व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय १७

“आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा”

“आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा”

“तुम्ही तर आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा; . . . आपणांस देवाच्या प्रीतिमध्ये राखा.”—यहूदा २०, २१.

१, २. तुम्ही कोणत्या प्रकारच्या बांधकामात गोवलेले आहात व तुमच्या बांधकामाकडे अथवा तुमच्या वर्तनाकडे तुम्ही लक्ष का दिले पाहिजे?

समजा तुम्ही एखादे बांधकाम हाती घेतले आहे. ते खूप दिवसांपासून चालले आहे व कदाचित पुढेही चालू राहील. आतापर्यंत तरी, हे बांधकाम अवघड असले तरी मनाला समाधान देणारे होते. काहीही झाले तरी आता मागे पाहायचे नाही किंवा आळस करायचा नाही, असे तुम्ही ठरवता. नाहीतर, बांधकामावर याचा परिणाम होऊ शकेल. कसल्या बांधकामाविषयी आपण बोलत आहोत? हे बांधकाम म्हणजे आपण स्वतः. आपल्या वर्तनाकडे आपण लक्ष दिले नाही तर याचा आपल्या भवितव्यावर परिणाम होऊ शकतो.

आपण स्वतःवर करत असलेल्या बांधकामाविषयी शिष्य यहुदा याने जोर दिला. “आपणांस देवाच्या प्रीतिमध्ये राखा” असे ख्रिश्चनांना आर्जवल्यानंतर त्याने त्याच उताऱ्यात पुढे म्हटले: “आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा.” (यहूदा २०, २१) कोणकोणत्या मार्गांनी आपण स्वतःची उभारणी करू शकतो आणि देवाच्या प्रेमात टिकून राहण्याकरता आपला विश्वास आणखी मजबूत करू शकतो? तुम्ही करू शकत असलेल्या बांधकामातील तीन पैलूंवर आता आपण आपले लक्ष केंद्रित करूया.

यहोवाच्या नीतिनियमांवर आपला विश्वास वाढवत राहा

३-५. (क) यहोवाच्या नियमांविषयी काय विचार करायला लावून सैतान तुम्हाला फसवू इच्छितो? (ख) देवाच्या नीतिनियमांविषयी आपण कोणता दृष्टिकोन बाळगला पाहिजे व आपल्या दृष्टिकोनाचा आपल्या विचारांवर कसा परिणाम होतो? उदाहरण द्या.

सर्वात आधी आपण देवाच्या नियमांवरील आपला विश्वास मजबूत केला पाहिजे. या पुस्तकाच्या अभ्यासाद्वारे तुम्हाला, वर्तनाविषयी असलेल्या यहोवाच्या अनेक नीतिनियमांची ओळख घडली. यहोवाचे नीतिनियम तुम्हाला कसे वाटतात? यहोवाचे नियम, त्याची तत्त्वे, त्याचे दर्जे बंधनकारक व खूप कडक आहेत असा विचार करायला लावून सैतान तुम्हाला फसवू शकतो. एदेन बागेत त्याची ही पद्धत यशस्वी ठरल्यापासून तो तिचा उपयोग करू लागला आहे. (उत्पत्ति ३:१-६) तुम्ही सैतानाकडून फसवले जाल का? हे बहुतांशी तुमच्या मनोवृत्तीवर अवलंबून आहे.

जसे की, तुम्ही एका सुंदरशा बागेत फेरफटका मारत आहात. फिरत असताना तुम्हाला बागेतील एका भागात जाड तारेचे कुंपण दिसते. पण कुंपणापलिकडचा भागही फार आकर्षक दिसतोय. सुरुवातीला तुम्हाला वाटेल, की हे कुंपण मधेच लावल्यासारखे आहे. या कुंपणामुळे तुम्ही पलिकडे जाऊ शकत नाही. पण तेवढ्यात तुम्हाला पलिकडे एक अतिशय हिंस्र सिंह, सावज शोधत असताना दिसतो. आता तुम्हाला त्या कुंपणाचे महत्त्व समजते. हे कुंपण तुमच्याच संरक्षणासाठी लावण्यात आले आहे! तुमच्यावर सध्या कोणी हिंस्र पशू टपून बसला आहे का? देवाचे वचन असा इशारा देते: “सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रु सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो.”—१ पेत्र ५:८.

सैतान हा एका हिंस्र पशूसारखा आहे. आपण सैतानाला बळी पडू नये असे यहोवाला वाटत असल्यामुळे आणि त्या दुष्टाच्या अनेक ‘डावपेचांपासून’ आपले संरक्षण व्हावे म्हणून यहोवाने त्याचे नियम घालून दिले आहेत. (इफिसकर ६:११) यास्तव, जेव्हा जेव्हा आपण देवाच्या नीतिनियमांवर मनन करू तेव्हा तेव्हा आपण त्या नियमांतून, आपल्या स्वर्गीय पित्याचे आपल्याबद्दल असलेले प्रेम पाहू. अशी मनोवृत्ती बाळगल्यास देवाचे नियम, आपली सुरक्षा करणारे व आपल्याला आनंद देणारे आहेत, असे वाटतील. शिष्य याकोबाने लिहिले: “जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमांचे निरीक्षण करुन ते तसेच करीत राहतो . . . त्याला आपल्या कार्यात धन्यता मिळेल.”—याकोब १:२५.

६. देवाच्या नीतिनियमांवरील व तत्त्वांवरील आपला विश्वास वाढवण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? उदहारण द्या.

नियमकर्त्यावर व त्याच्या नियमांतून दिसणाऱ्या बुद्धीवर आपला विश्वास वाढवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांनुसार जगणे. उदाहरणार्थ, ‘ख्रिस्ताच्या नियमात,’ त्याने ‘आज्ञापिलेल्या सर्व’ गोष्टी इतरांना शिकवा, या आज्ञेचा समावेश होतो. (गलतीकर ६:२; मत्तय २८:१९, २०) उपासनेसाठी व उभारणीकारक संगतीसाठी एकत्र येत राहा, ही आज्ञा देखील खरे ख्रिस्ती काटेकोरपणे पाळतात. (इब्री लोकांस १०:२४, २५) यहोवाने दिलेल्या इतर आज्ञांमध्ये, त्याला नित्यनियमाने तसेच पूर्ण मनाने प्रार्थना करणे, या आज्ञेचाही समावेश होतो. (मत्तय ६:५-८; १ थेस्सलनीकाकर ५:१७) या आज्ञांचे आपण जसजसे पालन करू तसतसे आपल्याला, त्यांच्यातून यहोवाचे प्रेमळ मार्गदर्शन स्पष्टपणे दिसून येईल. या त्रस्त जगात आपल्याला कुठेही सापडणार नाही असा आनंद व समाधान या आज्ञांचे पालन केल्याने मिळू शकते. देवाच्या नियमांनुसार वागल्याने तुम्हाला स्वतःला कोणते फायदे झाले आहेत यावर तुम्ही मनन करता तेव्हा या नियमांवरील तुमचा विश्वास आणखी मजबूत होत नाही का?

७, ८. वर्षानुवर्षे यहोवाचे नियम पाळत राहणे कठीण असेल, अशी चिंता करणाऱ्यांना देवाचे वचन कोणती खात्री देते?

काही वेळा काहींना अशी चिंता वाटेल, की वर्षानुवर्षे यहोवाचे नियम पाळत राहणे कठीण आहे. आपण कुठे ना कुठे तरी चुकू अशी भीती त्यांच्या मनात येते. तुम्हाला जर कधी असे वाटले तर पुढील शब्द आठवा: “तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवितो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो. तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास तर बरे होते; मग तुझी शांति नदीसारखी, तुझी धार्मिकता समुद्राच्या लाटासारखी झाली असती.” (यशया ४८:१७, १८) हे शब्द किती सांत्वनदायक आहेत याचा कधी तुम्ही थोडेसे थांबून विचार केला आहे का?

यहोवा आपल्याला येथे आठवण करून देतो, की आपण जर त्याच्या आज्ञा पाळल्या तर आपला फायदा होईल. तो आपल्याला दोन फायद्यांविषयी सांगतो. पहिला फायदा, आपली शांती तुडुंब भरलेल्या आणि संथ व सतत वाहणाऱ्या एका नदीसारखी होईल. दुसरा फायदा, आपली धार्मिकता समुद्राच्या लाटांसारखी होईल. तुम्ही कधी समुद्रकिनारी उभे राहून एकापाठोपाठ एक येणाऱ्या लाटा पाहिल्या आहेत का? त्यांना पाहून तुमच्या मनात चिरकालाची भावना येते का? या लाटांना अंत नसतो; अगणित युगांपासून त्या न थांबता एकामागोमाग एक अशा येतच आहेत. तुमची धार्मिकता म्हणजे योग्य करण्याचा तुमचा मार्ग या लाटांसारखा होईल, असे यहोवा म्हणतो. जोपर्यंत तुम्ही त्याच्याशी विश्वासू राहाल तोपर्यंत तो तुम्हाला कधीही सोडणार नाही! (स्तोत्र ५५:२२) ही अभिवचने यहोवावरील आणि त्याच्या नीतिनियमांवरील तुमचा विश्वास वाढवत नाहीत का?

‘प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा’

९, १०. (क) प्रौढतेप्रत जाणे ख्रिस्ती लोकांसाठी एक अद्‌भुत ध्येय का आहे? (ख) आध्यात्मिक दृष्टिकोन बाळगल्यामुळे एक व्यक्ती आनंदी कशी होते?

तुमच्या बांधकामात समाविष्ट असलेला दुसरा एक पैलू या ईश्वरप्रेरित शब्दांत आहे: “प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करूया.” (इब्री लोकांस ६:२) प्रौढतेप्रत जाणे हे ख्रिस्ती लोकांसाठी एक अद्‌भुत ध्येय आहे. प्रौढतेप्रत जाण्याचा अर्थ परिपूर्णता गाठणे असा होत नाही; कारण परिपूर्णता आपण कोणीही निदान सध्या तरी प्राप्त करू शकत नाही. परंतु प्रौढतेप्रत जाण्याचे ध्येय आपण साध्य करू शकतो. शिवाय, ख्रिस्ती जन जसजसे प्रौढ होतात तसतसे त्यांना यहोवाची सेवा करण्यात अधिकाधिक आनंद मिळतो. कसे काय बरे?

१० यहोवाबरोबर जवळचा नातेसंबंध असलेल्या ख्रिस्ती व्यक्तीचा यहोवासारखाच दृष्टिकोन असतो. (योहान ४:२३) पौलाने असे लिहिले: “जे देहस्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टींकडे चित्त लावतात; आणि जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत ते आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावतात.” (रोमकर ८:५) दैहिक दृष्टिकोनामुळे क्षणिक आनंद मिळतो कारण हा दृष्टिकोन असलेली व्यक्ती आत्म-केंद्री असते, ती पायापुरते पाहते आणि भौतिक वसतूंवर तिचे लक्ष केंद्रित असते. परंतु आध्यात्मिक दृष्टिकोन बाळगणारी व्यक्ती नेहमी आनंदी असते कारण तिचे लक्ष आनंदी देव यहोवा याच्यावर केंद्रित असते. ही व्यक्ती यहोवाला संतुष्ट करण्यास आतुर असते आणि परीक्षांचा सामना करतानाही आनंदी असते. का बरे? कारण परीक्षा येतात तेव्हा, सैतान लबाड आहे हे शाबीत करून दाखवण्याची तिला संधी मिळते व सचोटी राखण्यास वाव मिळतो. या सर्वांमुळे आपला स्वर्गीय पिता खूष होतो.—नीतिसूत्रे २७:११; याकोब १:२, ३.

११, १२. (क) पौलाने एका ख्रिस्ती व्यक्तीच्या ‘ज्ञानेंद्रियांविषयी’ काय म्हटले व “सराव” या शब्दाचा अर्थ काय होतो? (ख) एका बाळाला आणि एका कसरतपटूला कोणत्या प्रकारे प्रशिक्षण घेण्याची गरज आहे?

११ एक व्यक्ती प्रशिक्षणामुळेच आध्यात्मिक मनोवृत्तीची व प्रौढ बनते. या वचनावर विचार करा: “ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे.” (इब्री लोकांस ५:१४) आपल्या ज्ञानेंद्रियांना “सराव झाला आहे” असे जेव्हा पौलाने म्हटले तेव्हा त्याने एका ग्रीक शब्दाचा उपयोग केला जो, पहिल्या शतकात ग्रीसमधील व्यायामशाळांत सर्रास वापरला जात होता. आपल्या ज्ञानेंद्रियांना आपण ‘सराव देऊ शकतो,’ असेही त्याचे भाषांतर होऊ शकते. या सरावात काय काय गोवलेले होते त्याचा आता विचार करा.

एका कसरतपटूच्या शरीराला सरावाद्वारे प्रशिक्षित केले जाते

१२ आपण जन्मलो तेव्हा आपल्या शरीराला सराव नव्हता. उदाहरणार्थ, एका बाळाला, त्याचे हातपाय कसे हलतात हे कळत नसते. ते नुसतेच ते हालवत असते. आणि कधीकधी तर स्वतःच्याच तोंडावर मारून घेते. असे केल्यावर ते आश्चर्याने बघत राहते किंवा मग रडू लागते. हळूहळू मात्र त्याच्या शरीराला सराव होतो. बाळ रांगू लागते, मग चालू लागते आणि मग पळू लागते. * पण कसरतपटूचे काय? जेव्हा तुम्ही एका कसरतपटूला हवेत उंच उडी मारून, आपल्या शरीराला अगदी सहजपणे व नियोजनबद्धपणे पीळ देताना पाहता तेव्हा त्याच्या स्नायूंना त्याने अनेक वर्षांचा सराव दिला आहे, हे तुमच्या लगेच लक्षात येते. त्याच्या अंगी ही लवचिकता एका रात्रीत नाही तर रोज अनेक तासांच्या प्रशिक्षणानंतर आली आहे. अशा प्रकारची शारीरिक कसरत “थोडक्या बाबतीत उपयोगी आहे,” असे बायबल कबूल करते. आपल्या आध्यात्मिक ज्ञानेंद्रियांचा सराव करणे याहीपेक्षा किती अधिक मौल्यवान आहे!—१ तीमथ्य ४:८.

१३. आपण आपल्या ज्ञानेंद्रियांना सराव कसा देऊ शकतो?

१३ या पुस्तकात आपण, आपल्या ज्ञानेंद्रियांना सराव देण्यास आपल्याला मदत करणाऱ्या अनेक विषयांवर चर्चा केली आहे. यामुळे आपण आध्यात्मिक मनोवृत्तीची व्यक्ती बनून यहोवाशी विश्वासू राहू शकू. दैनंदिन जीवनात तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात तेव्हा यहोवाच्या तत्त्वांवर व नीतिनियमांवर प्रार्थनापूर्वक मनन करा. कोणताही निर्णय घेण्याआधी स्वतःला विचारा: ‘बायबलमधील कोणता नियम किंवा कोणते तत्त्व याला लागू होते? मी त्याचे पालन कसे करू शकतो? माझ्या कोणत्या कार्यामुळे माझा स्वर्गीय पिता संतुष्ट होऊ शकेल?’ (नीतिसूत्रे ३:५, ६; याकोब १:५) यानंतर मग जेव्हा तुम्ही कोणताही निर्णय घेता तेव्हा तुमच्या ज्ञानेंद्रियांना आणखी सराव होईल. या सरावामुळे तुम्हाला आध्यात्मिक मनोवृत्ती विकसित करून ती टिकवून ठेवण्यास मदत होईल.

१४. आध्यात्मिक अर्थाने आपण वाढू इच्छित असू तर आपल्यात कोणत्या प्रकारची भूक असली पाहिजे, पण सोबतच आपण कोणत्या बाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे?

१४ आपण सर्वच आध्यात्मिक अर्थाने प्रौढ बनू शकत असलो तरी, आध्यात्मिक वाढ ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. वाढ ही अन्नावर अवलंबून आहे. म्हणूनच पौलाने असे म्हटले: “प्रौढांसाठी जड अन्न आहे.” विश्वास वाढवण्याचा एक कानमंत्र म्हणजे जड आध्यात्मिक अन्न घेणे. शिकत असलेल्या गोष्टींचा जीवनात अवलंब करणे म्हणजे बुद्धी होय. आणि बायबल म्हणते, की “ज्ञान [“बुद्धी,” NW ] ही श्रेष्ठ चीज आहे.” त्यामुळे, आपला पिता सांगत असलेली अमूल्य सत्ये ग्रहण करण्याची भूक आपल्याला असली पाहिजे. (नीतिसूत्रे ४:५-७; १ पेत्र २:२) अर्थात, ज्ञान व देवाची बुद्धी प्राप्त झाल्यावर आपण घमेंडी बनू नये. आपल्या मनात गर्व किंवा इतर कोणतीही कमजोरी मूळ धरून वाढत आहे का हे पाहण्यासाठी आपण सतत स्वतःचे परीक्षण केले पाहिजे. “तुम्ही विश्वासात आहा किंवा नाही ह्याविषयी आपली परीक्षा करा; आपली प्रतीति पाहा,” असे पौलाने लिहिले.—२ करिंथकर १३:५.

१५. आध्यात्मिक वाढीसाठी प्रेम दाखवण्याची गरज का आहे?

१५ एका घराचे उदाहरण घ्या. त्याचे बांधकाम कदाचित कालांतराने पूर्ण होते परंतु घरातील कामे चालूच राहतात. घराची देखभाल, डागडूजी तर वेळोवेळी करावीच लागते. शिवाय परिस्थिती बदलल्यामुळे आणखी काही तरी बांधकाम करण्याची गरज पडू शकते. आपल्या आध्यात्मिकतेविषयी देखील असेच आहे. आपण आध्यात्मिक प्रौढता प्राप्त केल्यानंतर सर्वकाही तेथेच थांबत नाही. तर, स्वतःत काही फेरबदल करण्याची गरज आहे का हे पाहण्यासाठी आपण वेळोवेळी स्वतःचे परीक्षण केले पाहिजे. आध्यात्मिक अर्थाने प्रौढ बनून आपली आध्यात्मिक मनोवृत्ती टिकवून ठेवण्याकरता आपण काय करण्याची गरज आहे? आपण सर्वात आधी प्रेम दाखवण्याची गरज आहे. यहोवा आणि आपले बंधूभगिनी यांबद्दलचे आपले प्रेम वाढले पाहिजे. आपल्यात प्रेम नसेल तर आपले सर्व ज्ञान आणि आपली कार्ये, वाजणाऱ्या थाळीसारखी निरर्थक ठरतील. (१ करिंथकर १३:१-३) प्रेम असेल तरच आपण आध्यात्मिक प्रौढता प्राप्त करू शकू व आध्यात्मिकतेत वाढत राहू शकू.

यहोवाने दिलेल्या आशेवर आपले मन केंद्रित करा

१६. सैतान कोणत्या प्रकारच्या विचारशैलीला बढावा देतो पण यावर मात करण्याकरता यहोवाने कोणते साधन पुरवले आहे?

१६ आपल्या बांधकामातील आणखी एका पैलूची आता आपण चर्चा करूया. येशू ख्रिस्ताचा सच्चा अनुयायी म्हणून स्वतःची उभारणी करायची असेल तर तुम्ही तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीविषयी सावध असले पाहिजे. या जगाचा शासक सैतान, लोकांना नकारात्मक विचार करायला लावण्यात, निराशावादी बनवण्यात, त्यांच्या मनात विश्वासाची कमतरता व आशाहीनता निर्माण करण्यात पटाईत आहे. (इफिसकर २:२) ख्रिश्चनांसाठी अशा प्रकारची विचारसरणी घातक आहे. एका लाकडी इमारतीला लागलेल्या वाळवीसारखी ही विचारसरणी आहे. परंतु यहोवाने या विचारसरणीवर मात करण्याकरता एक महत्त्वपूर्ण साधन दिले आहे; त्याने आपल्याला आशा दिली आहे.

१७. आशा किती महत्त्वाची आहे हे देवाच्या वचनात कोणत्या उदाहरणातून दाखवून देण्यात आले आहे?

१७ बायबलमध्ये विविध प्रकारच्या आध्यात्मिक शस्त्रसामग्रीविषयी सांगितले आहे जी आपण सैतानाविरूद्ध आणि या जगाविरूद्ध लढताना धारण केली पाहिजे. यांतील सर्वात महत्त्वाची शस्त्रसामग्री शिरस्त्राण अर्थात “तारणाची आशा” ही आहे. (१ थेस्सलनीकाकर ५:८) बायबल काळातील सैनिकाला हे चांगल्या प्रकारे माहीत होते, की तो जर शिरस्त्राणाशिवाय लढायला गेला तर जास्त काळ जिवंत राहू शकणार नाही. हे शिरस्त्राण सहसा धातूचे बनलेले असायचे व आतून त्याला लोकरीचे किंवा कातड्याचे अस्तर असायचे. शिरस्त्राण घातल्यामुळे सैनिकावर होणारे वार त्याच्या डोक्याला न लागता वरच्यावर लागायचे. शिरस्त्राणामुळे जसे डोके सुरक्षित राहते तसेच आशेमुळे आपले विचार सुरक्षित राहतात.

१८, १९. आशा समोर ठेवण्यात येशूने कोणते उदाहरण मांडले व आपण त्याचे अनुकरण कसे करू शकतो?

१८ आशा समोर ठेवण्याच्या बाबतीत येशूचे आपल्यापुढे प्रमुख उदाहरण आहे. पृथ्वीवरील जीवनाच्या शेवटल्या रात्री त्याने काय काय सहन केले ते आठवा. त्याच्या जवळच्या मित्राने पैशासाठी त्याचा विश्वासघात केला. दुसऱ्या एकाने त्याला ओळखण्यास नकार दिला. बाकीचे त्याला सोडून पळून गेले. त्याचे स्वतःचेच देशवासी त्याच्याविरुद्ध उठले आणि रोमी सैनिकांनी त्याला सुळावर चढवावे म्हणून ते ओरडू लागले. आपल्यातील कोणालाही त्याच्या इतक्या कठीण परीक्षांचा सामना करावा लागणार नाही, असे आपण खात्रीने म्हणू शकतो. कोणत्या गोष्टीमुळे तो टिकून राहिला? इब्री लोकांस १२:२ या वचनात याचे उत्तर आहे. तेथे म्हटले आहे: “जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.” “जो आनंद त्याच्यापुढे होता,” त्याकडे येशूने कधीही कानाडोळा केला नाही.

१९ येशूपुढे कोणता आनंद होता? परीक्षा सहन करून आपण यहोवाच्या नावाचे पवित्रिकरण करू शकतो, हे येशूला माहीत होते. सैतान लबाड आहे याचे खणखणीत उत्तर तो देऊ शकत होता. यापेक्षा आणखी कोणतीच गोष्ट नव्हती जिच्यामुळे येशू आनंदी झाला असता. विश्वासू राहिल्यामुळे, स्वर्गात आपल्या पित्यासोबत पुन्हा असण्याचे अप्रतिम प्रतिफळ आपल्याला मिळेल, हे त्याला माहीत होते. ही आनंददायक आशा त्याने त्याच्या सर्वात कठीण काळांतही डोळ्यांपुढे ठेवली. आपणही असेच केले पाहिजे. आपल्यापुढेही आनंद आहे. यहोवाने आपल्या प्रत्येकाला त्याचे महान नाव पवित्र करण्याचा सुहक्क देऊन सन्मानित केले आहे. यहोवाला आपला सार्वभौम शासक निवडण्याद्वारे आणि आपल्यावर कोणतीही परीक्षा आली अथवा आपल्यासमोर कोणताही मोह आला, तरी आपल्या स्वर्गीय पित्याच्या प्रेमात सुरक्षितपणे टिकून राहण्याद्वारे आपण सैतानाला लबाड ठरवू शकतो.

२०. आपली विचारसरणी सकारात्मक व आशादायक ठेवण्यास कोणती गोष्ट तुम्हाला मदत करेल?

२० आपल्या विश्वासू सेवकांना प्रतिफळ देण्याची यहोवाची फक्त इच्छाच नाही तर असे करण्यास तो आतुरही आहे. (यशया ३०:१८; मलाखी ३:१०) त्यांच्या अंतःकरणातील योग्य इच्छा पूर्ण करण्यास त्याला खूप आनंद होतो. (स्तोत्र ३७:४) तेव्हा, तुमच्यासमोर असलेल्या आशेवरून तुमचे लक्ष इतरत्र भरकटू देऊ नका. सैतानी जगाच्या नकारात्मक, हिणकस व विकृत विचारसरणीचा स्वतःवर परिणाम होऊ देऊ नका. या जगाची मनोवृत्ती तुमच्या मनात किंवा अंतःकरणात हळूच शिरकाव करू पाहत आहे, अशी तुम्हाला चुणूक जरी लागली तरी लगेच ‘सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेल्या देवाच्या शांतीसाठी’ कळकळीने प्रार्थना करा. ही शांती तुमचे अंतःकरण आणि तुमचे विचार सुरक्षित ठेवेल.—फिलिप्पैकर ४:६, ७.

२१, २२. (क) ‘मोठ्या लोकसमुदायापुढे’ कोणती भव्य आशा आहे? (ख) ख्रिस्ती आशेतला कोणता पैलू तुम्हाला जास्त महत्त्वाचा वाटतो आणि तुमचा काय निश्चय आहे?

२१ मनन करायला तुमच्याजवळ किती अद्‌भुत आशा आहे. तुम्ही जर “मोठ्या संकटातून” बचावणाऱ्या ‘मोठ्या लोकसमुदायापैकी’ एक आहात तर लवकरच तुम्हाला किती उत्तम जीवन मिळणार आहे याचा विचार करा. (प्रकटीकरण ७:९, १४) सैतान आणि दुरात्मे तेव्हा नसल्यामुळे तुम्ही अशा एका निश्‍चिंत वातावरणात राहाल जे कदाचित तुम्हाला आता इतक्या चांगल्या प्रकारे समजणार नाही. कारण आपल्यापैकी कोण असा आहे ज्याच्या जीवनावर, सैतानाच्या भ्रष्ट प्रभावाचा दबाव नाही? हा दबाव नाहीसा झाल्यानंतर, येशूच्या व त्याच्या १,४४,००० स्वर्गीय सहराजांच्या मार्गदर्शनाखाली या पृथ्वीला नंदनवन बनवण्याचे तृप्तीदायक काम आपल्या सर्वांसमोर आहे. सर्व प्रकारचे आजार, सर्व प्रकारच्या व्याधी इतिहासजमा झालेल्या पाहण्यास, आपल्या मृत प्रिय जनांचे कबरेतून स्वागत करण्यास आणि देवाची सुरुवातीला जशी इच्छा होती त्याच प्रकारच्या जीवनाची आशा प्राप्त करण्यास आपल्याला किती आनंद वाटेल. जसजसे आपण परिपूर्ण होत जाऊ तसतसे आपल्याला आणखी एक मोठे प्रतिफळ मिळेल. रोमकर ८:२१ मध्ये सांगितल्यानुसार आपल्याला, “देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता” मिळू शकेल.

२२ तुम्ही कल्पनाही करू शकत नाही इतके भव्य स्वातंत्र्य तुम्हाला मिळावे अशी यहोवाची इच्छा आहे. पण हे स्वातंत्र्य, आपल्या आज्ञाधारकतेवर निर्भर आहे. मग, दररोज यहोवाच्या आज्ञेत राहण्याकरता तुम्ही करत असलेले प्रयत्न योग्य नाहीत का? तेव्हा, आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करत राहा जेणेकरून तुम्ही चिरकालासाठी देवाच्या प्रेमात टिकून राहू शकाल!

^ परि. 12 शास्त्रज्ञांचे असे म्हणणे आहे, की आपण जसजसे वाढत राहतो तसतसे आपल्या शरीरात एक खास प्रकारची शक्ती तयार होते जिच्यामुळे आपल्या शरीराला, उठबस करण्यास व आपल्या शरीराच्या अवयवांच्या हालचालीमध्ये ताळमेळ राखण्यास मदत होते. उदाहरणार्थ, या शक्तीमुळे आपण, डोळे बंद करूनही टाळी वाजवू शकतो. एका स्त्रीच्या शरीरातली ही शक्ती नाहीशी झाली तेव्हा ती उभी राहू शकत नव्हती, चालू शकत नव्हती किंवा सरळ बसूही शकत नव्हती.