व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्‍न १

जीवसृष्टीची सुरुवात कशी झाली?

जीवसृष्टीची सुरुवात कशी झाली?

“बाळ कुठून येतं?” लहानपणी असा प्रश्‍न विचारून कधी तुम्ही आपल्या आईबाबांना बुचकळ्यात टाकलं होतं का? मग, त्यांनी काय उत्तर दिलं? तुमच्या वयानुसार आणि त्यांच्या स्वभावानुसार, एकतर त्यांनी तुमच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केलं असेल किंवा कदाचित घाईघाईने काहीतरी उत्तर देऊन ते मोकळे झाले असतील. किंवा मग, त्यांनी तुम्हाला एखादी काल्पनिक गोष्ट सांगितली असेल, जी खरी नसल्याचं तुम्हाला नंतर कळलं असेल. अर्थात, लहान मुलांनी प्रौढत्वासाठी व वैवाहिक जीवनासाठी योग्यपणे तयार होणं गरजेचं आहे. म्हणून त्यांना स्त्रीपुरुषाच्या संबंधांबद्दल व बाळाच्या जन्माच्या प्रक्रियेबद्दल, म्हणजेच प्रजननाबद्दल माहिती असली पाहिजे.

मुलांचा जन्म कसा होतो याविषयी बोलायला ज्या प्रकारे बऱ्‍याच आईवडिलांना संकोच वाटतो, त्याच प्रकारे काही शास्त्रज्ञ याहूनही जास्त महत्त्वाच्या एका प्रश्‍नाबद्दल चर्चा करायला टाळाटाळ करतात. तो प्रश्‍न म्हणजे जीवसृष्टीची सुरुवात कशी झाली? या प्रश्‍नाचं खातरीलायक उत्तर मिळालं, तर जीवनाकडे पाहण्याच्या एका व्यक्‍तीच्या दृष्टिकोनावर याचा फार मोठा प्रभाव पडू शकतो. तर मग, कशी झाली जीवसृष्टीची सुरुवात?

मूळ आकारापेक्षा ८०० पटींनी मोठी करून दाखवलेली मानवी फलित अंडपेशी

बरेच शास्त्रज्ञ काय दावा करतात? उत्क्रांतीवर विश्‍वास ठेवणारे बरेच लोक तुम्हाला सांगतील, की कोट्यवधी वर्षांपूर्वी समुद्र किनाऱ्‍याजवळच्या एखाद्या तळ्यात किंवा मग खोल महासागरात जीवसृष्टीची सुरुवात झाली. त्यांच्या मते, अशाच एखाद्या अज्ञात ठिकाणी काही रसायनांची आपोआप एकमेकांशी प्रक्रिया होऊन बुडबुड्यांसारखं काहीतरी तयार झालं. त्यांपासून अनेक घटक असलेले रेणू तयार होऊन एकाचे दोन, दोनांचे चार असं त्यांचं विभाजन होऊ लागलं. त्यांचं असं म्हणणं आहे, की अगदी सुरुवातीच्या अशा एक किंवा अनेक “साध्या” पेशींपासून पृथ्वीवर दिसणारी सर्व सजीव सृष्टी आपोआप अस्तित्वात आली.

पण, उत्क्रांतीवर विश्‍वास ठेवणाऱ्‍या इतर अनेक नामवंत शास्त्रज्ञांना मात्र हे मान्य नाही. ते असा अंदाज लावतात, की सुरुवातीच्या पेशी किंवा त्यातले काही मुख्य घटक अंतराळातून पृथ्वीवर आले असावेत. त्यांना असं का वाटतं? कारण निर्जीव रेणूंपासून सजीव निर्माण होऊ शकतात, हे बरेच प्रयत्न करूनही शास्त्रज्ञांना सिद्ध करता आलेलं नाही. २००८ मध्ये जीवशास्त्राचे प्राध्यापक आलेक्सांद्र मेनेझ यांनी शास्त्रज्ञांसमोर असलेल्या या समस्येवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितलं, की मागच्या ५० वर्षांत “प्रयोगशाळेत केलेला कोणताही प्रयोग या अंदाजाचं समर्थन करत नाही, की पृथ्वीवर जीवसृष्टी फक्‍त रासायनिक मिश्रणातून आपोआप उत्पन्‍न झाली. आणि कोणताही महत्त्वाचा वैज्ञानिक शोध या दिशेने विचार करायला लावत नाही.”

पुराव्यांवरून काय दिसतं? बाळाचा जन्म कसा होतो या प्रश्‍नाचं उत्तर अगदी स्पष्ट आहे आणि त्याला पुराव्याचा आधार आहे. सजीव हा नेहमी आधीपासून अस्तित्वात असलेल्या सजीवापासूनच उत्पन्‍न होतो. पण, जर आपण काळाच्या प्रवाहात खूप मागे जाऊन पाहिलं, तर हा मूलभूत नियम कदाचित मोडला गेला असावा का? असं घडणं खरंच शक्य आहे का? सजीव सृष्टी खरोखरच निर्जीव रसायनांपासून आपोआप निर्माण होऊ शकते का? असं घडण्याची कितपत शक्यता आहे?

संशोधकांना समजलं आहे, की पेशी जिवंत राहण्यासाठी निदान तीन वेगवेगळ्या प्रकारच्या जटिल रेणूंनी एकमेकांशी सहकार्य करणं गरजेचं आहे. हे तीन रेणू म्हणजे डीऑक्सीरायबो न्युक्लिक अॅसिड (DNA), रायबो न्युक्लिक अॅसिड (RNA), आणि प्रथिने (Proteins). आज क्वचितच कोणी शास्त्रज्ञ असा दावा करेल, की एक संपूर्ण सजीव पेशी निर्जीव रसायनांच्या मिश्रणापासून अचानक आणि आपोआप उत्पन्‍न झाली. पण पेशीतले घटक असणारे RNA किंवा प्रथिने आपोआप निर्माण होण्याची कितपत शक्यता आहे? *

स्टॅन्ली मिलर, १९५३

१९५३ मध्ये पहिल्यांदा करण्यात आलेल्या एका प्रयोगामुळे, अनेक शास्त्रज्ञांना असं वाटतं की सजीव आपोआप अस्तित्वात येणं शक्य आहे. या प्रयोगात, शास्त्रज्ञांच्या मते अगदी सुरुवातीला पृथ्वीवर जसं वातावरण होतं, तसंच वातावरण स्टॅन्ली एल. मिलर नावाच्या एका शास्त्रज्ञाने प्रयोगशाळेत निर्माण केलं. प्रयोगात वापरलेल्या वायूंच्या मिश्रणात विजेचा प्रवाह सोडल्यावर मिलर यांना काही अमिनो अॅसिड्‌स तयार करण्यात यश आलं. अमिनो अॅसिड्‌स या रासायनिक घटकांपासूनच प्रथिने तयार होतात. काही काळाने एका उल्केतही अमिनो अॅसिड्‌स आढळली. पण, या शोधांच्या आधारावर, सजीव सृष्टीचे सर्व मूलभूत घटक सहजासहजी, अचानक उत्पन्‍न होऊ शकतात असं म्हणता येईल का?

न्यूयॉर्क विद्यापीठातले रसायनशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक रॉबर्ट शापीरो म्हणतात, “काही लेखकांनी असा निष्कर्ष काढला की सजीव सृष्टीचे सर्व  घटक मिलरने केलेल्या प्रयोगांसारख्याच इतर प्रयोगांच्या साहाय्याने अगदी सहज निर्माण केले जाऊ शकतात आणि उल्कांमध्ये ते सर्व घटक अस्तित्वात होते. पण ही गोष्ट खरी नाही.” *

RNA रेणूचं उदाहरण घ्या. तो न्युक्लिओटाइड्‌स म्हटलेल्या लहान रेणूंपासून बनलेला असतो. न्युक्लिओटाइड हा अमिनो अॅसिडपेक्षा वेगळा आणि थोडा जास्त जटिल प्रकारचा रेणू आहे. शापीरो म्हणतात की “कोणत्याही प्रकारचे न्युक्लिओटाइड्‌स आजपर्यंत, विजेचा प्रवाह सोडून केलेल्या प्रयोगांत तयार करण्यात आल्याचं किंवा उल्कांविषयीच्या संशोधनात आढळल्याची माहिती सापडत नाही.” ते पुढे म्हणतात की रासायनिक घटकांच्या मिश्रणातून, स्वतःचं विभाजन करू शकणारा RNA रेणू आपोआप तयार होण्याची शक्यता “इतकी कमी आहे, की सबंध विश्‍वात एकदाही कुठे असं घडल्याचं आढळलं तर आपण फारच नशीबवान आहोत असं म्हणावं लागेल.”

प्रथिने बनवण्यासाठी RNA (१) आवश्‍यक आहे, पण त्याच वेळी RNA बनवण्याच्या प्रक्रियेत प्रथिनांचा (२) उपयोग होतो. तर मग दोन्ही तर सोडाच, पण यांपैकी एकही आपोआप कसं काय अस्तित्वात येऊ शकतं? रायबोसोम्सविषयी (३) पुढच्या भागात चर्चा करण्यात आली आहे.

प्रथिनांच्या रेणूंविषयी काय? हे कधी फक्‍त ५० तर कधी हजारो अमिनो अॅसिड्‌सपासून बनलेले असून, अगदी ठरावीक क्रमाने जोडलेले असतात. एका “साध्या” पेशीत कार्य करणाऱ्‍या सर्वसाधारण प्रथिनात २०० अमिनो अॅसिड्‌स असतात. या पेशींतही हजारो वेगवेगळ्या प्रकारची प्रथिने असतात. फक्‍त १०० अमिनो अॅसिड्‌स असलेलं केवळ एक प्रथिन पृथ्वीवर कधीही आपोआप तयार होण्याची शक्यता मोजली, तर ती “१० कोटी-कोटींमध्ये एक” इतकी असल्याचं दिसून आलं.

प्रयोगशाळेत जटिल रेणू निर्माण करण्यासाठी जर एका शास्त्रज्ञाचं कौशल्य आवश्‍यक आहे, तर मग सजीव पेशीतले कितीतरी पटीने अधिक जटिल रेणू आपोआप अस्तित्वात येऊ शकतात का?

उत्क्रांतीच्या सिद्धान्ताचं समर्थन करणारे संशोधक ह्‍युबर्ट पी. यॉकी याच्याही एक पाऊल पुढे जातात. ते म्हणतात: “जीवसृष्टीची सुरुवात होताना ‘आधी प्रथिने’ निर्माण झाली हे अशक्य आहे.” प्रथिने बनवण्यासाठी RNA आवश्‍यक आहे, पण त्याच वेळी RNA बनवण्याच्या प्रक्रियेत प्रथिनांचा उपयोग होतो. पण, इतकी कमी शक्यता असूनही क्षणभर अशी कल्पना करू या की प्रथिने आणि RNA रेणू एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी आपोआप उत्पन्‍न झाले. समजा असं घडलं असलं, तरी त्यांनी आपसांत सहकार्य करून, स्वतःचं विभाजन आणि पोषण करण्याची क्षमता असलेला एक सजीव निर्माण केल्याची कितपत शक्यता आहे? RNA आणि प्रथिनांच्या स्वतःहून तयार झालेल्या मिश्रणातून एक जीव आपोआप तयार होण्याची शक्यता, “आपण कल्पनाही करू शकत नाही इतकी कमी आहे,” असं नॅशनल एअरोनॉटिक्स अॅन्ड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन्स अॅस्ट्रोबायोलॉजी इंस्टिट्यूटच्या सदस्या डॉ. कॅरल क्लेलंड म्हणतात. * त्या पुढे म्हणतात, “तरीसुद्धा बहुतेक संशोधक असं धरून चालतात, की पृथ्वीच्या अगदी सुरुवातीच्या नैसर्गिक परिस्थितीत प्रथिने आणि RNA आपणहून कसे तयार झाले असावेत, इतकंच समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यांना वाटतं, की हे जर आपल्याला समजलं तर मग त्यांचं विभाजन आणि पोषण कसं झालं हेही नंतर स्पष्ट होईल.” सजीवांतले हे मूलभूत घटक आपोआप कसे काय अस्तित्वात येऊ शकतात याविषयीच्या अलीकडच्या सिद्धान्तांबद्दल त्या म्हणतात: “हे कसं काय घडलं याविषयी यांपैकी कोणत्याही सिद्धान्ताने समाधानकारक स्पष्टीकरण दिलेलं नाही.”

एक निर्जीव रोबोट तयार करण्यासाठी आणि त्याला सूचना देण्यासाठी जर एका बुद्धिमान व्यक्‍तीची गरज आहे, तर मग मानव तर सोडाच, पण फक्‍त एक सजीव पेशी निर्माण करण्यासाठी कशाची गरज असेल?

या वस्तुस्थिती का महत्त्वाच्या आहेत? जीवसृष्टी आपोआप अस्तित्वात आली असं मानणाऱ्‍या संशोधकांसमोर कोणतं आव्हान आहे यावर विचार करा. त्यांना काही अशी अमिनो अॅसिड्‌स आढळली आहेत, जी सजीव पेशींमध्येही सापडतात. प्रयोगशाळेत काळजीपूर्वक घडवून आणलेल्या आणि नियंत्रित केलेल्या प्रयोगांत त्यांनी इतर अधिक जटिल प्रकारचे रेणू तयार केले आहेत. आज न उद्या, इतर सर्व आवश्‍यक घटक तयार करून एका “साध्या” पेशीची रचना करता येईल अशी त्यांना आशा आहे. त्यांची स्थिती एका अशा शास्त्रज्ञासारखी आहे, जो नैसर्गिक रीत्या आढळणारे पदार्थ घेतो; त्यांपासून स्टील, प्लॅस्टिक, सिलिकॉन आणि तारा बनवतो; आणि या साहित्याचा वापर करून एक रोबोट तयार करतो. या रोबोटला स्वतःच्याच प्रतिकृती तयार करता येतील अशा प्रकारच्या सूचना तो त्याला देतो. असं करण्याद्वारे तो काय सिद्ध करेल? जास्तीतजास्त हेच, की एक बुद्धिमान व्यक्‍ती एक कार्यक्षम यंत्र निर्माण करू शकते.

त्याच प्रकारे, पेशी निर्माण करण्यात शास्त्रज्ञांना कधी यश आलंच, तर हे नक्कीच खूप आश्‍चर्यकारक ठरेल​—पण, सजीव पेशी आपोआप निर्माण होऊ शकते, हे यावरून सिद्ध होईल का? खरं पाहता, याच्या अगदी उलटच गोष्ट सिद्ध होईल, नाही का?

तुम्हाला काय वाटतं? आजपर्यंत मिळालेले सर्व वैज्ञानिक पुरावे हेच दाखवतात, की एक नवीन जीव, आधीपासून अस्तित्वात असलेल्या सजीवापासूनच येऊ शकतो. एक “साधी” सजीव पेशी आपोआप निर्जीव रसायनांपासून उत्पन्‍न झाली, असं मानण्यासाठी खरंच कमालीच्या विश्‍वासाची गरज आहे.

वस्तुस्थितीकडे पाहिल्यावर, तुम्ही असा विश्‍वास दाखवायला तयार आहात का? या प्रश्‍नाचं उत्तर देण्याआधी, एका पेशीच्या रचनेचं जवळून परीक्षण करून पाहा. असं केल्यामुळे, तुम्हाला हे ठरवता येईल की जीवसृष्टीची सुरुवात कशी झाली याबद्दल काही शास्त्रज्ञांनी मांडलेले सिद्धान्त खरे मानण्यासारखे आहेत का? की, बाळ कुठून येतं या प्रश्‍नाचं उत्तर देताना काही आईवडिलांनी आपल्या मुलांना सांगितलेल्या गोष्टींइतकेच ते काल्पनिक आहेत?

^ परि. 8 DNA आपोआप निर्माण होण्याच्या शक्यतेविषयी, “सूचना कुठून आल्या?” असं शीर्षक असलेल्या तिसऱ्‍या भागात चर्चा केली जाईल.

^ परि. 10 सजीवांची निर्मिती करण्यात आली असं प्राध्यापक शापीरो मानत नाहीत. ते मानतात की सजीव सृष्टी ही अजून पूर्णपणे न समजलेल्या काही घटनांमुळे आपोआप अस्तित्वात आली. २००९ मध्ये इंग्लंडमधल्या मँचिस्टर विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या प्रयोगशाळेत काही न्युक्लीओटाइड्‌स निर्माण केल्याची बातमी प्रसिद्ध झाली. पण, शापीरो म्हणतात की या प्रयोगातून “मुळात RNA कशा प्रकारे निर्माण झाले असावेत याचं कोणतंही खातरीलायक स्पष्टीकरण मला मिळालेलं नाही.”

^ परि. 13 डॉ. क्लेलंड बायबलमधल्या निर्मितीच्या शिकवणीशी सहमत नाहीत. त्या असं मानतात की जीवसृष्टी आपोआप अस्तित्वात आली, पण नेमकी कशी हे अजून आपल्याला पूर्णपणे समजलेलं नाही.