व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय ६

हितकारक मनोरंजन कसे निवडावे

हितकारक मनोरंजन कसे निवडावे

“सर्व [काही] देवाच्या गौरवासाठी करा.”—१ करिंथकर १०:३१.

१, २. मनोरंजनाच्या बाबतीत आपण कोणता पर्याय निवडला पाहिजे?

समजा तुम्ही एक रसाळ फळ खाण्यासाठी हातात घेता आणि तोंडात घालण्याआधी तुम्हाला दिसते की त्या फळाचा एक भाग नासका आहे. अशा वेळी तुम्ही काय कराल? तुमच्यापुढे तीन पर्याय आहेत. एकतर तुम्ही ते फळ आहे तसेच खाऊ शकता; किंवा तुम्ही ते अख्खे फळच टाकून देऊ शकता; अथवा, फळातला फक्त नासका भाग कापून उरलेला चांगला भाग खाऊ शकता. वर सांगितलेला कोणता पर्याय तुम्ही निवडाल?

मनोरंजनही काही बाबतीत या फळासारखे आहे. तुम्हाला कधीकधी थोडासा विरंगुळा हवा असतो आणि तुम्ही विचार करता, चला आज जरा टीव्ही किंवा एखादा चित्रपट पाहूया. पण मग तुम्हाला जाणवते, की आजकाल टीव्हीवरचे बहुतेक कार्यक्रम किंवा चित्रपट फळाच्या त्या सडक्या भागासारखे नैतिकरीत्या नासलेले आहेत. मग तुम्ही काय कराल? काहीजण, वरील फळाच्या उदाहरणात सांगितल्याप्रमाणे नासक्या भागासहित फळ खाण्याचे ठरवतील म्हणजे, जे वाईट आहे तेही पाहत राहतील. इतर जण, आपल्यावर वाईट प्रभाव पडू नये म्हणून मनोरंजनच नको, असे म्हणतील. आणि इतर काही जण अपायकारक असलेले मनोरंजन टाळतील परंतु अधूनमधून हितकारक मनोरंजन निवडतील. देवाच्या प्रेमात टिकून राहण्याकरता तुम्ही कोणता पर्याय निवडाल?

३. आता आपण कशाची चर्चा करणार आहोत?

आपल्यातील बहुतेकजण तिसरा पर्याय निवडतील. आपल्याला थोडातरी विरंगुळा हवा, हे आपण मान्य करतो पण नैतिकरीत्या हितकारक असलेले मनोरंजनच आपण स्वीकारतो. त्यामुळे, हितकारक काय व अपायकारक काय हे आपण पाहिले पाहिजे. परंतु या आधी आपण निवडत असलेल्या मनोरंजनाचा यहोवासोबत असलेल्या आपल्या नातेसंबंधावर कोणता प्रभाव पडतो त्याची चर्चा करूया.

“सर्व [काही] देवाच्या गौरवासाठी करा”

४. आपल्या समर्पणाचा विचार केल्यामुळे मनोरंजनासारख्या गोष्टींबद्दलच्या आपल्या दृष्टिकोनावर कसा प्रभाव पडतो?

सन १९४६ साली बाप्तिस्मा घेतलेल्या एका वृद्ध साक्षीदाराने काही वर्षांपूर्वी असे म्हटले: “मी बाप्तिस्म्याच्या प्रत्येक भाषणाला आवर्जून हजर राहण्याचा व जणू माझाच बाप्तिस्मा असल्याप्रमाणे लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करतो.” का? ते पुढे म्हणतात: “आपले समर्पण सदैव नजरेपुढे ठेवल्यामुळे मला विश्वासू राहण्यास खूप मदत झाली आहे.” तुमच्याही अशाच भावना असतील. मी जीवनभर तुझी सेवा करेन, या यहोवाला तुम्ही दिलेल्या वचनाची सतत आठवण ठेवल्यामुळे तुम्हाला टिकून राहण्याची प्रेरणा मिळते. (उपदेशक ५:४) खरे तर, जेव्हा तुम्ही तुमच्या समर्पणाचा विचार करता तेव्हा तुम्ही फक्त ख्रिस्ती सेवेबद्दलच नव्हे तर जीवनातील इतर गोष्टींबद्दलही, ज्यात मनोरंजनाचा देखील समावेश होतो, देवासारखाच दृष्टिकोन बाळगण्याचा प्रयत्न करत असता. याच गोष्टीवर जोर देत प्रेषित पौलाने त्याच्या दिवसांतील ख्रिस्ती लोकांना असे लिहिले: “तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.”—१ करिंथकर १०:३१.

५. रोमकर १२:१ मधील इशारा ओळखण्यास लेवीय २२:१८-२० आपल्याला कशी मदत करते?

आपण जीवनात जे करतो त्याचा, यहोवाबरोबर असलेल्या आपल्या नातेसंबंधाशी संबंध आहे. सहविश्वासू बांधवांच्या मनावर हे सत्य ठसवण्याकरता प्रेषित पौलाने रोमकरांना लिहिलेल्या आपल्या पत्रात गहन अर्थ असलेला एक शब्द वापरला. त्याने त्यांना असे आर्जवले: “तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.” (रोमकर १२:१) या वचनात उल्लेखण्यात आलेले शरीर म्हणजे तुमचे मन, तुमचे हृदय आणि तुमची शक्ती. देवाची सेवा करण्याकरता तुम्ही या सर्वांचा उपयोग करता. (मार्क १२:३०) पूर्ण मनाने केलेल्या या सेवेला पौल यज्ञ असे म्हणतो. तर यज्ञ या शब्दात एक ताकीदही दडलेली आहे. मोशेला दिलेल्या नियमशास्त्रात म्हटले होते, की अर्पण केल्या जाणाऱ्या यज्ञात दोष असेल तर देव तो स्वीकारणार नाही. (लेवीय २२:१८-२०) तसेच, आज एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीची सेवा या किंवा त्या मार्गाने डागाळलेली असेल तर ती सेवा देव स्वीकारणार नाही. पण हे कसे होऊ शकते?

६, ७. एक ख्रिस्ती व्यक्ती आपले शरीर कशा प्रकारे डागाळू शकते आणि यामुळे तिला कोणती किंमत मोजावी लागू शकते?

रोममधील ख्रिस्ती लोकांना पौलाने असा सल्ला दिला: “तुम्ही आपले अवयव . . . पापाला समर्पण करीत राहू नका.” त्याने त्यांना पुढे असेही सांगितले: ‘शरीराची कर्मे ठार मारा.’ (रोमकर ६:१२-१४; ८:१३) आधीच्या पत्रात त्याने ‘शरीराच्या कर्मांची’ काही उदाहरणे दिली होती. पापी मानवजातीविषयी बायबलमध्ये असे म्हटले आहे: “त्यांचे तोंड शापाने . . . भरलेले आहे.” “त्यांचे पाय रक्तपात करावयास जाण्याकरिता उतावळे झाले आहेत.” “त्यांच्या डोळ्यांपुढे देवाचे भय नाही.” (रोमकर ३:१३-१८) एका ख्रिस्ती व्यक्तीने पापी कृत्यांसाठी आपल्या अवयवांचा उपयोग केला तर तिचे शरीर दोषी बनते. जसे की, एक ख्रिस्ती जर मुद्दामहून पोर्नोग्राफीसारख्या भ्रष्ट गोष्टी किंवा क्रूर हिंसाचार पाहत असेल तर तो आपले ‘डोळे पापाला समर्पित करतो’ आणि अशा प्रकारे त्याचे संपूर्ण शरीर दूषित होते. अशा व्यक्तीची उपासना अपवित्र किंवा दोषी यज्ञासारखी होते व देव ती स्वीकारत नाही. (अनुवाद १५:२१; १ पेत्र १:१४-१६; २ पेत्र ३:११) अपायकारक मनोरंजन निवडल्याबद्दल त्याला किती मोठी किंमत मोजावी लागते!

एक ख्रिस्ती व्यक्ती ज्या प्रकारचे मनोरंजन निवडते त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, ही गोष्ट आता स्पष्ट झाली आहे. तेव्हा, आपण देवाला डागाळलेले नव्हे तर देवाच्या आपण करत असलेल्या सेवेची शोभा वाढवेल असे निर्दोष यज्ञ अर्पण करू इच्छितो. तर आता आपण हितकारक मनोरंजन कोणते व अपायकारक कोणते याची चर्चा करूया.

“वाइटाचा वीट माना”

८, ९. (क) मनोरंजनाची साधारणपणे कोणत्या दोन भागात विभागणी करता येईल? (ख) कोणत्या प्रकारचे मनोरंजन आपण हमखास टाळतो व का?

मनोरंजनाची साधारण दोन भागात विभागणी करता येईल. एका भागात अशा प्रकारचे मनोरंजन आहे जे ख्रिस्ती हमखास टाळतात आणि दुसऱ्या प्रकारचे मनोरंजन असे असते जे ख्रिश्चनांना कदाचित स्वीकारयोग्य वाटेल किंवा वाटणार नाही. आधी आपण पहिल्या भागात मोडणाऱ्या मनोरंजनाची अर्थात ख्रिश्चनांनी हमखास टाळले पाहिजे अशा मनोरंजनाची चर्चा करूया.

या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायात सांगण्यात आले होते, की मनोरंजनाच्या काही प्रकारांचा बायबलमध्ये अगदी उघडपणे निषेध करण्यात आला आहे. उदाहरणार्थ, विकृत किंवा दुरात्मिक विचारांनी भरलेल्या अथवा अश्लील वा दुष्ट, अनैतिक गोष्टींना बढावा देणाऱ्या वेबसाईट्‌सचा, चित्रपटांचा, टीव्ही कार्यक्रमांचा व संगीताचा विचार करा. जगात मान्य असलेले मनोरंजनाचे हे प्रकार बायबल तत्त्वांच्या विरोधात आहेत त्यामुळे ख्रिश्चनांनी ते टाळलेच पाहिजेत. (प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९; १ करिंथकर ६:९, १०; प्रकटीकरण २१:८) असे अपायकारक मनोरंजन टाळून तुम्ही यहोवाला दाखवून देता की तुम्ही खरोखरच “वाइटाचा वीट” मानत आहात आणि सतत “वाइटाचा त्याग” करत आहात. अशा प्रकारे तुमचा विश्वास ‘निष्कपट’ असेल.—रोमकर १२:९; स्तोत्र ३४:१४; १ तीमथ्य १:५.

१०. मनोरंजनाबद्दलचा कोणता तर्क घातक असू शकतो व का?

१० चित्रपटात किंवा टीव्ही कार्यक्रमात उघडपणे दाखवल्या जाणाऱ्या अनैतिक गोष्टी पाहण्यात काही चूक नाही असे काहींना वाटेल. ते म्हणतील, ‘मी तर फक्त चित्रपटात किंवा टीव्हीवर या गोष्टी पाहतो. स्वतः कुठं करतो?’ परंतु अशा प्रकारचा तर्क फसवा व घातक आहे. (यिर्मया १७:९) यहोवाला किळसवाण्या वाटणाऱ्या गोष्टी पाहण्यात आपल्याला मजा येत असेल तर आपण खरोखरच “वाइटाचा वीट” मानतो का? अशा प्रकारच्या घाणेरड्या गोष्टी सारख्या सारख्या पाहत राहिल्यास, वाचत राहिल्यास किंवा ऐकत राहिल्यास आपले मन व आपला विवेक बधीर होईल. (स्तोत्र ११९:७०; १ तीमथ्य ४:१, २) याचा आपल्या वर्तनावर तसेच इतरांच्या पापी वर्तनाकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनावरही प्रभाव पडू शकतो.

११. मनोरंजनाच्या बाबतीत गलतीकर ६:७ वचन कसे खरे ठरले आहे?

११ असा प्रभाव खरोखरच पडू शकतो. काही ख्रिश्चनांना अनैतिक कृत्ये दाखवले जाणारे कार्यक्रम पाहण्याची सवय होती. याचा त्यांच्यावर इतका परिणाम झाला की या ख्रिश्चनांच्या हातून अनैतिक कृत्ये घडली. ‘माणूस जे काही पेरितो त्याचे त्याला पीक मिळते,’ हे सत्य ते वाईट अनुभवाने शिकले. (गलतीकर ६:७) परंतु हा वाईट अनुभव तुम्ही टाळू शकता. जर नैतिकरीत्या शुद्ध असलेल्या गोष्टी तुम्ही आपल्या मनात पेरल्या तर तुम्ही जीवनात आनंदाची कापणी कराल.—“ मी कोणत्या प्रकारचे मनोरंजन निवडावे?” हा चौकोन पाहा.

बायबल तत्त्वांच्या आधारावर व्यक्तिगत निर्णय

१२. गलतीकर ६:५ या वचनाचा मनोरंजनाशी कसा संबंध आहे व व्यक्तिगत निर्णय घेण्याकरता आपल्याजवळ कोणते मार्गदर्शन आहे?

१२ आता आपण दुसऱ्या भागात मोडणाऱ्या मनोरंजनाच्या प्रकाराचा अर्थात, देवाच्या वचनात सरळपणे खंडन न केलेल्या किंवा अगदी स्पष्टपणे मान्य न करण्यात आलेल्या मनोरंजनाच्या प्रकारांचा विचार करूया. अशा प्रकारचे मनोरंजन निवडताना एका ख्रिस्ती व्यक्तीने, तिला हितकारक वाटणाऱ्या गोष्टींबाबत व्यक्तिगत निर्णय घेतला पाहिजे. (गलतीकर ६:५) परंतु अशी निवड करतानाही आपल्याला मार्गदर्शन देण्यात आले आहे. बायबलमध्ये तत्त्वे किंवा मूलभूत सत्ये दिली आहेत ज्यांमुळे आपल्याला यहोवाचा दृष्टिकोन समजण्यास मदत होते. या तत्त्वांकडे लक्ष दिल्यास आपल्याला, सर्व बाबतीत म्हणजे अगदी मनोरंजनाची निवड करण्याच्या बाबतीतही “प्रभूची इच्छा काय आहे” हे समजेल.—इफिसकर ५:१७.

१३. कोणत्या गोष्टीने प्रवृत्त होऊन आपण यहोवाला असंतुष्ट करणारे मनोरंजन टाळतो?

१३ अर्थात सर्वच ख्रिश्चन, आपली नैतिक संवेदनक्षमता अथवा समजबुद्धी समप्रमाणात विकसित करत नाहीत. (फिलिप्पैकर १:९) शिवाय, मनोरंजनाच्या बाबतीत सर्वांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात हेही त्यांना माहीत आहे. त्यामुळे, सर्वच ख्रिस्ती एकाच प्रकारचा निर्णय घेतील, अशी आपण अपेक्षा करू शकत नाही. तसेच, देवाच्या तत्त्वांचा आपल्या मनावर व हृदयावर जसजसा परिणाम होईल तसतसे आपण यहोवाला असंतुष्ट करणारे मनोरंजन टाळतो.—स्तोत्र ११९:११, १२९; १ पेत्र २:१६.

१४. (क) मनोरंजनाची निवड करताना आपण आणखी कोणत्या गोष्टीचा विचार करणे अगत्याचे आहे? (ख) जीवनात आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य देता यावे म्हणून आपण काय करू शकतो?

१४ मनोरंजनाची निवड करताना आणखी एका गोष्टीचा विचार करणे अगत्याचे आहे. ती गोष्ट म्हणजे, मनोरंजनात आपण घालवत असलेला वेळ. तुम्ही ज्या प्रकारचे मनोरंजन निवडता त्यावरून, तुम्हाला कोणत्या गोष्टी मान्य आहेत ते समजते. तसेच, मनोरंजनात तुम्ही जितका वेळ खर्च करता त्यावरून तुम्ही कोणत्या गोष्टींना महत्त्व देता ते कळते. आणि ख्रिस्ती लोक तर देवाच्या उपासनेशी संबंधित असलेल्या आध्यात्मिक गोष्टींना आपल्या जीवनात प्राधान्य देतात. (मत्तय ६:३३) तेव्हा, जीवनात आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य देता यावे म्हणून तुम्ही काय करू शकता? प्रेषित पौलाने असे म्हटले: “अज्ञान्यासारखे नव्हे तर ज्ञान्यासारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा.” (इफिसकर ५:१५, १६) मनोरंजनात तुम्ही घालवत असलेल्या वेळेवर नियंत्रण ठेवल्याने तुम्हाला “जे श्रेष्ठ ते” अर्थात देवाबरोबरचा तुमचा नातेसंबंध बळकट करण्यास पोषक ठरणाऱ्या अधिक महत्त्वाच्या गोष्टींसाठी वेळ मिळेल.—फिलिप्पैकर १:१०.

१५. मनोरंजनाची निवड करताना नेहमीपेक्षा थोडी अधिक दक्षता घेण्यात सुज्ञता का आहे?

१५ मनोरंजनाची निवड करताना आपण नेहमीपेक्षा थोडी अधिक दक्षता घेण्यातही सुज्ञता आहे. दक्षता घेणे म्हणजे काय? फळाच्या उदाहरणाचा पुन्हा विचार करा. चुकून नासका भाग खाऊ नये म्हणून तुम्ही केवळ सडकाच भाग कापून काढत नाही तर त्याच्या आजूबाजूचाही थोडा भाग कापून काढता. तसेच, मनोरंजनाची निवड करतानाही आपण नेहमीपेक्षा थोडी अधिक दक्षता घेतली पाहिजे. एक सुज्ञ ख्रिस्ती, बायबल तत्त्वांच्या अगदी विरोधात असलेले मनोरंजनच फक्त टाळत नाही तर आक्षेपार्ह वाटणारे किंवा यहोवाबरोबरचा आपला नातेसंबंध बिघडवू शकणारे मनोरंजनाचे प्रकारही टाळेल. (नीतिसूत्रे ४:२५-२७) देवाच्या वचनात असणाऱ्या सल्ल्याचे काटेकोरपणे पालन केल्याने आपण असे करू शकतो.

“शुद्ध” असलेल्या गोष्टींचा विचार करा

मनोरंजनाची निवड करताना बायबलमधील तत्त्वांचा अवलंब केल्यास देवाबरोबरील आपल्या नातेसंबंधाला तडा जाणार नाही

१६. (क) नैतिक बाबतीत आपल्या यहोवासारख्याच भावना आहेत हे आपण कसे दाखवू शकतो? (ख) बायबलच्या तत्त्वांच्या आधारावर निर्णय घेणे तुमच्या अंगवळणी कसे पडेल?

१६ मनोरंजनाची निवड करताना खरे ख्रिस्ती सर्वात आधी यहोवाच्या दृष्टिकोनाचा विचार करतात. यहोवाच्या भावना काय आहेत किंवा त्याचे दर्जे काय आहेत हे बायबलमध्ये सांगण्यात आले आहे. राजा शलमोनाने, यहोवा द्वेष करत असलेल्या अनेक गोष्टी सांगितल्या. जसे की: “लबाड बोलणारी जिव्हा, निर्दोष रक्त पाडणारे हात, दुष्ट योजना करणारे अंतकरण, दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय.” (नीतिसूत्रे ६:१६-१९) यहोवाच्या दृष्टिकोनाचा तुमच्या दृष्टिकोनावर कोणता प्रभाव पडला पाहिजे? “परमेश्वरावर प्रीति करणाऱ्यांनो, वाइटाचा द्वेष करा,” अशी स्तोत्रकर्ता विनंती करतो. (स्तोत्र ९७:१०) मनोरंजनाच्या बाबतीत तुम्ही जी काही निवड करता त्यावरून, यहोवाला वीट आणणाऱ्या गोष्टींचा तुम्हालाही वीट येतो, हे स्पष्ट झाले पाहिजे. (गलतीकर ५:१९-२१) तसेच, तुम्ही चारचौघात असताना जे काही करता त्यापेक्षा तुम्ही एकांतात असताना जे करता त्यावरून तुम्ही कोणत्या प्रकारची व्यक्ती आहात हे स्पष्ट होईल. (स्तोत्र ११:४; १६:८) तेव्हा, जीवनाच्या प्रत्येक पैलूत, नैतिक गोष्टींबाबत यहोवासारख्याच भावना दाखवण्याची तुमची मनापासून इच्छा असेल तर तुम्ही नेहमी बायबलच्या तत्त्वांच्या आधारावर निर्णय घ्याल. ते तुमच्या अंगवळणी पडेल.—२ करिंथकर ३:१८.

१७. मनोरंजनाची निवड करण्याआधी तुम्ही स्वतःला कोणते प्रश्न विचारले पाहिजेत?

१७ मनोरंजनाची निवड करताना यहोवाच्या दृष्टिकोनानुसार वागण्याकरता तुम्ही आणखी काय काय करू शकता? पुढील प्रश्‍नावर विचार करा: ‘यहोवाबरोबरच्या माझ्या नातेसंबंधावर याचा कसा परिणाम होईल?’ जसे की, एखादा चित्रपट पाहायचा की नाही हे ठरवण्याआधी, स्वतःला विचारा: ‘या चित्रपटातील गोष्टींचा माझ्या विवेकावर काय प्रभाव पडेल?’ या विषयाशी संबंधित असलेल्या तत्त्वांवर आपण चर्चा करू या.

१८, १९. (क) फिलिप्पैकर ४:८ मधील तत्त्व, आपण निवडलेले मनोरंजन हितकारक आहे किंवा नाही हे ठरवण्यास आपल्याला कशा प्रकारे मदत करू शकते? (ख) हितकारक मनोरंजन निवडण्यास आणखी कोणती तत्त्वे तुम्हाला मदत करू शकतात? (तळटीप पाहा.)

१८ फिलिप्पैकर ४:८ मध्ये एका महत्त्वाच्या तत्त्वाविषयी सांगितले आहे: “जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्‌गुण, जी काही स्तुति, त्यांचे मनन करा.” पौल येथे मनोरंजनाविषयी नव्हे तर देवाला संतुष्ट करणाऱ्या आपल्या मनातील विचारांविषयी बोलत होता, हे कबूल आहे. (स्तोत्र १९:१४) असे असले तरी, मनोरंजनाच्या बाबतीतही आपण पौलाने सांगितलेल्या या तत्त्वाचा अवलंब करू शकतो. तो कसा?

१९ स्वतःला विचारा: ‘मी जे चित्रपट पाहतो, व्हिडिओ गेम खेळतो, संगीत ऐकतो किंवा मनोरंजनाच्या इतर प्रकारांमध्ये भाग घेतो त्यामुळे माझे मन “शुद्ध” गोष्टींनी भरते का?’ जसे की, एखादा चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या मनात सतत कोणती दृश्ये रेंगाळत राहतात? ही दृश्ये सुखदायक, निर्मळ व तजेलादायक असतील तर तुम्हाला समजेल की तुम्ही निवडलेले मनोरंजन हितकारक होते. पण, तुम्ही पाहिलेल्या चित्रपटामुळे तुमच्या मनात अशुद्ध विचार येत असतील तर त्याचा अर्थ तुम्ही निवडलेले मनोरंजन अपायकारक व धोकेदायकही होते. (मत्तय १२:३३; मार्क ७:२०-२३) असे का? कारण, नैतिकरीत्या अशुद्ध असलेल्या गोष्टींवर विचार केल्यामुळे तुम्ही मानसिकरीत्या अस्वस्थ होऊ शकता, तुमचा बायबल प्रशिक्षित विवेक बोथट होऊ शकतो व यहोवाबरोबरचा तुमचा नातेसंबंधसुद्धा बिघडू शकतो. (इफिसकर ५:५; १ तीमथ्य १:५, १९) अशा प्रकारच्या मनोरंजनाचा तुमच्यावर व्यक्तिगतरीत्या प्रभाव पडत असल्यामुळे, ते टाळण्याचा निश्चय करा. * (रोमकर १२:२) यहोवाला प्रार्थना करणाऱ्या स्तोत्रकर्त्याप्रमाणे व्हा. त्याने असे म्हटले: “निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टि वळीव.”—स्तोत्र ११९:३७.

दुसऱ्यांच्याही हिताचा विचार करा

२०, २१. हितकारक मनोरंजन निवडण्याच्या बाबतीत १ करिंथकर १०:२३, २४ ही वचने कशी लागू होतात?

२० पौलाने बायबलमधील आणखी एका महत्त्वपूर्ण तत्त्वाचा उल्लेख केला ज्याचा विचार आपण कोणतेही व्यक्तिगत निर्णय घेण्याआधी केला पाहिजे. तो म्हणाला: “[आपल्याला] सर्व गोष्टींची मोकळीक आहे तरी सर्व गोष्टी उन्नति करितातच असे नाही. कोणीहि आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्याचे [देखील] पाहावे.” (१ करिंथकर १०:२३, २४) हितकारक मनोरंजन निवडताना हे तत्त्व आपण कसे लागू करू शकतो? तुम्ही स्वतःला विचारले पाहिजे: ‘मी निवडलेल्या मनोरंजनामुळे इतरांवर कोणता प्रभाव पडेल?’

२१ तुमचा विवेक कदाचित तुम्हाला स्वीकारयोग्य वाटणारा मनोरंजनाचा एखादा प्रकार निवडण्याची “मोकळीक” देईल. परंतु, ज्यांचा विवेक त्यांना अशी मोकळीक देत नाही अशा बांधवांना तुमची निवड आक्षेपार्ह वाटत असेल तर तुम्ही त्यावर अडून राहणार नाही. का नाही? पौलाने म्हटल्याप्रमाणे, तुम्ही आपल्या “बंधुविरुद्ध” किंवा “ख्रिस्ताविरुद्ध पाप” करून त्यांना देवाशी विश्वासू राहणे कठीण बनवणार नाही. “कोणालाहि अडखळविणारे होऊ नका” हा सल्ला तुम्ही नेहमी लक्षात ठेवता. (१ करिंथकर ८:१२; १०:३२) खरे ख्रिस्ती, पौलाचा विचारशील व समंजस सल्ला ऐकतात. मनोरंजनाचा एखादा प्रकार निवडण्याची त्यांना “मोकळीक” असली तरी त्याने त्यांची “उन्नती” होत नसल्यामुळे असे प्रकार निवडण्याचे ते टाळतात.—रोमकर १४:१; १५:१.

२२. व्यक्तिगत निर्णय घेताना खरे ख्रिस्ती इतरांच्या आवडीनिवडींचा देखील विचार का करतात?

२२ इतरांचे हित पाहण्यात आणखी एक गोष्ट समाविष्ट आहे. ज्याचा संकोचित विवेक आहे त्याने, ख्रिस्ती मंडळीतील सर्वांनी, मनोरंजनाच्या बाबतीत त्याला योग्य वाटणाऱ्या गोष्टी स्वीकाराव्यात असा हट्ट धरू नये. असे केले तर तो, महामार्गावरील सर्वच वाहनचालकांनी माझ्याच वाहनाच्या गतीने वाहन चालवावे असा अट्टहास धरणाऱ्या चालकाप्रमाणे होईल. हा तर आडमुठेपणा ठरेल. त्यामुळे, संकोचित विवेक असलेल्या बांधवात ख्रिस्ती प्रेम असेल तर तो, इतर बांधवांचा मनोरंजनाच्या बाबतीत त्याच्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन असला तरी तो ख्रिस्ती तत्त्वांनुसारच आहे, ही गोष्ट लक्षात ठेवेल. असे वागल्यामुळे हा बांधव आपला “समंजसपणा सर्वांस” दाखवून देतो.—फिलिप्पैकर ४:५, NW; उपदेशक ७:१६.

२३. तुम्ही हितकारक मनोरंजन कसे निवडाल?

२३ थोडक्यात, तुम्ही हितकारक मनोरंजन कसे निवडाल? देवाच्या वचनात हिणकस, अनैतिक कार्यांचे उघडपणे खंडन करण्यात आले आहे. ज्या मनोरंजनात असे प्रकार बिनधोकपणे दाखवले जातात असे मनोरंजनाचे सर्व प्रकार टाळा. बायबलमध्ये मनोरंजनाच्या सर्व प्रकारांविषयी सविस्तरपणे सांगण्यात आलेले नाही. म्हणून असे प्रकार निवडताना बायबलमधील कोणत्या तत्त्वांचा अवलंब करता येईल त्यावर विचार करा. तुमचा विवेक ज्यामुळे दुखावेल अशा प्रकारचे मनोरंजन टाळा. इतरांच्या आणि विशेषकरून आपल्या बांधवांच्या भावना ज्यामुळे दुखावतील असे मनोरंजनाचे प्रकार टाळण्याचीही तयारी ठेवा. या तुमच्या दृढनिश्चयामुळे देवाचे गौरव होवो आणि तुम्ही व तुमचे कुटुंब देवाच्या प्रेमात टिकून राहो!

^ परि. 19 मनोरंजनाच्या बाबतीत लागू होणारी आणखी काही तत्त्वे, नीतिसूत्रे ३:३१; १३:२०; इफिसकर ५:३, ४; कलस्सैकर ३:५, ८, २० येथे सापडू शकतात.