व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ २६

आपण आपले राज्य सभागृह सुस्थितीत कसे ठेवू शकतो?

आपण आपले राज्य सभागृह सुस्थितीत कसे ठेवू शकतो?

एस्टोनिया

झिम्बाब्वे

मंगोलिया

प्वेर्टोरिको

यहोवाच्या साक्षीदारांचे प्रत्येक राज्य सभागृह देवाचे पवित्र नाव धारण करते. त्यामुळे ते स्वच्छ, नीटनेटके व सुस्थितीत ठेवणे ही आपल्यासाठी एक सन्मानाची गोष्ट आहे व आपल्या पवित्र उपासनेचे ते एक अविभाज्य अंग आहे. आपले सभागृह सुस्थितीत ठेवण्यात प्रत्येक जण हातभार लावू शकतो. आपण हे कसे करू शकतो?

सभा संपल्यानंतर स्वच्छता करण्यात पुढाकार घ्या. प्रत्येक सभा संपल्यानंतर बंधुभगिनी राज्य सभागृहाची थोडीफार स्वच्छता करण्यात आनंदाने हातभार लावतात. मग, आठवड्यातून एकदा अधिक चांगल्या प्रकारे स्वच्छता केली जाते. मंडळीतले एखादे वडील किंवा सेवा सेवक या कामाचे संयोजन करतात. त्यांच्याजवळ कोण-कोणती कामे केली जावीत याची एक यादी असते आणि त्यानुसार सगळी कामे केली आहेत याची ते खातरी करतात. यात झाडू मारणे, लादी पुसणे, डस्टिंग करणे, खुर्च्या व्यवस्थित लावणे, बाथरूम, खिडक्या, काचा, आरसे धुवून काढणे, केरकचरा टाकून देणे, सभागृहाची इमारत बाहेरून स्वच्छ करणे, आजूबाजूची जागा स्वच्छ करणे या सर्व गोष्टी समाविष्ट असतात. मग, निदान वर्षातून एकदा तरी सभागृहाची कसून स्वच्छता केली जाते. काही लहानसहान कामे करण्यात आपल्या मुलांना सामील केल्याने आपण त्यांना आपल्या उपासनास्थळांचा आदर करण्यास शिकवतो.—उपदेशक ५:१.

दुरुस्तीची कामे करण्यास पुढाकार घ्या. दर वर्षी राज्य सभागृहाची आतून-बाहेरून कसून पाहणी केली जाते. त्यानुसार, नियमितपणे दुरुस्तीची कामे केली जातात, जेणेकरून सभागृह सुस्थितीत राहते आणि अनावश्यक खर्च टाळला जातो. (२ इतिहास २४:१३; ३४:१०) देवाची उपासना करण्यासाठी स्वच्छ व सुस्थितीत ठेवलेले सभागृह सगळ्यात योग्य ठिकाण आहे. या कामात हातभार लावल्याने आपल्याला यहोवाबद्दल व आपल्या उपासनास्थळाबद्दल किती प्रेम आहे हे आपण दाखवून देतो. (स्तोत्र १२२:१) स्वच्छ व सुस्थितीत ठेवलेले राज्य सभागृह पाहून आजूबाजूच्या लोकांवर चांगली छाप पडते.—२ करिंथकर ६:३.

  • आपण आपल्या उपासनास्थळाकडे दुर्लक्ष का करू नये?

  • राज्य सभागृह स्वच्छ ठेवण्यासाठी कोणत्या योजना केल्या जातात?