व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग २५

विश्‍वास, योग्य आचरण आणि प्रेम यांबद्दल सल्ला

विश्‍वास, योग्य आचरण आणि प्रेम यांबद्दल सल्ला

याकोब, पेत्र, योहान आणि यहूदा हे ख्रिस्ती बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी पत्रे लिहितात

याकोब आणि यहूदा हे येशूचे भाऊ होते. पेत्र आणि योहान हे येशूच्या १२ प्रेषितांपैकी होते. या चौघांनी ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांतील पत्रांपैकी एकूण सात पत्रे लिहिली. यांपैकी प्रत्येक पत्राला त्याच्या लेखकाचे नाव देण्यात आले आहे. या पत्रांमधील देवप्रेरित सल्ला, ख्रिश्‍चनांना यहोवाप्रती आपली एकनिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी आणि देवाच्या राज्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी साहाय्य करण्याच्या हेतूने देण्यात आला होता.

विश्‍वास कृतीतून प्रदर्शित करणे. विश्‍वास आहे असे म्हणणे पुरेसे नाही. तर, खरा विश्‍वास कार्यांतून दिसून येतो. “म्हणून,” याकोब लिहितो, ‘विश्‍वास क्रियांवाचून निर्जीव आहे.’ (याकोब २:२६) संकटांना तोंड देताना विश्‍वास दाखवल्याने धीर धरण्यास मदत मिळते. यशस्वी होण्यासाठी ख्रिश्‍चनांनी सुबुद्धी देण्याची देवाजवळ विनंती केली पाहिजे आणि देव ती अवश्‍य देईल असा भरवसा बाळगला पाहिजे. धीर धरल्याने आपण देवाच्या पसंतीस उतरतो. (याकोब १:२-६, १२) यहोवाचा एक उपासक विश्‍वासूपणे त्याला एकनिष्ठ राहिल्यास, यहोवा देवही त्याच्याप्रती आपले प्रेम व निष्ठा व्यक्‍त करेल. याकोब म्हणतो: “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हांजवळ येईल.”—याकोब ४:८.

ख्रिस्ती व्यक्‍तीचा विश्‍वास त्याच्यासमोर येणाऱ्‍या प्रलोभनांचा व अनैतिक प्रभावांचा यशस्वी रीत्या प्रतिकार करण्याइतका भक्कम असला पाहिजे. यहूदाने त्याच्या काळातील वाढत्या अनैतिकतेमुळे ख्रिस्ती बांधवांना तुम्ही ‘विश्‍वास राखण्यास फार झटावे’ असे आर्जवले.—यहूदा ३, पं.र.भा.

शुद्ध आचरण राखणे. आपले उपासक पवित्र अर्थात सर्व प्रकारे शुद्ध असले पाहिजेत अशी यहोवा अपेक्षा करतो. पेत्र लिहितो: “तुम्हीहि सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा; कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘तुम्ही पवित्र असा, कारण मी [यहोवा] पवित्र आहे.’” (१ पेत्र १:१५, १६) याबाबतीत अनुकरण करण्यासाठी आपल्यापुढे एक उत्तम उदाहरण आहे. पेत्र म्हणतो: “ख्रिस्तानेहि तुम्हासाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हाकरिता कित्ता घालून दिला आहे.” (१ पेत्र २:२१) देवाच्या नीतिनियमांनुसार जगण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे ख्रिश्‍चनांना त्रास किंवा दुःख सहन करावे लागले तरीही ते आपला “सद्‌भाव” किंवा चांगला विवेकभाव टिकवून ठेवतात. (१ पेत्र ३:१६, १७) पेत्र ख्रिश्‍चनांना आग्रह करतो, की देवाच्या न्यायाच्या दिवसाची आणि ज्यामध्ये “नीतिमत्त्व वास करिते” अशा प्रतिज्ञात नवीन जगाची वाट पाहत असताना, त्यांनी आपले आचरण पवित्र ठेवावे आणि ज्यांतून सुभक्‍ती दिसून येईल अशी कार्ये करत राहावे.—२ पेत्र ३:११-१३.

“देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल.”—याकोब ४:८

प्रेम प्रदर्शित करणे. “देव प्रीति आहे,” असे योहान लिहितो. प्रेषित योहान याकडे लक्ष वेधतो की देवाने येशूला “तुमच्याआमच्या पापांचे प्रायश्‍चित्त व्हावे म्हणून” पाठवण्याद्वारे त्याचे सर्वश्रेष्ठ प्रेम प्रदर्शित केले. त्या बदल्यात ख्रिश्‍चनांनी काय केले पाहिजे? योहान स्पष्ट करतो: “प्रियजनहो, देवाने जर आपल्यावर अशा प्रकारे प्रीति केली तर आपणहि एकमेकांवर प्रीति केली पाहिजे.” (१ योहान ४:८-११) अशा प्रकारचे प्रेम दाखवण्याचा एक मार्ग म्हणजे आपल्या ख्रिस्ती बंधूभगिनींचा पाहुणचार करणे.—३ योहान ५-८.

पण, यहोवाच्या उपासकांचे त्याच्यावर प्रेम आहे हे ते कशा प्रकारे दाखवू शकतात? योहान याचे उत्तर देतो: “देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.” (१ योहान ५:३; २ योहान ६) जे अशा प्रकारे देवाच्या आज्ञांचे पालन करतात त्यांना हे आश्‍वासन देण्यात आले आहे की देव त्यांच्यावर प्रेम करत राहील आणि त्यांना ‘सार्वकालिक जीवनाचा’ आशीर्वाद देईल.—यहूदा २१.

याकोब; १ पेत्र; २ पेत्र; १, योहान; २ योहान; ३ योहान; यहूदा या पुस्तकांवर आधारित.