व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ २१

बेथेल म्हणजे काय?

बेथेल म्हणजे काय?

अमेरिकेतील आर्ट डिपार्टमेन्ट

जर्मनी

केनिया

कोलंबिया

इब्री भाषेतील शब्द बेथेल याचा अर्थ “देवाचे घर” असा होतो. (उत्पत्ति २८:१७, १९) यहोवाच्या साक्षीदारांनी जगभरात अनेक संकुले व इमारती उभारल्या आहेत जेथून राज्य प्रचाराच्या कार्याचे नियोजन केले जाते व या कार्याला पाठिंबा दिला जातो. तेव्हा, त्यांस बेथेल म्हणणे योग्यच आहे. नियमन मंडळ, अमेरिकेतील न्यू यॉर्क राज्यात असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या मुख्यालयातून कार्य करते आणि तेथून ते अनेक देशांमध्ये असलेल्या शाखा कार्यालयांच्या कार्याची देखरेख करते. जे लोक बेथेलमध्ये सेवा करतात त्यांना बेथेल कुटुंबाचे सदस्य असे म्हटले जाते. एका कुटुंबाप्रमाणे हे लोक सोबत काम करतात, एकत्र राहतात व सोबत जेवण करतात; तसेच ते एकत्र मिळून बायबलचा अभ्यासही करतात.—स्तोत्र १३३:१.

एक अनोखी जागा जेथे कुटुंबातील सदस्य स्वतःला देवाच्या कार्यात झोकून देतात. प्रत्येक बेथेलगृहात देवाच्या इच्छेनुसार कार्य करणारे आणि राज्याशी संबंधित कार्यांसाठी स्वतःला झोकून देणारे ख्रिस्ती स्त्री-पुरुष पूर्ण वेळचे स्वयंसेवक म्हणून कार्य करतात. (मत्तय ६:३३) येथे कोणालाही पगार मिळत नाही, पण त्यांच्या राहण्याची व खाण्याची व्यवस्था केली जाते आणि त्यांच्या वैयक्तिक खर्चासाठी छोटीशी रक्कम त्यांना दिली जाते. बेथेलमध्ये प्रत्येकाला नेमणूक दिली जाते मग ती ऑफिसमध्ये असो, किचनमध्ये असो, डायनिंग हॉलमध्ये असो किंवा इतर कोणत्याही विभागात असो. काहींना छापखान्यात, बाइंडिंग विभागात, खोल्यांची सफाई करण्याच्या कामात, लॉन्ड्रीमध्ये, मेंटेनंसमध्ये किंवा इतर विभागात नेमले जाते.

राज्य प्रचाराला चालना देणारे एक व्यस्त ठिकाण. बायबलचे सत्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणे हा प्रत्येक बेथेलगृहाचा मुख्य हेतू आहे. या माहितीपत्रकाचेच उदाहरण घ्या. हे माहितीपत्रक नियमन मंडळाच्या देखरेखीखाली लिहिण्यात आले, मग ते इंटरनेटच्या माध्यमाने जगभरात असलेल्या भाषांतर गटांपर्यंत पोचवण्यात आले, त्यानंतर जलद गतीने कार्य करणाऱ्या छपाई यंत्रांवर त्याची छपाई करण्यात आली आणि शेवटी हे माहितीपत्रक १,१०,००० पेक्षा जास्त मंडळ्यांना पाठवण्यात आले. या प्रत्येक टप्प्यात बेथेल कुटुंब महत्त्वाची भूमिका निभावते. अशा प्रकारे, बेथेल कुटुंब आपल्या काळातल्या सर्वात महत्त्वाच्या कार्याला म्हणजेच सुवार्ता सांगण्याच्या कार्याला पाठिंबा देते.—मार्क १३:१०.

  • बेथेलगृहात कोण सेवा करतात आणि त्यांच्यासाठी कोणत्या तरतुदी केल्या जातात?

  • प्रत्येक बेथेल कुटुंब कोणत्या महत्त्वाच्या कार्याला पाठिंबा देते?