व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय १२

“उन्नतीकरिता जे चांगले” ते बोला

“उन्नतीकरिता जे चांगले” ते बोला

“तुमच्या मुखातून कसलेच कुजके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नतीकरिता जे चांगले तेच मात्र निघो.”—इफिसकर ४:२९.

१-३. (क) यहोवाने आपल्या सर्वांना कोणती देणगी दिली आहे व तिचा दुरुपयोग आपण कसा करू शकतो? (ख) देवाच्या प्रेमात टिकून राहायचे असेल तर आपण आपल्या बोलण्याच्या देणगीचा उचित वापर कसा केला पाहिजे?

समजा तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला एक भेटवस्तू देता, जसे की एखादी गाडी. पण नंतर तुम्हाला समजते, की ती अगदी बेफिकीरपणे ती गाडी चालवत आहे, लोकांना जखमी करत आहे. हे ऐकून तुम्हाला कसे वाटेल?

समंजसपणे बोलण्याची क्षमता ही, “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान” देणाऱ्या यहोवाकडून आपल्याला मिळालेली एक देणगी आहे. (याकोब १:१७) प्राण्यांना ही देणगी मिळालेली नाही. आपल्याला मिळाली असल्यामुळे आपण इतरांना फक्त आपले विचारच नव्हे तर आपल्या भावना देखील व्यक्त करू शकतो. पण, जसे एक वाहन बेफिकीरपणे चालवले जाऊ शकते तसेच या देणगीचा देखील दुरूपयोग केला जाऊ शकतो. इतरांना दुःख होईल, त्यांना वाईट वाटेल अशा पद्धतीने जेव्हा आपण बोलतो तेव्हा यहोवाला किती वाईट वाटत असावे.

देवाच्या प्रेमात टिकून राहायचे असेल तर आपण, देवाने आपल्याला बोलण्याची क्षमता ज्या उद्देशाने दिली होती तिचा योग्य वापर केला पाहिजे. कोणत्या प्रकारच्या बोलण्याने यहोवा संतुष्ट होतो हे त्याने आपल्याला स्पष्टपणे सांगितलेले आहे. त्याच्या वचनात असे म्हटले आहे: “तुमच्या मुखातून कसलेच कुजके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नतीकरिता जे चांगले तेच मात्र निघो, ह्यासाठी की, तेणेकडून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे.” (इफिसकर ४:२९) आपण आपल्या जीभेवर ताबा का ठेवला पाहिजे, कोणत्या प्रकारचे बोलणे टाळले पाहिजे व “उन्नतीकरिता जे चांगले” आहे ते आपण कसे बोलू शकतो, या तीन गोष्टींची आपण चर्चा करूया.

आपण आपल्या जीभेवर ताबा का ठेवला पाहिजे

४, ५. शब्दांमध्ये सामर्थ्य असते हे बायबलमधील काही नीतिसूत्रांतून कसे दिसून येते?

आपण आपल्या जीभेवर ताबा ठेवण्याचे पहिले महत्त्वाचे कारण म्हणजे, शब्दांमध्ये सामर्थ्य असते. नीतिसूत्रे १५:४ मध्ये म्हटले आहे: “जिव्हेची सौम्यता जीवनाचा वृक्ष आहे. पण तिची कुटीलता अंतःकरण विदारिते.” * कोमेजलेल्या झाडाला पाणी घातल्यावर जसे ते पुन्हा टवटवीत होते तसेच सौम्य बोलण्यामुळे ऐकणाऱ्यांना उत्तेजन मिळू शकते. पण तेच खोचक बोलण्यामुळे लोक निरुत्साहित होऊ शकतात. होय, आपल्या शब्दांत एखाद्याला जखमी करण्याची किंवा त्याला उभारी देण्याची शक्ती आहे.—नीतिसूत्रे १८:२१.

शब्दांमध्ये असलेल्या सामर्थ्याचे स्पष्ट वर्णन करताना आणखी एका नीतिसूत्रात असे म्हटले आहे: “कोणी असा असतो की तरवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करितो.” (नीतिसूत्रे १२:१८) मागचा पुढचा विचार न करता बोलल्यामुळे मनावर ओरखडे उठू शकतात, नातेसंबंध बिघडू शकतात. तलवारीचे जसे वार केले जातात तसे कधी कोणी तुमच्यावर शब्दांचे वार केले आहेत का? त्याच नीतिसूत्रात पुढे असे उत्तेजनदायक शब्द आहेत: “सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे.” देवाकडून आलेल्या बुद्धीनुसार विचार करून बोलणाऱ्या व्यक्तीच्या शब्दांमुळे, घायाळ हृदयाची जखम भरून निघू शकते व नातेसंबंध सुधारू शकतात. एखाद्याच्या दयाळू शब्दांमुळे तुम्हाला कधी दिलासा मिळाला आहे का? (नीतिसूत्रे १६:२४) आपल्या शब्दांत सामर्थ्य आहे हे ओळखून आपण नक्कीच, इतर जण जखमी होतील अशा रीतीने नव्हे तर इतरांना उत्तेजन मिळेल अशा रीतीने आपल्या जीभेचा वापर करूया.

सौम्यपणे बोलल्याने तजेला मिळतो

६. जीभेवर ताबा ठेवणे खरोखरच कठीण का आहे?

पण, आपण कितीही प्रयत्न केला तरी, आपल्या जीभेवर पूर्ण ताबा ठेवण्यात कधी न कधी उणे पडतोच. म्हणून, जीभेवर ताबा ठेवण्याचे दुसरे कारण आपण आठवणीत ठेवले पाहिजे: पाप आणि अपरिपूर्णता यामुळे कधीकधी आपण आपल्या जीभेचा दुरुपयोग करतो. शब्द हे आपल्या अंतःकरणातून बाहेर येतात व “मानवाच्या मनांतल्या [अंतःकरणातल्या] कल्पना . . . दुष्ट असतात.” (उत्पत्ति ८:२१; लूक ६:४५) त्यामुळे जीभेवर ताबा ठेवणे वाटते तितके सोपे नाही. (याकोब ३:२-४) आपल्या जीभेवर आपण पूर्ण ताबा ठेवू शकत नसलो तरी, जीभेचा उपयोग करण्याच्या बाबतीत आपण निदान सुधारणा तरी करू शकतो. प्रवाहाच्या विरुद्ध पोहणाऱ्याला जशी उलट दिशेने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध झुंज द्यावी लागते तसेच जीभेचा गैरवापर करण्याच्या आपल्या पापी प्रवृत्तीविरुद्ध आपल्याला सतत लढावे लागेल.

७, ८. आपल्या बोलण्यामुळे यहोवा आपल्याला कितपत जबाबदार धरतो?

जीभेवर ताबा ठेवण्याचे तिसरे कारण म्हणजे, आपल्या बोलण्याचा आपल्याला यहोवाला हिशेब द्यावा लागणार आहे. आपल्या शब्दांचा, सहमानवांबरोबरच्या आपल्या नातेसंबंधावर परिणाम होतोच, शिवाय यहोवासोबत असलेल्या नातेसंबंधावर देखील होतो. याकोब १:२६ मध्ये म्हटले आहे: “आपण धर्माचरण करणारे आहो, असे कोणाला वाटत असेल व तो आपल्या जिभेला आळा घालीत नसेल, आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे.” * आपण आधीच्या अध्यायात पाहिले होते, की आपले बोलणे आणि आपली उपासना यांत अगदी जवळचा संबंध आहे. आपला जीभेवर ताबा नसेल, ती अपायकारक, विषारी गोष्टी उगाळत असेल तर देवाच्या नजरेत आपली सर्व ख्रिस्ती कार्ये व्यर्थ ठरतील. हे विधान खरेच विचार करायला लावणारे आहे, नाही का?—याकोब ३:८-१०.

जीभेवर ताबा ठेवण्यासाठी आपल्याजवळ अगदी ठोस कारणे आहेत, हे अगदी स्पष्ट झाले आहे. उत्तेजनदायक बोलण्याच्या हितकारक प्रकारांची चर्चा करण्याआधी आपण, कोणत्या प्रकारच्या बोलण्याला खऱ्या ख्रिश्चनांच्या जीवनात थारा नाही, त्याची चर्चा करूया.

विनाशकारक बोलणे

९, १०. (क) आज लोकांची दररोजची भाषा कशी आहे? (ख) आपण अश्लील भाषा का टाळली पाहिजे? (तळटीप पाहा.)

अश्लील भाषा. शिव्या-शाप देणे, निंदात्मक बोलणे व इतर प्रकारची अश्लील भाषा आज लोकांची दररोजची भाषा बनली आहे. अनेक जण, बोलताना इतरांवर आपली छाप पाडण्यासाठी अपशब्द वापरतात किंवा कोठे काय बोलायचे हे त्यांना कळत नाही. विनोद करणारे नट लोकांना हसवण्यासाठी दुहेरी अर्थाचे चावट विनोद करतात. परंतु अश्लील भाषा ही हसण्यावारी नेण्याजोगी गोष्ट नाही. सुमारे २,००० वर्षांपूर्वी प्रेषित पौलाने देवाच्या प्रेरणेने कलस्सै मंडळीला, “आपल्या मुखातून अमंगळ बोलणे . . . आपणापासून दूर करा,” असा सल्ला दिला. (कलस्सैकर ३:८, पं.र.भा.) इफिस मंडळीला पौलाने सांगितले, की ‘टवाळीचा’ उल्लेख अशा गोष्टींमध्ये करण्यात आला आहे ज्यांचा खऱ्या ख्रिश्चनांनी ‘उच्चारही’ करू नये.—इफिसकर ५:३, ४.

१० अश्लील किंवा गलिच्छ बोलण्याचा यहोवाला तिटकारा वाटतो. जे यहोवावर प्रेम करतात त्यांनाही अशा प्रकारच्या बोलण्याची घृणा वाटते. यहोवावर आपण प्रेम करतो म्हणूनच आपल्याला अशा प्रकारच्या गलिच्छ भाषेचा तिटकारा वाटतो. ‘देहाच्या कर्मांविषयी’ सांगताना पौलाने ‘अशुद्धपणाचा’ उल्लेख केला, ज्यात बोलण्यातील अशुद्धपणाचा समावेश होतो. (गलतीकर ५:१९-२१) ही एक गंभीर गोष्ट आहे. ख्रिस्ती मंडळीतला कोणी, वारंवार सल्ला मिळूनही अशा प्रकारे अश्लील, गलिच्छ व अशुद्ध भाषा उद्दामपणे वापरत असेल व दुसऱ्यांनाही तसे करण्यास उत्तेजन देत असेल तर त्याला मंडळीतून बहिष्कृत केले जाऊ शकते. *

११, १२. (क) गप्पागोष्टी करण्याचा काय अर्थ होतो व आपल्या गप्पा हानीकारक केव्हा बनू शकतात? (ख) यहोवाची उपासना करणाऱ्यांनी चहाडी का करू नये?

११ हानीकारक गप्पागोष्टी, चहाडी. गप्पागोष्टी करताना आपण कधीकधी, लोकांविषयी, त्यांच्या जीवनाविषयी फुटकळ गप्पा मारू शकतो. पण मग सर्वच प्रकारच्या गप्पा हानीकारक असतात का? नाही. आपण जर चांगल्या मनाने, एकमेकांशी एखाद्या विषयावर काही बोलत असू, एखादी फायदेकारक गोष्ट सांगत असू, जसे की, अमूक एकाचा बाप्तिस्मा झाला किंवा त्याला/तिला उत्तेजनाची गरज आहे वगैरे तर अशा गप्पा हानीकारक नसतात. पहिल्या शतकातील ख्रिश्चनांनी एकमेकांबद्दल खरी काळजी व्यक्त केली आणि सहबांधवांविषयी चांगल्या गोष्टी एकमेकांना सांगितल्या. (इफिसकर ६:२१, २२; कलस्सैकर ४:८, ९) परंतु, आपल्या गप्पा तेव्हा हानीकारक ठरतात जेव्हा आपण खऱ्या गोष्टी तिखट-मीठ लावून सांगतो किंवा मग एखाद्याच्या खासगी जीवनाविषयी बोलू लागतो. आणि अशा गप्पांमध्ये चहाडी केली जाते तेव्हा ती गंभीर बाब बनते. या गप्पा खरोखरच हानीकारक असतात. चहाडीचा अर्थ, “एखाद्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवणारे खोटे आरोप लावणे,” असा होतो. उदाहरणार्थ, परुशांनी मनात दुष्ट हेतू बाळगून येशूला बदनाम करण्यासाठी त्याच्याविषयी खोट्या गोष्टी पसरवल्या. (मत्तय ९:३२-३४; १२:२२-२४) आणि चहाडीमुळे सहसा वाद होतात.—नीतिसूत्रे २६:२०.

१२ इतरांना बदनाम करण्यासाठी किंवा फूटी पाडण्यासाठी आपल्या बोलण्याच्या क्षमतेचा गैरवापर करणाऱ्या लोकांकडे यहोवा दुर्लक्ष करत नाही. ‘भावाभावांत वैमनस्य उत्पन्न करणाऱ्या मनुष्याचा’ तो द्वेष करतो. (नीतिसूत्रे ६:१६-१९) “चहाडखोर” असे ज्याचे भाषांतर करण्यात आले आहे तो ग्रीक शब्द आहे डायबोलोस. हा शब्द सैतानासाठीसुद्धा लागू करण्यात आला आहे. तो “दियाबल” आहे, जो दुष्ट हेतूने देवाची चहाडी करतो. (प्रकटीकरण १२:९, १०) दियाबलासारखे न बनण्यासाठी आपण अशा सर्व प्रकारचे बोलणे टाळले पाहिजे. ख्रिस्ती मंडळीमध्ये चहाडी मुळीच खपवून घेतली जात नाही. कारण यामुळे “तट, फुटी,” यांसारखी देहाची कर्मे घडतात. (गलतीकर ५:१९-२१) त्यामुळे, कोणाविषयी काहीही सांगण्याआधी स्वतःला विचारा: ‘मी जे सांगणार आहे, ते खरे आहे का? हे दयाळुपणाचे कार्य ठरेल का? मी ही माहिती इतरांना सांगण्याची खरच गरज आहे का?’—१ थेस्सलनीकाकर ४:११.

१३, १४. (क) निंदात्मकरीतीने बोलणाऱ्यांचा इतरांवर काय परिणाम होऊ शकतो? (ख) अपमानकारक बोलणे म्हणजे नेमके काय व ज्या व्यक्तीला अशा प्रकारची भाषा वापरण्याची सवय असते ती स्वतःला कोणत्या धोक्यात घालत असते?

१३ निंदा. आधी आपण हे पाहिले होते, की शब्दांमध्ये शक्ती असते. कधीकधी, अपरिपूर्णतेमुळे आपण असे काही बोलून जातो ज्याचा नंतर आपल्याला पस्तावा होतो. परंतु, बायबलमध्ये अशा प्रकारच्या बोलण्याचा उल्लेख केला आहे जे ख्रिस्ती कुटुंबात किंवा मंडळीत मुळीच खपवून घेतले जात नाही. पौलाने ख्रिश्चनांना असा सल्ला दिला: “सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही, अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येवोत.” (इफिसकर ४:३१) इतर अनुवादांमध्ये, “निंदा” या शब्दासाठी “टोचून बोलणे,” “हानीकारक भाषा” व “अपमानजनक भाषा” हे शब्द वापरण्यात आले आहेत. निंदा करण्यामध्ये, एखाद्याला अपमानकारक नावे ठेवणे, त्याची अगदी कठोर, सतत टीका करणे यांचाही समावेश होतो. यामुळे, एखाद्याची प्रतिष्ठा हिरावली जाऊ शकते व त्याला आपण कुचकामी आहोत असे वाटू शकते. अशा निंदात्मक बोलण्यामुळे विशेषतः मुलांच्या कोवळ्या व भरवसा करणाऱ्या मनांचा चुराडा होऊ शकतो.—कलस्सैकर ३:२१.

१४ एखाद्याचा पाणउतारा करण्यासाठी, त्याच्याशी अपमानकारकपणे किंवा निंदात्मकपणे बोलण्याच्या सवयीचा बायबल अगदी कडक शब्दांत निषेध करते. अशा प्रकारची निंदात्मक भाषा वापरणारी व्यक्ती स्वतःला धोक्यात घालत असते. तिला सुधारण्याकरता वडीलजन करत असलेल्या वारंवार प्रयत्नांकडे जर तिने दुर्लक्ष केले तर तिला मंडळीतून बहिष्कृत केले जाऊ शकते. तिने जर आपले बोलणे सुधारलेच नाही तर नव्या जगात जगण्याचा आशीर्वादही ती गमावून बसू शकते. (१ करिंथकर ५:११-१३; ६:९, १०) यावरून अगदी स्पष्ट होते, की आपली जर गलिच्छ, असत्य किंवा निर्दयी पद्धतीने बोलण्याची सवय असेल तर आपल्याला देवाच्या प्रेमात टिकून राहता येणार नाही. कारण, अशा प्रकारचे बोलणे विनाशकारी आहे.

“उन्नतीकरिता जे चांगले” ते बोला

१५ बोलण्याच्या क्षमतेची देणगी आपल्याला ज्याने ज्या हेतूने दिली आहे त्यानुसार आपण तिचा उपयोग कसा करू शकतो? देवाच्या वचनात आपल्याला, “गरजेप्रमाणे उन्नतीकरिता जे चांगले तेच मात्र” बोलण्यास आर्जवण्यात आले आहे, हे आठवा. (इफिसकर ४:२९) आपण आपल्या बोलण्याचा, इतरांची उन्नती करण्याकरता, त्यांना प्रोत्साहन व बळकटी देण्याकरता जेव्हा उपयोग करतो तेव्हा यहोवाला खूप आनंद होतो. पण असे उत्तेजनदायक शब्द बोलण्यासाठी आपण आधी विचार केला पाहिजे. बायबल आपल्याला, आपण कोणत्या प्रकारे बोलले पाहिजे यासंबंधाने विशिष्ट नियम देत नाही किंवा ‘सद्‌भाषण’ यांत कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो त्याची यादी देत नाही. (तीत २:८, सुबोध भाषांतर.) “उन्नतीकरिता जे चांगले” ते बोलण्याकरता आपण, तीन सोप्या परंतु अगदी महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ज्या उभारणीकारक असतात: या गोष्टी हितकारक, सत्य व दयाळू असतात. या गोष्टी लक्षात ठेवून आपण, उन्नतीकारक बोलण्याच्या तीन विशिष्ट उदाहरणांचा विचार करूया.—“ माझं बोलणं उन्नतीकारक आहे का?” हा चौकोन पाहा.

१६, १७. (क) आपण इतरांची प्रशंसा का केली पाहिजे? (ख) मंडळीमध्ये व कुटुंबामध्ये प्रशंसा करण्याच्या आपल्यासमोर कोणत्या संधी आहेत?

१६ प्रामाणिक प्रशंसा. यहोवा आणि येशू या दोघांनीही, प्रशंसेचे व कौतुकाचे बोलणे किती महत्त्वाचे आहे हे जाणले. (मत्तय ३:१७; २५:१९-२३; योहान १:४७) ख्रिस्ती असल्यामुळे आपणही इतरांची प्रामाणिक मनाने प्रशंसा करतो. का? कारण “समयोचित बोल किती उत्तम” आहे, असे नीतिसूत्रे १५:२३ मध्ये म्हटले आहे. स्वतःला विचारा: ‘माझी जेव्हा कोणी प्रामाणिक प्रशंसा करतो तेव्हा मला कसे वाटते? यामुळे मला उत्तेजन मिळते, माझ्यात समाधानाची भावना जागृत होत नाही का?’ प्रशंसेमुळे आपल्याला जाणवते, की कोणाचे तरी आपल्याकडे लक्ष आहे, कोणाला तरी आपली काळजी आहे व तुम्ही केलेले प्रयत्न खरोखरच योग्य आहेत. या खात्रीमुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि भविष्यात आणखी आवेशाने काम करण्याची तुम्हाला प्रेरणा मिळते. तुमची प्रशंसा केल्यावर तुम्हाला कृतज्ञ वाटते तर मग तुम्हीही इतरांची प्रशंसा करण्याचा मनःपूर्वक प्रयत्न का करू नये?—मत्तय ७:१२.

१७ इतरांचे चांगले गुण पाहण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा आणि मग तसे त्यांना बोलून दाखवा. मंडळीतील एखाद्या सभेत तुम्ही एखादे सुरेख भाषण ऐकता, एखाद्या तरुण व्यक्तीला आध्यात्मिक प्रगती करताना पाहता किंवा वाढते वय असूनही सभांना विश्वासूपणे येणाऱ्या एखाद्या वृद्ध बांधवाला अथवा बहिणीला पाहता. अशा बांधवांची किंवा बहिणींची तुम्ही प्रामाणिक मनाने प्रशंसा करता तेव्हा त्यांना खूप आनंद होतो व यहोवाची सेवा करण्याचा त्यांचा निश्चय आणखी मजबूत होतो. कुटुंबात, पतीपत्नीने एकमेकांची प्रेमळपणे प्रशंसा व कौतुक केले पाहिजे. (नीतिसूत्रे ३१:१०, २८) मुलांचे जेव्हा आपण भरभरून कौतुक करतो तेव्हा, कोणाचे तरी आपल्याकडे लक्ष आहे या जाणीवेने त्यांची जोमाने वाढ होते. एखाद्या झाडाला जोमाने वाढण्याकरता जशी सूर्यप्रकाशाची व पाण्याची गरज असते तशीच मुलांच्याही वाढीला प्रशंसा व कौतुकाची आवश्यकता असते. पालकांनी आपल्या मुलांमधील कौतुकास्पद गुणांची व प्रयत्नांची स्तुती करण्यासाठी संधी शोधली पाहिजे. मुलांची स्तुती केल्याने त्यांचे धैर्य व त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना जे बरोबर आहे ते करण्याची आणखी प्रेरणा मिळते.

१८, १९. बंधूभगिनींचे सांत्वन करण्यासाठी व त्यांना दिलासा देण्यासाठी आपण होता होईल तितके प्रयत्न का केले पाहिजे व आपण हे कसे करू शकतो?

१८ सांत्वन व दिलासा. ‘नम्र जनांविषयी’ व “अनुतापी” अर्थात दुःखी जनांविषयी यहोवाला खूप काळजी आहे. (यशया ५७:१५) त्याच्या वचनात आपल्याला, “एकमेकांचे सांत्वन करा” व “अशक्तांना आधार द्या,” असे आर्जवण्यात आले आहे. (१ थेस्सलनीकाकर ५:११, १४) दुःखामुळे त्रस्त झालेल्या बंधूभगिनींना सांत्वन व दिलासा देण्याकरता आपण करत असलेल्या प्रयत्नांची यहोवा देव दखल घेतो व आनंदित होतो, ही खातरी आपण बाळगू शकतो.

इतरांची उन्नती होईल या पद्धतीने जेव्हा आपण बोलतो तेव्हा यहोवाला आनंद वाटतो

१९ पण, निरुत्साहित किंवा खिन्न झालेल्या बंधूभगिनींची उन्नती व्हावी म्हणून तुम्ही त्यांच्याशी काय बोलू शकता? तुम्हाला त्यांची समस्या सोडवता आली पाहिजे, असा विचार करू नका. बहुतेक वेळा, त्यांच्याशी फक्त बोलणेच काय ते पुरेसे असते. त्यांच्याबद्दल तुम्हाला काळजी व चिंता आहे हे त्यांना बोलून दाखवा. त्यांच्यासोबत प्रार्थना केल्यास त्यांना आवडेल का, असे विचारा. प्रार्थनेत, पीडित व्यक्तीबद्दल इतरांना व यहोवाला किती काळजी आहे हे समजायला त्यांना मदत मिळो अशी यहोवाला विनंती करा. (याकोब ५:१४, १५) मंडळीत तुम्हाला त्यांची गरज आहे, सर्वांचे त्यांच्यावर प्रेम आहे याची त्यांना पुन्हा पुन्हा खात्री करून द्या. (१ करिंथकर १२:१२-२६) व्यक्ती या नात्याने यहोवाला त्यांची खरोखर काळजी वाटते याची खात्री पटवून देण्यासाठी त्यांना बायबलमधून एखादे उत्तेजनकारक वचन वाचून दाखवा. (स्तोत्र ३४:१८; मत्तय १०:२९-३१) निरुत्साहित झालेल्या व्यक्तीबरोबर मनापासून “गोड शब्द” बोलण्यासाठी पुरेसा वेळ दिल्याने तिला, बंधूभगिनींचे आपल्यावर प्रेम आहे, त्यांना आपली कदर आहे, हे नक्कीच दिसून येईल.—नीतिसूत्रे १२:२५.

२०, २१. कोणकोणत्या कारणांमुळे सल्ला प्रभावी ठरतो?

२० प्रभावकारी सल्ला. अपरिपूर्ण असल्यामुळे आपल्या सर्वांनाच अधूनमधून सल्ल्याची गरज असते. बायबल आपल्याला असे उत्तेजन देते: “सुबोध ऐक व शिक्षण स्वीकार, म्हणजे आपल्या उरलेल्या आयुष्यांत तू सुज्ञपणे वागशील.” (नीतिसूत्रे १९:२०) पण फक्त वडीलच सल्ला देतात असे नाही. तर पालकही आपल्या मुलांना सल्ला देतात. (इफिसकर ६:४) प्रौढ ख्रिस्ती भगिनी तरुण भगिनींना सल्ला देऊ शकतात. (तीत २:३-५) बंधूभगिनींवरील आपल्या प्रेमामुळे आपण त्यांना सल्ला देतो व ज्याला सल्ला दिला जातो त्याने तो वाईट न वाटता स्वीकारला पाहिजे. हा सल्ला आपण कसा देऊ शकतो? तीन कारणांमुळे आपला सल्ला प्रभावकारी ठरू शकतो: सल्ला देणाऱ्याची मनोवृत्ती व हेतू, सल्ला देण्याचा आधार आणि सल्ला देण्याची पद्धत.

२१ प्रभावी सल्लागारच प्रभावकारी सल्ला देऊ शकतो. स्वतःला विचारा: ‘मी सल्ला केव्हा स्वीकारतो?’ सल्ला देणाऱ्याला तुमची काळजी वाटते, तो चिडल्यामुळे किंवा मनात काही हेतू बाळगून सल्ला देत नाही, हे जेव्हा तुम्हाला जाणवते तेव्हा तुम्ही त्याने दिलेला सल्ला सहजासहजी स्वीकारता. त्यामुळे तुम्ही जेव्हा इतरांना सल्ला देता तेव्हा, तुमची देखील अशीच मनोवृत्ती व हेतू असला पाहिजे, नाही का? प्रभावी सल्ला देवाच्या वचनावरही आधारित असतो. (२ तीमथ्य ३:१६) तुम्ही थेट बायबल उघडून एखादे वचन वाचून दाखवत असला किंवा फक्त तोंडी ते वचन सांगत असला तरी, तुम्ही जे काही बोलाल ते बायबलवर आधारित असले पाहिजे. म्हणून वडील जन, स्वतःची मते इतरांवर न थोपवण्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगतात. तसेच ते शास्त्रवचनांचा हवा तसा उपयोग करून असे भासवण्याचा प्रयत्न करत नाहीत की बायबल त्यांच्या बोलण्याला पुष्टी देत आहे. योग्य पद्धतीने दिलेला सल्ला प्रभावी ठरतो. मिठाने रुचकर केल्यासारखा दयाळुपणे दिलेला सल्ला सहजासहजी स्वीकारला जातो आणि ज्याला तो मिळतो त्याला अपमानजनक वाटत नाही.—कलस्सैकर ४:६.

२२. बोलण्याच्या क्षमतेच्या देणगीचा उपयोग कसा करण्याचे तुम्ही ठरवले आहे?

२२ बोलण्याची क्षमता खरोखरच देवाकडून मिळालेली एक अमूल्य देणगी आहे. यहोवावर आपले प्रेम असेल तर आपण या देणगीचा गैरवापर करणार नाही. आपल्या बोलण्याचा इतरांवर प्रभाव पडतो, त्यांची एकतर उन्नती किंवा हानी होऊ शकते, हे आपण लक्षात ठेवू या. देवाने आपल्याही ही देणगी “उन्नतीकरिता” वापरायला दिली आहे. तेव्हा याच उद्देशास्तव आपण या देणगीचा उपयोग करूया. अशा प्रकारे मग आपल्या बोलण्यामुळे इतरांना प्रोत्साहन मिळेल आणि आपल्याला देवाच्या प्रेमात टिकून राहता येईल.

^ परि. 4 नीतिसूत्रे १५:४ येथे ज्याचे भाषांतर “कुटिलता” असे करण्यात आले आहे त्या हिब्रू शब्दाचा अर्थ, “वाकडा, दुष्ट” असाही होऊ शकतो.

^ परि. 7 “व्यर्थ” असे भाषांतर करण्यात आलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ, “निष्फळ” व “निरर्थक” असाही होतो.—१ करिंथकर १५:१७.

^ परि. 10 शास्त्रवचनांत वापरण्यात आलेला “अशुद्धपणा” हा शब्द अनेक पापांना सूचित करतो. सर्व प्रकारच्या अशुद्धपणासाठी न्यायिक कारवाईची आवश्यकता नसली तरीसुद्धा, एखादी व्यक्ती जर घोर अशुद्धपणा आचरत असेल तर तिला मंडळीतून बहिष्कृत केले जाऊ शकते.—२ करिंथकर १२:२१; इफिसकर ४:१९; टेहळणी बुरूज ऑक्टोबर १, २००९ मधील “वाचकांचे प्रश्न” लेख पाहा.