व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय १२

“यहोवाने दिलेल्या अधिकारामुळे धैर्याने” संदेश सांगा”

“यहोवाने दिलेल्या अधिकारामुळे धैर्याने” संदेश सांगा”

पौल आणि बर्णबा नम्रता, धीर आणि धैर्य दाखवतात

प्रे. कार्यं १४:१-२८ वर आधारित

१, २. पौल आणि बर्णबा लुस्त्रमध्ये असताना कोणत्या घटना घडतात?

 लुस्त्र शहरात गोंधळ माजला आहे. जन्मापासून पांगळा असलेल्या एका माणसाला, दोन अनोळखी माणसांनी बरं केल्यामुळे तो आनंदाने उड्या मारत आहे. लोकसुद्धा आश्‍चर्यचकित झाले आहेत. तेवढ्यात एक पुजारी या दोन माणसांसाठी हार घेऊन येतो, कारण या चमत्कारामुळे लोक त्यांना देव समजू लागतात. झ्यूस देवाचा पुजारी बैलांचा बळी देण्याची तयारी करू लागतो, तेव्हा बैल हंबरडा फोडतात. पौल आणि बर्णबा ओरडून या गोष्टींना विरोध करतात. त्यांना या मोठ्या गर्दीला आवरणं कठीण होत आहे. ते आपले कपडे फाडतात आणि जमलेल्या लोकांना विनंती करतात, की त्यांनी त्यांची उपासना करू नये.

काही वेळाने पिसिदियाचं अंत्युखिया आणि इकुन्या इथून यहुदी विरोधक येतात. ते लुस्त्रच्या लोकांना पौल आणि बर्णबाबद्दल खोटं सांगून भडकवतात. काही वेळाआधीच पौलची उपासना करायला निघालेले लोक, आता त्याला चारही बाजूने घेरतात आणि बेशुद्ध होईपर्यंत दगडमार करतात. शेवटी त्यांचा राग शांत होतो. बेशुद्ध झालेल्या पौलला ते फरफटत शहराबाहेर नेतात आणि तो मेला आहे असं समजून त्याला तिथेच सोडून देतात.

३. या अध्यायात आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

लुस्त्रमध्ये ही घटना कशामुळे घडली? बर्णबा, पौल आणि त्यांच्याबद्दल आपलं मत सहज बदलणाऱ्‍या लुस्त्रच्या लोकांकडून, आजच्या काळात आनंदाच्या संदेशाची घोषणा करणारे काय शिकू शकतात? तसंच, ख्रिस्ती मंडळीतले वडील, प्रचारात “यहोवाने दिलेल्या अधिकारामुळे धैर्याने” बोलण्याबद्दल पौल आणि बर्णबा यांच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतात?​—प्रे. कार्यं १४:३.

“पुष्कळ . . . लोकांनी विश्‍वास स्वीकारला” (प्रे. कार्यं १४:१-७)

४, ५. पौल आणि बर्णबा इकुन्याला का गेले, आणि तिथे काय झालं?

या घटनेच्या काही दिवसांपूर्वी पिसिदियाचं अंत्युखिया या रोमन शहरातल्या यहुदी विरोधकांनी, लोकांना पौल आणि बर्णबा यांच्याविरुद्ध भडकवलं आणि शहराबाहेर घालवलं. या शहरातल्या लोकांनी प्रतिसाद न दिल्यामुळे निराश होण्याऐवजी या दोघांनी त्यांच्याविरुद्ध “आपल्या पायांची धूळ झटकली.” (प्रे. कार्यं १३:५०-५२; मत्त. १०:१४) विरोध करणाऱ्‍या या लोकांचा न्याय करणं देवाच्या हातात सोडून, पौल आणि बर्णबा शांतपणे तिथून निघून गेले. (प्रे. कार्यं १८:५, ६; २०:२६) आणि आनंदाने आपल्या प्रचार दौऱ्‍यावर पुढे निघाले. दक्षिणपूर्वेकडे १५० किलोमीटरचा प्रवास करून, ते टॉरस आणि सुलतान पर्वत रांगांच्या मध्ये असलेल्या एका सुपीक सपाट प्रदेशात आले.

पौल आणि बर्णबा सर्वात आधी इकुन्या इथे थांबले. या शहरावर ग्रीक संस्कृतीचा प्रभाव होता आणि ते गलतीया या रोमन प्रांताच्या मुख्य शहरांपैकी एक होतं. a या शहरात यहुदी आणि यहुदी धर्म स्वीकारलेले अनेक लोक राहत होते. नेहमीप्रमाणे पौल आणि बर्णबा सभास्थानात गेले आणि प्रचार करू लागले. (प्रे. कार्यं १३:५, १४) “ते इतक्या प्रभावीपणे बोलले, की पुष्कळ यहुदी आणि ग्रीक लोकांनी विश्‍वास स्वीकारला.”​—प्रे. कार्यं १४:१.

६. पौल आणि बर्णबा प्रभावी शिक्षक का होते, आणि आपण त्यांचं अनुकरण कसं करू शकतो?

पौल आणि बर्णबा यांचं बोलणं इतकं प्रभावी का होतं? पौलला शास्त्रवचनांचं चांगलं ज्ञान होतं. त्याने इतिहास, भविष्यवाण्या आणि मोशेचं नियमशास्त्र यांतल्या पुराव्यांचा कुशलतेने वापर करून, येशू हाच वचन दिलेला मसीहा आहे हे सिद्ध केलं. (प्रे. कार्यं १३:१५-३१; २६:२२, २३) बर्णबाच्या बोलण्यातून लोकांबद्दल त्याला असलेली काळजी दिसून आली. (प्रे. कार्यं ४:३६, ३७; ९:२७; ११:२३, २४) ते दोघंही स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून न राहता, “यहोवाने दिलेल्या अधिकारामुळे” धैर्याने बोलले. आपल्या प्रचारकार्यात तुम्ही या दोन मिशनरी बांधवांचं अनुकरण कसं करू शकता? तुम्ही पुढे दिलेल्या गोष्टी करू शकता: देवाच्या वचनाचं चांगलं ज्ञान घ्या. तुमच्या ऐकणाऱ्‍यांच्या मनाला स्पर्श करतील अशी शास्त्रवचनं निवडा. प्रचारात भेटणाऱ्‍या लोकांना सांत्वन देण्याचे व्यावहारिक मार्ग शोधा. आणि आपल्या बुद्धीच्या आधारावर नाही, तर नेहमी यहोवाच्या वचनाच्या आधारावर शिकवा.

७. (क) आनंदाच्या संदेशाचे कोणते परिणाम होतात? (ख) आनंदाच्या संदेशाचा स्वीकार केल्यामुळे तुमच्या कुटुंबात फूट पडली असेल, तर तुम्ही कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

पण पौल आणि बर्णबा यांचं बोलणं ऐकून इकुन्याच्या सर्वच लोकांना आनंद झाला नाही. लूक म्हणतो, “विश्‍वास न ठेवलेल्या यहुद्यांनी विदेशी लोकांना भडकवलं आणि बांधवांविरुद्ध त्यांची मनं दूषित केली.” पौल आणि बर्णबा यांनी ओळखलं की त्यांना आनंदाच्या संदेशाबद्दल सत्य सांगण्यासाठी तिथेच थांबावं लागेल. ते “बराच काळ तिथे राहिले” आणि “धैर्याने” लोकांना सत्याविषयी सांगत राहिले. याचा परिणाम असा झाला, की “शहरातल्या लोकांमध्ये फूट पडली होती. काहींनी यहुद्यांची बाजू घेतली तर काहींनी प्रेषितांची.” (प्रे. कार्यं १४:२-४) आजही आनंदाच्या संदेशामुळे असाच परिणाम होतो. हा आनंदाचा संदेश काही जणांना एकत्र आणतो, तर इतरांना एकमेकांपासून वेगळं करतो. (मत्त. १०:३४-३६) तुम्ही आनंदाच्या संदेशाचा स्वीकार केल्यामुळे, कदाचित तुमच्याही कुटुंबात फूट पडली असेल. पण लक्षात ठेवा की कुटुंबातले सदस्य सहसा, एखादी अफवा किंवा कोणी मुद्दामहून दिलेली खोटी माहिती ऐकून तुमचा विरोध करत असतात. तुमच्या चांगल्या वागणुकीमुळे त्या गोष्टी खोट्या आहेत, हे तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांना कळेल. काही काळाने ते तुमचा विरोध करायचं सोडून तुमच्याशी चांगलं वागू लागतील.​—१ पेत्र २:१२; ३:१, २.

८. पौल आणि बर्णबा इकुन्यामधून का निघून गेले, आणि यातून आपण कोणता धडा शिकतो?

काही काळाने इकुन्यामधल्या विरोधकांनी पौल आणि बर्णबा यांना दगडमार करण्याचा कट रचला. ही गोष्ट जेव्हा या दोघा बांधवांना कळली, तेव्हा त्यांनी तिथून प्रचार करण्यासाठी दुसरीकडे जाण्याचा निर्णय घेतला. (प्रे. कार्यं १४:५-७) राज्य प्रचारकांनी आजही अशीच सावधगिरी बाळगली पाहिजे. आपल्यावर खोटे आरोप लावले जातात, तेव्हा आपण धैर्याने आपली बाजू मांडतो. (फिलिप्पै. १:७; १ पेत्र ३:१३-१५) पण मारहाण होण्याची शक्यता असेल, तर आपण अशी कोणतीही गोष्ट करण्याचं टाळू, ज्यामुळे आपल्या किंवा बांधवांच्या जीवाला धोका निर्माण होईल.​—नीति. २२:३.

“जिवंत देवाकडे वळावं” (प्रे. कार्यं १४:८-१९)

९, १०. लुस्त्र शहर कुठे होतं, आणि तिथल्या लोकांबद्दल आपल्याला कोणती माहिती आहे?

यानंतर पौल आणि बर्णबा लुस्त्रला गेले. रोमच्या अधिकाराखाली असलेलं हे शहर, इकुन्याच्या दक्षिणपश्‍चिम दिशेला सुमारे ३० किलोमीटर अंतरावर होतं. लुस्त्र आणि पिसिदियाचं अंत्युखिया या शहरांमध्ये घनिष्ठ संबंध होते. पण अंत्युखियाप्रमाणे लुस्त्र इथे जास्त यहुदी लोक राहत नव्हते. तिथल्या लोकांना कदाचित ग्रीक भाषा बोलता येत असावी, पण लुकवनियाची भाषा ही त्यांची मातृभाषा होती. कदाचित, या शहरात सभास्थान नसल्यामुळे पौल आणि बर्णबा एका सार्वजनिक ठिकाणी प्रचार करू लागले. यरुशलेममध्ये असताना, पेत्रने जन्मापासून अपंग असलेल्या एका माणसाला बरं केलं होतं. आता लुस्त्रमध्ये पौल जन्मापासून पांगळा असलेल्या एका माणसाला बरं करतो. (प्रे. कार्यं १४:८-१०) पेत्रने चमत्कार केल्यामुळे अनेक लोक विश्‍वासात आले होते. (प्रे. कार्यं ३:१-१०) पण पौलने केलेल्या चमत्कारामुळे अगदी वेगळाच परिणाम झाला.

१० आपण या अध्यायाच्या सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे, जेव्हा तो पांगळा माणूस चालू लागला, तेव्हा लुस्त्रमधल्या खोट्या देवतांची उपासना करणाऱ्‍या लोकांचा लगेच गैरसमज झाला. त्यांनी बर्णबाला देवतांमधला प्रमुख झ्यूस, असं म्हटलं; तर पौलला झ्यूसचा मुलगा आणि देवांचा संदेश सांगणारा हर्मेस असं म्हटलं. (“ लुस्त्र शहर आणि झ्यूस व हर्मेस देवतांची उपासना” ही चौकट पाहा.) पण, बर्णबा आणि पौल लोकांना समजवू लागले. आपण खोट्या देवतांच्या अधिकाराने नाही, तर एकच खरा देव यहोवा याच्या अधिकाराने बोलत आणि कार्य करत आहोत, हे त्यांना लोकांना पटवून द्यायचं होतं.​—प्रे. कार्यं १४:११-१४.

“निरर्थक गोष्टी सोडून जिवंत देवाकडे वळावं, . . . कारण त्याच देवाने आकाश, पृथ्वी, समुद्र आणि त्यांतल्या सगळ्या गोष्टी बनवल्या.”​—प्रे. कार्यं १४:१५

११-१३. (क) पौल आणि बर्णबा यांनी लुस्त्रच्या रहिवाशांना काय म्हटलं? (ख) पौल आणि बर्णबा यांच्या शब्दांतून आपल्याला कोणता धडा शिकायला मिळतो?

११ इतका गोंधळ उडालेला असतानाही, पौल आणि बर्णबा यांनी लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. या अहवालातून, लूकने आपल्याला खोट्या देवतांची उपासना करणाऱ्‍या लोकांना आनंदाचा संदेश सांगण्याचा एक प्रभावी मार्ग सांगितला आहे. पौल आणि बर्णबा यांनी आपल्या ऐकणाऱ्‍यांच्या मनापर्यंत पोहोचण्याचा कसा प्रयत्न केला याकडे लक्ष द्या: “लोकांनो, तुम्ही हे सगळं का करताय? आम्हीही तुमच्यासारखीच साधीसुधी माणसं आहोत. आणि तुम्ही या निरर्थक गोष्टी सोडून जिवंत देवाकडे वळावं, म्हणून आम्ही तुम्हाला एक आनंदाचा संदेश सांगतोय. कारण त्याच देवाने आकाश, पृथ्वी, समुद्र आणि त्यांतल्या सगळ्या गोष्टी बनवल्या. पूर्वीच्या काळात देवाने सगळ्या राष्ट्रांना आपापल्या मार्गांनी चालत राहायची परवानगी दिली होती. पण त्याने स्वतःबद्दल साक्ष द्यायचं सोडलं नाही. उलट, आकाशातून पाऊस आणि फलदायी ऋतू देऊन, अन्‍नधान्याने तुम्हाला तृप्त करून आणि तुमची मनं आनंदाने भरून तो तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी करत राहिला.”​—प्रे. कार्यं १४:१५-१७.

१२ विचार करायला लावणाऱ्‍या या शब्दांमधून आपण कोणते धडे शिकू शकतो? पहिला, पौल आणि बर्णबा यांनी स्वतःला आपल्या ऐकणाऱ्‍यांपेक्षा श्रेष्ठ समजलं नाही. त्यांनी देव असल्याचं सोंग घेतलं नाही. याउलट, आपला संदेश ऐकणाऱ्‍या त्या मूर्तिपूजक लोकांसारख्याच दुर्बलता आपल्यामध्येही आहेत, हे त्यांनी नम्रपणे कबूल केलं. हे खरं आहे, की पौल आणि बर्णबा यांना पवित्र शक्‍ती मिळाली होती आणि खोट्या शिकवणींपासून त्यांची सुटका झाली होती. तसंच, ख्रिस्तासोबत राज्य करण्याची आशासुद्धा त्यांना मिळाली होती. पण, लुस्त्रच्या लोकांनी ख्रिस्ताच्या आज्ञांचं पालन केलं, तर हे सर्व आशीर्वाद त्यांनाही मिळू शकतात याची त्या दोघांना जाणीव होती.

१३ आपण ज्यांना प्रचार करतो त्यांच्याविषयी आपली मनोवृत्ती कशी आहे? आपण त्यांना आपल्या बरोबरीचे समजतो का? इतरांना देवाच्या वचनातलं सत्य शिकवताना, पौल आणि बर्णबा यांच्याप्रमाणे आपण दुसऱ्‍यांची प्रशंसा मिळवण्याचं टाळतो का? चार्ल्‌झ टेझ रस्सल यांचं उदाहरण घ्या. ते फार प्रभावशाली शिक्षक होते. १९ व्या शतकाच्या शेवटी आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीला ते प्रचार कार्याचं नेतृत्व करत होते. त्यांनी लिहिलं: “लोकांनी आमची किंवा आमच्या लिखाणाची प्रशंसा करावी किंवा त्याबद्दल आमचा गौरव करावा अशी आमची इच्छा नाही; तसंच, कोणीही आमच्यासाठी रेव्हरंड (पूज्य) किंवा रब्बी अशा पदव्यांचाही वापर करू नये.” बंधू रस्सल यांनी खरोखर पौल आणि बर्णबा यांच्यासारखीच नम्र मनोवृत्ती दाखवली. त्याच प्रकारे, आपणही आपला गौरव व्हावा या उद्देशाने प्रचार करत नाही, तर लोकांना “जिवंत देवाकडे” यायला मदत करण्यासाठी आपण हे काम करतो.

१४-१६. पौल आणि बर्णबा यांनी लुस्त्रच्या लोकांना जे सांगितलं त्यावरून आपण आणखी कोणते दोन धडे शिकू शकतो?

१४ पौल आणि बर्णबा यांच्या बोलण्यातून आपण आणखी एक धडा शिकू शकतो. ते दोघंही आपल्या शिकवण्याच्या पद्धतीत परिस्थितीनुसार बदल करायला तयार होते. इकुन्यामध्ये असलेल्या यहुदी आणि यहुदी धर्म स्वीकारलेल्या लोकांप्रमाणे लुस्त्रच्या लोकांना शास्त्रवचनांचं जास्त ज्ञान नव्हतं; तसंच, इस्राएल राष्ट्राशी देवाने कशा प्रकारे व्यवहार केला होता, याबद्दलही त्यांना जास्त माहिती नव्हती. पौल आणि बर्णबा यांचा संदेश ऐकणारे, प्रामुख्याने शेती करणारे लोक होते. लुस्त्रची जमीन सुपीक होती आणि तिथलं हवामानही चांगलं होतं. त्यामुळे, हे लोक त्यांच्याभोवती असलेला निसर्ग आणि वेगवेगळ्या ऋतूंमध्ये उत्पन्‍न होणारं भरपूर पीक, यांसारख्या गोष्टींतून सृष्टिकर्त्या देवाचे अनेक गुण पाहू शकत होते. आणि याच गोष्टीचा आधार घेऊन, पौल आणि बर्णबा यांनी त्यांना विचार करायला भाग पाडलं.​—रोम. १:१९, २०.

१५ आपणही अशाच प्रकारे आपल्या शिकवण्याच्या पद्धतीत बदल करायला तयार असतो का? एखादा शेतकरी कदाचित वेगवेगळ्या शेतांमध्ये एकाच प्रकारचं बी पेरेल. पण, प्रत्येक शेतातली जमीन लागवडीसाठी तयार करताना त्याला वेगवेगळ्या पद्धती वापराव्या लागतील. एखाद्या शेतातली जमीन आधीपासूनच मऊ असेल. त्यामुळे, तिथे बी पेरणं त्याला सोपं जाईल. तर दुसऱ्‍या शेतात कदाचित जमीन तयार करण्यासाठी त्याला जास्त मेहनत घ्यावी लागेल. त्याच प्रकारे आपण जे बी पेरतो, ते एकाच प्रकारचं असतं. हे बी म्हणजे देवाच्या वचनातला राज्याचा संदेश. पण, आपल्याला पौल आणि बर्णबा यांच्यासारखं व्हायचं असेल, तर आपण ज्यांना प्रचार करतो त्या लोकांची परिस्थिती आणि त्यांचे धार्मिक विश्‍वास जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मग या माहितीनुसार आपण राज्याचा संदेश सांगण्याच्या आपल्या पद्धतीत आवश्‍यक ते बदल केले पाहिजेत.​—लूक ८:११, १५.

१६ पौल, बर्णबा आणि लुस्त्रच्या लोकांबद्दल असलेल्या या अहवालातून आपण एक तिसरा धडाही शिकू शकतो. मनापासून प्रयत्न करूनही कधीकधी आपण पेरलेलं बी हिरावून घेतलं जातं, किंवा ते खडकाळ जमिनीवर पडतं. (मत्त. १३:१८-२१) तुमच्या बाबतीत असं झालं तर निराश होऊ नका. पौलने नंतर रोममध्ये असलेल्या शिष्यांना अशी आठवण करून दिली, की “आपल्यापैकी प्रत्येक जण [आपण जिच्यासोबत देवाच्या वचनाबद्दल चर्चा करतो अशी प्रत्येक व्यक्‍तीही] स्वतःबद्दल देवाला हिशोब देईल.”​—रोम. १४:१२.

त्यांनी त्यांना “यहोवाच्या हाती सोपवून दिलं” (प्रे. कार्यं १४:२०-२८)

१७. दर्बेहून निघाल्यावर पौल आणि बर्णबा कुठे गेले, आणि का?

१७ लुस्त्रच्या लोकांनी पौलला शहराबाहेर फरफटत नेऊन तो मेला आहे असं समजून तिथेच सोडून दिलं. त्यानंतर शिष्य त्याच्याभोवती जमले आणि रात्र काढण्यासाठी त्यांनी शहरात आसरा शोधला. दुसऱ्‍याच दिवशी, पौल आणि बर्णबा १०० किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या दर्बेच्या प्रवासाला निघाले. काही तासांपूर्वीच पौलला दगडमार झाली होती. त्यामुळे हा कठीण प्रवास करताना त्याला किती त्रास होत असेल, याची आपण फक्‍त कल्पनाच करू शकतो. असं असूनही, पौल आणि बर्णबा यांनी धीराने तो प्रवास पूर्ण केला. दर्बेला आल्यावर त्यांनी ‘पुष्कळ शिष्य’ केले. यानंतर, जवळच्या रस्त्याने आपल्या नेहमीच्या मुक्कामाच्या ठिकाणी, म्हणजे सीरियाच्या अंत्युखियाला जाण्याऐवजी “ते लुस्त्र, इकुन्या आणि [पिसिदियाच्या] अंत्युखियाला परत आले.” कशासाठी? तर, तिथल्या शिष्यांना धीर देऊन त्यांना विश्‍वासात टिकून राहण्याचं प्रोत्साहन देण्यासाठी. (प्रे. कार्यं १४:२०-२२) खरंच, या दोघा प्रचारकांनी आपल्यासाठी किती सुंदर उदाहरण मांडलं आहे! स्वतःच्या सोयीचा विचार करण्याऐवजी त्यांनी मंडळीच्या फायद्याचा विचार केला. आपल्या काळातही प्रवासी पर्यवेक्षक आणि मिशनरी बांधव त्यांच्या या उदाहरणाचं अनुकरण करतात.

१८. वडिलांना नियुक्‍त करण्यात कोणत्या गोष्टी सामील आहेत?

१८ शिष्यांना आपल्या शब्दांनी आणि उदाहरणाने प्रोत्साहन देण्यासोबतच, पौल आणि बर्णबा यांनी “प्रत्येक मंडळीत वडिलांना नियुक्‍त केलं.” त्यांना या मिशनरी दौऱ्‍यावर जरी “पवित्र शक्‍तीद्वारे पाठवण्यात” आलं होतं, तरीही या वडिलांना “यहोवाच्या हाती सोपवून” देण्याआधी, त्या दोघांनी उपवास आणि प्रार्थना केली. (प्रे. कार्यं १३:१-४; १४:२३) आजही असंच केलं जातं. एखाद्या बांधवाला नियुक्‍त करण्याची शिफारस करण्याआधी, तो बांधव शास्त्रात दिलेल्या योग्यता पूर्ण करत आहे का, यावर मंडळीतला वडीलवर्ग प्रार्थनापूर्वक विचार करतो. (१ तीम. ३:१-१०, १२, १३; तीत १:५-९; याक. ३:१७, १८; १ पेत्र ५:२, ३) तो बांधव किती काळापासून सत्यात आहे हा मुख्य मुद्दा नसतो. याऐवजी, त्याचं वागणं-बोलणं आणि मंडळीत त्याचं नाव कसं आहे याचा विचार केला जातो. कारण याच गोष्टींवरून दिसून येतं, की त्याच्या जीवनावर पवित्र शक्‍तीचा किती प्रभाव आहे. देवाच्या वचनात देखरेख करणाऱ्‍यांसाठी दिलेल्या पात्रता तो पूर्ण करत असेल, तरच त्याला कळपाची देखरेख करणारा म्हणून सेवा करण्यासाठी नियुक्‍त केलं जातं. (गलती. ५:२२, २३) विभागीय पर्यवेक्षकांवर भावांना नियुक्‍त करायची जबाबदारी असते.​—१ तीमथ्य ५:२२ सोबत तुलना करा.

१९. वडिलांना कोणत्या गोष्टीची जाणीव असते, आणि ते पौल आणि बर्णबा यांचं अनुकरण कसं करतात?

१९ नियुक्‍त केलेल्या वडिलांना या गोष्टीची जाणीव असते, की ते मंडळीतल्या बांधवांशी जसे वागतात त्यासाठी त्यांना यहोवाला उत्तर द्यावं लागेल. (इब्री १३:१७) पौल आणि बर्णबा यांच्याप्रमाणेच, आजच्या काळातही वडील प्रचारकार्यात पुढाकार घेतात. ते बांधवांना त्यांच्या शब्दांनी प्रोत्साहन देतात. आणि ते स्वतःच्या सोयीपेक्षा मंडळीच्या फायद्याचा जास्त विचार करतात.​—फिलिप्पै. २:३, ४.

२०. ख्रिस्ती बांधवांनी केलेल्या विश्‍वासू सेवेबद्दलचे अहवाल वाचल्यामुळे आपल्याला कसा फायदा होईल?

२० शेवटी पौल आणि बर्णबा सीरियाच्या अंत्युखियाला परत आले. मिशनरी दौरा करताना ते सहसा या ठिकाणीच मुक्काम करायचे. तिथे त्यांनी, “देवाने आपल्याद्वारे केलेल्या बऱ्‍याच गोष्टींबद्दल त्यांना सांगितलं. तसंच, देवाने कशा प्रकारे विदेश्‍यांसाठीही विश्‍वासाचं दार उघडलं होतं,” याबद्दल बांधवांना सांगितलं. (प्रे. कार्यं १४:२७) आपण जेव्हा आपल्या ख्रिस्ती बांधवांनी केलेल्या विश्‍वासू सेवेबद्दल वाचतो आणि यहोवाने त्यांच्या प्रयत्नांवर कसा आशीर्वाद दिला हे पाहतो, तेव्हा आपल्यालाही “यहोवाने दिलेल्या अधिकारामुळे धैर्याने” संदेश सांगत राहण्याचं प्रोत्साहन मिळतं.