व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ १४

पायनियरांसाठी कोण-कोणत्या प्रशाला आहेत?

पायनियरांसाठी कोण-कोणत्या प्रशाला आहेत?

अमेरिका

गिलियड प्रशाला, पॅटरसन, न्यू यॉर्क

पनामा

यहोवाचे साक्षीदार नेहमीच देवाबद्दलच्या शिक्षणासाठी ओळखले जातात. जे लोक राज्याच्या प्रचार कार्यासाठी आपला पूर्ण वेळ देतात अशांना प्रशिक्षण देण्यासाठी खास प्रशाला आयोजित केल्या जातात; या प्रशालांमुळे त्यांना आपली सेवा “पूर्ण” करणे शक्य होते.—२ तीमथ्य ४:५

पायनियर सेवा प्रशाला: एका सामान्य पायनियरच्या पूर्ण-वेळ सेवेचे पहिले वर्ष संपत येते तेव्हा त्याचे किंवा तिचे नाव सहा दिवसांच्या प्रशालेत नोंदवले जाते; ही प्रशाला सहसा जवळच्या राज्य सभागृहात घेतली जाते. या प्रशालेचा उद्देश एका पायनियरला यहोवासोबत घनिष्ठ नातेसंबंध जोडण्यास, सेवाकार्याच्या सर्व पैलूंत अधिक कुशल होण्यास आणि आपली सेवा विश्वासूपणे करत राहण्यास मदत करणे हा आहे.

सुवार्तिकांसाठी प्रशाला: या प्रशालेचा कालावधी दोन महिन्यांचा असतो. जे अनुभवी पायनियर, जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करण्यासाठी आपल्या घरापासून दूर जाण्यास तयार असतात अशांना प्रशिक्षण देण्याच्या हेतूने या प्रशालेची रचना करण्यात आली आहे. हे पायनियर, पृथ्वीवर होऊन गेलेला सर्वात मोठा सुवार्तिक, येशू ख्रिस्त याच्याप्रमाणे जणू असे म्हणत असतात: “हा मी आहे, मला पाठीव.” (यशया ६:८; योहान ७:२९) एका नवीन परिसरात जाऊन सेवा करण्यासाठी त्यांना कदाचित तेथील लोकांच्या साध्या राहणीमानाशी जुळवून घ्यावे लागेल. तेथील संस्कृती, हवामान आणि खाणेपिणे हे त्यांच्यासाठी अगदीच वेगळे असेल. त्यांना कदाचित तेथील भाषाही शिकून घ्यावी लागेल. ही प्रशाला, २३ ते ६५ या वयोगटांतील अविवाहित बंधू व भगिनी तसेच वैवाहिक जोडपे यांच्यासाठी असते; नवीन नेमणुकीत उपयोगी पडतील असे आध्यात्मिक गुण विकसित करण्यास ही प्रशाला त्यांना मदत करते; तसेच, त्यांना अशी कौशल्येही विकसित करण्यास मदत करते ज्यामुळे यहोवाला आणि त्याच्या संघटनेला त्यांचा पुरेपूर उपयोग करता येईल.

वॉचटावर बायबल गिलियड प्रशाला. हिब्रू भाषेत “गिलियड” याचा अर्थ “साक्षीदारांचा समुदाय” असा होतो. सन १९४३ मध्ये गिलियडची स्थापना झाली तेव्हापासून या प्रशालेच्या ८,००० हून अधिक पदवीधरांना “पृथ्वीच्या दिगंतापर्यंत” किंवा टोकापर्यंत साक्ष देण्यासाठी पाठवण्यात आले आणि या कार्यात त्यांना खूप यश मिळत आहे. (प्रे. कृत्ये १३:४७) उदाहरणार्थ, या प्रशालेतून पदवीधर झालेले बंधुभगिनी पहिल्यांदा पेरू देशात आले तेव्हा तेथे एकही मंडळी नव्हती. पण, आज तेथे १,००० पेक्षा जास्त मंडळ्या आहेत. तसेच जपानमध्ये मिशनरींनी पहिल्यांदा सेवा सुरू केली तेव्हा तेथे जेमतेम दहा साक्षीदार होते. आज मात्र त्या देशात २,००,००० पेक्षा जास्त साक्षीदार आहेत. पाच महिन्यांच्या या गिलियड अभ्यासक्रमात देवाच्या वचनाचा सखोल अभ्यास केला जातो. जे खास पायनियर म्हणून किंवा क्षेत्रात मिशनरी म्हणून सेवा करत आहेत; जे शाखा कार्यालयात सेवा करत आहेत किंवा जे विभागीय कार्यात आहेत अशांना या प्रशालेला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले जाते. जगभरातील कार्य सुरळीतपणे चालू ठेवण्यास व त्यास बळकटी देण्यास त्यांना मदत करता यावी म्हणून या प्रशालेत त्यांना व्यापक प्रशिक्षण दिले जाते.

  • पायनियर सेवा प्रशालेचा उद्देश काय आहे?

  • सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेची रचना कोणासाठी करण्यात आली आहे?