व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबलचे परीक्षण का करावे?

बायबलचे परीक्षण का करावे?

तुम्हाला बायबलविषयी काही माहिती आहे का? हे अनोखे पुस्तक संपूर्ण इतिहासातील सर्वात जास्त वितरित केलेले पुस्तक आहे. बायबलमधील संदेश सांत्वन व दिलासा देणारा आणि त्यातील सल्ला दैनंदिन जीवनात उपयोगी असल्याचे सर्वच संस्कृतींतील लोकांना दिसून आले आहे. तरीही, आज बऱ्‍याच लोकांना बायबलविषयी फारसे माहीत नाही. तुम्ही देवाधर्माला मानणारे असोत वा नसोत, कदाचित तुम्हाला बायबलमध्ये काय सांगितले आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल. बायबलमधील संदेश काय आहे याची तुम्हाला थोडक्यात माहिती देण्यासाठीच हे माहितीपत्रक तयार करण्यात आले आहे.

बायबल वाचण्यास सुरुवात करण्याआधी, बायबलची मांडणी कशा प्रकारे करण्यात आली आहे हे जाणून घेणे तुम्हाला साहाय्यक ठरेल. बायबलला पवित्र शास्त्र देखील म्हटले जाते. खरेतर, बायबल हे ६६ पुस्तकांचे किंवा भागांचे मिळून बनलेले आहे. आणि याची सुरुवात उत्पत्ति नावाच्या पुस्तकाने तर शेवट प्रकटीकरण नावाच्या पुस्तकाने होतो.

बायबलचा लेखक कोण आहे? हा एक विचार करण्याजोगा प्रश्‍न आहे. मुळात, बायबल हे जवळजवळ ४० मनुष्यांनी सुमारे १,६०० वर्षांच्या कालावधीत लिहिले. विशेष म्हणजे, त्यांच्यापैकी एकानेही स्वतःला बायबलचा लेखक म्हटले नाही. उलट, ‘प्रत्येक शास्त्रलेख परमेश्‍वरप्रेरित’ असल्याचे त्यांच्यापैकी एकाने सांगितले. (२ तीमथ्य ३:१६) आणखी एकाने असे म्हटले: “परमेश्‍वराचा आत्मा माझ्या द्वारे म्हणाला, त्याचे वचन माझ्या जिव्हेवर आले.” (२ शमुवेल २३:२) अशा प्रकारे, या ४० मनुष्यांनी बायबलचा लेखक असण्याचे श्रेय विश्‍वाच्या महान शासकाला, यहोवा देवाला दिले. मानवांनी देवाला ओळखावे, त्याला जाणून घ्यावे अशी त्याची इच्छा आहे असे त्यांनी प्रकट केले.

बायबलमधील संदेश समजून घेण्यासाठी आणखी एक गोष्ट लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बायबलमध्ये असलेल्या सगळ्या मजकुराचा एक मुख्य विषय आहे. तो म्हणजे, केवळ देवालाच मानवजातीवर आधिपत्य करण्याचा अधिकार आहे, हे त्याच्या स्वर्गीय राज्याच्या माध्यमाने कायमचे सिद्ध केले जाणे. हा विषय उत्पत्ति ते प्रकटीकरण या पुस्तकांत म्हणजेच सबंध बायबलमध्ये आढळतो हे सदर माहितीपत्रक वाचताना तुमच्या लक्षात येईल.

या सर्व गोष्टी लक्षात ठेवून, जगातील सर्वात लोकप्रिय पुस्तक, बायबल यामधील संदेशाचे आता परीक्षण करू या.