व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय १६

सैतानाला अडवा आणि त्याचे डावपेच हाणून पाडा

सैतानाला अडवा आणि त्याचे डावपेच हाणून पाडा

“सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हांपासून पळून जाईल.”—याकोब ४:७.

१, २. बाप्तिस्म्याचे प्रसंग पाहून कोणाकोणाला आनंद होतो?

यहोवाची सेवा तुम्ही अनेक वर्षांपासून करत असाल तर कदाचित तुम्ही आपल्या संमेलनांमध्ये व अधिवेशनांमध्ये दिले जाणारे बाप्तिस्म्याचे भाषण अनेकदा ऐकले असेल. या प्रसंगाला तुम्ही खूपदा उपस्थित राहिला असला तरी, जेव्हा जेव्हा सभागृहाच्या पहिल्या ओळीत बसलेल्या बंधूभगिनींना तुम्ही, आपण बाप्तिस्मा घेण्यास तयार आहोत हे दर्शवण्यासाठी उभे राहिलेले पाहता तेव्हा तेव्हा तुम्हाला भरून येते. त्या प्रसंगी, श्रोत्यांमध्ये बसलेल्या सर्व बंधूभगिनींमध्ये उत्साहाची एक लाट पसरते व त्यानंतर टाळ्यांचा कडकडाट होतो. यहोवाची बाजू घेणारा आणखी एक अमूल्य लोकांचा गट तयार झालेला पाहून तुमचे डोळे कदाचित पाणावतील. अशा वेळी आपण सर्व किती आनंदित होतो!

आपल्या भागात वर्षातून काही वेळा आपल्याला असे प्रसंग पाहायला मिळतात; पण देवदूत तर अनेकदा असे प्रसंग पाहतात. विश्वभरात हजारो लोकांना दर आठवडी, यहोवाच्या पृथ्वीवरील संघटनेचे सदस्य बनताना ‘स्वर्गात किती आनंद होत’ असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. (लूक १५:७, १०) ही वाढ पाहून देवदूतही नक्कीच रोमांचित होत असावेत!—हाग्गय २:७.

सैतान “गर्जणाऱ्या सिंहासारखा” फिरत आहे

३. सैतान एका “गर्जणाऱ्या सिंहासारखा” का फिरत आहे व तो काय करू इच्छितो?

पण याच्या अगदी उलट, असेही काही आत्मिक प्राणी आहेत जे, बाप्तिस्मा घेणाऱ्यांकडे क्रोधित होऊन पाहत आहेत. या भ्रष्ट जगाकडे पाठ फिरवणाऱ्या हजारो लोकांना पाहून सैतान आणि त्याचे दुरात्मे रागाने लालबुंद होत आहेत. कारण सैतानाने अशी बढाई मारली होती, की कोणताही मनुष्य यहोवाची सेवा निव्वळ प्रेमापोटी करत नाही व परीक्षा आल्यावर कोणीही त्याच्याशी विश्वासू राहणार नाही. (ईयोब २:४, ५) जेव्हा कोणी यहोवाला आपले जीवन समर्पित करण्यास प्रेरित होते तेव्हा सैतान खोटा ठरतो. जणू काय वर्षातल्या दर आठवडी हजारदा सैतानाच्या थोबाडीत मारले जाते. म्हणूनच तर तो एका ‘गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरत असतो.’ (१ पेत्र ५:८) हा ‘सिंह’ आपल्याला आध्यात्मिक अर्थाने फस्त करायला टपून बसला आहे; यहोवाबरोबरचा आपला नातेसंबंध बिघडवण्याची, नव्हे तोडून टाकण्याची तो वाट पाहत आहे.—स्तोत्र ७:१, २; २ तीमथ्य ३:१२.

जेव्हा जेव्हा कोणी यहोवाला आपले जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेतो तेव्हा तेव्हा सैतान खोटा ठरतो

४, ५. (क) यहोवाने कोणत्या दोन महत्त्वपूर्ण मार्गांनी सैतानावर बंधन घातले आहे? (ख) एक ख्रिस्ती कोणते आश्वासन बाळगू शकतो?

आपला शत्रू जालीम असला तरी आपण गर्भगळीत होण्याची गरज नाही. का नाही? कारण यहोवाने दोन महत्त्वपूर्ण मार्गांनी या ‘गर्जणाऱ्या सिंहावर’ बंधन घातले आहे. कोणती बंधने? एक बंधन म्हणजे, यहोवाने असे भाकीत केले, की खऱ्या ख्रिश्चनांचा एक “मोठा लोकसमुदाय,” “मोठ्या संकटातून” सुखरूप वाचेल. (प्रकटीकरण ७:९, १४) देवाने केलेली एकही भविष्यवाणी आजतागायत खोटी ठरलेली नाही. तेव्हा, सैतानालाही हे माहीत आहे, की तो देवाच्या सर्व लोकांना कधीच पाशात पकडू शकणार नाही.

दुसरे बंधन देवाच्या प्राचीन विश्वासू सेवकांपैकी एकाने सांगितलेल्या एका मूलभूत सत्यातून स्पष्ट होते. संदेष्टा अजऱ्या याने राजा आसा याला असे म्हटले: “तुम्ही परमेश्वराच्या बरोबर राहाल तोवर तो तुमच्याबरोबर राहील.” (२ इतिहास १५:२; १ करिंथकर १०:१३) बायबलमधील गतकाळातील अनेक उदाहरणांवरून स्पष्टपणे कळते, की देवाच्या समीप असलेल्या कोणत्याही सेवकाला सैतान कधीही फस्त करू शकला नाही. (इब्री लोकांस ११:४-४०) आज, जो ख्रिस्ती देवाच्या समीप राहतो तो सैतानाला अडवू शकतो; इतकेच नव्हे तर त्याच्यावर विजय देखील मिळवू शकतो. खरे तर, देवाच्या वचनात आपल्याला असे आश्वासन देण्यात आले आहे: “सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल.”—याकोब ४:७.

“आपले झगडणे . . . दुरात्म्यांबरोबर आहे”

६. एकेका ख्रिश्चनाविरुद्ध सैतान कसा लढतो?

सैतान या युद्धात विजयी ठरू शकत नसला तरी, आपण गाफील राहिलो तर तो वैयक्तिकरीत्या आपल्याला फस्त करू शकतो. यहोवाबरोबरचा आपला नातेसंबंध कमजोर झाला तर तो आपल्याला फस्त करू शकतो हे सैतानाला माहीत आहे. यासाठी तो काय करतो? तो आपल्यावर तीव्र, एकेकावर व अतिशय धूर्त हल्ले करतो. सैतान वापरत असलेल्या प्रमुख कुयुक्त्यांची आपण चर्चा करूया.

७. सैतान यहोवाच्या लोकांवर तीव्र हल्ला का चढवत आहे?

तीव्र हल्ले. प्रेषित योहानाने असे म्हटले: “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहान ५:१९) सर्व खऱ्या ख्रिश्चनांसाठी या शब्दांत एक इशारा आहे. सैतानाने अभक्त लोकांच्या संपूर्ण जगाला केव्हाच गिळंकृत केले आहे व आता तो आपले लक्ष यहोवाच्या लोकांकडे वळवून जे आतापर्यंत त्याच्या तावडीतून सुटले आहेत त्यांच्यावरील आपला हल्ला वाढवू शकतो. (मीखा ४:१; योहान १५:१९; प्रकटीकरण १२:१२, १७) आपला काळ फार थोडा राहिला आहे हे त्याला माहीत असल्यामुळे तो अतिशय क्रोधित झाला आहे. म्हणून त्याने आपले कार्यही वाढवले आहे. देवाबरोबरचा नातेसंबंध तोडण्याकरता तो करत असलेल्या शेवटल्या क्रूर हल्ल्याचा आज आपण सामना करत आहोत. म्हणूनच कधी नव्हे तितके आज ‘कालप्रवृत्ति ओळखून आपण नेमके काय केले पाहिजे हे समजून घेतले पाहिजे.’—१ इतिहास १२:३२.

८. दुरात्म्यांबरोबर आपले “झगडणे” आहे असे जेव्हा प्रेषित पौलाने म्हटले तेव्हा त्याच्या म्हणण्याचा काय अर्थ होता?

वैयक्तिकरीत्या झगडणे. प्रेषित पौलाने ख्रिश्चनांना असा इशारा दिला: “आपले झगडणे . . . आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.” (इफिसकर ६:१२) पौलाने येथे “झगडणे” हा शब्द का वापरला बरे? कारण, या शब्दावरून, कुस्तीचा, एकमेकांशी अगदी जवळून झगडण्याचा अर्थ येतो. या शब्दाद्वारे पौल या गोष्टीवर जोर देत होता, की आपल्यातील प्रत्येकाला वैयक्तिकरीत्या दुरात्म्यांबरोबर झगडावे लागते. भूता-खेतांवर लोकांचा जास्त विश्वास असलेल्या एखाद्या देशात आपण राहत असलो किंवा नसलो तरी, आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती ही, की आपण यहोवाला आपले जीवन समर्पित केल्यापासूनच जणू काय आपण कुस्तीच्या आखाड्यात उतरलो आहोत. निदान समर्पणापासून प्रत्येक ख्रिश्चन या झगड्यात सामील झाला आहे. म्हणूनच तर पौलाला इफिससमधील ख्रिश्चनांना वारंवार, ‘टिकाव धरा’ असे आर्जवण्याची गरज वाटली.—इफिसकर ६:११, १३, १४.

९. (क) सैतान आणि त्याचे दुरात्मे विविध ‘डावपेचांचा’ उपयोग का करतात? (ख) सैतान आपली विचारशैली भ्रष्ट करण्याचा प्रयत्न का करत आहे व आपण त्याचे प्रयत्न हाणून कसे पाडू शकतो? ( सैतानाच्या धूर्त कुयुक्त्यांपासून सावधान! हा चौकोन पाहा.) (ग) आता आपण सैतानाच्या कोणत्या कुयुक्तीची चर्चा करणार आहोत?

धूर्त कुयुक्त्या. पौलाने ख्रिश्चनांना सैतानाच्या “डावपेचांपुढे” टिकाव धरण्याचे उत्तेजन दिले. (इफिसकर ६:११) पौलाने वापरलेला शब्द अनेकवचनी आहे, याची नोंद घ्या. दुरात्मे केवळ एकाच नव्हे तर विविध धूर्त कुयुक्त्यांचा उपयोग करतात. असे करण्यामागे त्यांच्याकडे चांगले कारण आहे. यहोवाचे काही सेवक एक प्रकारच्या परीक्षेत टिकून राहिले पण त्यांच्यावर जेव्हा दुसऱ्या प्रकारची परीक्षा आली तेव्हा मात्र ते बळी पडले. म्हणजे, सैतान आणि त्याचे दुरात्मे आपली कोणती कमतरता त्यांना दिसते का हे पाहण्यासाठी आपल्या प्रत्येकाला अगदी जवळून न्याहाळत असतात. आणि मग, देवाबरोबरचा आपला नातेसंबंध बिघडवणारी एखादी कमतरता सापडल्यास ते लगेच तिचा फायदा उचलतात. पण आपण देवाचे आभार मानले पाहिजेत, की बायबलच्या साहाय्याने आपण सैतान वापरत असलेल्या अनेक पद्धती ओळखू शकतो. (२ करिंथकर २:११) या प्रकाशनातील मागील अध्यायात आपण, भौतिकवाद, वाईट संगत व लैंगिक अनैतिकता यांसारख्या काही कुयुक्त्यांची चर्चा केली होती. आता आपण सैतानाच्या आणखी एका कुयुक्तीची चर्चा करूया ही कुयुक्ती आहे भुताटकी.

भुताटकी—विश्वासघातकी कृत्य

१०. (क) भुताटकी म्हणजे काय? (ख) भुताटकीविषयी यहोवाचा आणि तुमचा काय दृष्टिकोन आहे?

१० भुताटकीद्वारे एक व्यक्ती थेट दुरात्म्यांबरोबर संपर्क साधते. चेटूक, जादू, वशीकरण, मृतात्म्याला विचारणे, हे सर्व भुताटकीचे प्रकार आहेत. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे, की भुताटकीचा यहोवाला “वीट आहे.” (अनुवाद १८:१०-१२; प्रकटीकरण २१:८) आपल्यालाही “वाइटाचा वीट” असला पाहिजे त्यामुळे, दुरात्म्यांबरोबर संगती करण्याचा विचारही आपल्या मनाला शिवू नये. (रोमकर १२:९) नाहीतर, आपला स्वर्गीय पिता यहोवा याचा आपण किती घृणास्पदरीत्या विश्वासघात करू, नाही का?

११. सैतानाने एखाद्याला भुताटकीकडे वळवल्यास तो विजयी कसा ठरतो? उदाहरण देऊन सांगा.

११ भुताटकी हे यहोवाचा घोर विश्वासघात करणारे कृत्य असल्यामुळे सैतान आपल्यातील काहींना या कृत्यात अडकवण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे. जेव्हा जेव्हा सैतान एका ख्रिस्ती व्यक्तीला भुताटकीचे कृत्य करण्यास प्रेरित करतो तेव्हा तेव्हा त्याचा विजय होतो. तो कसा? उदाहरणार्थ, एका सैनिकाला जर त्याच्या तुकडीपासून दूर करून व तिचा विश्वासघात करून शत्रू सैन्यात सामील होण्यास भाग पाडण्यात आले तर शत्रू सैन्याच्या अधिकाऱ्याला याचा खूप आनंद होईल. तो कदाचित, या सैनिकाच्या आधीच्या अधिकाऱ्याचा अपमान करण्यासाठी या विश्वासघातकी सैनिकाची मिरवणूकही काढेल. तसेच, एक ख्रिस्ती व्यक्ती जर भुताटकीकडे वळाली तर ती स्वच्छेने व जाणूनबुजून यहोवाला सोडते आणि स्वतःला सैतानाच्या हवाली करते. अशा वेळी, युद्धाचे करंडक म्हणून या विश्वासघातकी व्यक्तीची मिरवणूक काढायला सैतानाला किती आनंद होईल, याची कल्पना करा. सैतानाला अशा प्रकारे विजय मिळवून द्यायला आपल्यातील कोणालाही आवडेल का? मुळीच आवडणार नाही. आपण विश्वासघातकी लोक नाही.

प्रश्नांद्वारे मनात संशय निर्माण करणे

१२. भुताटकीविषयी आपली विचारसरणी बदलण्यासाठी सैतान कोणत्या पद्धतीचा उपयोग करतो?

१२ जोपर्यंत आपण भुताटकीचा वीट मानू तोपर्यंत सैतान आपल्याला फसवू शकत नाही. त्यामुळे मग तो आपली विचारसरणी बदलण्याचा प्रयत्न करू लागतो. ते कसे? ख्रिश्चनांना तो इतःपर बुचकळ्यात पाडतो की काहीजण “वाईटाला बरे व बऱ्याला वाईट” असे म्हणू लागतात. (यशया ५:२०) असे करण्यासाठी तो त्याच्या एका अगदी जुन्या परिणामकारी पद्धतीचा उपयोग करतो. मनात संशय निर्माण करण्यासाठी तो प्रश्न उभे करतो.

१३. मनात संशय निर्माण करण्यासाठी सैतानाने कशा प्रकारे प्रश्नांचा उपयोग केला?

१३ गतकाळात सैतानाने या पद्धतीचा उपयोग कसा केला होता ते पाहा. एदेन बागेत त्याने हव्वेला विचारले: “तुम्ही बागेतल्या कोणत्याहि झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हास सांगितले हे खरे काय?” ईयोबाच्या काळात, स्वर्गात झालेल्या देवदूतांच्या एका सभेच्या वेळी सैतानाने अशी शंका उपस्थित केली: “ईयोब देवाचे भय काय फुकट बाळगितो?” आणि येशूने पृथ्वीवरील त्याच्या सेवेला सुरुवात केली अगदी तेव्हाच सैतानाने त्याला असे म्हणून आव्हान केले: “तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्याच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर.” सैतानाचे धाडस तर पाहा. यहोवाने सहा आठवड्यांपूर्वीच तर येशूविषयी असे घोषित केले होते, की “हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.” यहोवाच्या या उद्‌गारांची सैतानाने थट्टा केली!—उत्पत्ति ३:१; ईयोब १:९; मत्तय ३:१७; ४:३.

१४. (क) भुताटकीविषयी आपल्या मनात शंका निर्माण करण्यासाठी सैतान कुयुक्तीचा उपयोग कसा करतो? (ख) आता आपण कशाचा विचार करणार आहोत?

१४ आजही सैतान भुताटकीच्या दुष्टतेविषयी मनात संशय निर्माण करण्यासाठी अशाच पद्धतीचा अवलंब करतो. सत्यात असलेल्या काही बंधूभगिनींच्या मनात संशय निर्माण करण्यात तो यशस्वी ठरला आहे, ही दुःखाची गोष्ट आहे. भुताटकीचे काही प्रकार खरोखरच हानीकारक आहेत का याविषयी त्यांना शंका वाटते. (२ करिंथकर ११:३) अशा लोकांना आपण त्यांची विचारसरणी बदलण्यास कशी मदत करू शकतो? सैतानाच्या कुयुक्तीचा आपल्यावर प्रभाव पडणार नाही याची आपण खात्री कशी करू शकतो? याचे उत्तर मिळण्यासाठी आपण अशा दोन क्षेत्रांचा विचार करूया जी सैतानाने अगदी धूर्तपणे भुताटकीने भ्रष्ट केली आहेत. ही दोन क्षेत्रे, मनोरंजन आणि आरोग्य ही आहेत.

आपल्या इच्छांचा व गरजांचा गैरफायदा घेणे

१५. (क) पाश्‍चिमात्य देशांतील अनेक जण भुताटकीच्या प्रकारांना क्षुल्लक कसे समजतात? (ख) भुताटकीविषयी असलेल्या जगाच्या दृष्टिकोनाचा काही ख्रिश्चनांवरही कसा परिणाम झाला आहे?

१५ पाश्‍चिमात्य देशांत विशेषकरून, गूढवाद, चेटूक आणि भुताटकीच्या इतर प्रकारांना क्षुल्लक समजले जाते. चित्रपट, पुस्तके, टीव्ही कार्यक्रम, कंप्युटर गेम्स यांमध्ये असे दाखवले जाते की दुरात्मिक प्रथा आचरणारे मौजेखातर त्या आचरतात किंवा मग त्या प्रथा आचरणारे हुशार असतात व या प्रथा निर्धोक असतात. जादूटोण्यावर बनवलेले काही चित्रपट व पुस्तके इतकी लोकप्रिय झाली आहेत की रसिकांनी, रसिक मंडळ बनवले आहे. यावरून स्पष्टपणे कळते, की जादूटोण्याचे धोके क्षुल्लक असल्याचे दाखवण्यात दुरात्मे यशस्वी झाले आहेत. भुताटकीचे धोके क्षुल्लक लेखण्याच्या मनोवृत्तीचा ख्रिश्चनांवरही परिणाम झाला आहे का? काहींवर झाला आहे. कशावरून आपण असे म्हणू शकतो? एका ख्रिश्चनाने जादूटोण्याचा एक चित्रपट पाहिल्यानंतर असे म्हटले: “मी फक्त चित्रपट पाहिला. स्वतः जादूटोणा केला का?” हा असा तर्क धोकेदायक का आहे?

१६. जादूटोण्यावर आधारित असलेले मनोरंजन निवडणे धोकेदायक का आहे?

१६ भुताटकी करण्यात व ती पाहण्यात फरक असला तरी, जादूटोण्याचे प्रकार पाहण्यात काही धोका नाही असा अर्थ होत नाही. का नाही? विचार करा, देवाच्या वचनात असे सूचित करण्यात आले आहे, की सैतानाकडे किंवा त्याच्या दुरात्म्यांकडे मानवांचे विचार जाणण्याचे सामर्थ्य नाही. * त्यामुळे, आधी उल्लेख केल्याप्रमाणे, आपण काय विचार करतो व देवाबरोबरचा आपला नातेसंबंध कमजोर कसा करता येईल हे शोधण्याकरता दुरात्म्यांना आपल्या कार्यांचे जवळून परीक्षण करावे लागते. आणि यात, आपण कोणत्या प्रकारच्या मनोरंजनाची निवड करतो हेही समाविष्ट आहे. एक ख्रिस्ती व्यक्ती जेव्हा भुता-खेतांविषयी, वशीकरण व भूत लागल्याचे प्रकार किंवा भुताटकीवरच आधारित असलेले चित्रपट पाहायला किंवा पुस्तके वाचायला आवडतात हे आपल्या कार्यांद्वारे दाखवते तेव्हा ती दुरात्म्यांना काहीतरी सुचवत असते. वास्तविक पाहता ती त्यांना तिची कमतरता दाखवून देत असते! आणि मग, हे दुरात्मे त्या ख्रिस्ती व्यक्तीने दाखवून दिलेल्या तिच्या कमतरतेचा गैरफायदा घेऊन तिच्याविरुद्धची त्यांची कुस्ती, तिला चीत करेपर्यंत तेजीने करत राहतात. खरे पाहता, मनोरंजनामुळे भुताटकीविषयी ज्यांची उत्सुकता वाढत गेली होती ते कालांतराने भुताटकी करण्यात गोवले गेले.—गलतीकर ६:७.

आजारपणात यहोवाच्या साहाय्याचा फायदा घ्या

१७. कोणत्या कुयुक्तीचा उपयोग करून सैतान आजारी असलेल्यांचा गैरफायदा घेऊ शकतो?

१७ सैतान फक्त, मनोरंजन करण्याच्या आपल्या इच्छेचाच गैरफायदा घेत नाही तर आरोग्याची काळजी घेण्याच्या गरजेचाही घेतो. तो कसा? नको नको ते प्रयत्न करूनही तब्येत ढासळतच राहते तेव्हा एक ख्रिस्ती व्यक्ती अगदी निराश होऊ शकते. (मार्क ५:२५, २६) काहीही करून बरे होण्याची तिच्या मनात तीव्र इच्छा असते. अशा वेळी सैतान व त्याचे दुरात्मे तिला असे उपचार घेण्यास मोहीत करतील जे देवाच्या तत्त्वांत बसत नाही. अखेरचा प्रयत्न म्हणून कदाचित ही ख्रिस्ती व्यक्ती असे उपचार घेण्यास तयार होईल ज्यात भुताटकीचा किंवा जादूटोणाचा समावेश होतो. (यशया १:१३) * दुरात्म्यांची ही कुयुक्ती सफल झाली म्हणजे, ख्रिस्ती व्यक्तीचा देवाबरोबरचा नातेसंबंध आपोआपच कमकुवत होतो. हे कसे होते?

१८. ख्रिस्ती व्यक्ती कोणकोणत्या उपचार व निदान पद्धती टाळेल व का?

१८ “गूढ शक्तींचे” साहाय्य घेणाऱ्या इस्राएली लोकांना यहोवाने अशी चेतावणी दिली: “तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्यापुढे डोळे झाकितो; तुम्ही कितीहि विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही.” (यशया १:१३, १५) होय, आपण अशा सर्व गोष्टींपासून दूर राहू ज्यामुळे यहोवा आपल्या प्रार्थना ऐकण्याचे व आपल्याला साहाय्य करण्याचे बंद करेल. विशेषकरून आजारी असताना आपण या गोष्टीची आणखी जास्त काळजी घेऊ. (स्तोत्र ४१:३) त्यामुळे, एखाद्या उपचार किंवा रोगनिदान करण्याच्या पद्धतीत भुताटकीशी संबंधित असलेल्या गोष्टींचा समावेश आहे असा सुगावा लागल्यावर खऱ्या ख्रिश्चनांनी लगेच त्या टाळल्या पाहिजेत. * (मत्तय ६:१३) असे केल्यास यहोवा त्यांना साहाय्य करत राहील, अशी खात्री ते बाळगू शकतात.—“ ही खरोखरच भुताटकी आहे का?” हा चौकोन पाहा.

 

भुता-खेतांच्या कहाण्यांना ऊत येतो

१९. (क) सैतानाने लोकांना आपल्या शक्तीविषयी काय विश्वास करायला लावून फसवले आहे? (ख) खऱ्या ख्रिश्चनांनी कोणत्या कहाण्या टाळल्या पाहिजेत?

१९ पाश्‍चिमात्य देशातील अनेक लोक सैतानाच्या शक्तीच्या धोक्याला क्षुल्लक लेखतात, परंतु जगाच्या इतर भागांत याच्या उलट घडत असते. येथे सैतानाने अनेक लोकांना असा विश्वास करायला लावून फसवले आहे की त्याच्याजवळ खूप शक्ती आहे, जी खरे पाहता त्याच्याजवळ नाही. त्यामुळे काही लोक भुतांना घाबरतच जगतात, खातात, कामाला जातात, झोपतात. भुतांच्या कहाण्यांना येथे ऊत आला आहे. अशा कहाण्या सहसा अतिशय चवीने सांगितल्या जातात; लोकही अगदी उत्सुकतेने त्या ऐकतात. अशा कहाण्या पसरवण्यात आपण भाग घ्यावा का? नाही. खऱ्या देवाचे सेवक दोन कारणांसाठी असे करण्यास टाळतात.

२०. एक ख्रिस्ती व्यक्ती कदाचित अजाणतेत सैतानाचे विचार कशी पसरू शकते?

२० पहिले कारण, भुतांच्या कहाण्या पसरवण्याद्वारे एक व्यक्ती सैतानाचा उद्देश साध्य करत असते. तो कसा? सैतान शक्तिशाली कार्ये करू शकतो याची पुष्टी देवाच्या वचनात दिलेली आहे, पण त्यात असाही इशारा दिलेला आहे, की तो “खोटी महत्कृत्ये” आणि “कपट” यांचा उपयोग करतो. (२ थेस्सलनीकाकर २:९, १०) सैतान प्रमुख ठकबाज असल्यामुळे, भुताटकीची आवड असलेल्यांच्या मनावर कसा प्रभाव पाडायचा व खोट्या गोष्टी खऱ्या म्हणून त्यांना विश्वास करायला कसे लावायचे हे त्याला माहीत आहे. या लोकांना वाटेल, की त्यांनी खरोखरच त्या गोष्टी पाहिल्या व ऐकल्या आहेत. ते आपले अनुभव इतरांनाही, सत्य घटना म्हणून सांगतील. कालांतराने, या कहाण्या सतत सांगितल्या जात असल्यामुळे, त्या जरा वाढवून-चढवूनही सांगितल्या जातात. ख्रिस्ती व्यक्ती अशा कहाण्या पसरवत असेल तर ती “लबाडीचा बाप” असलेल्या सैतानाची इच्छा पूर्ण करते. ती सैतानाचे विचार पसरवत राहील.—योहान ८:४४; २ तीमथ्य २:१६.

२१. आपले संभाषण जास्तकरून कोणत्या विषयावर असले पाहिजे?

२१ दुसरे कारण, एखाद्या ख्रिश्चनाची खरोखरच गतकाळात दुरात्म्यांबरोबर कधी गाठ पडली असली तरी, ती याविषयी इतर बंधूभगिनींना वारंवार सांगण्याचे टाळेल. का? “आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे,” असा आपल्याला सल्ला देण्यात आला आहे. (इब्री लोकांस १२:२) होय, आपण सैतानावर नव्हे तर ख्रिस्तावर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. सैतान काय करू शकतो किंवा करू शकत नाही याविषयी येशूला पृथ्वीवर असताना बरेच काही सांगता आले असते; पण त्याने त्याच्या शिष्यांना दुरात्म्यांबद्दलच्या गोष्टी सांगून त्यांचे मनोरंजन केले नाही, ही गोष्ट नोंद घेण्याजोगी आहे. उलट त्याचे लक्ष राज्याच्या संदेशावर केंद्रित होते. यास्तव, येशू आणि त्याच्या प्रेषितांचे अनुकरण करून आपले संभाषणही जास्तकरून ‘देवाच्या महत्कृत्यांवर’ असले पाहिजे.—प्रेषितांची कृत्ये २:११; लूक ८:१; रोमकर १:११, १२.

२२. ‘स्वर्गात आनंद व्हावा’ म्हणून आपण काय करत राहू?

२२ यहोवाबरोबरचा आपला नातेसंबंध तोडण्याचा प्रयत्न करण्यासाठी सैतान भुताटकीसहित विविध प्रकारच्या कुयुक्त्यांचा उपयोग करतो. पण, जे वाईट आहे त्याची घृणा करून व जे चांगले आहे ते धरून आपण, सर्व प्रकारची भुताटकी टाळण्याचा आपला निश्चय कमकुवत बनवण्यास सैतानाला कसलाच वाव देत नाही. (इफिसकर ४:२७) सैतानाचा विनाश होईपर्यंत ‘त्याच्या डावपेचांपुढे आपण टिकाव धरून राहिलो’ तर ‘स्वर्गात किती आनंद होईल,’ याची कल्पना करा!—लूक १५:७; इफिसकर ६:११.

^ परि. 16 सैतानाचे वर्णन करण्याकरता त्याला देण्यात आलेल्या नावांवरून (विरोधक, निंदक, फसवणारा, मोहविणारा, लबाड) हे सूचित होत नाही, की त्याच्याजवळ मानवांचे हृदय व मन जाणण्याची कुवत आहे. उलट, यहोवाला ‘हृदये पारखणारा’ व येशूला “मने व अंतःकरणे” पारखणारा असे म्हटले आहे.—नीतिसूत्रे १७:३; प्रकटीकरण २:२३.

^ परि. 17 यशया १:१३ या वचनात, ‘अधर्म’ असे ज्याचे भाषांतर करण्यात आले आहे तो मूळ इब्री भाषेतला शब्द ‘जादूटोणा’ असा आहे. या शब्दाचा ‘दुष्ट शक्ती’ असादेखील अर्थ होतो.

^ परि. 18 अधिक माहितीकरता, टेहळणी बुरूज डिसेंबर १५, १९९४, पृष्ठे १९-२२ वरील “तुमची आरोग्य चाचणी” आणि नोव्हेंबर १५, २००८, पृष्ठे २३-२७ वरील “आरोग्याची निगा राखा पण बायबलमधील तत्त्वांच्या चाकोरीत राहून” हे लेख पाहा.