व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय ९

“जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा”

“जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा”

“पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ—ह्याला मूर्तिपूजा म्हणावे—हे जिवे मारा.”—कलस्सैकर ३:५.

१, २. यहोवाच्या लोकांना फसवण्यासाठी बलामाने कोणता कट रचला?

एक कोळी, आपल्या आवडत्या ठिकाणी मासे पकडण्यासाठी जातो. आज कोणता मासा पकडायचा हे त्याने मनात आधीच ठरवले आहे. त्यासाठी तो गळाला लावण्यासाठी एक लालूच निवडतो आणि तो पाण्यात टाकतो. थोड्याच वेळात, गळ जड वाटू लागतो आणि गळाला बांधलेली काठी वाकते. आपण योग्य लालूच वापरले म्हणून तो मनातल्या मनात खूष होतो.

काहीसे असेच सा.यु.पू. १४७३ साली बलाम नावाच्या एका मनुष्याने केले. त्यानेही गळाला कोणते लालूच लावायचे यावर खूप विचार केला होता. त्याला देवाच्या लोकांना फसवायचे होते. वचन दिलेल्या देशाच्या सीमेवरील मवाबाच्या मैदानावर देवाच्या लोकांनी तळ ठोकला होता. आपण यहोवाचा संदेष्टा आहोत असा बलाम दावा करत होता परंतु खरे तर, तो एक लोभी मनुष्य होता. इस्राएलवर शाप आणण्यासाठी त्याला पैसे देऊन विकत घेण्यात आले होते. पण यहोवाने मधे हस्तक्षेप केल्यामुळे बलामाच्या तोंडून इस्राएलाबद्दल आशीर्वादच निघत होते. बलाम मात्र पैशासाठी इतका हपापलेला होता की, देवाच्या लोकांना एखादे गंभीर पाप करण्याच्या प्रलोभनात पाडून त्यांना शाप देण्यास तो देवाला उघुक्त करू शकतो, असा विचार त्याने केला. त्यामुळे, इस्राएली पुरुषांना फसवण्यासाठी त्याने तरुण मवाबी स्त्रियांचा मोहजाल टाकला.—गणना २२:१-७; ३१:१५, १६; प्रकटीकरण २:१४.

३. बलामाने रचलेला कट कितपत यशस्वी ठरला?

बलामाने टाकलेल्या मोहजालात इस्राएली लोक अडकले का? हो, बरेच लोक अडकले. हजारो इस्राएली पुरुषांनी “मवाबी कन्यांशी व्यभिचार” केला. एवढेच नव्हे तर ते मवाबी दैवतांची उपासना करू लागले; जनन किंवा सेक्स देवता बआलपौर याच्या भजनी ते लागले. वचन दिलेल्या देशाच्या अगदी उंबरठ्यावर असताना २४,००० इस्राएली पुरुषांना आपला जीव गमावावा लागला. किती भयंकर अनर्थ त्यांच्यावर ओढवला होता!—गणना २५:१-९.

४. हजारो इस्राएली पुरुष अनैतिकतेच्या पाशाला बळी का पडले?

पण हा अनर्थ कशामुळे ओढवला होता? अनेक इस्राएली पुरुषांचे मन, ज्या देवाने त्यांना ईजिप्तच्या दास्यत्वातून सोडवले होते, रानात त्यांना खाऊ घातले होते, वचन दिलेल्या देशापर्यंत त्यांना सुखरूप आणले होते त्या यहोवापासून दूर गेल्यामुळे दुष्ट बनले होते. (इब्री लोकांस ३:१२) या गोष्टीची पुन्हा एकदा आठवण करून देत प्रेषित पौलाने लिहिले: “त्यांच्यापैकी कित्येकांनी जारकर्म केले व ते एका दिवसात तेवीस हजार मरून पडले; तेव्हा आपण जारकर्म करू नये.” *१ करिंथकर १०:८.

५, ६. मवाबाच्या मैदानावर इस्राएली पुरुषांनी केलेल्या पापाचा अहवाल आज आपल्यासाठी महत्त्वाचा का आहे?

गणना पुस्तकातील अहवालात अनेक महत्त्वपूर्ण धडे आहेत जे देवाचे लोक आज शिकू शकतात. कारण तेही वचन दिलेल्या देशापेक्षा सरस असलेल्या नवीन जगाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. (१ करिंथकर १०:११) उदाहरणार्थ, प्राचीन मवाबी लोकांप्रमाणेच, किंबहुना कितीतरी मोठ्या प्रमाणात आजच्या जगाला सेक्सच्या आकर्षणाने झपाटून टाकले आहे. शिवाय, अनेक इस्राएली पुरुष ज्या पाशात अडकले होते त्याच अनैतिकतेच्या पाशात दर वर्षी हजारो ख्रिस्ती अडकत आहेत. (२ करिंथकर २:११) एका मिद्यानी स्त्रीला इस्राएली छावणीत निर्लज्जपणे मिरवत थेट आपल्या तंबूपर्यंत नेणाऱ्या जिम्रीप्रमाणे आज देवाच्या लोकांबरोबर सहवास राखणारे काही जण आणि एवढेच नव्हे तर बाप्तिस्मा घेतलेले काही ख्रिस्ती देखील मंडळीसाठी भ्रष्ट प्रभाव ठरत आहेत.—गणना २५:६, १४; यहूदा ४.

आज तुम्ही देखील एका आधुनिक मवाबाच्या मैदानावर असल्याची कल्पना करा. तुम्ही ज्याची आतुरतेने वाट पाहत आहात ते नवीन जग अगदी समोर असल्याचे तुम्हाला दिसते का? मग “जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा,” या देवाने दिलेल्या आज्ञेचे पालन करून त्याच्या प्रेमात टिकून राहण्याकरता तुम्हाला जो काही प्रयत्न करावा लागतो तो करा.—१ करिंथकर ६:१८.

मवाबाच्या मैदानावरून

जारकर्म म्हणजे काय?

७, ८. “जारकर्म” या शब्दाचा काय अर्थ होतो व जारकर्म करणाऱ्यांना कोणते परिणाम भोगावे लागतात?

बायबलमध्ये ‘जारकर्म’ (ग्रीक, पोर्निया) हा शब्द, देवाच्या नजरेत स्वीकृत असलेल्या विवाहाबाहेर ठेवल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या बेकायदेशीर लैंगिक संबंधांना लागू होतो. यांत, व्यभिचार, वेश्यावृत्ती, अविवाहित स्त्रीपुरुषांतील लैंगिक संबंध, मौखिक व गुदमैथुन तसेच जिच्याशी विवाह झालेला नाही अशा व्यक्तीचे लैंगिक अवयव चोळणे, या सर्व गोष्टींचा समावेश होतो. तसेच, समलिंगी व्यक्तींतील संबंध व पशूगमन, यांचाही यात समावेश होतो. *

शास्त्रवचनात अगदी स्पष्टपणे सांगितलेले आहे, की जारकर्म आचरणाऱ्यांचा ख्रिस्ती मंडळीशी काहीच संबंध उरत नाही व त्यांना सार्वकालिक जीवनही मिळणार नाही. (१ करिंथकर ६:९; प्रकटीकरण २२:१५) एवढेच नव्हे तर, आत्ताही ते स्वतःची खूप हानी करून घेतात. ते इतरांचा भरवसा व स्वतःचा आत्मसन्मान गमावतात, त्यांच्या वैवाहिक जीवनात एकी राहत नाही, त्यांचा विवेक सतत त्यांना बोचत राहतो. नको असलेले गर्भारपण, लैंगिक आजार व मृत्यूही त्यांच्यावर ओढवतो. (गलतीकर ६:७, ८) ज्या मार्गावर केवळ दुःखच आहे अशा मार्गावर चालायला सुरुवात तरी का करायची? या मार्गावर पहिले पाऊल टाकण्याआधी पुष्कळ लोक एवढ्या लांबचा विचार कधी करत नाहीत, ही दुःखाची गोष्ट आहे. याची सुरुवात सहसा पोर्नोग्राफी पाहण्यापासून होते.

पोर्नोग्राफी—पहिले पाऊल

९. काही म्हणतात त्याप्रमाणे पोर्नोग्राफी अनपायकारक आहे का? समजावून सांगा.

अनेक देशांमध्ये पोर्नोग्राफी, मासिकांच्या स्टॉलवर, संगीतात, टीव्हीवर आणि इंटरनेटवर सर्रासपणे आढळते. * काही म्हणतात त्याप्रमाणे ती खरोखरच अनपायकारक आहे का? मुळीच नाही. उलट ती खूप हानीकारक आहे. पोर्नोग्राफी पाहणाऱ्यांना, हस्तमैथुनाची सवय लागते, त्यांच्या मनात ‘दुर्वासना’ वाढू लागतात ज्यामुळे ते सेक्स, विकृत इच्छा यामुळे वेडेपिसे होतात, नवराबायकोत गंभीर स्वरूपाचे मतभेद निर्माण होतात; त्यांची भांडणे विकोपाला जाऊन त्याचे पर्यवसान घटस्फोटात होते. * (रोमकर १:२४-२७; इफिसकर ४:१९) सेक्सचे व्यसन कॅन्सरसारखे आहे, असे एका संशोधकाने म्हटले. तो म्हणतो: “ज्या व्यक्तीला हे व्यसन जडते ते वाढत व पसरत राहते. फार कमी वेळा ते नाहीसे होते. सेक्सचे व्यसन जडलेल्या व्यक्तीवर उपचार करणे व तिला पूर्णपणे बरी करणे अतिशय कठीण असते.”

घरात सर्वांचे येता-जाता लक्ष राहील अशा ठिकाणी इंटरनेटचा उपयोग करण्यात सुज्ञपणा आहे

१०. याकोब १:१४, १५ मधील तत्त्वाचा आपण अवलंब कसा करू शकतो? ( नैतिकरित्या शुद्ध राहायला मला मदत कशी मिळाली? हा चौकोनही पाहा.)

१० याकोब १:१४, १५ मधील शब्दांचा विचार करा: “प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो तेव्हा मोहांत पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते; आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजविते.” यास्तव, तुमच्या मनात वाईट विचार येतात तेव्हा ते लगेच झटकून टाका. जसे की, नकळत तुमची नजर कामोत्तेजक दृश्यांवर गेली तर लगेच दुसरीकडे बघा किंवा मग कंप्युटर बंद करा अथवा टीव्ही चॅनेल बदला. अनैतिक इच्छा तुमच्या मनात प्रबळ होऊन तिने तुमच्यावर कब्जा करण्याआधी तुम्हीच तिच्यावर मात करून तिला टाळायचा होता होईल तितका प्रयत्न करा.—मत्तय ५:२९, ३०.

११. वाईट विचारांवर मात करताना यहोवावरील भरवसा आपण कसा दाखवू शकतो?

११ आपल्यापेक्षाही जो आपल्याला चांगल्या प्रकारे ओळखतो तो असा सल्ला देतो: “पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ—ह्याला मूर्तिपूजा म्हणावे—हे जिवे मारा.” (कलस्सैकर ३:५) असे करणे कठीण असू शकते. पण आपल्याला मदत करायला एक प्रेमळ व सहनशील स्वर्गीय पिता सदैव तयार आहे हे विसरू नका. (स्तोत्र ६८:१९) तुमच्या मनात वाईट विचार येतात त्याच क्षणी त्याला प्रार्थना करा. ‘पराकोटीचे सामर्थ्य’ मिळण्यासाठी प्रार्थना करा आणि वाईट विचारांऐवजी चांगल्या विचारांवर मन केंद्रित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा.—२ करिंथकर ४:७; १ करिंथकर ९:२७; पृष्ठ ११८ वरील “ मी वाईट सवय कशी सोडू शकतो?” हा चौकोन पाहा.

१२. आपले ‘अंतःकरण’ म्हणजे काय व आपण त्याचे रक्षण का केले पाहिजे?

१२ सुज्ञ राजा शलमोन याने असे लिहिले: “सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे.” (नीतिसूत्रे ४:२३) आपले ‘अंतःकरण’ म्हणजे आपले आंतरिक व्यक्तिमत्त्व अर्थात आपण देवाच्या नजरेत असलेली एक व्यक्ती. शिवाय, आपल्याला सार्वकालिक जीवन मिळणार किंवा नाही हे, लोकांनी आपल्याविषयी ठरवलेल्या मतावरून नव्हे तर देव करत असलेल्या आपल्या ‘अंतःकरणाच्या’ परीक्षणावरून ठरेल. हे अगदी सोपे गणित आहे. पण तितकेच गंभीरही आहे. आपण कोणत्याही स्त्रीकडे वाईट नजरेने बघू नये म्हणून विश्वासू ईयोबाने आपल्या डोळ्यांशी एक करार केला होता. (ईयोब ३१:१) ईयोबाचे किती सुरेख उदाहरण आपल्यापुढे आहे! स्तोत्रकर्त्याची देखील अशीच मनोवृत्ती होती. तो म्हणाला होता: “निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टि वळीव.”—स्तोत्र ११९:३७.

दीनाने केली चुकीची निवड

१३. दीना कोण होती व मैत्रिणींच्या बाबतीत तिने केलेली निवड चुकीची का होती?

१३ आपण या पुस्तकाच्या तिसऱ्या अध्यायात पाहिले होते, की आपल्या मित्रांचा आपल्यावर चांगला किंवा वाईट प्रभाव पडू शकतो. (नीतिसूत्रे १३:२०; १ करिंथकर १५:३३) कुलपिता याकोबाची मुलगी दीना हिचे उदाहरण घ्या. (उत्पत्ति ३४:१) बालपणापासून दीनावर चांगलेच संस्कार झाले होते तरीपण तिने मैत्रिणींच्या बाबतीत चुकीची निवड केली. तिने कनानी मुलींशी मैत्री केली. मवाबी लोकांप्रमाणेच कनानी लोकसुद्धा वाईट चालीचे म्हणून सर्वपरिचित होते. (लेवीय १८:६-२५) कनानी पुरुषांना आणि आपल्या “बापाच्या घराण्यातल्या सर्वाहून मोठा” असलेल्या शेखमलाही, कनानमधील इतर तरूण स्त्रियांप्रमाणेच अनैतिक संबंध ठेवण्यास दीनाची देखील काही हरकत नसेल, असे वाटले.—उत्पत्ति ३४:१८, १९.

१४. मैत्रिणींच्या बाबतीत दीनाने केलेल्या निवडीमुळे तिच्यावर आणि तिच्या कुटुंबावर कोणते संकट कोसळले?

१४ दीनाने जेव्हा शेखमला पाहिले असावे तेव्हा लैंगिक संबंधांचा विचारही तिच्या मनाला शिवला नसेल. परंतु शेखम इतर कनानी पुरुषांप्रमाणेच वागला. लैंगिक इच्छा चाळवल्यानंतर त्यांना जे करणे स्वाभाविक वाटले असते तेच शेखमनेही केले. दीनाने कदाचित शेवटच्या क्षणी त्याला अडवण्याचा प्रयत्नही केला असेल पण त्याचा काही उपयोग झाला नाही कारण “तो तिला घेऊन गेला व तिजपाशी निजून त्याने तिला भ्रष्ट केले.” अहवालात पुढे म्हटले आहे, की दीनावर नंतर “त्याचे मन बसले.” पण यामुळे यात फारसा फरक पडणार नव्हता कारण त्याने तर तिची अब्रू लुटली होती. (उत्पत्ति ३४:१-४) या घटनेत फक्त दीनालाच हाल सोसावे लागले नाहीत. मैत्रिणींच्या बाबतीत तिने केलेल्या चुकीच्या निवडीमुळे नंतर ज्या घटना घडल्या त्यामुळे तिच्या संपूर्ण कुटुंबाचेच नाक कापले गेले.—उत्पत्ति ३४:७, २५-३१; गलतीकर ६:७, ८.

१५, १६. आपण खरी बुद्धी कशी प्राप्त करू शकतो? ( मी वाईट सवय कशी सोडू शकतो? हा चौकोन पाहा.)

१५ दीना एका वाईट अनुभवानंतर महत्त्वाचा धडा शिकली होती. यहोवावर प्रेम करणाऱ्यांनी व त्याच्या आज्ञा पाळणाऱ्यांनी वाईट अनुभव घेऊन मग धडा शिकण्याची गरज नाही. देवाचे बोलणे ऐकल्यामुळे ते “सुज्ञांची सोबत” धरतात. (नीतिसूत्रे १३:२०क) यामुळे त्यांना ‘सर्व सन्मार्गाची जाणीव घडते’ व ते अनावश्यक त्रास व मानसिक यातना टाळतात.—नीतिसूत्रे २:६-९; स्तोत्र १:१-३.

१६ देवाकडून येणारी बुद्धी प्राप्त करण्याची उत्कट इच्छा असणाऱ्या व ती इच्छा पूर्ण करणाऱ्या सर्वांकरता ती उपलब्ध आहे. प्रार्थना, देवाच्या वचनाचा व विश्वासू व बुद्धिमान दासाकडून मिळणाऱ्या साहित्याचा अभ्यास यांद्वारे ते ही इच्छा पूर्ण करतात. (मत्तय २४:४५; याकोब १:५) आपण नम्रपणा देखील दाखवला पाहिजे. बायबलमधील सल्ला अनुसरण्याच्या आपल्या तयारीवरून आपला नम्रपणा दिसून येतो. (२ राजे २२:१८, १९) उदाहरणार्थ, आपले हृदय कपटी व धोकेदायक असू शकते, असे एक ख्रिस्ती कदाचित कबूल करेल. (यिर्मया १७:९) पण या व्यक्तीवर जेव्हा तिच्या अविचारीपणामुळे संकट ओढवते तेव्हा ती विशिष्ट, प्रेमळ सल्ला व मदत स्वीकारण्याइतपत नम्रपणा दाखवते का?

१७. एखाद्या कुटुंबात उद्‌भवणाऱ्या परिस्थितीचे वर्णन करा व पिता आपल्या मुलीशी कशा प्रकारे तर्क करू शकतो, ते सांगा.

१७ जरा कल्पना करा. एक पिता आपल्या तरुण मुलीला एका तरुण ख्रिस्ती बांधवासोबत एकटे जाऊ देणार नाही. मुलगी म्हणेल: “पण पप्पा तुम्हाला माझ्यावर भरवसा नाही का? आम्ही चुकीचं काही करणार नाही!” त्या मुलीचे यहोवावर प्रेम असेल आणि कदाचित तिचे हेतूही चांगले असतील पण ती ‘सुज्ञतेने चालत’ आहे असे आपण म्हणू शकतो का? ती ‘जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढत’ आहे का? की, “आपल्या मनावर भरवसा” ठेवून ती मूर्खपणे वागत आहे? (नीतिसूत्रे २८:२६) याबाबतीत या पित्याला व मुलीला मदत करतील अशा आणखी काही बायबल तत्त्वांचा तुम्ही विचार करू शकता.—पाहा नीतिसूत्रे २२:३; मत्तय ६:१३; २६:४१.

योसेफाने जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढला

१८, १९. योसेफासमोर कोणता मोहपाश होता व तो त्याने कसा टाळला?

१८ दीनाचा सावत्र भाऊ योसेफ सज्जन होता. त्याचे देवावर प्रेम होते आणि त्याने जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढला होता. (उत्पत्ति ३०:२०-२४) आपल्या बहिणीच्या चुकीच्या निर्णयाचे परिणाम त्याने स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहिले होते. या सर्व आठवणी त्याच्या मनात ताज्या असल्यामुळे आणि देवाच्या प्रेमात टिकून राहण्याची त्याची स्वतःची देखील इच्छा असल्यामुळे, अनेक वर्षांनंतर ईजिप्तमध्ये दास असताना त्याच्यासमोर आलेल्या मोहपाशापासून तो सुरक्षित राहिला. त्याच्या धन्याची बायको त्याला भुलवण्याचा “रोज रोज” प्रयत्न करत होती. योसेफाला त्याच्या धन्याने ईजिप्तमध्ये एक दास म्हणून आणले होते. आणि दासांना त्यांच्या मनास येईल तेव्हा धन्याची चाकरी सोडण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे योसेफाला त्याच्यासमोर दररोज येणाऱ्या या परीक्षेला अतिशय सुज्ञपणे व धैर्याने तोंड द्यावे लागले. तो पोटीफरच्या बायकोला सतत नकार देत राहिला आणि शेवटी तर त्याने तेथून पळच काढला.—उत्पत्ति ३९:७-१२.

१९ विचार करा: योसेफ जर पोटीफरच्या बायकोचे स्वप्न पाहत राहिला असता किंवा सतत सेक्सचा विचार करत राहिला असता तर तो आपली एकनिष्ठा टिकवून ठेवू शकला असता का? मुळीच नाही. आपल्या मनात पापी विचार घोळण्याऐवजी योसेफाने यहोवाबरोबरच्या त्याच्या नातेसंबंधाला जास्त महत्त्व दिले. पोटीफरच्या बायकोला तो जे म्हणाला त्यावरून हे कळते. तो म्हणाला होता: “तुम्ही त्यांची पत्नी केवळ म्हणून तुमच्याखेरीज त्यांनी [धन्याने] माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही, असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू?”—उत्पत्ति ३९:८, ९.

२०. यहोवाने योसेफाच्या जीवनातील घटनांना कसे वळण दिले?

२० आपल्या कुटुंबापासून दूर असलेल्या व दररोज आपली एकनिष्ठा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असलेल्या तरुण योसेफाला पाहून यहोवाला किती आनंद झाला असेल याची कल्पना करा. (नीतिसूत्रे २७:११) नंतर यहोवाने घटनांना असे वळण दिले ज्यामुळे योसेफाची फक्त तुरुंगातूनच सुटका झाली नाही तर त्याला ईजिप्तचा महामंत्री व अन्नधान्याचा मुख्याधिकारी बनवण्यात आले! (उत्पत्ति ४१:३९-४९) स्तोत्र ९७:१० मधील शब्द किती खरे आहेत: “अहो परमेश्वरावर प्रीति करणाऱ्यांनो, वाइटाचा द्वेष करा; तो आपल्या भक्तांच्या जीवाचे रक्षण करितो तो त्यांस दुर्जनाच्या हातांतून सोडवितो.”

२१. आफ्रिकी देशातील एका बांधवाने कशा प्रकारे नैतिक धैर्य दाखवले?

२१ तसेच आजही यहोवाचे अनेक सेवक, त्यांना ‘वाइटाचा द्वेष आहे व बऱ्याची आवड आहे,’ हे आपल्या कार्यातून दाखवतात. (आमोस ५:१५) आफ्रिकी देशातील एक तरुण बांधव आठवून सांगतो की एकदा त्याच्या वर्गातील एका मुलीने अगदी निर्लज्जपणे त्याला म्हटले होते, की गणिताच्या परीक्षेच्या वेळी तू मला मदत केलीस तर मी तुला माझ्याशी संबंध ठेवू देईन. त्याने पुढे म्हटले: “मी लगेच तिचा प्रस्ताव नाकारला. एकनिष्ठ राहून, मी सोन्या-चांदीपेक्षा मौल्यवान असलेली माझी प्रतिष्ठा व आत्मसन्मान टिकवून ठेवू शकलो.” खरेच, पापामुळे “क्षणिक सुख” मिळते, पण या हलक्या प्रतीच्या आनंदानंतर पुष्कळ यातना होतात. (इब्री लोकांस ११:२५) शिवाय, यहोवाच्या आज्ञांचे पालन केल्यामुळे मिळणाऱ्या चिरकालिक आनंदापुढे हे क्षणिक सुख अगदी फिके पडते.—नीतिसूत्रे १०:२२.

दयाळू देवाची मदत घ्या

२२, २३. (क) एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीच्या हातून गंभीर पाप घडले असेल तर सुधारणा करण्याचे तिच्यापुढील सर्वच मार्ग बंद होतात का? (ख) पापी व्यक्तीला मदत करण्याकरता यहोवाने कोणती योजना केली आहे?

२२ अपरिपूर्ण असल्यामुळे आपण सर्वजण, आपल्या वासनांवर काबू मिळवण्याचा तसेच देवाच्या नजरेत जे बरोबर आहे ते करण्याचा कसोशीने प्रयत्न करत असतो. (रोमकर ७:२१-२५) आपण “केवळ माती आहो” हे यहोवाला देखील माहीत आहे. (स्तोत्र १०३:१४) परंतु कधीकधी एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीच्या हातून एखादे गंभीर पाप घडते. अशा वेळी सुधारणा करण्याचे तिच्यापुढील सर्वच मार्ग बंद होतात का? नाही. राजा दाविदाप्रमाणे कदाचित तिला तिच्या चुकीच्या गोष्टीचे फळ भोगावे लागेल. पण जे पश्‍चात्ताप करतात व ‘आपली पातके कबूल’ करतात अशांना ‘क्षमा’ करण्यास यहोवा सदैव तयार असतो.—स्तोत्र ८६:५; याकोब ५:१६; नीतिसूत्रे २८:१३.

२३ तसेच, देवाने ख्रिस्ती मंडळीत “मानवरूपी देणग्या” दिल्या आहेत अर्थात आध्यात्मिक अर्थाने प्रौढ, अनुभवी व मदत करण्यास तयार असलेल्या वडिलांची प्रेमळ योजना केली आहे. (इफिसकर ४:८ NW, १२; याकोब ५:१४, १५) पाप करणाऱ्याला देवाबरोबर त्याचा बिघडलेला नातेसंबंध पुन्हा जोडण्यास मदत करणे आणि शलमोनाने म्हटल्याप्रमाणे या पापी व्यक्तीला, त्याने परत एकदा तेच पाप करू नये म्हणून तिला ‘ज्ञान मिळवण्यास’ मदत करणे हा या वडिलांचा हेतू असतो.—नीतिसूत्रे १५:३२.

‘ज्ञान मिळवणे’

२४, २५. (क) नीतिसूत्रे ७:६-२३ मध्ये वर्णन केलेल्या तरुणाने ‘बुद्धीहीन’ असल्याचे कसे दाखवून दिले? (ख) आपण कशा प्रकारे ‘ज्ञान मिळवू’ शकतो?

२४ बायबल आपल्याला, ‘बुद्धीहीन’ आणि ‘ज्ञान मिळवू पाहणाऱ्या’ अशा दोन प्रकारच्या लोकांविषयी सांगते. (नीतिसूत्रे ७:७) आध्यात्मिक अर्थाने प्रौढ नसल्यामुळे व देवाच्या सेवेत जास्त अनुभव नसल्यामुळे जे ‘बुद्धीहीन’ आहेत त्यांच्याजवळ कदाचित समंजसपणा किंवा समजबुद्धी नसेल. नीतिसूत्रे ७:६-२३ मध्ये वर्णन केलेल्या तरुणाप्रमाणे त्यांच्या हातून अगदी सहजरीत्या गंभीर पाप घडू शकते. परंतु, ‘ज्ञान मिळवू पाहणारे,’ देवाच्या वचनाचा नियमित व प्रार्थनापूर्वक अभ्यास करून आपल्या आंतरिक मनुष्याचे परीक्षण करतात. आपल्या अपरिपूर्ण अवस्थेतही ते होता होईल तितके आपले विचार, आपल्या इच्छा, आपल्या भावना, आपली ध्येये देवाच्या विचारांच्या सुसंगतेत आणण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे ते “आपल्या जिवावर प्रेम” करतात म्हणजे देवाचा अनुग्रह प्राप्त करतात. यामुळे त्यांचे “कल्याण” होते.—नीतिसूत्रे १९:८.

२५ स्वतःला विचारा: ‘देवाचे स्तर बरोबर आहेत अशी माझी पूर्ण खात्री पटली आहे का? या स्तरांनुसार मी जगलो तर मला खूप आनंद मिळेल, असा माझा ठाम विश्वास आहे का?’ (स्तोत्र १९:७-१०; यशया ४८:१७, १८) तुमच्या मनात जराही शंका आली तर लगेच तिचे निरसन करा. देवाचे नियम तोडल्यावर होणाऱ्या परिणामांचा विचार करा. तसेच, सत्यानुसार जगण्याद्वारे व सत्य, न्याय्य, शुद्ध, प्रशंसनीय व सद्‌गुणी गोष्टींनी आपले मन भरण्याद्वारे यहोवा “किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा.” (स्तोत्र ३४:८; फिलिप्पैकर ४:८, ९) या गोष्टी तुम्ही जितक्या अधिक करण्याचा प्रयत्न कराल, देवावर जितके जास्त प्रेम कराल तितकेच देवाला आवडत असलेल्या गोष्टी तुम्हालाही आवडू लागतील आणि त्याला वीट असलेल्या गोष्टींचा तुम्हालाही वीट वाटेल. योसेफ हा काही सुपरमॅन नव्हता. तरीपण तो ‘जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढू शकला’ कारण अनेक वर्षांपासून त्याने यहोवाला त्याला घडवू दिले होते आणि त्याच्या मनात यहोवाला संतुष्ट करण्याची इच्छा होती. तुम्हीही योसेफासारखेच बना.—यशया ६४:८.

२६. पुढील अध्यायात कोणत्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली जाईल?

२६ देवाने आपल्याला दिलेले जननेंद्रिये खेळण्याकरता नव्हे तर संतती उत्पन्न करण्याकरता व वैवाहिक जीवनात आनंद मिळण्याकरता दिले आहेत. (नीतिसूत्रे ५:१८) पुढील दोन अध्यायात आपण विवाहाविषयी देवाचा काय दृष्टिकोन आहे त्याची चर्चा करणार आहोत.

^ परि. 4 गणना पुस्तकात दिलेल्या संख्येत, न्यायाधीशांनी व थेट यहोवाने ज्यांचा संहार केला त्या लोकांत ‘लोकांच्या सर्व प्रमुखांचा’ समावेश होतो. यांची संख्या १,००० पर्यंत गेली असावी.—गणना २५:४, ५.

^ परि. 7 अशुद्धता व कामातुरपणा या शब्दांचा अर्थ काय होतो त्याची चर्चा यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या टेहळणी बुरूज ऑक्टोबर १, २००९ यांतील “वाचकांचे प्रश्न” यात करण्यात आली आहे ती पाहा.

^ परि. 9 येथे वापरण्यात आलेल्या “पोर्नोग्राफी” या शब्दात, चित्ररूपात व लेखी स्वरूपात किंवा लैंगिक इच्छा चाळवण्याकरता असलेल्या आवाजाच्या स्वरूपातील अश्लील गोष्टींचा समावेश होतो. पोर्नोग्राफीत एखाद्या व्यक्तीच्या कामुक चित्रापासून ते दोन किंवा अधिक व्यक्तींमधील अत्यंत घृणास्पद प्रकारच्या लैंगिक कृत्यांचे वर्णन अथवा चित्रणापर्यंत काहीही असू शकते.

^ परि. 9 हस्तमैथुनाच्या सवयीवर विजय मिळवा परिशिष्टमधील या लेखात, हस्तमैथुन या विषयाची चर्चा करण्यात आली आहे.