व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय १४

“आम्ही . . . एकमताने ठरवलं” आहे

“आम्ही . . . एकमताने ठरवलं” आहे

नियमन मंडळाने घेतलेला निर्णय आणि त्यामुळे मंडळ्यांमध्ये निर्माण झालेली एकता

प्रे. कार्यं १५:१३-३५ वर आधारित

१, २. (क) पहिल्या शतकातल्या नियमन मंडळासमोर कोणते गंभीर प्रश्‍न आहेत? (ख) योग्य निर्णयावर येण्यासाठी या बांधवांना कोणती मदत मिळाली आहे?

 यरुशलेममध्ये एका खोलीत जमलेले सर्व प्रेषित आणि वडील उत्सुकतेने एकमेकांकडे पाहत आहेत. हा एक अतिशय महत्त्वाचा क्षण आहे याची त्या सर्वांनाच जाणीव आहे. सुंतेच्या विषयावरून बरेच गंभीर प्रश्‍न उभे राहिले आहेत. ख्रिश्‍चनांनी मोशेच्या नियमशास्त्राचं पालन करणं गरजेचं आहे का? यहुदी आणि विदेशी ख्रिश्‍चनांमध्ये काही फरक असला पाहिजे का?

हा वाद सोडवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्‍या बांधवांनी बऱ्‍याच पुराव्यांवर विचार केला आहे. देवाच्या वचनात दिलेल्या भविष्यवाण्या, तसंच विदेश्‍यांवर यहोवाने दिलेल्या आशीर्वादाबद्दल प्रेषितांनी दिलेली साक्षही त्यांनी विचारात घेतली आहे. सर्वांनीच आपापली मतं मोकळेपणाने व्यक्‍त केली आहेत. हा वाद सोडवण्यासाठी आता त्यांच्याजवळ भरपूर पुरावे आहेत. कोणता निर्णय घ्यायचा हे यहोवाची पवित्र शक्‍ती त्यांना अगदी स्पष्टपणे दाखवत आहे. पण प्रेषित आणि वडील पवित्र शक्‍तीच्या मार्गदर्शनाचा स्वीकार करणार आहेत का?

३. प्रेषितांची कार्यं पुस्तकातल्या १५ व्या अध्यायातल्या अहवालाचं परीक्षण केल्यामुळे आपल्याला कोणता फायदा होईल?

याबाबतीत पवित्र शक्‍तीचं मार्गदर्शन स्वीकारण्यासाठी त्यांना खरा विश्‍वास आणि धैर्य दाखवावं लागणार आहे. यहुदी धर्मपुढारी त्यांचा आणखीनच द्वेष करू लागतील हे निश्‍चित आहे. तसंच, मंडळीतल्या काही लोकांकडूनही विरोध होणार हेही त्यांना माहीत आहे. कारण हे विरोधक, देवाच्या उपासकांनी पूर्वीप्रमाणेच मोशेच्या नियमशास्त्राचं पालन केलं पाहिजे असं पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. मग नियमन मंडळाने काय निर्णय घेतला? आणि, आज यहोवाच्या साक्षीदारांचं नियमन मंडळ पहिल्या शतकातल्या नियमन मंडळाच्या उदाहरणाचं पालन कसं करत आहे? चला, पाहू या. ख्रिस्ती म्हणून जगत असताना आपल्याला जेव्हा निर्णय घ्यावे लागतात किंवा समस्यांना तोंड द्यावं लागतं, तेव्हा आपणही त्यांच्या याच उदाहरणाचं पालन केलं पाहिजे.

“संदेष्ट्यांच्या लिखाणांतसुद्धा असं म्हटलंय” (प्रे. कार्यं १५:१३-२१)

४, ५. चर्चेदरम्यान याकोबने देवाच्या वचनातल्या भविष्यवाण्यांमधून कोणती माहिती दिली?

मग येशूचा भाऊ, शिष्य याकोब बोलू लागला. a या प्रसंगी तोच सभेचा अध्यक्ष होता असं दिसतं. नियमन मंडळाचे सर्व सदस्य एकमताने ज्या निष्कर्षावर पोहोचले त्याचा सारांश त्याने सर्वांपुढे मांडला. जमलेल्या सर्वांना उद्देशून याकोब म्हणाला: “देवाने आपल्या नावाकरता लोक निवडण्यासाठी पहिल्यांदाच विदेशी लोकांकडे कशा प्रकारे आपलं लक्ष वळवलं, याबद्दल शिमोनने अगदी सविस्तरपणे आपल्याला सांगितलंय. आणि संदेष्ट्यांच्या लिखाणांतसुद्धा असं म्हटलंय.”​—प्रे. कार्यं १५:१४, १५.

शिमोन, म्हणजेच शिमोन पेत्र याने दिलेलं भाषण आणि बर्णबा व पौल यांनी दिलेले पुरावे, यांमुळे याकोबला कदाचित काही योग्य शास्त्रवचनांची आठवण झाली असेल. ही वचनं चर्चा केल्या जात असलेल्या विषयाशी संबंधित होती. (योहा. १४:२६) “संदेष्ट्यांच्या लिखाणांतसुद्धा असं म्हटलंय” हे सांगितल्यानंतर, याकोबने सर्वांना आमोस ९:११, १२ या वचनांतले शब्द सांगितले. आमोस हे पुस्तक हिब्रू शास्त्रवचनांच्या ज्या भागात होतं, त्याला सहसा “संदेष्टे” असं म्हटलं जायचं. (मत्त. २२:४०; प्रे. कार्यं १५:१६-१८) पण, याकोबने सांगितलेले शब्द हे आज आमोसच्या पुस्तकात आढळणाऱ्‍या शब्दांपेक्षा वेगळे आहेत असं तुम्हाला दिसेल. याचं कारण म्हणजे, कदाचित याकोबने ते शब्द सेप्ट्युजिंट  या हिब्रू शास्त्रवचनांच्या ग्रीक भाषांतरातून घेतले असावेत.

६. चर्चेदरम्यान विषयाची अचूक समज मिळण्यासाठी शास्त्रवचनांमुळे कशी मदत मिळाली?

संदेष्टा आमोस याच्याद्वारे यहोवाने अशा काळाबद्दल सांगितलं, जेव्हा तो “दावीदचा पडलेला तंबू” पुन्हा उभारेल. हे शब्द त्या राजवंशाला सूचित करत होते, ज्यातून मसीहाचं राज्य स्थापन होणार होतं. (यहे. २१:२६, २७) यहोवा पुन्हा एकदा यहुद्यांशी एक खास निवडलेलं राष्ट्र म्हणून व्यवहार करणार होता का? नाही. त्याच भविष्यवाणीत असं सांगण्यात आलं, की सर्व राष्ट्रांच्या  लोकांना, देवाच्या नावाने ओळखले जाणारे लोक म्हणून एकत्र आणलं जाईल. तुम्हाला आठवत असेल, की पेत्रने नुकतंच असं सांगितलं होतं, की देवाने “त्यांच्यात [विश्‍वासात आलेले विदेशी] आणि आपल्यात [यहुदी ख्रिस्ती] कोणताच भेदभाव केला नाही. तर, त्याने त्यांच्या विश्‍वासामुळे त्यांची अंतःकरणं शुद्ध केली.” (प्रे. कार्यं १५:९) दुसऱ्‍या शब्दांत, देवाचीच अशी इच्छा होती की यहुद्यांसोबत विदेश्‍यांनाही राज्यात वारस होण्यासाठी सामील केलं जावं. (रोम. ८:१७; इफिस. २:१७-१९) देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आलेल्या या भविष्यवाण्यांमध्ये असं कुठेही सांगण्यात आलं नव्हतं, की विश्‍वासात येणाऱ्‍या या विदेश्‍यांनी आधी शारीरिक सुंता करणं किंवा यहुदी धर्म स्वीकारणं गरजेचं आहे.

७, ८. (क) याकोबने कोणता प्रस्ताव मांडला? (ख) याकोबच्या शब्दांचा आपण कसा अर्थ घेतला पाहिजे?

शास्त्रवचनांतल्या या पुराव्यांमुळे आणि नुकत्याच देण्यात आलेल्या प्रभावी साक्षीमुळे याकोबने सर्वांसमोर एक प्रस्ताव मांडला: “तेव्हा माझा असा निर्णय आहे, की देवाकडे वळणाऱ्‍या विदेशी लोकांना आपण त्रास देऊ नये. तर त्यांना असं लिहून कळवावं, की त्यांनी मूर्तींनी दूषित झालेल्या गोष्टी, अनैतिक लैंगिक कृत्यं, गळा दाबून मारलेले प्राणी आणि रक्‍त यांपासून दूर राहावं. कारण मोशेच्या पुस्तकांतून या नियमांचं दर शब्बाथाच्या दिवशी प्रत्येक शहरातल्या सभास्थानांत, मोठ्याने वाचन करून उपदेश करणारी माणसं प्राचीन काळापासूनच आहेत.”​—प्रे. कार्यं १५:१९-२१.

“तेव्हा माझा असा निर्णय आहे” असं म्हणून याकोब, सभेचा अध्यक्ष या नात्याने सर्वांवर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करत होता का? किंवा तो सर्वांच्या वतीने स्वतःच निर्णय घेत होता का? मुळीच नाही. “माझा असा निर्णय आहे” असं भाषांतर केलेल्या ग्रीक शब्दांचा, “मला असं वाटतं” किंवा “माझं असं मत आहे” असाही अर्थ होऊ शकतो. तेव्हा याकोब नियमन मंडळावर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करत नव्हता, तर फक्‍त एक प्रस्ताव मांडत होता. आताच विचारात घेतलेल्या पुराव्यांच्या आणि शास्त्रवचनांच्या आधारावर तो असा एक मार्ग सुचवत होता, ज्यावर सर्वांनी विचार करायचा होता.

९. याकोबने सुचवलेल्या मार्गामुळे कोणते फायदे होणार होते?

याकोबने मांडलेला प्रस्ताव चांगला होता का? नक्कीच, कारण नंतर प्रेषितांनी आणि वडिलांनी तो मान्य केला. यामुळे कोणते फायदे झाले? याकोबने सुचवलेल्या मार्गामुळे विदेशी ख्रिश्‍चनांना मोशेच्या नियमशास्त्रातल्या आज्ञांचं पालन करण्याची सक्‍ती केली जाणार नव्हती. त्यामुळे आता त्यांना यहोवाची उपासना करताना कोणताही “त्रास” होणार नव्हता, किंवा उपासना करणं “कठीण जाणार” नव्हतं. (प्रे. कार्यं १५:१९; न्यू इंटरनॅशनल व्हर्शन ) तसंच, या निर्णयामुळे यहुदी ख्रिश्‍चनांच्या विवेकाबद्दलही आदर दाखवला जाणार होता. कारण, या बांधवांनी वर्षानुवर्षं “दर शब्बाथाच्या दिवशी प्रत्येक शहरातल्या सभास्थानांत, मोठ्याने वाचन” होताना ऐकलं होतं. b (प्रे. कार्यं १५:२१) याकोबने सुचवलेल्या प्रस्तावामुळे यहुदी आणि विदेशी ख्रिश्‍चनांमध्ये असलेले संबंध नक्कीच मजबूत होणार होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, यामुळे यहोवा देवाला आनंद होणार होता कारण हा निर्णय त्याच्या उद्देशाप्रमाणे होता. ज्या समस्येमुळे देवाच्या लोकांच्या मंडळीची एकता आणि शांती भंग झाली असती, ती सोडवण्याचा हा खरंच किती चांगला मार्ग होता! आणि आजच्या ख्रिस्ती मंडळीसाठीही हे किती उत्तम उदाहरण आहे!

ॲल्बर्ट श्रोडर, १९९८ या वर्षी एका आंतरराष्ट्रीय अधिवेशनात भाषण देताना

१०. आज नियमन मंडळ, पहिल्या शतकातल्या नियमन मंडळाचं कशा प्रकारे अनुकरण करतं?

१० याआधीच्या अध्यायात उल्लेख केल्याप्रमाणे, आजच्या काळात यहोवाच्या साक्षीदारांचं नियमन मंडळ पहिल्या शतकातल्या नियमन मंडळाचं अनुकरण करतं. हे बांधव सर्व गोष्टींत, विश्‍वाचा सर्वोच्च प्रभू यहोवा आणि मंडळीचं मस्तक असलेला येशू ख्रिस्त यांच्या मार्गदर्शनावर अवलंबून राहतात. c (१ करिंथ. ११:३) ते असं कशा प्रकारे करतात? ॲल्बर्ट श्रोडर, ज्यांनी १९७४ पासून ते मार्च २००६ मध्ये त्यांचं पृथ्वीवरचं जीवन संपेपर्यंत नियमन मंडळात सेवा केली, ते सांगतात: “दर बुधवारी नियमन मंडळाची सभा होते. या सभेची सुरुवात प्रार्थनेने केली जाते आणि यहोवाच्या पवित्र शक्‍तीच्या मार्गदर्शनासाठी विनंती केली जाते. प्रत्येक गोष्टीवर चर्चा करताना आणि प्रत्येक निर्णय घेताना तो देवाच्या वचनानुसार म्हणजेच बायबलनुसार असेल, याची विशेष काळजी घेतली जाते.” त्याच प्रकारे, मिल्टन जी. हेन्शेल यांच्या शब्दांवरही विचार करा. हेन्शेल यांनी बराच काळ नियमन मंडळात सेवा केली होती आणि त्यांचं पृथ्वीवरचं जीवन मार्च २००३ मध्ये संपलं. वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या १०१ व्या वर्गाच्या पदवीदान समारंभात त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना हा महत्त्वाचा प्रश्‍न विचारला: “पृथ्वीवर आज दुसरी कोणतीही अशी संघटना आहे का, जिचं नियमन मंडळ महत्त्वाचे निर्णय घेण्याआधी देवाचं वचन बायबल यातून मार्गदर्शन घेतं?” उत्तर अगदी स्पष्ट आहे.

“निवडलेल्या माणसांना . . . पाठवायचं ठरवलं” (प्रे. कार्यं १५:२२-२९)

११. नियमन मंडळाचा निर्णय मंडळ्यांना कशा प्रकारे कळवण्यात आला?

११ सुंतेविषयीच्या प्रश्‍नावर यरुशलेममधल्या नियमन मंडळाने शेवटी एकमताने निर्णय घेतला होता. पण, सर्व मंडळ्यांतल्या बांधवांना या निर्णयानुसार कार्य करता यावं म्हणून त्यांना स्पष्ट, प्रेमळ आणि प्रोत्साहन मिळेल अशा पद्धतीने या निर्णयाबद्दल कळवणं आवश्‍यक होतं. हे कशा प्रकारे करण्यात आलं? अहवालात असं सांगितलं आहे: “प्रेषितांनी, वडिलांनी आणि संपूर्ण मंडळीने त्यांच्यातल्या काही निवडलेल्या माणसांना पौल आणि बर्णबा यांच्यासोबत अंत्युखियाला पाठवायचं ठरवलं. त्यांनी बर्सब्बा म्हटलेला यहूदा आणि सीला यांना पाठवलं. ते बांधवांमध्ये नेतृत्व करत होते.” शिवाय, या माणसांसोबत एक पत्रही पाठवण्यात आलं. हे पत्र अंत्युखिया, सीरिया आणि किलिकियाच्या सर्व मंडळ्यांमध्ये वाचून दाखवलं जाणार होतं.​—प्रे. कार्यं १५:२२-२६.

१२, १३. (क) यहूदा आणि सीला यांना पाठवल्यामुळे आणि (ख) नियमन मंडळाकडून पत्र पाठवल्यामुळे कोणते चांगले परिणाम झाले?

१२ यहूदा आणि सीला “बांधवांमध्ये नेतृत्व” करत असल्यामुळे, ते नियमन मंडळातर्फे बांधवांना जाऊन भेटण्याकरता अगदी योग्य होते. हे चार बांधव मंडळ्यांमध्ये गेल्यामुळे सर्वांना हे अगदी स्पष्टपणे कळणार होतं, की त्यांनी आणलेला निरोप हा फक्‍त अंत्युखियाच्या बांधवांनी सुरुवातीला विचारलेल्या प्रश्‍नाचं उत्तर नव्हतं; तर, या बांधवांद्वारे नियमन मंडळाच्या स्पष्ट सूचना त्यांना कळवल्या जात होत्या. “निवडलेल्या” बांधवांना पाठवल्यामुळे यरुशलेममधले यहुदी ख्रिस्ती आणि इतर ठिकाणचे विदेशी ख्रिस्ती यांच्यामध्ये असलेले संबंध आणखी मजबूत होणार होते. खरंच, ही किती चांगली आणि प्रेमळ व्यवस्था होती! यामुळे नक्कीच देवाच्या लोकांमध्ये शांती आणि एकता वाढायला मदत झाली असेल.

१३ नियमन मंडळाच्या पत्राद्वारे विदेशी ख्रिश्‍चनांसाठी अगदी स्पष्ट मार्गदर्शन देण्यात आलं. त्यात फक्‍त सुंतेविषयी माहिती नव्हती, तर यहोवाची कृपा आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे, याबद्दलही सांगण्यात आलं होतं. पत्रात खासकरून असं म्हटलं होतं: “पवित्र शक्‍तीच्या मदतीने आम्ही या निष्कर्षावर पोहोचलो आहोत, की पुढे सांगितलेल्या आवश्‍यक गोष्टींशिवाय, इतर कोणत्याही गोष्टींचं ओझं तुमच्यावर लादू नये: मूर्तींना अर्पण केलेल्या गोष्टी, रक्‍त, गळा दाबून मारलेले प्राणी आणि अनैतिक लैंगिक कृत्यं यांपासून दूर राहा. या गोष्टींचं तुम्ही काळजीपूर्वक पालन केलं, तर तुमचं कल्याण होईल. आमच्या सदिच्छा नेहमी तुमच्यासोबत आहेत!”​—प्रे. कार्यं १५:२८, २९.

१४. जगात इतक्या फुटी असतानाही यहोवाच्या साक्षीदारांमध्ये एकता कशामुळे आहे?

१४ आज सबंध जगात यहोवाच्या साक्षीदारांची संख्या ८३ लाखांपेक्षा जास्त आहे आणि त्यांच्या एक लाखापेक्षा जास्त मंडळ्या आहेत. तरी, यहोवाच्या सर्व साक्षीदारांचे विश्‍वास आणि त्यांची उपासना करण्याची पद्धत सारखीच आहे. आज जगात इतके मतभेद आणि फुटी असताना यहोवाच्या साक्षीदारांमध्ये अशी एकता कशामुळे आहे? ही एकता असण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मंडळीचं मस्तक असलेला येशू ख्रिस्त “विश्‍वासू आणि बुद्धिमान दास” म्हणजे नियमन मंडळाद्वारे त्यांना स्पष्ट मार्गदर्शन देतो. (मत्त. २४:४५-४७) यहोवाच्या लोकांमध्ये एकता असण्याचं आणखी एक कारण म्हणजे, सबंध जगातले बांधव नियमन मंडळाच्या मार्गदर्शनाला आनंदाने सहकार्य देतात.

“प्रोत्साहन देणारं पत्र वाचून बांधवांना खूप आनंद झाला” (प्रे. कार्यं १५:३०-३५)

१५, १६. सुंतेविषयीचा वाद कशा प्रकारे सोडवण्यात आला, आणि हा चांगला परिणाम कशामुळे घडून आला?

१५ प्रेषितांची कार्यं यातला अहवाल पुढे सांगतो, की यरुशलेमहून आलेले बांधव अंत्युखियाला आले, तेव्हा “त्यांनी संपूर्ण मंडळीला एकत्र करून त्यांना हे पत्र दिलं.” तिथल्या बांधवांनी नियमन मंडळाकडून मिळालेल्या मार्गदर्शनाला कसा प्रतिसाद दिला? “ते प्रोत्साहन देणारं पत्र वाचून बांधवांना खूप आनंद झाला.” (प्रे. कार्यं १५:३०, ३१) शिवाय, यहूदा आणि सीला यांनी “बरीच भाषणं देऊन बांधवांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांचा विश्‍वास मजबूत केला.” म्हणूनच, या दोघांनाही बर्णबा, पौल आणि इतरांप्रमाणे “संदेष्टे” म्हणण्यात आलं आहे. संदेष्टा हा शब्द, देवाची इच्छा घोषित करणाऱ्‍या किंवा ती लोकांना सांगणाऱ्‍या व्यक्‍तीला सूचित करतो.​—प्रे. कार्यं १३:१; १५:३२; निर्ग. ७:१, २.

१६ या संपूर्ण व्यवस्थेवर यहोवाचा आशीर्वाद होता हे अगदी स्पष्ट होतं आणि म्हणूनच हा वाद चांगल्या प्रकारे सोडवण्यात आला. पण यामागचं मुख्य कारण काय होतं? नियमन मंडळाने देवाच्या वचनाच्या आणि पवित्र शक्‍तीच्या मार्गदर्शनाच्या आधारावर योग्य वेळी दिलेल्या स्पष्ट सूचनांमुळेच असं घडलं, यात काहीही शंका नाही. तसंच, नियमन मंडळाचे निर्णय मंडळ्यांना प्रेमळपणे आणि आपुलकीने कळवण्यात आले, हेही त्यामागचं एक कारण होतं.

१७. आज विभागीय पर्यवेक्षक कोणत्या काही गोष्टींमध्ये पहिल्या शतकात मंडळ्यांना भेटी देणाऱ्‍या बांधवांचं अनुकरण करतात?

१७ पहिल्या शतकातल्या नियमन मंडळाप्रमाणेच आजही यहोवाच्या साक्षीदारांचं नियमन मंडळ सबंध जगातल्या बांधवांना योग्य वेळी योग्य सूचना देतं. कोणतेही निर्णय घेतले जातात, तेव्हा मंडळ्यांना ते अगदी सरळ आणि स्पष्ट रीत्या कळवले जातात. हे निर्णय मंडळ्यांना कळवण्याचा एक मार्ग म्हणजे विभागीय पर्यवेक्षकांच्या भेटी. निःस्वार्थ मनोवृत्तीने काम करणारे हे बांधव सर्व मंडळ्यांना भेटी देऊन, स्पष्ट सूचना आणि प्रेमळ प्रोत्साहन देतात. पौल आणि बर्णबा यांच्याप्रमाणे ते सेवाकार्यासाठी बराच वेळ देतात आणि बांधवांसोबत मिळून लोकांना आनंदाचा संदेश सांगतात आणि त्याबद्दल शिकवतात. (प्रे. कार्यं १५:३५) यहूदा आणि सीला यांच्याप्रमाणे ते “बरीच भाषणं देऊन बांधवांना प्रोत्साहन” देतात.

१८. यहोवाचा आशीर्वाद मिळत राहावा यासाठी त्याच्या लोकांनी काय केलं पाहिजे?

१८ आणि मंडळ्यांबद्दल काय? आज जगात वेगवेगळ्या कारणांमुळे लोकांमध्ये फूट पडली आहे. अशा परिस्थितीत सबंध जगातल्या मंडळ्यांमध्ये शांती आणि एकता कशामुळे टिकून राहू शकते? शिष्य याकोबने नंतर जे लिहिलं होतं ते तुम्हाला आठवत असेल. त्याने लिहिलं: “वरून येणारी बुद्धी ही सर्वात आधी शुद्ध, मग शांतिप्रिय, समजूतदार, आज्ञाधारक, . . . असते. शिवाय, नीतिमत्त्वाचं बी शांतिपूर्ण परिस्थितीत पेरलं जातं आणि शांतीसाठी झटणाऱ्‍यांना त्याचं फळ मिळतं.” (याको. ३:१७, १८) हे शब्द लिहिताना याकोबच्या मनात यरुशलेममध्ये झालेली ती सभा असावी का, हे नक्की सांगता येत नाही. पण, प्रेषितांची कार्यं यातल्या १५ व्या अध्यायात लिहिलेल्या घटनांचं परीक्षण केल्यामुळे एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली आहे. ती म्हणजे, एकता आणि सहकार्याची वृत्ती असेल तरच यहोवाचा आशीर्वाद मिळू शकतो.

१९, २०. (क) अंत्युखियाच्या मंडळीत आता शांती आणि एकता होती, हे कशावरून दिसून आलं? (ख) पौल आणि बर्णबा आता काय करू शकत होते?

१९ अंत्युखियाच्या मंडळीत आता शांती आणि एकता होती, हे अगदी स्पष्ट होतं. अंत्युखियाच्या बांधवांनी यरुशलेमहून आलेल्या बांधवांचा विरोध केला नाही. उलट, यहूदा आणि सीला यांच्या भेटीमुळे त्यांना खूप आनंद झाला. असं आपण कशावरून म्हणू शकतो? कारण, अंत्युखियाच्या बांधवांनी त्यांना बरेच दिवस आपल्याकडेच ठेवून घेतलं. आणि ते “काही काळ तिथे राहिल्यानंतर, ज्यांनी त्यांना पाठवलं होतं त्यांच्याकडे [यरुशलेमला] बांधवांनी त्यांना सुखरूप परत पाठवून दिलं.” d (प्रे. कार्यं १५:३३) या दोघा बांधवांनी यरुशलेमला आल्यावर आपल्या दौऱ्‍याबद्दल जे काही सांगितलं, त्यामुळे तिथल्या बांधवांनाही किती आनंद झाला असेल याची आपण कल्पना करू शकतो. यहोवाच्या अपार कृपेमुळे त्यांचा दौरा सफल झाला होता आणि मंडळीत निर्माण झालेला मोठा वाद अगदी चांगल्या प्रकारे सोडवण्यात आला होता!

२० पौल आणि बर्णबा अंत्युखियातच थांबले होते. त्यामुळे, आता ते प्रचाराच्या कार्यात जास्तीत जास्त भाग घेऊन, या कार्यात चांगल्या प्रकारे पुढाकार घेऊ शकले. आज विभागीय पर्यवेक्षक त्यांच्या देखरेखीखाली असलेल्या मंडळ्यांना भेटी देतात तेव्हा तेही असंच करतात. (प्रे. कार्यं १३:२, ३) यहोवाच्या लोकांसाठी हा किती मोठा आशीर्वाद आहे! पण, पौल आणि बर्णबा या आवेशी प्रचारकांचा यहोवाने पुढे कसा उपयोग करून घेतला? आणि त्यांना कोणकोणते आशीर्वाद दिले? याविषयी आपण पुढच्या अध्यायात पाहणार आहोत.

यहोवाच्या लोकांना आज नियमन मंडळ आणि त्यांनी नेमलेल्या बांधवांकडून मिळणाऱ्‍या आध्यात्मिक तरतुदींमुळे फायदा होतो

a याकोब​—‘प्रभूचा भाऊ’” ही चौकट पाहा.

b याकोबने मोशेच्या पुस्तकांचा उल्लेख केला हे योग्यच होतं. कारण मोशेने लिहिलेल्या पुस्तकांत फक्‍त नियमशास्त्रच नव्हतं; तर ते नियमशास्त्र द्यायच्या आधीपासूनच देवाने कशा प्रकारे आपल्या लोकांशी व्यवहार केला आणि त्याची इच्छा त्यातून कशी दिसून आली, हेसुद्धा त्या पुस्तकांतून पाहायला मिळतं. उदाहरणार्थ रक्‍त, व्यभिचार, आणि मूर्तिपूजा यांबद्दल देवाचा दृष्टिकोन काय आहे, हे उत्पत्तीच्या अहवालातून स्पष्ट दिसून येतं. (उत्प. ९:३, ४; २०:२-९; ३५:२, ४) तेव्हा, यहोवाने आधीच अशा तत्त्वांची जाणीव करून दिली होती, जी सर्व मानवांनी पाळणं आवश्‍यक होतं, मग ते यहुदी असोत किंवा विदेशी.

d बायबलच्या काही भाषांतरांमध्ये ३४ व्या वचनात असं सुचवण्यात आलं आहे, की सीलाने अंत्युखियातच राहण्याचा निर्णय घेतला. (किंग जेम्स व्हर्शन) पण, हे शब्द बायबलच्या मूळ मजकुरात नंतर जोडण्यात आले.