व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय १३

देवाला नाखूष करणारे सण

देवाला नाखूष करणारे सण

“प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा.”—इफिसकर ५:१०.

१. यहोवा कोणत्या लोकांना स्वतःकडे आकर्षित करतो व देवाला काय संतोषकारक आहे याबाबतीत त्यांनी सतत जागरूक का राहिले पाहिजे?

“खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करितील अशी वेळ येत आहे; किंबहुना आलीच आहे; कारण आपले उपासक असे असावे अशीच पित्याची इच्छा आहे,” असे येशूने म्हटले. (योहान ४:२३) यहोवाने जसे तुम्हाला शोधून काढले आहे तसेच तो आणखी इतरांना शोधून स्वतःकडे व आपल्या पुत्राकडे आकर्षित करतो. (योहान ६:४४) ही किती सन्मानाची गोष्ट आहे! पण, बायबल सत्याची आवड बाळगणाऱ्यांनी ‘प्रभूला काय संतोषकारक आहे हे सतत पारखून घेत’ राहिले पाहिजे कारण लोकांना फसवण्यात सैतान वस्ताद आहे.—इफिसकर ५:१०; प्रकटीकरण १२:९.

२. खऱ्या उपासनेत खोट्या उपासनेची भेसळ करणाऱ्यांबद्दल यहोवाचा काय दृष्टिकोन आहे ते समजावून सांगा.

सीनाय पर्वताजवळ इस्राएली लोकांनी अहरोनाला त्यांच्यासाठी एक देव बनवण्यास सांगितले तेव्हा काय झाले त्यावर थोडा विचार करा. अहरोनाने या लोकांच्या म्हणण्याचा विरोध केला नाही. त्याने निमूटपणे एक सोन्याचे वासरू बनवले आणि म्हटले, की हे वासरू यहोवाला सूचित करते व “उद्या परमेश्वराप्रीत्यर्थ उत्सव करावयाचा” आहे. खऱ्या उपासनेत होणाऱ्या या खोट्या उपासनेची भेसळ पाहून यहोवा शांत राहिला का? नाही. त्याने ३,००० हजार मूर्तिपूजकांचा संहार केला. (निर्गम ३२:१-६, १०, २८) या अहवालावरून आपण काय शिकतो? जर आपण देवाच्या प्रेमात टिकून राहू इच्छित असू तर आपण कोणत्याही ‘अशुद्ध वस्तूला शिवू नये’ आणि खऱ्या उपासनेत कोणत्याही प्रकारच्या खोट्या उपासनेची भेसळ न करण्याचे आपण कटाक्षाने टाळले पाहिजे.—यशया ५२:११; यहेज्केल ४४:२३; गलतीकर ५:९.

३, ४. लोकप्रिय प्रथांचे व सणावारांचे परीक्षण करताना आपण बायबल तत्त्वांचा काळजीपूर्वक विचार का केला पाहिजे?

दुःखाची गोष्ट म्हणजे, धर्मत्यागाचा कडाडून विरोध करणाऱ्या प्रेषितांच्या मृत्यूनंतर, सत्यावर प्रेम नसणाऱ्या तथाकथित ख्रिश्चनांनी मूर्तिपूजक लोकांतून घेतलेल्या त्यांच्या चालीरीती, सणवार व पवित्र दिवस ख्रिस्ती सणांच्या नावाखाली पाळण्यास सुरुवात केली. (२ थेस्सलनीकाकर २:७, १०) त्यांपैकी काही सणांची येथे चर्चा करण्यात आली आहे. हे सण देवाची नव्हे तर जगाची मनोवृत्ती कशी प्रदर्शित करतात ते पाहा. सहसा, जगात साजरा केल्या जाणाऱ्या सणांत एक समान गोष्ट दिसून येते: हे सण आकर्षक वाटतात आणि ते ‘मोठ्या बाबेलीचे’ ओळखचिन्ह असलेल्या खोट्या धार्मिक विश्वासांचे व भूतविघेचे समर्थन करतात. * (प्रकटीकरण १८:२-४, २३) आपण आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती ही, की अनेक लोकप्रिय प्रथांची सुरुवात मूर्तिपूजक धार्मिक रिवाजातून झाली आहे हे स्वतः यहोवाने पाहिले आहे. त्यामुळे आजही त्याला हे सणवार किळसवाणे वाटतात. मग, जर यहोवाच्या नजरेत ही गोष्ट इतकी महत्त्वाची आहे तर आपल्याला देखील महत्त्वाची वाटली पाहिजे, नाही का?—२ योहान ६, ७.

आपण खरे ख्रिस्ती असल्यामुळे आपल्याला माहीत आहे, की काही विशिष्ट सण यहोवाला नाखूष करतात. यांपैकी कुठल्याही सणांमध्ये आपण भाग घेणार नाही असा ठाम निश्चय आपण केला पाहिजे. यहोवा का नाखूष होतो त्या कारणांची उजळणी केल्यास, देवाच्या प्रेमात टिकून राहण्याच्या आड येऊ शकणाऱ्या सर्व गोष्टी टाळण्याचा आपला दृढनिश्चय आणखी मजबूत होऊ शकेल.

सूर्याच्या उपासनेपासून सुरू झालेला नाताळ सण

५. येशूचा जन्म डिसेंबर २५ रोजी झाला नव्हता हे आपण ठामपणे कसे सांगू शकतो?

बायबलमध्ये येशूचा वाढदिवस साजरा केल्याचा उल्लेख आढळत नाही. खरे तर, त्याच्या जन्माची नेमकी तारीख कोणालाही माहीत नाही. आपण एवढे मात्र सांगू शकतो, की त्याचा जन्म जगाच्या त्या भागातील बोचऱ्या थंडीत, डिसेंबर २५ रोजी तर नक्कीच झाला नव्हता. * कारण, बायबलचा एक लेखक लूक याने असे लिहिले, की येशूचा जन्म झाला तेव्हा “मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते.” (लूक २:८-११) मेंढपाळ संपूर्ण वर्षभर रानातच राहात असतील तर “रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते” या वाक्याला काही महत्त्व राहिले नसते. पण, बेथलेहेमात हिवाळ्यात कडाक्याची थंडी व बर्फ पडत असल्यामुळे, मेंढपाळ आपले कळप घेऊन बाहेर “रानात” राहत नसत, तर आपापल्या घरात राहत असत. शिवाय, कैसर औगुस्त ह्याने नावनिशी करण्याची आज्ञा केल्यामुळे खरे तर योसेफ व मरीया बेथलेहेमाला गेले होते. (लूक २:१-७) रोमी सरकारवर खार खाऊन असलेल्या लोकांना कैसराने, या मरणाच्या थंडीत आपापल्या जन्म ठिकाणी जाऊन आपली नावनिशी लिहिण्याची आज्ञा देणे अगदीच अशक्य होते.

६, ७. (क) नाताळ सणाची सुरुवात कोठून झाली आहे? (ख) नाताळाच्या वेळी लोकांनी एकमेकांना भेटवस्तू देणे व खऱ्या ख्रिश्चनांनी एकमेकांना भेटवस्तू देणे यात कोणता फरक आहे?

नाताळ सणाचा उल्लेख बायबलमध्ये कोठेही आढळत नाही, तर त्याची सुरूवात एका प्राचीन मूर्तिपूजक सणातून झाल्याचे दिसून येते. हा सण कृषिदैवत सॅटर्न याच्या प्रीत्यर्थ साजरा केला जाणारा रोमन सॅटर्नलिया हा होता. तसेच, मिथ्रा दैवताचे भक्त त्यांच्या अंदाजानुसार, डिसेंबर २५ हा “अजिंक्य सूर्याचा जन्म दिवस” म्हणून पाळत असत, असे न्यू कॅथलिक एन्सायक्लोपिडिआमध्ये म्हटले आहे. त्यात पुढे असेही म्हटले आहे, की ख्रिस्ताच्या मृत्यूच्या सुमारे तीनशे वर्षांनंतर, जेव्हा “रोममध्ये सूर्याची उपासना मोठ्या प्रमाणावर केली जायची त्याच वेळी नाताळाची सुरुवात झाली.”

खरे ख्रिस्ती प्रेमाने प्रवृत्त होऊन देतात

हे उत्सव साजरे करताना लोक एकमेकांना विविध भेटवस्तू देऊन व मेजवान्या करून आनंदोत्सव करीत असत. हीच प्रथा नाताळ सणात टिकवून ठेवलेली आहे. पण, आजही लोक एकमेकांना भेटवस्तू देत असले तरी त्यांचे हे देणे २ करिंथकर ९:७ मधील वचनाच्या सुसंगतेत नाही. त्या वचनात म्हटले आहे, की “प्रत्येकाने आपआपल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे; दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो.” खरे ख्रिस्ती प्रेमाने प्रवृत्त होऊन देतात. शिवाय ते एका विशिष्ट दिवशीच भेटवस्तू देत नाहीत किंवा त्या भेटवस्तूच्या मोबदल्यात कशाचीही अपेक्षा करत नाहीत. (लूक १४:१२-१४; प्रेषितांची कृत्ये २०:३५) तसेच, नाताळाच्या घाईगडबडीच्या व तणावपूर्ण काळापासून आणि वर्षाच्या या वेळेला अनेकजण स्वतःवर ओढवून घेत असलेल्या कर्जाच्या त्या ओझ्यापासून त्यांची सुटका झाल्याबद्दल त्यांना आता खूप आनंद होतो.—मत्तय ११:२८-३०; योहान ८:३२.

८. ज्योतिषांनी येशूसाठी वाढदिवसानिमित्त भेटवस्तू आणल्या होत्या का? समजावून सांगा.

पण काही जण म्हणतील, की ज्योतिषांनी येशूच्या वाढदिवसानिमित्त भेटवस्तू आणल्या नव्हत्या का? नाही. त्यांनी येशूच्या वाढदिवसानिमित्त या भेटवस्तू आणल्या नव्हत्या तर, त्या काळात एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला आदराप्रीत्यर्थ भेटवस्तू देण्याची प्रथा असल्यामुळे त्यांनी त्या आणल्या होत्या. (१ राजे १०:१, २, १०, १३; मत्तय २:२, ११) आणि ते येशूचा जन्म झाला त्या रात्री आले नव्हते. ते आले तेव्हा येशू एका घरात होता आणि त्या वेळेला तो काही महिन्यांचा होता; गव्हाणीत ठेवलेला नवजात बालक नव्हता.

 

वाढदिवसांविषयी बायबल काय म्हणते

९. बायबलमध्ये उल्लेखण्यात आलेल्या वाढदिवसांच्या अहवालांत कोणती गोष्ट नोंद घेण्याजोगी आहे?

बाळाचा जन्म हा आनंदाचा प्रसंग असला तरी, बायबलमध्ये कोठेही देवाच्या सेवकांनी वाढदिवस साजरा केल्याचा उल्लेख आढळत नाही. (स्तोत्र १२७:३) मग, देवाच्या पुत्राचा वाढदिवस साजरा केल्याच्या अहवालाचा उल्लेख करायला बायबल लेखक कदाचित विसरले असावेत का? नाही. कारण, बायबलमध्ये वाढदिवस साजरे केल्याचे दोन उल्लेख आहेत. एक, इजिप्तच्या फारोचा वाढदिवस आणि दुसरा हेरोद अंतिपा याचा वाढदिवस. (उत्पत्ति ४०:२०-२२; मार्क ६:२१-२९) पण या दोन्ही घटना वाईट असल्याच्या दाखवण्यात आल्या आहेत; खासकरून दुसरी घटना, कारण या वेळेला बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा शिरच्छेद करण्यात आला होता.

१०, ११. आरंभीच्या ख्रिश्चनांचा वाढदिवस साजरा करण्याच्या प्रथेविषयी कोणता दृष्टिकोन होता व का?

१० द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिआ यात असे म्हटले आहे: “आरंभीचे ख्रिस्ती, एखाद्याचा वाढदिवस साजरा करण्याची प्रथा मूर्तिपूजक असल्याचे समजत असत.” जसे की, प्राचीन ग्रीक लोकांचा असा समज होता, की प्रत्येक व्यक्तीसाठी एक संरक्षक आत्मा असतो. त्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी तो हजर असतो आणि आयुष्यभर त्या व्यक्तीचे तो रक्षण करतो. ‘या आत्म्याचा गूढ व अलौकिक संबंध अशा एका दैवताशी असतो ज्याच्या जन्मदिवशीच या व्यक्तीचाही जन्म झालेला असतो,’ असे वाढदिवसांची परंपरा (इंग्रजी) या पुस्तकात म्हटले आहे. वाढदिवस पाळण्याच्या प्रथेचा, ज्योतिषशास्त्र आणि जन्मकुंडली यांजशी फार आधीपासून जवळचा संबंध आहे.

११ प्राचीन काळातील देवाच्या सेवकांनी, वाढदिवसाचा संबंध मूर्तिपूजा व भूतविद्या यांच्याशी असल्यामुळेच फक्त नव्हे तर, ही प्रथा पाळण्यामागे लोकांचे असलेले विश्वास यांमुळे देखील तो साजरा केला नाही. असे आपण का म्हणतो? कारण, देवाचे हे प्राचीन काळातील सेवक, इतके साधे-सुधे व नम्र होते, की जगात ज्या दिवशी ते आले तो दिवस आपण साजरा केला पाहिजे असे त्यांना मुळीच वाटले नाही. * (मीखा ६:८; लूक ९:४८) उलट, जीवनाची अमूल्य देणगी दिल्याबद्दल त्यांनी यहोवाची स्तुती केली व त्याचे आभार मानले. *स्तोत्र ८:३, ४; ३६:९; प्रकटीकरण ४:११.

१२. आपल्या जन्मदिनापेक्षा आपला मृत्यूदिन बरा, हे कसे?

१२ देवाशी शेवटपर्यंत विश्वासू राहिलेले त्याचे सेवक त्याच्या स्मृतीत सुरक्षित असतात आणि त्यांना भवितव्यात पुन्हा जिवंत होण्याची खातरी आहे. (ईयोब १४:१४, १५) “सुवासिक अत्तरापेक्षा नावलौकिक बरा; जन्मदिनापेक्षा मृत्युदिन बरा,” असे उपदेशक ७:१ मध्ये म्हटले आहे. आपल्या विश्वासू सेवेदरम्यान आपण देवापुढे उत्तम “नावलौकिक” मिळवतो. ख्रिश्चनांना, येशूचा जन्मदिन नव्हे तर त्याचा मृत्यूदिन साजरा करण्याची आज्ञा देण्यात आली आहे, ही नोंद घेण्याजोगी गोष्ट आहे. येशूने कमावलेल्या उत्तम ‘नावलौकिकामुळेच’ तर आपण तारण प्राप्त करू शकतो.—इब्री लोकांस १:३, ४; लूक २२:१७-२०.

ईस्टर

१३, १४. खरे ख्रिस्ती, ईस्टर सण का साजरा करत नाहीत?

१३ ईस्टर हा ख्रिस्ती धर्मजगतातील एक महत्त्वाचा सण समजला जातो. ख्रिस्ताला मृत्यूतून पुन्हा जिवंत करण्यात आल्याच्या स्मरणार्थ हा सण पाळला जातो. पण ख्रिस्ताने त्याचे पुनरुत्थान साजरे करण्याची आज्ञा दिली होती का? नाही. इतिहासाची पुस्तके आपल्याला सांगतात, की आरंभीचे ख्रिस्ती ईस्टर सण पाळत नसत व तो मूर्तिपूजक प्रथांवर आधारित आहे. द एन्सायक्लोपिडिआ ब्रिटानिका यात असे म्हटले आहे: “ईस्टर सण पाळल्याचा नवीन करारात कोणताही उल्लेख नाही. . . . विशिष्ट काळांना पवित्र मानण्याची कल्पना, आरंभीच्या ख्रिश्चनांच्या मनातही नव्हती.”

१४ एका मूर्तिपूजक प्रथेमुळे सुरु झालेल्या सणाला यहोवा देव, आपल्या पुत्राच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ पाळण्याची अनुमती देईल का? मुळीच नाही. (२ करिंथकर ६:१७, १८) उलट, बायबलमध्ये तर येशूच्या पुनरुत्थानाचे स्मरण करण्याची आज्ञा किंवा अनुमतीही दिलेली नाही. यास्तव, ईस्टरच्या नावाखाली असे करणे निव्वळ बेईमानीच आहे!

नव वर्ष साजरे करणे चुकीचे आहे का?

१५. खरे ख्रिस्ती नव वर्ष दिन का साजरा करत नाहीत?

१५ नवीन वर्ष साजरे करण्याची प्रथा मूर्तिपूजक राष्ट्रांत आढळते. द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिआ यात असे म्हटले आहे: “रोमी शासक जूलियस सीझर याने सा.यु. ४६ मध्ये, जानेवारी १ ही तारीख नवीन वर्ष दिन म्हणून स्थापित केली. रोमी लोकांनी हा दिवस, फाटकांची, दारे-खिडक्यांची व सुरुवातींची देवता जानस हिला समर्पित केला होता. जानेवारी हे नाव देखील जानस या देवतेच्या नावावरूनच पडले. हिला दोन तोंडे होती—एक पुढे बघणारे तोंड व एक मागे बघणारे तोंड.” नवीन वर्ष दिन याजशी संबंधित असलेल्या तारखा व प्रथा, प्रत्येक देशांत वेगवेगळ्या आहेत. लोककथा, मिथ्यकथा आणि दंतकथा यांच्या स्टॅण्डर्ड डिक्शनरीत असे म्हटले आहे: “युरोप व अमेरिकेतील अनेक देशांत, सरलेले वर्ष व नवीन वर्षाचे आगमन, साज-शृंगार करून केलेल्या नृत्यांच्या कार्यक्रमाद्वारे साजरे केले जायचे; या वेळेला लोक मद्यपान करायचे आणि बेधुंदपणे वागायचे.” आणि पूर्वेकडील संस्कृतींच्या लोकांबद्दल त्याच डिक्शनरीत पुढे असे म्हटले आहे, की “एका वर्षाचे संपणे व दुसऱ्या वर्षाचे सुरु होणे हा इच्छा तृप्त करण्याचा क्षण समजला जायचा.” परंतु, रोमकर १३:१३ मध्ये असा सल्ला देण्यात आला आहे: “दिवसाढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे. चैनबाजीत व मद्यपानात, विषयविलासात व कामासक्तीत, कलहात व मत्सरात नसावे.”—१ पेत्र ४:३, ४; गलतीकर ५:१९-२१.

आपला विवाह शुद्ध ठेवा

१६, १७. (क) विवाह करू इच्छिणाऱ्या ख्रिस्ती जोडप्यांनी, विवाहाच्या स्थानिक प्रथांचे परीक्षण बायबलच्या तत्त्वांनुसार का केले पाहिजे? (ख) अक्षता टाकण्याच्या प्रथेचा ख्रिश्चनांनी गंभीरपणे विचार का केला पाहिजे?

१६ असा काळ लवकरच येणार आहे जेव्हा “नवरानवरीचा शब्द [मोठ्या बाबेलीत] ह्यापुढे ऐकू येणारच नाही.” (प्रकटीकरण १८:२३) असे का? कारण लवकरच मोठ्या बाबेलीचा नाश होणार आहे. हा नाश होण्यामागचे एक कारण हे आहे की ती भूतविघेशी संबंधित असलेल्या प्रथांना बढावा देते. या प्रथा वैवाहिक जीवनाला विवाहाच्या पहिल्या दिवसापासूनच प्रदूषित करतात.—मार्क १०:६-९.

१७ प्रत्येक राष्ट्रातील प्रथा वेगवेगळ्या असतात. नव दांपत्य किंवा त्यांचे पाहुणे यांच्यासाठी शुभ मानल्या जाणाऱ्या काही प्रथा कदाचित चुकीच्या वाटणार नाहीत परंतु त्यांचा उगम बॅबिलोनी प्रथांतून असू शकतो. (यशया ६५:११) त्यांतील एक प्रथा लग्नाच्या वेळी नवरा-नवरीवर अक्षता टाकणे, ही आहे. असे केल्याने दुष्टात्मे शांत होतात व नवरा-नवरीला ते इजा करत नाहीत, या विश्वासामुळे या प्रथेची सुरुवात झाली असावी. तसेच, फार पूर्वीपासून तांदळाचा गूढ संबंध सुपीकता, आनंद व दीर्घायुष्य यांच्याशी आहे, असे मानले जाते. तेव्हा, देवाच्या प्रेमात टिकून राहणाऱ्या सर्वांनी अशा दूषित प्रथांपासून स्वतःला चार हात दूरच ठेवले पाहिजे.—२ करिंथकर ६:१४-१८.

१८. विवाह करणाऱ्या जोडप्याने व आमंत्रितांनी बायबलमधील कोणती तत्त्वे विचारात घेतली पाहिजेत?

१८ यहोवाचे सेवक अशा सर्व जगिक प्रथांपासून दूर राहतात ज्यामुळे विवाहप्रसंगाचे आणि त्यानंतर असलेल्या रिसेप्शन पार्टीचे गांभीर्य नाहीसे होऊ शकते किंवा इतरांना अडखळण ठरू शकते. जसे की, ते अशी भाषणे देणार नाहीत ज्यात इतरांच्या भावना दुखावणारी टीका केली जाते किंवा मग नवदांपत्याला अथवा इतरांना ऐकायला संकोच वाटेल असे चावट विनोद किंवा विधाने केली जातात. (नीतिसूत्रे २६:१८, १९; लूक ६:३१; १०:२७) यहोवाचे सेवक, कथा-कादंबऱ्यांमध्ये चित्रित केल्या जाणाऱ्या भपकेबाज व खर्चिक रिसेप्शन पार्ट्याही ठेवत नाहीत कारण त्यांवरून नम्रता नव्हे तर “संसाराविषयीची फुशारकी” दिसून येते. (१ योहान २:१६) तुम्ही जर विवाह करणार असाल, तर तुमच्या जीवनातला हा खास दिवस तुमच्या आठवणीत, दुःखाचा नव्हे तर आनंदाचा दिवस राहावा अशी यहोवाची इच्छा आहे. *

टोस्टींग—एक धार्मिक प्रथा?

१९, २०. टोस्टींग या प्रथेचा उगम कोठून झाला याविषयी एका विश्वकोशात काय म्हटले आहे आणि ही प्रथा ख्रिश्चनांसाठी स्वीकारयोग्य का नाही?

१९ विवाह व इतर प्रसंगी, मद्यपान करण्यापूर्वी मद्याचे ग्लास एकमेकांना भिडवून ‘चिअर्स’ करण्याला टोस्टींग म्हटले जाते. द एन्सायक्लोपिडिआ ब्रिटानिका या विश्वकोशात असे म्हटले आहे: “ग्रीक व रोमन लोक, त्यांच्या दैवतांच्या नावाने भोजनाआधी मद्य ओतायचे आणि समारंभाच्या विधीच्या वेळी दैवतांना व मृतांना शुभेच्छा द्यायचे.”

२० या गोष्टींचा धार्मिक अर्थ आहे किंवा ती एक अंधश्रद्धा आहे, असा विचार आज कदाचित लोक करणार नाहीत. तरीपण, वाईन ग्लास वर आकाशाकडे करण्याची प्रथा ही, ‘स्वर्गाला’ अर्थात एखाद्या अलौकिक शक्तीला, आशीर्वाद देण्याची विनंती करण्यासारखे आहे, जी शास्त्रवचनांच्या सुसंगतेत नाही.—योहान १४:६; १६:२३. *

“अहो परमेश्वरावर प्रीति करणाऱ्यांनो, वाइटाचा द्वेष करा”

२१. अशा कोणत्या काही प्रथा आहेत ज्या धार्मिक स्वरूपाच्या नसल्या तरी, ख्रिस्ती जन त्या टाळतात व का?

२१ आजच्या जगातील नैतिक दर्जे दिवसेंदिवस खालावत चालले आहेत. याला मोठी बाबेल प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष बढावा देते. अनेक देशांत उत्साहाने आयोजित केल्या जाणाऱ्या वार्षिक कार्निव्हल या सणांवरून हे दिसून येते. या सणांच्या वेळी लोक कामोत्तेजक नृत्ये करतात व समलैंगिक जीवनशैलीचा गौरव करतात. यहोवावर ‘प्रेम करणाऱ्या’ व्यक्तीने अशा प्रसंगी उपस्थित राहणे किंवा हे प्रसंग पाहणे उचित ठरेल का? तिला वाईटाचा खरोखरच वीट आहे हे तिच्या कार्यांवरून दिसून येईल का? (स्तोत्र १:१, २; ९७:१०) आपणही स्तोत्रकर्त्यासारखी मनोवृत्ती दाखवणे किती चांगले असेल. त्याने म्हटले: “निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टि वळीव.”—स्तोत्र ११९:३७.

२२. एखाद्या उत्सवात भाग घ्यावा किंवा घेऊ नये हे ख्रिस्ती व्यक्ती तिच्या विवेकानुसार केव्हा ठरवू शकते?

२२ जगात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांच्या दिवशी, ख्रिश्चनांनी काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून त्यांचे वर्तन पाहून इतरांना असे वाटू नये, की तेही या उत्सवांमध्ये भाग घेत आहेत. प्रेषित पौलाने लिहिले: “तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.” (१ करिंथकर १०:३१; “ योग्य निर्णय घेणे,” हा चौकोन पाहा.) परंतु एखाद्या प्रथेचे किंवा उत्सवाचे स्वरूप धार्मिक नसेल, राजकारणाशी अथवा देशभक्तीशी त्याचा काही संबंध नसेल व बायबल तत्त्वांचे उल्लंघन होत नसेल तर, या प्रथेत किंवा उत्सवात भाग घ्यावा की नाही हा प्रत्येक ख्रिश्चनाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्याचबरोबर ती ख्रिश्चन व्यक्ती इतरांना अडखळण्याचे कारण बनून त्यांच्या भावना दुखावणार नाही याची देखील खबरदारी घेईल.

आपल्या शब्दाद्वारे व कृतीद्वारे देवाचे गौरव करा

२३ पुष्कळांना, विशिष्ट लोकप्रिय सणाचे दिवस, कुटुंबाला व मित्रमंडळीला एकत्र येण्याचे प्रसंग वाटतात. त्यामुळे, आपण जेव्हा ही बायबल आधारित भूमिका घेतो तेव्हा काही जण असा चुकीचा अर्थ काढतात की आपण माणूसघाणे किंवा टोकाची भूमिका घेणारे आहोत. अशा लोकांना आपण समजावून सांगू शकतो, की यहोवाचे साक्षीदार, कुटुंबाबरोबर व मित्रपरिवाराबरोबर एकत्र येण्यास उत्सुक असतात. (नीतिसूत्रे ११:२५; उपदेशक ३:१२, १३; २ करिंथकर ९:७) पण यहोवावर आणि त्याच्या धार्मिक दर्जांवर आपले प्रेम असल्यामुळे, तो ज्यामुळे नाखूष होतो अशा प्रथा पाळून, या आनंदाच्या प्रसंगांना आपण गालबोट लावू इच्छित नाही. म्हणूनच आपण वर्षभरात इतर कोणत्याही दिवशी आपल्या प्रिय जनांबरोबर सहवासाचा आनंद लुटतो.—“ खऱ्या उपासनेमुळेच निखळ आनंद मिळतो,” हा चौकोन पाहा.

 

२३, २४. यहोवाच्या धार्मिक स्तरांची आपण उत्तम साक्ष कशी देऊ शकतो?

२४ काही साक्षीदारांना, बायबल काय शिकवते * या पुस्तकातील १६ व्या अध्यायामधून काही मुद्दे प्रामाणिक मनाने प्रश्न विचारणाऱ्यांना दाखवण्यात चांगले यश मिळाले आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती ही, की आपला हेतू, एखाद्याला सत्य उपासनेकडे आकर्षित करणे हा आहे, त्याचे विश्वास चुकीचे आहेत हे दाखवणे नाही. यास्तव, लोकांबरोबर आदरपूर्वक, सौम्यतेने चर्चा करा आणि “तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रूचकर केल्यासारखे असावे.”—कलस्सैकर ४:६.

२५, २६. पालक आपल्या मुलांना त्यांचा विश्वास आणि यहोवावरील प्रेम वाढवण्यास कशा प्रकारे मदत करू शकतात?

२५ यहोवाचे सेवक असल्यामुळे आपण प्रशिक्षित आहोत. आपण अमूक गोष्टींवर विश्वास का करतो, त्या का पाळतो व काही गोष्टी का टाळतो हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे. (इब्री लोकांस ५:१४) तेव्हा पालकांनो, आपल्या मुलांना बायबलमधील तत्त्वांवर तर्क करण्यास शिकवा. असे केल्याने तुम्ही त्यांचा विश्वास वाढवता, जे त्यांना त्यांच्या विश्वासांबद्दल विचारतात त्यांना बायबल आधारित उत्तर देण्यास मदत करता व यहोवाचे त्यांच्यावर प्रेम आहे याची त्यांना खात्री देता.—यशया ४८:१७, १८; १ पेत्र ३:१५.

२६ “आत्म्याने व खरेपणाने” देवाची उपासना करणारे, बायबलमध्ये नसलेले उत्सवच फक्त टाळत नाहीत तर ते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रामाणिक असण्याचा प्रयत्न करतात. (योहान ४:२३) आज पुष्कळ लोकांना वाटते, की या जगात प्रामाणिकपणा दाखवून चालत नाही. पण देवाचे मार्गच सर्वोत्तम आहेत हे आपण पुढील अध्यायात पाहणार आहोत.

^ परि. 3 मी या सणावारांत भाग घेतला पाहिजे का?” हा चौकोन पाहा. यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या वॉचटावर पब्लिकेशन्स इंडेक्स यांत, “पवित्र” समजल्या जाणाऱ्या विशिष्ट दिवसांची व सणांची चर्चा करण्यात आली आहे.

^ परि. 5 बायबलमध्ये दिलेली वंशावळ आणि इतिहास यानुसार येशूचा जन्म कदाचित सा.यु.पू. २ साली, एथानीम या यहुदी महिन्यात झाला असावा. आपल्या सध्याच्या कॅलेंडरनुसार ही तारीख अदमासे सप्टेंबर/ऑक्टोबरमध्ये येते.—यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले शास्त्रवचनांवर सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी) खंड २, पृष्ठे ५६-५७ आणि बायबल नेमके काय शिकवते? पृष्ठे २२१-२२२ पाहा.

^ परि. 11 नियमशास्त्रात असे म्हटले होते, की एका स्त्रीने प्रसूतीनंतर देवाला पापार्पण करायचे होते. (लेवीय १२:१-८) नियमशास्त्रातील ही आज्ञा मानव आपल्या मुलांना पापाचा वारसा देतात, ही वेदनादायक आठवण करून देत होती. यामुळे, इस्राएली लोक बाळाच्या जन्माबद्दल संतुलित दृष्टिकोन बाळगू शकले आणि मूर्तिपूजक लोकांतून आलेली वाढदिवस साजरा करण्याची प्रथा टाळू शकले.—स्तोत्र ५१:५.

^ परि. 18 विवाह आणि सामाजिक मेळावे याविषयावर टेहळणी बुरूज नोव्हेंबर २००६, पृष्ठे १२-२३मधील तीन लेख पाहा.

^ परि. 20 टेहळणी बुरूज फेब्रुवारी १५, २००७, पृष्ठे ३०-३१ (इंग्रजी) पाहा.

^ परि. 24 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले.