यायचेच सोडून देऊ का? यहोवावर आपले खरे प्रेम असेल आणि तो ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यावर आपले प्रेम असेल तर आपण असे करणार नाही.

१७ यहोवा आपला निर्माणकर्ता आहे व त्याच्यामुळेच आज आपण जिवंत आहोत. आपले प्रेम व संपूर्ण भक्ती मिळण्यास तो पात्र आहे. (प्रकटीकरण ४:११) याशिवाय, तो ज्या मंडळीचा उपयोग करत आहे तिला देखील आपण एकनिष्ठपणे पाठिंबा दिला पाहिजे. (इब्री लोकांस १३:१७) त्यामुळे, एखाद्या भावाने अथवा बहिणीने कधी आपल्याला दुखावलेच तर आपण किती नाराज आहोत हे दाखवण्यासाठी मंडळीत यायचे सोडून देणार नाही. आपण असे करूही कसे? कारण, यहोवाने तर आपल्याला नाराज केलेले नाही. यहोवावर आपले प्रेम असल्याकारणाने आपण कधीही त्याच्याकडे किंवा त्याच्या लोकांकडे पाठ फिरवणार नाही.—स्तोत्र ११९:१६५.

१८. (क) मंडळीतील शांती टिकवून ठेवण्याकरता आपण काय करू शकतो? (ख) उचित कारण असते तेव्हा क्षमा केल्याने कोणते फायदे होतात?

१८ बंधूभगिनींबद्दल असलेले प्रेम आपल्याला मंडळीतील शांती टिकवून ठेवण्याची प्रेरणा देईल. यहोवा ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्याकडून तो परिपूर्णतेची अपेक्षा करत नाही म्हणून आपणही ती करू नये. आपले बांधवांवर प्रेम असेल तर आपण त्यांच्या लहानसहान चुकांकडे दुर्लक्ष करू आणि आपण सर्वच अपरिपूर्ण आहोत, सर्वांच्याच हातून चुका होतात ही गोष्ट लक्षात ठेवू. (नीतिसूत्रे १७:९; १ पेत्र ४:८) प्रेम आपल्याला “आपसात क्षमा” करत राहण्यास मदत करेल. (कलस्सैकर ३:१३) या सल्ल्याचे पालन करणे वाटते तितके सोपे नाही. जर आपण नकारात्मक भावनांच्या आहारी गेलो तर आपण मनात राग बाळगू व आपले मन दुखावणाऱ्याबरोबर अबोला धरून असे दाखवून देऊ की आपण जणू त्याला शिक्षा देत आहोत. आणि खरे तर, अशा प्रकारे मनात राग बाळगल्याने आपलाच तोटा होतो. पण उचित कारण असते तेव्हा क्षमा केल्याने खूप फायदे होतात. (लूक १७:३, ४) जसे की, आपले मन व हृदय शांत राहते, मंडळीत शांती टिकून राहते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यहोवाबरोबरचा आपला नातेसंबंध टिकून राहतो.—मत्तय ६:१४, १५; रोमकर १४:१९.

काहींबरोबर सहवास राखणे कधी थांबवावे?

१९. एखाद्याबरोबर सहवास राखणे आपल्याला का थांबवावे लागेल?

१९ कधीकधी, मंडळीतल्या एखाद्या सदस्याबरोबर सहवास राखू नये, असे आपल्याला सांगितले जाते. देवाच्या नियमांचे उल्लंघन करून पश्‍चात्ताप न करणाऱ्या किंवा खोट्या शिकवणी देऊन विश्वास नाकारणाऱ्या व्यक्तीला जेव्हा मंडळीतून बहिष्कृत केले जाते अथवा एखादी व्यक्ती स्वतःहून मंडळीसोबत आपला संबंध तोडते तेव्हा अशा व्यक्तीबरोबर आपण सहवास राखू नये. अशा लोकांची आपण “संगत धरू नये” असे देवाच्या वचनात स्पष्टपणे सांगितलेले आहे. * (१ करिंथकर ५:११-१३; २ योहान ९-११) कदाचित ही व्यक्ती आपला मित्र असेल किंवा आपला नातेवाईक असेल तर तिच्याशी सहवास राखण्याचे थांबवणे आपल्याला खरोखरच खूप कठीण वाटेल. पण, नातेसंबंधांपेक्षा यहोवाला आणि त्याच्या धार्मिक नियमांना एकनिष्ठा दाखवून आपण ठाम भूमिका घेऊ का? एकनिष्ठा व आज्ञाधारकता यांना यहोवा खूप महत्त्वाचे समजतो, हे आठवणीत असू द्या.

२०, २१. (क) बहिष्कृत करण्याची योजना ही एक प्रेमळ योजना आहे असे आपण का म्हणतो? (ख) आपण मित्र सुज्ञपणे का निवडले पाहिजेत?

२० खरे तर, बहिष्कृत करण्याची योजना यहोवाची एक प्रेमळ योजना आहे. ती कशी? पश्‍चात्ताप न करणाऱ्या व्यक्तीला आपल्यातून बाहेर काढल्याने मंडळीचे, यहोवाच्या पवित्र नावाबद्दल, त्याच्या स्तरांबद्दल व यहोवाबद्दल असलेले प्रेम व्यक्त होते. (१ पेत्र १:१५, १६) बहिष्कृत करण्याच्या योजनेमुळे मंडळी सुरक्षित राहते. मंडळीतील इतर विश्वासू लोक, निर्ढावलेल्या पातक्यांच्या हानीकारक प्रभावापासून सुरक्षित राहतात व मंडळी या दुष्ट जगापासून सुरक्षित आश्रयस्थान असल्यामुळे तिथे येऊन आपण यहोवाची उपासना करू शकतो, हा भरवसा ते बाळगू शकतात. (१ करिंथकर ५:७; इब्री लोकांस १२:१५, १६) बहिष्कृत करणाऱ्याला मिळालेली ही कडक शिक्षा खरे तर यहोवाचे त्याच्यावर प्रेम असल्याचा पुरावा आहे. ताळ्यावर येण्यासाठी व यहोवाकडे परतण्यासाठी या तडाख्याची कदाचित त्याला आवश्यकता असेल.—इब्री लोकांस १२:११.

२१ जवळच्या मित्रांचा आपल्यावर जबरदस्त प्रभाव पडतो ही वस्तुस्थिती आहे. यास्तव आपण अगदी सुज्ञपणे मित्र निवडले पाहिजेत. यहोवाच्या मित्रांशी मैत्री केल्यास व तो ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यावर आपणही प्रेम केल्यास, आपल्या सभोवती सर्वोत्तम मित्रांचा गराडा असेल. त्यांच्याकडून आपण जे काही शिकू त्यामुळे, यहोवाला संतुष्ट करण्याचा आपला निश्चय पूर्ण करण्यास आपल्याला मदत होईल.

^ परि. 4 अब्राहामाला इसहाकाचे अर्पण करायला सांगण्याद्वारे यहोवाने, भविष्यात तो आपल्या एकुलत्या एका पुत्राचे बलिदान देणार आहे याची झलक दिली. (योहान ३:१६) अब्राहामाला मात्र यहोवाने इसहाकाचे अर्पण करू दिले नाही. इसहाकाच्या ऐवजी त्याने बलिदानासाठी चमत्कारिक रीत्या एका एडक्याची तरतूद केली.—उत्पत्ति २२:१, २, ९-१३.

^ परि. 9 दाविदाने गल्याथाचा वध केला तेव्हा दावीद ‘मुलगाच’ होता आणि योनाथानाचा मृत्यू झाला तेव्हा तो सुमारे ३० वर्षांचा होता. (१ शमुवेल १७:३३, सुबोध भाषांतर; ३१:२; २ शमुवेल ५:४) योनाथान त्याच्या मृत्यूच्या वेळी ६० वर्षांचा होता. म्हणजे दावीद व योनाथान यांच्यात जवळजवळ ३० वर्षांचे अंतर होते.

^ परि. 10 पहिले शमुवेल २३:१७ नुसार, योनाथानाने दाविदाचे धैर्य वाढवण्याकरता त्याला पाच गोष्टी सांगितल्या. (१) तू भिऊ नकोस, असे त्याने सांगितले. (२) शौलाचे सर्व प्रयत्न वाया जातील, याची खातरी त्याने दिली. (३) देवाने वचन दिल्याप्रमाणे त्यालाच राजपद मिळेल, याची त्याने आठवण करून दिली. (४) मी तुझ्याबरोबरच राहीन, असे त्याने वचन दिले. (५) मी तुझ्याच बाजूने उभा राहीन हे माझ्या बापालाही चांगल्याप्रकारे माहीत आहे, असेही तो म्हणाला.

^ परि. 19 बहिष्कृत झालेल्यांबरोबर व स्वतःहून मंडळीसोबत संबंध तोडणाऱ्यांबरोबर आपण कसे वागावे यासंबंधी अधिक माहिती हवी असेल तर “बहिष्कृत व्यक्तीशी कसे वागावे”हा परिशिष्टमधील लेख पाहा.