व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय ११

“लग्न सर्वस्वी आदरणीय असावे”

“लग्न सर्वस्वी आदरणीय असावे”

“तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट” राहा.—नीतिसूत्रे ५:१८.

१, २. आपण कोणत्या प्रश्‍नावर चर्चा करणार आहोत व का?

तुम्ही विवाहित आहात का? असल्यास, तुमचे वैवाहिक जीवन सुखी आहे का, की तुमच्यात गंभीर वैवाहिक समस्या आहेत? तुम्हा दोघांमध्ये दरी निर्माण झाली आहे का? फक्त लग्न झाल्यामुळे तुम्ही एकत्र राहात आहात पण तुमचे वैवाहिक जीवन निरस झाले आहे का? सुरुवातीला तुमच्या नातेसंबंधात असलेला तो प्रेमळ ओलावा आता नाहीसा झाल्यामुळे तुम्ही कदाचित दुःखी असाल. ख्रिस्ती असल्यामुळे तुम्हाला आपल्या विवाहाद्वारे, तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्या यहोवा देवाचे गौरव करण्याची इच्छा असेल. म्हणून, तुमच्या सध्याच्या परिस्थितीमुळे तुम्हाला चिंता व दुःख वाटत असेल. पण, तुमच्या जीवनात काहीच आशा उरली नाही, असा लगेचच विचार करू नका.

आज अशी अनेक ख्रिस्ती जोडपी आहेत ज्यांचे वैवाहिक जीवन एकेकाळी अतिशय खडतर बनले होते. त्यांना विवाहात अडकून पडल्यासारखे वाटते होते, ते आनंदी नव्हते. पण आपले विवाहबंधन मजबूत करण्याचा मार्ग त्यांना सापडला. तुम्हालाही तुमच्या वैवाहिक जीवनात समाधान मिळू शकते. ते कसे?

देव आणि आपला जोडीदार यांच्याजवळ येणे

३, ४. विवाह जोडीदारांनी देवाच्या जवळ येण्याचा प्रयत्न केल्यास ते एकमेकांच्या जवळ कसे काय येतील? उदाहरण देऊन सांगा.

तुम्ही व तुमच्या विवाह जोडीदाराने देवाजवळ येण्याचा मनापासून प्रयत्न केल्यास, तुम्ही दोघेही एकमेकांच्या जवळ येऊ शकता. का? एक उदाहरण पाहा: एका डोंगराचा विचार करा जो शंकूच्या आकाराचा आहे. हा डोंगर पायथ्याशी रुंद व वर निमुळता आहे. डोंगराच्या पायथ्याशी एका बाजूला एक पुरुष उभा आहे आणि अगदी विरुद्ध बाजूला एक स्त्री उभी आहे. दोघेही डोंगर चढू लागतात. दोघे जेव्हा डोंगराच्या पायथ्याशी असतात तेव्हा त्यांच्यातील अंतर जास्त असते. पण जसजसे ते तो निमुळता डोंगर चढू लागतात तसतसे त्यांच्यातील अंतर कमी होत जाते. या उदाहरणातून तुम्हाला काही दिलासा मिळतो का?

यहोवाची सेवा करण्याचा तुम्ही करत असलेल्या मनापासूनच्या प्रयत्नांची तुलना, एखादा डोंगर चढताना तुम्हाला कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांशी करता येईल. तुमचे यहोवावर प्रेम असल्यामुळे तुम्ही नाहीतरी, प्रयत्नांची पराकाष्ठा करतच आहात. पण, तुम्ही जर एकमेकांपासून दुरावला असाल तर तुम्ही जणू विरुद्ध बाजूने डोंगर चढण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही डोंगर चढतच राहता तेव्हा काय होते? सुरुवातीला तुमच्या दोघांत पुष्कळ अंतर असेल. पण, जसजसा तुम्ही डोंगर चढत राहता अर्थात यहोवा देवाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत राहता तसतसे तुम्हा दोघा पतीपत्नीतील अंतर कमी-कमी होत जाते. होय, एकमेकांच्या जवळ येण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दोघांनीही देवाच्या जवळ येणे. पण देवाच्या जवळ येण्याचा नेमका काय अर्थ होतो?

बायबलच्या ज्ञानात सामर्थ्य आहे, या ज्ञानाचा अवलंब केल्यास तुमचे वैवाहिक बंधन मजबूत होऊ शकते

५. (क) यहोवाच्या आणि आपल्या विवाह जोडीदाराच्या जवळ येण्याचा एक मार्ग कोणता आहे? (ख) विवाहाबद्दल यहोवाचा दृष्टिकोन काय आहे?

देवाच्या जवळ येण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे तुम्ही व तुमच्या जोडीदाराने देवाच्या वचनात विवाहाबद्दल असलेल्या सल्ल्याचे पालन करणे. (स्तोत्र २५:४; यशया ४८:१७, १८) प्रेषित पौलाने दिलेल्या एका विशिष्ट सल्ल्याकडे आता लक्ष द्या. त्याने म्हटले: “लग्न सर्वस्वी आदरणीय असावे.” (इब्री लोकांस १३:४) काय अर्थ होतो या वचनाचा? या वचनात वापरण्यात आलेल्या “आदरणीय” या शब्दावरून, एखादी गोष्ट पवित्र व मौल्यवान आहे हे सूचित होते. विवाहाबद्दल यहोवाचा अगदी हाच दृष्टिकोन आहे. विवाहाला तो पवित्र व मौल्यवान समजतो.

तुमची प्रेरणा—यहोवावरील तुमचे गाढ प्रेम

६. विवाहाविषयी पौलाने दिलेल्या सल्ल्याच्या मागच्या पुढच्या संदर्भावरून काय कळते व ही गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे का आहे?

यहोवाचे सेवक असल्यामुळे, लग्न मौल्यवान व पवित्र आहे हे तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आधीपासूनच माहीत आहे. स्वतः यहोवानेच विवाह व्यवस्थेची स्थापना केली आहे. (मत्तय १९:४-६) परंतु, तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या असतील तर विवाह आदरणीय आहे फक्त ही गोष्ट माहीत असणेच एकमेकांशी प्रेमाने व आदराने वागण्यास तुम्हाला प्रेरित करण्याकरता पुरेशी नाही. मग आणखी कशाची गरज आहे? इब्री लोकांस १३:४ या वचनाच्या मागच्या पुढच्या वचनांचे जर आपण बारकाईने परीक्षण केले तर आपल्याला दिसून येईल, की पौल इब्रीकरांना विवाहाविषयी सल्ला देत होता. (इब्री लोकांस १३:१-५) विवाहाविषयी तो ढोबळ मत मांडत नव्हता तर सल्ला देत होता. ही गोष्ट तुम्ही जर लक्षात ठेवली तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला पुन्हा एकदा मौल्यवान समजण्याची प्रेरणा मिळू शकेल. का बरे?

७. (क) आपण बायबलमधील कोणत्या आज्ञांचे पालन करतो व का? (ख) आज्ञाधारकता दाखवल्याने कोणते चांगले परिणाम मिळतात?

बायबलमध्ये असलेल्या इतर आज्ञांबद्दल जसे की, शिष्य बनवण्याच्या आज्ञेबद्दल किंवा मग उपासनेकरता एकत्र जमण्याच्या आज्ञेबद्दल तुमचा काय दृष्टिकोन आहे यावर आता विचार करा. (मत्तय २८:१९; इब्री लोकांस १०:२४, २५) हे कबूल आहे, की कधीकधी या आज्ञांचे पालन करणे कठीण असू शकते. तुम्ही ज्या लोकांना प्रचार करता ते कदाचित तुमचा संदेश ऐकणार नाहीत किंवा तुमच्या नोकरीमुळे तुम्ही इतके गळून जात असाल की ख्रिस्ती सभांना हजर राहायला तुम्हाला कठीण वाटत असेल. तरीपण तुम्ही विश्वासूपणे राज्य संदेशाचा प्रचार करीत राहता व ख्रिस्ती सभांना उपस्थित राहता. असे करण्यापासून कोणीही, अगदी सैतानसुद्धा तुम्हाला थांबवू शकत नाही. का नाही? यहोवावर तुमचे मनापासून प्रेम असल्यामुळे तुम्ही त्याच्या आज्ञांचे पालन करता. (१ योहान ५:३) यामुळे काय होते? प्रचार कार्यात भाग घेतल्याने व सभांना हजर राहिल्याने तुम्हाला मानसिक शांती व आनंद मिळतो कारण तुम्हाला माहीत आहे, की तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करीत आहात. या समाधानामुळे तुम्ही नव्या जोमाने कार्य करीत राहता. (नहेम्या ८:१०) यावरून आपण काय धडा शिकतो?

८, ९. (क) कोणती गोष्ट आपल्याला, लग्न आदरणीय ठेवण्याची प्रेरणा देईल व का? (ख) आपण कोणत्या दोन मुद्द्‌यांची पुढे चर्चा करणार आहोत?

देवावरील प्रेम तुम्हाला प्रचार करण्याच्या व अडचणी असूनही उपासनेसाठी एकत्र जमण्याच्या आज्ञेचे पालन करण्याची प्रेरणा देते. तेच प्रेम तुम्हाला “लग्न सर्वस्वी आदरणीय” ठेवण्याच्या बायबलमधील आज्ञेचे पालन करणे कितीही कठीण वाटत असले, तरी तसे करण्यास प्रवृत्त करते. (इब्री लोकांस १३:४; स्तोत्र १८:२९; उपदेशक ५:४) यासोबतच, प्रचार कार्यात भाग घेण्याकरता व सभांना हजर राहण्याकरता तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांमुळे तुम्हाला जसे देवाचे समृद्ध आशीर्वाद मिळतात तसेच आपले लग्न आदरणीय ठेवण्याकरता तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांची यहोवा दखल घेईल व तुमच्या प्रयत्नांवर त्याचे आशीर्वाद असतील.—१ थेस्सलनीकाकर १:३; इब्री लोकांस ६:१०.

पण तुम्ही तुमचा विवाह आदरणीय कसा करू शकता? यासाठी तुम्हाला वैवाहिक जीवनास हानीकारक असलेले सर्व प्रकारचे वर्तन टाळावे लागेल. आणि यासोबतच तुम्हाला तुमचे वैवाहिक बंधन मजबूत करण्याकरता काही पावले उचलावी लागतील.

विवाहाचा अनादर करणारे बोलणे व वर्तन टाळा

१०, ११. (क) कोणत्या प्रकारच्या वर्तनामुळे विवाहाचा अनादर होतो? (ख) आपण आपल्या जोडीदाराला कोणता प्रश्न विचारला पाहिजे?

१० एका ख्रिस्ती पत्नीने काही काळाआधी असे म्हटले: “मी यहोवाला, मला सहनशक्ती देण्याची प्रार्थना करते.” सहनशक्ती कशासाठी? ती भगिनी म्हणते: “माझा नवरा मला घालून-पाडून बोलतो. त्याचं बोलणं फटके मारण्यासारखं आहे. माझ्या शरीरावर कदाचित तुम्हाला कोणतेही व्रण दिसणार नाहीत, पण ‘तू माझ्या गळ्यात बांधलेली धोंड आहेस,’ ‘तू काहीच कामाची नाहीस,’ या त्याच्या धारदार बोलण्यानं माझं अंतःकरण ओरबडून निघालं आहे.” या पत्नीने एका अतिशय गंभीर समस्येचा उल्लेख केला आहे. विवाह जोडीदारांमध्ये होत असलेल्या अपमानकारक बोलण्याचा तिने उल्लेख केला आहे.

११ दुःखाची गोष्ट म्हणजे, काही ख्रिस्ती पतीपत्नी एकमेकांवर ताशेरे ओढतात. यामुळे ते मानसिकरीत्या घायाळ होतात. त्यांच्या मनावर झालेल्या जखमा सहजासहजी भरून येणाऱ्या नसतात. जर पतीपत्नी एकमेकांना खोचकपणे बोलत असतील तर त्यांचा विवाह निश्‍चित्तच आदरणीय म्हणता येणार नाही. तुमचा विवाह याबाबतीत कसा आहे, हे शोधून काढण्याचा एक मार्ग आहे. तुम्ही आपल्या जोडीदाराला नम्रपणे विचारू शकता: “माझं बोलणं कसं वाटतं?” काही वेळा तुमच्या बोलण्यामुळे तुमच्या जोडीदाराला खरोखरच वाईट वाटले होते असे जर तुमच्या जोडीदाराने तुम्हाला सांगितले तर तुम्ही याबाबतीत सुधारणा करण्यास तयार असले पाहिजे.—गलतीकर ५:१५; इफिसकर ४:३१.

१२. एखाद्याची उपासना कशामुळे व्यर्थ ठरू शकते?

१२ तुमच्या बोलण्याचा यहोवाबरोबर असलेल्या तुमच्या नातेसंबंधावर प्रभाव पडतो, ही गोष्ट तुम्ही नीट लक्षात ठेवली पाहिजे. बायबलमध्ये म्हटले आहे: “आपण धर्माचरण करणारे आहो, असे कोणाला वाटत असेल व तो आपल्या जिभेला आळा घालीत नसेल, आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे.” (याकोब १:२६) तुमचे बोलणे आणि तुमची उपासना यांत अगदी जवळचा संबंध आहे. एखादी व्यक्ती देवाची सेवा करत असेल पण मग ती घरात कशीही वागली तरी चालेल, या गोष्टीचे बायबल मुळीच समर्थन करत नाही. स्वतःला फसवू नका. ही खरोखरच एक गंभीर गोष्ट आहे. (१ पेत्र ३:७) तुमच्याकडे अनेक कौशल्ये असतील, तुम्ही देवाच्या सेवेत खूप आवेशी असाल पण तुम्ही जर मुद्दामहून तुमच्या जोडीदाराला खोचक बोलण्याने घायाळ करत असाल तर तुम्ही विवाह व्यवस्थेचा अनादर करत असता आणि यामुळे देवाच्या नजरेत तुमची उपासना व्यर्थ ठरू शकते.

१३. पती किंवा पत्नी आपल्या जोडीदाराचे मन कदाचित कशा प्रकारे दुखावेल?

१३ विवाह सोबत्यांनी एकमेकांना अप्रत्यक्ष मार्गांनी देखील मानसिक दुःख न देण्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे. पुढे दिलेल्या दोन उदाहरणांचा विचार करा: एक एकटी आई, मंडळीतील एका लग्न झालेल्या ख्रिस्ती बांधवाला एखाद्या गोष्टीबद्दलचे मार्गदर्शन विचारण्याकरता सारखी फोन करत असेल व ते दोघे फोनवर खूप वेळपर्यंत बोलत असतील. दुसरे उदाहरण, एक अविवाहित ख्रिस्ती बांधव एका विवाहित ख्रिस्ती बहिणीबरोबर दर आठवडी क्षेत्र सेवेत बराच वेळ घालवत असेल. या दोन्ही उदाहरणातील विवाहित व्यक्तींचे हेतू कदाचित चांगले असतील, पण, त्यांच्या वागण्याचा त्यांच्या जोडीदारांवर कोणता परिणाम होत असेल? अशा परिस्थितीत असलेल्या एका पत्नीने म्हटले: “माझा नवरा माझ्यापेक्षा मंडळीतील दुसऱ्या बहिणीबरोबर इतका वेळ घालवतो, तिची काळजी घेतो हे पाहून मला खूप वाईट वाटतं. माझ्या नवऱ्याला माझी काहीच किंमत नाही, असं मला वाटतं.”

१४. (क) उत्पत्ति २:२४ मध्ये कोणत्या एका वैवाहिक कर्तव्यावर जोर देण्यात आला आहे? (ख) आपण स्वतःला काय विचारले पाहिजे?

१४ या जोडीदाराला किंवा विवाहात अशाच परिस्थितीचा सामना करणाऱ्या इतरांना वाईट वाटेल, हे समजण्याजोगे आहे. “पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील,” या विवाहासाठी देवाने दिलेल्या मूलभूत सूचनेकडे हे विवाह जोडीदार दुर्लक्ष करतात. (उत्पत्ति २:२४) लग्नानंतरही पतीपत्नी आपल्या आईवडिलांचा आदर करतात. परंतु, लग्नानंतर आता त्यांनी आपल्या जोडीदाराचा आधी विचार केला पाहिजे, ही देवाची व्यवस्था आहे. तसेच, ख्रिस्ती जोडपे लग्नानंतरही आपल्या ख्रिस्ती भाऊबहिणींवर प्रेम करतात. परंतु, लग्नानंतर त्यांनी आपल्या जोडीदाराकडे आधी लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे, लग्न झालेला पती अथवा पत्नी, इतर बहिणीबरोबर अथवा बांधवाबरोबर जास्त वेळ घालवत असेल तर त्यांच्या या वागण्यामुळे त्यांच्या वैवाहिक बंधनावर ताण येऊ शकतो. तुमच्या दोघांतील नातेसंबंध तणावपूर्ण बनण्याचे हे एक कारण तर नसावे? स्वतःला विचारा: ‘मी माझ्या जोडीदाराचा हक्काचा वेळ त्याला देतो का, त्याची काळजी घेतो का, त्याच्यावर प्रेम करतो का?’

१५. मत्तय ५:२८ नुसार, विवाहित ख्रिस्ती बांधवाने अथवा बहिणीने विरुद्ध लिंगी व्यक्तीबरोबर जास्त घसट का वाढवू नये?

१५ शिवाय, आपला जोडीदार नसलेल्या विरुद्ध लिंगी व्यक्तीकडे अनुचित लक्ष देणारे विवाहित ख्रिस्ती स्वतःला धोक्यात आणतात. दुःखाची गोष्ट म्हणजे, काही विवाहित ख्रिस्ती भावांच्या व बहिणींच्या मनात, त्यांची ज्यांच्याबरोबर जास्त घसट होती अशा व्यक्तींबद्दल प्रणय भावना निर्माण झाल्या आहेत. (मत्तय ५:२८) त्यांच्यात निर्माण झालेल्या या भावनिक बंधनामुळे त्यांच्या हातून विवाहाचे अनादर करणारे वर्तन घडले आहे. याविषयी प्रेषित पौलाने पुढे काय म्हटले ते पाहा.

“अंथरूण निर्दोष असावे”

१६. विवाहाच्या बाबतीत पौल कोणती आज्ञा देतो?

१६ “लग्न सर्वस्वी आदरणीय असावे,” हा सल्ला दिल्यानंतर लगेचच पौलाने पुढे एक ताकीद दिली. तो म्हणाला: “अंथरूण निर्दोष असावे; जारकर्मी व व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील.” (इब्री लोकांस १३:४) पौलाने येथे, पतीपत्नीतील लैंगिक संबंध सूचित करण्यासाठी “अंथरूण” हा शब्द वापरला. फक्त विवाहाच्या चाकोरीत अनुभवलेले हे संबंध “निर्दोष” किंवा नैतिकरीत्या शुद्ध ठरतात. म्हणूनच ख्रिस्ती, “तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट” राहा, या देवाने दिलेल्या सल्ल्याचे पालन करतात.—नीतिसूत्रे ५:१८.

१७. (क) व्यभिचाराविषयी जगाच्या दृष्टिकोनाचा ख्रिश्चन स्वतःवर कोणताही परिणाम का होऊ देत नाहीत? (ख) आज आपण ईयोबाचा कित्ता कसा गिरवू शकतो?

१७ आपल्या जोडीदाराव्यतिरिक्त इतर कोणाबरोबरही लैंगिक संबंध ठेवणारे, देवाच्या नैतिक नियमांचा घोर अनादर करतात. आज मात्र व्यभिचार खपवून घेतला जातो. पण, व्यभिचाराविषयी इतर लोकांच्या दृष्टिकोनाचा ख्रिश्चनांच्या मनावर कोणताही परिणाम होता कामा नये. कारण त्यांना माहीत आहे, की शेवटी, मनुष्य नव्हे तर “देव” “जारकर्मी व व्यभिचारी ह्यांचा न्याय . . . करील.” (इब्री लोकांस १०:३१; १२:२९) म्हणूनच, खरे ख्रिस्ती या विषयावर असलेला यहोवाचा दृष्टिकोन स्वीकारतात. (रोमकर १२:९) कुलपिता ईयोब याने काय म्हटले होते ते आठवा: “मी तर आपल्या डोळ्यांशी करार केला आहे.” (ईयोब ३१:१) व्यभिचाराकडे नेणाऱ्या मार्गावरील पहिले पाऊल टाकण्याचे टाळण्याकरता खरे ख्रिस्ती आपल्या डोळ्यांवर नियंत्रण ठेवतात व आपला विवाह जोडीदार नसलेल्या विरुद्ध लिंगी व्यक्तीकडे ते वाईट नजरेने कधीही पाहत राहत नाहीत.—घटस्फोट आणि विभक्ती याविषयी बायबलचा दृष्टिकोन, परिशिष्टातील हा लेख पाहा.

१८. (क) यहोवाच्या नजरेत व्यभिचार हा किती गंभीर गुन्हा होता? (ख) व्यभिचार व मूर्तिपूजा यांत कोणती साम्यता आहे?

१८ यहोवाच्या नजरेत व्यभिचार हा किती गंभीर गुन्हा होता? याबाबतीत यहोवाच्या काय भावना होत्या हे आपल्याला मोशेला दिलेल्या नियमशास्त्रातील नियमांवरून समजून येते. इस्राएलमध्ये, व्यभिचार व मूर्तिपूजा अशा पापांमध्ये गणण्यात आले होते ज्याच्यासाठी मृत्यूदंड दिला जायचा. (लेवीय २०:२, १०) व्यभिचार व मूर्तिपूजा यांतील साम्यता तुम्हाला समजली का? एखाद्या इस्राएली व्यक्तीने जर मूर्तीची उपासना केली तर यहोवासोबत त्याने केलेला करार मोडला जायचा. तसेच, एखाद्या इस्राएली व्यक्तीने जर व्यभिचार केला तर त्याने आपल्या जोडीदाराबरोबर केलेला करार मोडला जायचा. कारण दोघांचेही वागणे कपटी होते. (निर्गम १९:५, ६; अनुवाद ५:९; मलाखी २:१४) यास्तव दोघेही, विश्वासू व भरवसालायक असलेल्या यहोवाच्या नजरेत शिक्षेस पात्र होते.—स्तोत्र ३३:४.

१९. व्यभिचार टाळण्याचा दृढनिश्चय कशामुळे आणखी पक्का होऊ शकतो व का?

१९ पण आज तर ख्रिश्चनांना मोशेला दिलेल्या नियमांचे पालन करावे लागत नाही. तरीपण, प्राचीन इस्राएलमध्ये व्यभिचार एक गंभीर पाप होते ही गोष्ट लक्षात ठेवल्यामुळे, विवाहित ख्रिश्चन हे गंभीर पाप न करण्याचा आपला दृढनिश्चय आणखी पक्का करू शकतात. का? पुढील गोष्टीचा विचार करा: तुम्ही एखाद्या मूर्तीसमोर गुडघे टेकून तिला नमन कराल का? “मुळीच नाही!” अशी तुमची प्रतिक्रिया असेल. पण तुम्हाला जर कोणी खूप पैसे दिलेत तर तुम्ही तसे करायला तयार व्हाल का? “शक्यच नाही,” असे तुम्ही म्हणाल. होय, मूर्तीची उपासना करून यहोवाचा विश्वासघात करण्याचा विचारसुद्धा खऱ्या ख्रिश्चनांना किळसवाणा वाटतो. तसेच, व्यभिचाराचा मोह कितीही आकर्षक असला तरी, आपल्या देवाचा आणि जोडीदाराचा विश्वासघात करण्याचा विचारसुद्धा ख्रिश्चनांना अगदी घृणास्पद वाटला पाहिजे. (स्तोत्र ५१:१, ४; कलस्सैकर ३:५) सैतान ज्यामुळे खूष होईल पण यहोवाचा व वैवाहिक व्यवस्थेचा घोर अनादर होईल असे कोणतेही कृत्य आपण करणार नाही.

आपले वैवाहिक बंधन मजबूत करणे

२०. काही विवाहांची स्थिती कशी झाली आहे? उदाहरण देऊन सांगा.

२० विवाहाचा अनादर करणारे वर्तन टाळण्याव्यतिरिक्त तुम्ही आणखी काय करू शकता ज्यामुळे तुमच्या जोडीदाराबद्दलचा तुमचा आदर पुन्हा जागृत होऊ शकेल? या प्रश्‍नाच्या उत्तरासाठी, विवाह व्यवस्था ही एका घरासारखी आहे अशी कल्पना करा. विवाह सोबत्यांचे दयाळू शब्द, विचारी वर्तन, विवाहाचा आदर करणाऱ्या इतर गोष्टी या, घराचे सौंदर्य वाढवणाऱ्या शोभिवंत वसतुंप्रमाणे असतात. तुम्ही जर एकमेकांच्या जवळ आलात तर तुमचा विवाह, रंगरंगोटी केलेल्या एका अशा घरासारखा दिसेल जे आपुलकी व प्रेम या गुणांमुळे शोभिवंत दिसते. तुमच्यात आपुलकी, प्रेम नाहीसे झाले तर त्या शोभिवंत वस्तू हळूहळू नाहीशा होतील. यामुळे तुमचा विवाह, कसलीच शोभा नसलेल्या घरासारखा फिका किंवा निस्तेज बनेल. लग्न सर्वस्वी आदरणीय असावे,या देवाच्या आज्ञेचे पालन करण्याची तुमची इच्छा असल्यामुळे वैवाहिक जीवनात सुधारणा करण्यास तुम्ही प्रेरित व्हाल. आणि, मौल्यवान व पवित्र असलेली गोष्ट सुधारलीच पाहिजे, नाही का? हे तुम्ही कसे करू शकाल? “सुज्ञानाच्या योगे घर बांधिता येते; समंजसपणाने ते मजबूत राहते; ज्ञानाच्या योगे त्याच्या खोल्या सर्व प्रकारच्या मोलवान व मनोरम वसतूंनी भरून जातात,” असे देवाच्या वचनात म्हटले आहे. (नीतिसूत्रे २४:३, ४) या वचनांतील शब्दांचा वैवाहिक जीवनात कशा प्रकारे अवलंब करता येईल त्यावर विचार करा.

२१. आपण आपला विवाह हळूहळू मजबूत कसा करू शकतो? ( माझा विवाह मी कसा सुधारू शकतो? हा चौकोन पाहा.)

२१ खरे प्रेम, देवाबद्दलचे भय आणि भक्कम विश्वास हे गुण, एका आनंदी घरातील ‘मोलवान वसतूंपैकी’ आहेत. (नीतिसूत्रे १५:१६, १७; १ पेत्र १:७) या गुणांमुळे विवाह मजबूत होतो. पण, वरील नीतिसूत्रात उल्लेखण्यात आलेल्या मोलवान वसतूंच्या खोल्या कशाने भरलेल्या आहेत? त्या “ज्ञानाच्या योगे” भरलेल्या आहेत. होय, बायबलच्या ज्ञानात सामर्थ्य आहे. या ज्ञानाचा आपल्या जीवनात अवलंब केल्यास, लोकांच्या विचारसरणीत परिवर्तन घडू शकते व पतीपत्नीच्या मनात एकमेकांबद्दल पुन्हा प्रेम जागृत होऊ शकते. (रोमकर १२:२; फिलिप्पैकर १:९) त्यामुळे, जेव्हा तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकत्र बसून, बायबलमधील एखादा उतारा जसे की दैनिक वचन अथवा टेहळणी बुरूज नियतकालिकांतील व इतर प्रकाशनांतील विवाहाच्या संबंधाने आलेला लेख वाचता तेव्हा तुम्ही जणू काय तुमचे घर सुशोभित करणारी एक सुंदर वस्तू न्याहाळत असता. यहोवाबद्दलचे प्रेम तुम्हाला, तुम्ही नुकतेच परीक्षण केलेल्या सल्ल्याचे तुमच्या वैवाहिक जीवनात पालन करण्यास प्रवृत्त करते तेव्हा जणू काय, तुम्ही त्या शोभेच्या वस्तू आपल्या ‘खोल्यांमध्ये’ आणता. यामुळे, तुमच्या वैवाहिक जीवनात तुम्हाला पहिल्यासारख्या आपुलकीचा व प्रेमाचा पुन्हा प्रत्यय येईल.

२२. विवाह मजबूत करण्याकरता आपण आपल्या परीने प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला कोणते समाधान मिळते?

२२ शोभिवंत वसतुंप्रमाणे असलेले गुण पुन्हा जागच्या जागी लावण्यास वेळ लागेल, बरेच प्रयत्न लागतील. पण, तुम्ही जर तुमच्या परीने प्रयत्न केलेत तर, “प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना,” या बायबलमधील आज्ञेचे तुम्ही पालन करत आहात याचे समाधान तुम्हाला मिळेल. (रोमकर १२:१०; स्तोत्र १४७:११) आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लग्न आदरणीय ठेवण्यासाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांमुळे तुम्ही देवाच्या प्रेमात टिकून राहाल.