व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग १६

मशीहा प्रकट होतो

मशीहा प्रकट होतो

फार पूर्वी भाकीत करण्यात आलेला मशीहा नासरेथचा येशू असल्याची खुद्द यहोवा ग्वाही देतो

भाकीत करण्यात आलेल्या मशीहाला ओळखण्यास यहोवा आपल्या लोकांना मदत करणार होता का? हो. देवाने काय केले हे लक्षात घ्या. इब्री शास्त्रवचनांचे लिखाण पूर्ण झाल्यावर सुमारे चार शतकांनंतर घडलेली ही घटना आहे. गालील या उत्तरेकडील प्रांतातील नासरेथ शहरात राहणाऱ्‍या मरीया नावाच्या तरुणीकडे एके दिवशी एक अनपेक्षित पाहुणा आला. तो होता गब्रीएल नावाचा एक देवदूत. त्याने तिला सांगितले की देवाच्या कार्यशील शक्‍तीच्या म्हणजेच पवित्र आत्म्याच्या साहाय्याने ती कुमारिका असूनही एका पुत्राला जन्म देईल. तिचा हा पुत्रच फार पूर्वी प्रतिज्ञा केलेला राजा असेल आणि त्याचे राज्य सर्वकाळ टिकेल! हे मूल म्हणजे खुद्द देवाचा पुत्र असेल. देव त्याचे जीवन स्वर्गातून मरीयेच्या उदरात स्थलांतरीत करेल.

देवाने सोपवलेली ही अद्‌भुत कामगिरी मरीयेने नम्रतापूर्वक स्वीकारली. योसेफ नावाच्या एका सुताराशी तिची मागणी झाली होती. देवाने योसेफाकडे एका देवदूताला पाठवून मरीयेच्या गरोदरपणाचे कारण स्पष्ट केल्यानंतर योसेफाने मरीयेशी लग्न केले. पण मशीहाचा जन्म बेथलेहेमात होईल असे जे भाकीत करण्यात आले होते, त्याचे काय झाले? (मीखा ५:२) कारण, बेथलेहेम हे लहानसे गाव तर नासरेथपासून १४० किलोमीटर अंतरावर होते!

त्याच सुमारास, एका रोमी शासकाने जनगणना करण्याचे फरमान काढले. यासाठी लोकांना आपापल्या मूळ गावी जाऊन नाव नोंदवायचे होते. योसेफ व मरीया हे दोघेही कदाचित बेथलेहेमचेच असल्यामुळे योसेफ आपल्या गरोदर पत्नीला घेऊन तेथे गेला. (लूक २:३) तेथे एका साध्याशा गोठ्यात मरीया बाळंत झाली आणि तिने एका गव्हाणीत आपल्या बाळाला ठेवले. त्याच वेळी एका डोंगरावर काही मेंढपाळ आपली मेंढरे राखत होते. देवाने त्या मेंढपाळांकडे आपल्या देवदूतांच्या समुदायास हे सांगण्यास पाठवले, की नुकतेच जन्मलेले एक बालक प्रतिज्ञा केलेला मशीहा किंवा ख्रिस्त आहे.

येशू हाच प्रतिज्ञा केलेला मशीहा असल्याची कालांतराने इतर जणही ग्वाही देणार होते. संदेष्ट्या यशयाने भाकीत केले होते की एक जण मशीहाच्या महत्त्वपूर्ण कार्याचा मार्ग तयार करण्यासाठी त्याच्या अगोदर येईल. (यशया ४०:३) मशीहाच्या अगोदर येणारा हा बाप्तिस्मा देणारा योहान होता. त्याने येशूला पाहिले तेव्हा तो म्हणाला: “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!” योहानाच्या शिष्यांपैकी काही जण लगेच येशूचे अनुयायी बनले. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला: “मशीहा (म्हणजे ख्रिस्त) आम्हाला सापडला आहे.”—योहान १:२९, ३६, ४१.

येशू हाच मशीहा असल्याची या लोकांनी तर ग्वाही दिलीच, पण योहानाने येशूला बाप्तिस्मा दिला तेव्हा यहोवा स्वतः स्वर्गातून बोलला. त्याने येशूला पवित्र आत्म्याद्वारे मशीहा म्हणून नियुक्‍त केले आणि म्हणाला: “हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्‍याच्याविषयी मी संतुष्ट आहे.” (मत्तय ३:१६, १७) अशा रीतीने, फार पूर्वी ज्याच्याविषयी प्रतिज्ञा करण्यात आली होती तो मशीहा शेवटी प्रकट झाला!

हे केव्हा घडले? इ.स. २९ या वर्षी, म्हणजेच दानीएलाने भाकीत केलेली ४८३ वर्षे संपुष्टात आली तेव्हा. येशू हाच मशीहा किंवा ख्रिस्त आहे हे सिद्ध करणाऱ्‍या अनेक खातरीलायक पुराव्यांपैकी हा एक आहे. पण, पृथ्वीवर असताना हा मशीहा कोणता संदेश घोषित करणार होता?

मत्तय अध्याय १ ते ३; मार्क अध्याय १; लूक अध्याय २; योहान अध्याय १ वर आधारित.