व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय १४

सर्व बाबतीत प्रामाणिक असा

सर्व बाबतीत प्रामाणिक असा

“सर्व बाबतीत चांगले [प्रामाणिकपणे] वागण्याची आमची इच्छा . . . आहे.”—इब्री लोकांस १३:१८.

१, २. आपण प्रामाणिक असण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहोत हे पाहून यहोवाला आनंद का होतो? उदाहरण देऊन सांगा.

एक आई आणि तिचा लहान मुलगा दुकानाच्या बाहेर येतात. अचानक मुलगा दचकून थांबतो. दुकानातले एक खेळणे त्याच्या हातात आहे. तो एकतर ते खेळणे परत त्या जागी ठेवायला किंवा त्याला हे खेळणे घेऊन द्यावे म्हणून आईला सांगायला विसरला असावा. त्याला रडू येते. आईने आपल्याला मदत करावी या आशेने तो तिच्याकडे बघतो. आई त्याला जवळ घेते आणि दोघे, दुकानाच्या मालकाला ती वस्तू परत देण्यासाठी व त्याची क्षमा मागण्यासाठी दुकानात पुन्हा जातात. आईला आपल्या मुलाचे कौतुक व अभिमान वाटतो. का?

आपली मुले प्रामाणिकपणाचे महत्त्व शिकत आहेत हे पाहून आईवडिलांना नेहमीच आनंद होतो. आणि ‘सत्यस्वरूप’ असलेल्या आपल्या स्वर्गातील पित्याला देखील होतो. (स्तोत्र ३१:५) त्याच्यासोबतचा आपला नातेसंबंध वाढवत असताना आपण प्रामाणिक असण्याचा कसोशीने प्रयत्न करतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो. यहोवाला संतुष्ट करण्याची व त्याच्या प्रेमात टिकून राहण्याची आपली इच्छा असल्यामुळे आपल्या देखील प्रेषित पौलासारख्याच भावना आहेत. त्याने असे म्हटले: “सर्व बाबतीत चांगले वागण्याची आमची इच्छा . . . आहे.” (इब्री लोकांस १३:१८) “चांगले” असे ज्याचे भाषांतर करण्यात आले आहे त्या मूळ ग्रीक शब्दाच्या अर्थात, प्रामाणिक असण्याचा अर्थही समाविष्ट आहे. प्रामाणिक राहण्यास कठीण वाटू शकणाऱ्या जीवनाच्या अशा चार क्षेत्रांवर आपण आता लक्ष केंद्रित करूया. आणि त्यानंतर आपण हेही पाहूया की प्रामाणिक राहिल्याने आपल्याला कोणते आशीर्वाद मिळू शकतात.

स्वतःशी प्रामाणिक असणे

३-५. (क) स्वतःची फसवणूक करण्याच्या धोक्यांबद्दल देवाचे वचन आपल्याला सावध कसे करते? (ख) आपण स्वतःशी प्रामाणिक कसे राहू शकतो?

पहिले क्षेत्र, स्वतःशी प्रामाणिक असण्यास शिकणे. हे कठीण असू शकते. आपण अपरिपूर्ण असल्यामुळे सहजरीत्या स्वतःची फसवणूक करू शकतो. जसे की लावदिकीया येथील ख्रिश्चनांना येशूने सांगितले, की ते स्वतःला श्रीमंत समजत होते परंतु खरे तर ते ‘दरिद्री, अंधळे व उघडेवाघडे’ अर्थात आध्यात्मिक अर्थाने दयनीय स्थितीत होते. (प्रकटीकरण ३:१७) स्वतःबद्दलच्या या चुकीच्या समजूतीमुळे त्यांची अवस्था खरोखरच घातक बनली होती.

शिष्य याकोबाने दिलेली चेतावणीही तुम्हाला कदाचित आठवत असेल: “आपण धर्माचरण करणारे आहो, असे कोणाला वाटत असेल व तो आपल्या जिभेला आळा घालीत नसेल, आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे.” (याकोब १:२६) आपण यहोवाची उपासना करत आहोत तेव्हा आपली भाषा कशीही असली तरी काही हरकत नाही, असा जर आपण तर्क करत असू तर आपण स्वतःची फसवणूक करत आहोत. आपली उपासना निरर्थक, निव्वळ व्यर्थ ठरू शकेल. हे नुकसानकारक जीवनक्रमण आपण कसे टाळू शकतो?

याकोबाने लिहिलेल्या त्या वचनांत तो देवाच्या वचनातील सत्याची तुलना एका आरशाशी करतो. देवाच्या परिपूर्ण नियमात पाहून त्यानुसार काही फेरबदल करण्याची आवश्यकता आहे किंवा नाही हे पाहण्याचा तो आपल्याला सल्ला देतो. (याकोब १:२३-२५) बायबल आपल्याला स्वतःशी प्रामाणिक असण्यास व जीवनाच्या कोणकोणत्या क्षेत्रात आपण सुधारणा केली पाहिजे ते पाहण्यास मदत करू शकते. (विलापगीत ३:४०; हाग्गय १:५) तसेच, आपली झडती घेऊन आपल्यात काही गंभीर दोष आहेत का ते पाहून ते सुधारण्यास आपल्याला मदत करावी म्हणून आपण यहोवाला प्रार्थना देखील करू शकतो. (स्तोत्र १३९:२३, २४) अप्रामाणिकपणा ही अशी एक कमतरता आहे जी सहजपणे लक्षात येत नाही. या कमतरतेबद्दल आपलाही दृष्टिकोन आपल्या स्वर्गातील पित्याप्रमाणे असला पाहिजे. नीतिसूत्रे ३:३२ मध्ये असे म्हटले आहे: “परमेश्वराला कुटिलाचा वीट आहे. पण सरळांबरोबर त्याचे रहस्य आहे.” यहोवा आपल्याला त्याच्या नजरेतून स्वतःकडे पाहण्यास मदत करू शकतो. पौलाने काय म्हटले होते ते आठवा. तो म्हणाला होता: “सर्व बाबतीत चांगले [प्रामाणिकपणे] वागण्याची आमची इच्छा . . . आहे.” सध्या आपण परिपूर्ण बनू शकत नसलो तरी, प्रामाणिक बनण्याची आपली मनापासून इच्छा आहे आणि तसे बनण्याचा आपण खरोखर प्रयत्नही करतो.

कुटुंबात प्रामाणिक असणे

तुम्ही जर प्रामाणिक असाल तर, तुम्ही जे काही करत आहात त्या गोष्टी आपल्या सोबत्यापासून लपवण्याचा मोह टाळाल

६. पती-पत्नीने एकमेकांशी प्रामाणिक का असले पाहिजे व त्यामुळे ते कोणकोणत्या धोकेदायक गोष्टी टाळतात?

प्रामाणिकपणा ही ख्रिस्ती कुटुंबाची खासियत असली पाहिजे. त्यामुळे, पती-पत्नीने खुल्या मनाने एकमेकांसोबत संवाद साधले पाहिजेत. विवाह सोबती नसलेल्या व्यक्तीबरोबर प्रणयचेष्टा करणे, इंटरनेटद्वारे छुपे नातेसंबंध जोडणे किंवा कोणत्याही प्रकारचे अश्लील साहित्य पाहणे यांसारख्या हानीकारक व अशुद्ध वर्तनाला ख्रिस्ती विवाहात थारा नाही. काही विवाहित ख्रिश्चनांनी आपल्या निरपराध सोबत्याच्या नकळत या गोष्टी केल्या आहेत. असे करणे बेईमानी आहे. विश्वासू राजा दावीद याने काय म्हटले ते पाहा: “अधम लोकांत मी बसलो नाही; कपटी लोकांची संगत मी धरणार नाही.” (स्तोत्र २६:४) तुम्ही जर विवाहित असाल तर, तुम्ही जे काही करत आहात त्या गोष्टी आपल्या सोबत्यापासून लपवण्याचा मोह टाळा.

७, ८. बायबलमधील कोणत्या उदाहरणांवरून मुले प्रामाणिकपणाचे महत्त्व शिकू शकतात?

आपल्या मुलांना प्रामाणिकपणाचे महत्त्व शिकवताना पालक बायबलमधील उदाहरणांचा उपयोग करू शकतात. बायबलमध्ये वाईट आणि चांगली अशी दोन्ही उदाहरणे आहेत. जसे की, वाईट उदाहरणांमध्ये चोरी करून आणलेल्या वस्तू लपवून ठेवण्याचा प्रयत्न करणारा आखान; पैशाच्या लोभापायी खोटे बोलणारा गेहेजी; आणि चोरी करणारा, खोटे बोलणारा व आपण येशूचा मित्र आहोत असा आव आणणारा यहुदा, यांचा समावेश होतो.—यहोशवा ६:१७-१९; ७:११-२५; २ राजे ५:१४-१६, २०-२७; मत्तय २६:१४, १५; योहान १२:६.

आणि चांगली उदाहरणे ही आहेत: मुलांच्या पिशवीत चुकून कोणीतरी पैसे ठेवले असावेत म्हणून त्यांना ते पैसे पुन्हा जाऊन द्या असे सांगणारा याकोब; यहोवाला दिलेले वचन पाळणारा इफ्ताह व त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागली तरी पित्याने दिलेल्या वचनानुसार वागणारी त्याची मुलगी; आणि भविष्यवाणी पूर्ण व्हावी म्हणून व आपल्या मित्रांना वाचवण्यासाठी, हातात काठ्या घेऊन आलेल्या समूहापुढे धैर्याने आत्मसमर्पण करणारा येशू. (उत्पत्ति ४३:१२; शास्ते ११:३०-४०; योहान १८:३-११) देवाच्या वचनातील अनेक चांगल्या उदाहरणांपैकी ही काही उदाहरणे किती मौल्यवान आहेत हे पालकांना कदाचित जाणवेल. या उदाहरणांद्वारे ते आपल्या मुलांना प्रामाणिकपणाची आवड बाळगण्यास व त्याचे महत्त्व समजण्यास मदत करू शकतात.

९. पालक आपल्या मुलांसमोर प्रामाणिकपणा दाखवण्याच्या बाबतीत स्वतःचे उदाहरण मांडू इच्छित असतील, तर त्यांनी काय करण्याचे टाळले पाहिजे व हे का महत्त्वाचे आहे?

आपल्या मुलांना शिकवणाऱ्या पालकांवर एक महत्त्वाची जबाबदारी येते. प्रेषित पौलाने असे विचारले: “दुसऱ्याला शिकविणारा तू स्वतःलाच शिकवीत नाहीस काय? चोरी करु नये अशी घोषणा करणारा तू स्वतःच चोरी करितोस काय?” (रोमकर २:२१) काही पालक आपल्या मुलांना प्रामाणिकपणाचे धडे शिकवतात पण स्वतः मात्र बेईमानपणे वागतात. यामुळे त्यांची मुले गोंधळून जातात. भुरट्या चोऱ्या, लहान-सहान लबाड्या करून ते अशी सबब देतील, की “ही छोटीशीच लबाडी आहे, मी फक्त शेंडी लावली. त्यात काय एवढं?” वास्तविकतेत, चोरी ही चोरीच आहे मग ती एखाद्या लहानशा वस्तूची असो अथवा मोठ्या. आणि लबाडी ही लबाडीच आहे मग ती एखाद्या लहानशा बाबतीत असो अथवा मोठ्या बाबतीत. * (लूक १६:१०) मुले दांभिकपणा लगेच ओळखतात आणि याचा त्यांच्या बालमनावर गंभीर परिणाम होऊ शकतो. (इफिसकर ६:४) परंतु, आपल्या पालकांच्या उदाहरणातून ते जर प्रामाणिकपणा शिकले तर या बेईमान जगात प्रामाणिक बनून ते यहोवाची स्तुती करतील.—नीतिसूत्रे २२:६.

ख्रिस्ती मंडळीत प्रामाणिक असणे

१०. बंधूभगिनींबरोबर प्रामाणिक संवाद साधताना आपण कोणकोणत्या बाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे?

१० बंधूभगिनींबरोबर सहवास राखल्यामुळे आपल्याला प्रामाणिकपणा विकसित करण्याच्या अनेक संधी मिळतात. त्यांच्याबरोबर असताना आपण, आपल्याला मिळालेल्या भाषेच्या देणगीचा काळजीपूर्वक उपयोग केला पाहिजे, हे आपण १२ व्या अध्यायात शिकलो. नेहमीच्या बोलण्याचा ओघ हानीकारक गप्पांकडे वळू शकतो आणि कधीकधी तर आपण एखाद्याची निंदानालस्ती करू लागू! आपल्याला नक्की ठाऊक नसलेल्या माहितीबद्दल आपण सारखे सारखे बोलत राहिलो तर कदाचित आपण खोट्या बातम्या पसरवू. त्यामुळे आपण आपल्या तोंडावर ताबा ठेवणे किती महत्त्वाचे आहे. (नीतिसूत्रे १०:१९) दुसऱ्या बाजूला पाहता, आपल्याला कदाचित एखादी गोष्ट माहीत असेल जी खरी आहे. पण याचा अर्थ आपण ती गोष्ट सगळ्यांना सांगत सुटावे, असा होत नाही. जसे की, अशी एखादी गोष्ट जिच्याशी आपले काही घेणेदेणे नाही किंवा जिच्याबद्दल बोलत सुटल्याने इतर जण दुखावतील, याबद्दल न बोलणेच उचित ठरेल. (१ पेत्र ४:१५) काही लोक, तोंडावर किंवा सडेतोडपणे बोलण्याला प्रामाणिकपणा म्हणतील. पण आपले शब्द नेहमी रूचकर व दयाळू असले पाहिजेत.—कलस्सैकर ४:६.

११, १२. (क) गंभीर पापात अडकलेले काही जण आणखी पेचात कसे पडतात? (ख) गंभीर पापांविषयी सैतान कोणत्या लबाड्या पसरवत आहे व आपण असे करणे कसे टाळू शकतो? (ग) आपण यहोवाच्या संघटनेशी प्रामाणिक कसे राहू शकतो?

११ मंडळीत पुढाकार घेणाऱ्यांशी खासकरून आपण प्रामाणिक असणे महत्त्वाचे आहे. ज्यांच्या हातून एखादे गंभीर पाप घडले आहे ते, एक लबाडी लपवण्यासाठी दुसरी लबाडी करतात. मंडळीत वडील जेव्हा त्यांना याबाबत विचारतात तेव्हा ते त्यांच्याशी खोटे बोलतात. असे लोक दुहेरी जीवन जगत असतात. ते एकीकडे यहोवाची सेवा करत असल्याचे नाटक करतात आणि दुसरीकडे गंभीर पाप करत असतात. खरे तर त्यांचे संपूर्ण आयुष्यच ढोंगी ठरते. (स्तोत्र १२:२) इतर जण, अर्धवट माहिती सांगतात आणि महत्त्वाच्या गोष्टी लपवून ठेवतात. (प्रेषितांची कृत्ये ५:१-११) ते, सैतान बढावा देत असलेल्या लबाड्या मानत असल्यामुळे अशी बेईमानी करत असतात.—“ गंभीर पापांविषयी सैतानाने पसरवलेल्या लबाड्या” असे शीर्षक असलेला चौकोन पाहा.

१२ लेखी स्वरूपात जेव्हा आपण प्रश्नांची उत्तरे लिहितो तेव्हाही आपण यहोवाच्या संघटनेशी प्रामाणिक असणे महत्त्वाचे आहे. जसे की, आपण आपल्या क्षेत्र सेवेचा अहवाल भरतो तेव्हा आपण खोटा रिपोर्ट देत नाही. तसेच, सेवेच्या एखाद्या विशेषाधिकाराकरता अर्ज भरताना आपण आपल्या तब्येतीविषयी किंवा आपल्या रेकॉर्डविषयी जेव्हा माहिती लिहावी लागते तेव्हा जे खरे आहे तेच लिहितो.—नीतिसूत्रे ६:१६-१९.

१३. बांधवांबरोबरच्या व्यापारविषयक मामल्यात आपण प्रामाणिकपणा कसा दाखवू शकतो?

१३ बांधवांबरोबरच्या व्यापारविषयक मामल्यात देखील आपण प्रामाणिक असले पाहिजे. कधीकधी, काही बंधू अथवा भगिनी एकत्र मिळून बिझनेस करतात. अशा वेळी त्यांनी, बिझनेस संबंधित गोष्टी उपासनेपासून वेगळ्या ठेवल्या पाहिजेत. म्हणजे, राज्य सभागृहात किंवा क्षेत्र सेवेत असताना त्यांनी याबाबतीत चर्चा करू नये. काही वेळा, एक बांधव दुसऱ्या बांधवाकडे कामाला असेल. मालक असलेल्या बांधवाने त्याच्याकडे कामाला असलेल्या बांधवाला वेळच्या वेळी, ठरल्याप्रमाणे व कायद्यानुसार जे लाभ मिळाले पाहिजे ते सर्व देण्याच्याबाबतीत प्रामाणिकपणा दाखवला पाहिजे. (१ तीमथ्य ५:१८; याकोब ५:१-४) आणि आपण एखाद्या बंधू अथवा भगिनीकडे काम करत असू, तर आपल्याला जितका पगार दिला जातो त्यानुसार संपूर्ण वेळ काम केले पाहिजे. (२ थेस्सलनीकाकर ३:१०) तो आपलाच बांधव आहे त्यामुळे, त्याच्याकडे कामाला असलेल्या इतर कामगारांना त्याने सूट दिली नाही तरी, आपल्याला मात्र विशेष सुट्या, लाभ किंवा इतर सवलती द्याव्यात, अशी आपण अपेक्षा करू नये.—इफिसकर ६:५-८.

१४. बांधवांचा भागीदारीतील एखादा व्यवसाय असेल तर त्यांनी कोणती खबरदारी घ्यावी व का?

१४ इतर बांधवांसोबत आपला एखादा बिझनेस असेल, कदाचित आपण पैसे गुंतवले असतील किंवा लोन वगैरे घेतले असेल तर काय? बायबल याबाबतीत आपल्याला एक महत्त्वाचे तत्त्व सांगते: सर्व व्यवहार लेखी करावेत! उदाहरणार्थ, यिर्मयाने जेव्हा जमीन विकत घेतली तेव्हा त्याने खरेदी खताच्या दोन प्रती बनवल्या, त्यावर संबंधितांच्या सह्या घेतल्या आणि पुढे-मागे लागतील म्हणून त्या जपून ठेवल्या. (यिर्मया ३२:९-१२; उत्पत्ति २३:१६-२०) बांधवांबरोबर बिझनेस करताना, एका दस्तऐवजावर सर्व व्यवहार लेखी, स्वतःच्या आणि साक्षीदारांच्या सह्या केलेल्या स्वरुपात असावेत. आपला बांधवांवर विश्वास नाही म्हणून आपण असे करतो, असा याचा अर्थ होत नाही. उलट, असे केल्याने गैरसमज, नाराजी व फूटी यांसारखे वाद निर्माण होणार नाहीत. बिझनेस करणाऱ्या सर्व ख्रिश्चनांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती ही, की कोणत्याही बिझनेसमुळे मंडळीचे ऐक्य व शांती धोक्यात येता कामा नये. *१ करिंथकर ६:१-८.

जगात वावरताना प्रामाणिक असणे

१५. बिझनेस मामल्यातील बेईमानीविषयी यहोवाचा काय दृष्टिकोन आहे व आज सर्वसामान्य असलेल्या फसवाफसवीच्या प्रकारांबद्दल खऱ्या ख्रिश्चनांचा काय दृष्टिकोन आहे?

१५ खरे ख्रिस्ती केवळ मंडळीतच प्रामाणिकपणा दाखवतात असे नाही. पौलाने म्हटले: “सर्व बाबतीत चांगले वागण्याची आमची इच्छा” आहे. (इब्री लोकांस १३:१८) बिझनेसच्या मामल्यात आपण प्रामाणिक असले पाहिजे, अशी आपल्या निर्माणकर्त्याची इच्छा आहे. बायबलमधील नीतिसूत्रे या पुस्तकात खोट्या तराजूविषयीचे बरेच उल्लेख आहेत. (नीतिसूत्रे ११:१; २०:१०, २३) प्राचीन काळी, माल तोलून देण्याकरता व तो माल विकत घेण्याकरता दिला जाणारा पैसा तोलण्याकरता व्यापारी लोक तराजूंचा उपयोग करीत असत. गिऱ्हाईकांना फसवण्यासाठी, व्यापारी दोन प्रकारच्या वजनांचा उपयोग करायचे आणि फसवे तराजू वापरायचे. * यहोवाला या गोष्टींचा वीट आहे! आपण त्याच्या प्रेमात टिकून राहू इच्छित असल्यामुळे, बिझनेस मामल्यात सर्व प्रकारचा बेईमानपणा आपण कटाक्षाने टाळतो.

१६, १७. आज लोक कोणकोणत्या प्रकारे बेईमानी करतात व खऱ्या ख्रिश्चनांचा कोणता ठाम निश्चय आहे?

१६ सैतान या जगाचा शासक असल्यामुळे, आपल्या सभोवती चालणारी बेईमानी पाहून आपल्याला आश्चर्य वाटत नाही. आपल्यासमोर बेईमानी करण्याचे अनेक मोह येऊ शकतात. नोकरीचा अर्ज भरताना लोक सर्रासपणे खोटी किंवा वाढवून-चढवून माहिती लिहितात, स्वतःच्या योग्यतेची व अनुभवाची खोटी माहिती देतात. स्थलांतर, कर, विमा वगैरेसाठी अर्ज भरावे लागतात तेव्हा ते सहसा, आपले काम साधण्यासाठी खोटी उत्तरे लिहितात. विद्यार्थी परीक्षेत कॉपी करतात, त्यांना जेव्हा शाळेत निबंध व रिपोर्ट लिहावे लागतात तेव्हा ते इंटरनेटवरून दुसऱ्याची माहिती चोरून ती स्वतःची म्हणून सादर करतात. भ्रष्ट अधिकाऱ्यांकडे काही काम असते तेव्हा लोक आपले काम करून द्यावे म्हणून या अधिकाऱ्यांना लाच देतात. या जगात आपण अशाच वर्तनाची अपेक्षा करू शकतो कारण बहुतेक लोक ‘स्वार्थी, धनलोभी व चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारे,’ आहेत.—२ तीमथ्य ३:१-५.

१७ खरे ख्रिस्ती कुठल्याही प्रकारची बेईमानी न करण्याचा निश्चय करतात. कधीकधी, आपण जेव्हा बेईमानी करणाऱ्या लोकांचे चांगले झालेले किंवा या जगात तेच पुढे असल्याचे पाहतो, तेव्हा आपल्याला प्रामाणिकपणा दाखवणे कठीण वाटू शकते. (स्तोत्र ७३:१-८) खरे ख्रिस्ती “सर्व बाबतीत” प्रामाणिक राहू इच्छित असल्यामुळे, त्यांना कदाचित आर्थिक तोटा सहन करावा लागेल. मग, प्रामाणिक असण्याचा काही फायदा होतो का? होय, नक्कीच होतो. पण आपण प्रामाणिक का असले पाहिजे व यामुळे आपल्याला कोणते आशीर्वाद मिळू शकतात?

प्रामाणिकपणामुळे मिळणारे आशीर्वाद

१८ जीवनात अशा फार कमी गोष्टी आहेत ज्या, ‘प्रामाणिक, भरवसालायक व्यक्ती’ या नावलौकिकापेक्षा मौल्यवान आहेत. (“ मी किती प्रामाणिक आहे?” हा चौकोन पाहा.) शिवाय असे नावलौकिक कोणीही मिळवू शकते. यासाठी तुमच्याजवळ कलाकौशल्य, धनसंपत्ती, सौंदर्य, सामाजिक पार्श्वभूमी किंवा इतर गोष्टी असण्याची गरज नाही. हे इतके सहज असतानाही पुष्कळ लोक उत्तम नावलौकिक हा मौल्यवान खजिना प्राप्त करत नाहीत. फार क्वचित लोक तो प्राप्त करतात. (मीखा ७:२) तुम्ही प्रामाणिक असल्यामुळे काही जण तुमची थट्टा करतील पण इतर तुमचे कौतुक करतील, तुमच्यावर भरवसा ठेवतील आणि तुमचा आदर करतील. यहोवाच्या अनेक साक्षीदारांना, प्रामाणिक असल्यामुळे आर्थिकरीत्या फायदा झाल्याचे आढळून आले आहे. बेईमानी करणाऱ्या कामगारांना नोकरीवरून काढून टाकण्यात येते पण साक्षीदार प्रामाणिक असल्यामुळे त्यांची नोकरी शाबूत राहते. किंवा, जेथे प्रामाणिक कामगारांची अत्यंत आवश्यकता असते अशा कंपन्यांमध्ये त्यांना काम मिळते.

१९. प्रामाणिक जीवनशैलीचा आपल्या विवेकावर व यहोवासोबत असलेल्या आपल्या नातेसंबंधावर कोणता परिणाम होतो?

१९ तुम्हाला असा अनुभव आला असेल अथवा नसेलही; पण प्रामाणिक असल्याने इतरही अनेक फायदे होतात. जसे की, तुमचा विवेक शुद्ध राहतो. पौलाने लिहिले: “आमचा विवेकभाव चांगला [प्रामाणिक] आहे.” (इब्री लोकांस १३:१८) शिवाय, स्वर्गात असलेल्या आपल्या प्रेमळ पित्याचे आपल्याकडे कधीही दुर्लक्ष होणार नाही कारण त्याला प्रामाणिकच लोक आवडतात. (स्तोत्र १५:१, २; नीतिसूत्रे २२:१) याचा अर्थ, प्रामाणिक असल्याने तुम्ही देवाच्या प्रेमात टिकून राहू शकता. यापेक्षा आणखीन मोठे बक्षीस कोणते असू शकते? याजशी संबंधित पुढील अध्यायाचा विषय आहे: कामाबद्दल यहोवाचा दृष्टिकोन.

^ परि. 9 ख्रिस्ती मंडळीतील एखाद्या व्यक्तिला धडधडीतपणे खोटे बोलण्याची सवय असेल किंवा दुसऱ्याची हानी करण्याच्या स्पष्ट व वाईट हेतूने खोटे बोलण्याची सवय असेल तर वडील जन तिच्याविरुद्ध न्यायिक कारवाई करतील.

^ परि. 14 बिझनेसच्या बाबतीत काही समस्या निर्माण झाल्यास काय करावे याबाबत आणखी माहिती आर्थिक व्यवहारांतील वाद सोडवणे, या लेखात पाहा.

^ परि. 15 हे व्यापारी, वस्तू विकत घेण्यासाठी एक वजन आणि वस्तू विकण्यासाठी दुसरे वजन वापरत असत. दोन्हींतून ते नफा मिळवायचे. शिवाय, त्यांच्या तराजूतले एक पारडे दुसऱ्या पारड्यापेक्षा लांब किंवा जड असायचे. म्हणजे एक पारड्याला लावलेल्या साखळ्या दुसऱ्या पारड्यापेक्षा जरा लांब किंवा जड असायच्या. अशा प्रकारे ते गिऱ्हाईकांना लुबाडत असत.