व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग २१

येशू पुन्हा जिवंत होतो!

येशू पुन्हा जिवंत होतो!

आपल्या अनुयायांना सूचना आणि उत्तेजन देण्यासाठी येशू त्यांच्यासमोर प्रकट होतो

येशूच्या मृत्यूच्या तिसऱ्‍या दिवशी, त्याच्या शिष्यांपैकी काही स्त्रियांना दिसले, की कबरेच्या तोंडावरील मोठा दगड बाजूला लोटून देण्यात आला होता आणि कबरही रिकामी होती!

मग दोन देवदूत त्यांच्यासमोर प्रकट झाले. त्यांपैकी एकाने म्हटले: “वधस्तंभावर खिळलेल्या येशू नासरेथकराचा शोध तुम्ही करीत आहा. तो उठला आहे.” (मार्क १६:६) हे ऐकताच त्या स्त्रिया, प्रेषितांना ही बातमी कळवण्यासाठी लगेच धावत गेल्या. वाटेत त्यांना येशू भेटला व त्याने त्यांना म्हटले: “भिऊ नका; जा माझ्या भावांस सांगा की, त्यांनी गालीलात जावे; तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेन.”—मत्तय २८:१०.

त्याच दिवशी नंतर दोन शिष्य जेरूसलेमपासून अम्माऊस नावाच्या गावाला चालले असता वाटेत त्यांना एक अनोळखी व्यक्‍ती भेटली. वाटेने चालताना ते कोणत्या गोष्टींची चर्चा करत होते, असे त्या व्यक्‍तीने त्यांना विचारले. अर्थात, ही अनोळखी व्यक्‍ती म्हणजे खुद्द पुनरुत्थान झालेला येशू होता. पण, तो एका वेगळ्या रूपात त्यांच्यासमोर आल्यामुळे त्यांनी त्याला ओळखले नाही. मग, अगदी दुःखी स्वरात त्या दोघांनी म्हटले, की ते येशूविषयी बोलत होते. त्यावर ती अनोळखी व्यक्‍ती त्यांना शास्त्रवचनांत मशीहासंबंधी सांगितलेल्या गोष्टींचा उलगडा करून सांगू लागली. खरोखर, येशूने मशीहाबद्दल केलेल्या भविष्यवाण्या अगदी तंतोतंत पूर्ण केल्या होत्या. * ही अनोळखी व्यक्‍ती आत्मिक शरीरात पुनरुत्थान झालेला येशू आहे हे त्यांच्या लक्षात येताच तो एकाएकी दिसेनासा झाला.

ते दोन शिष्य लगबगीने जेरूसलेमला माघारी गेले. तेथे एका बंद खोलीत त्यांना एकत्र जमलेले प्रेषित भेटले. आपल्याला आलेला अनुभव ते प्रेषितांना सांगू लागले तेव्हा येशू स्वतः त्यांच्यामध्ये प्रकट झाला. शिष्यांचा त्यांच्या डोळ्यांवर विश्‍वासच बसेना! मग, येशूने त्यांना म्हटले: “तुमच्या मनात तर्कवितर्क का उद्‌भवतात? असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दुःख सोसावे, तिसऱ्‍या दिवशी मेलेल्यांतून उठावे.”—लूक २४:३८, ४६.

येशूचे पुनरुत्थान झाल्यानंतर ४० दिवसांपर्यंत तो वेगवेगळ्या प्रसंगी आपल्या शिष्यांना दिसला. एकदा तर ५०० पेक्षा अधिक लोकांना तो दिसला! बहुधा याच वेळी त्याने त्यांना ही महत्त्वपूर्ण आज्ञा दिली: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; . . . जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.”—मत्तय २८:१९, २०.

आपल्या ११ विश्‍वासू प्रेषितांबरोबर झालेल्या त्याच्या अखेरच्या भेटीत त्याने त्यांना असे वचन दिले: “पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि . . . पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.” (प्रेषितांची कृत्ये १:८) मग, तो वर स्वर्गात जात असता मेघाने त्याला त्यांच्या दृष्टिआड केले.

मत्तय अध्याय २८; मार्क अध्याय १६; लूक अध्याय २४; योहान अध्याय २० आणि २१; १ करिंथकर १५:५, ६ वर आधारित.

^ परि. 6 येशूने मशीहासंबंधी कोणकोणत्या भविष्यवाण्या पूर्ण केल्या याच्या माहितीसाठी याच माहितीपत्रकातील भाग १४, भाग १५ आणि भाग १६ तसंच बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातल्या परिशिष्ठात “येशू ख्रिस्त—भाकीत केलेला मशीहा” हा लेख पाहा.