व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ३

या आनंदाच्या बातमीवर आपण का विश्‍वास ठेवू शकतो?

या आनंदाच्या बातमीवर आपण का विश्‍वास ठेवू शकतो?

१. बायबलचा लेखक कोण आहे?

लोक या पृथ्वीवर सदासर्वकाळ राहतील, ही आनंदाची बातमी आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळते. (स्तोत्र ३७:२९) बऱ्‍याच लोकांनी बायबलबद्दल ऐकलं आहे, पण हे पुस्तक कुठून आलं आणि यात कोणती माहिती आहे, हे त्यांना माहीत नाही. खरंतर बायबल हे पुस्तक ६६ छोट्या-छोट्या पुस्तकांनी मिळून बनलं आहे. ही पुस्तकं लिहिण्यासाठी देवाने ४० विश्‍वासू माणसांचा उपयोग केला. बायबलची पहिली पाच पुस्तकं मोशे नावाच्या एका माणसाने आजपासून जवळजवळ ३,५०० वर्षांआधी लिहिली होती. तर शेवटचं पुस्तक प्रेषित योहान याने आजपासून १,९०० पेक्षा जास्त वर्षांआधी लिहिलं. बायबलच्या लेखकांनी त्यात स्वतःचे विचार लिहिले का? नाही. त्यांनी स्वतःचे नाही, तर देवाचे विचार लिहिले. देवाने त्याच्या पवित्र शक्‍तीद्वारे त्याचे विचार त्यांना कळवले. (२ शमुवेल २३:२) म्हणून आपण असं म्हणू शकतो, की बायबलचा लेखक यहोवा आहे.—२ तीमथ्य ३:१६; २ पेत्र १:२०, २१ वाचा.

बायबलचा लेखक कोण आहे? हा व्हिडिओ पाहा

२. बायबलमधली माहिती खरी आहे हे आपण कशावरून म्हणू शकतो?

बायबल हे पुस्तक देवाकडून आहे असं आपण म्हणू शकतो, कारण यात भविष्याबद्दल सांगितलेली बारीकसारीक माहितीसुद्धा अगदी पूर्णपणे खरी ठरली आहे. कोणताही माणूस भविष्याबद्दल इतकी अचूक माहिती देऊ शकत नाही. (यहोशवा २३:१४) भविष्यात काय होईल हे फक्‍त सर्वसमर्थ देवच अचूकपणे सांगू शकतो.—यशया ४२:९; ४६:१० वाचा.

जर एखादं पुस्तक देवाकडून असेल, तर ते इतर सगळ्या पुस्तकांपेक्षा अगदी वेगळं असलं पाहिजे. आणि बायबल खरोखरच असं पुस्तक आहे. आजपर्यंत बायबलच्या करोडो प्रती, शेकडो भाषांमध्ये छापण्यात आल्या आहेत. हे जुन्या काळात लिहिलेलं पुस्तक असलं, तरी त्यातली माहिती विज्ञानाच्या दृष्टीने अचूक आहे. तसंच, याच्या ४० लेखकांनी ज्या गोष्टी लिहिल्या, त्या कुठेही एकमेकांच्या विरोधात असल्याचं दिसून येत नाही. * बायबलमध्ये लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीवरून देवाचं प्रेम दिसून येतं. आणि आजही या पुस्तकात लोकांच्या जीवनामध्ये चांगला बदल घडवून आणण्याची ताकद आहे. या सर्व गोष्टींमुळे लाखो लोकांना याची खातरी पटली आहे, की बायबल हे खरोखरच देवाचं वचन आहे.—१ थेस्सलनीकाकर २:१३ वाचा.

बायबल देवाकडून असल्याची खातरी आपण का बाळगू शकतो? हा व्हिडिओ पाहा

३. बायबलमध्ये कोणती माहिती दिली आहे?

देव कशा प्रकारे सगळ्या दुःखांचा अंत करून मानवजातीला पृथ्वीवर सदासर्वकाळाचं जीवन देईल, हाच बायबलचा मुख्य विषय आहे. देवाने सुरुवातीला दिलेलं नंदनवनातलं सुंदर जीवन मानवाने कसं गमावलं आणि देव पुन्हा एकदा या पृथ्वीला नंदनवन कसं बनवेल, हे संपूर्ण बायबलमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.—प्रकटीकरण २१:४, ५ वाचा.

बायबलमध्ये बरेच नियम, तत्त्वं आणि सल्लेसुद्धा आहेत. शिवाय, देवाने मानवजातीसोबत कसा व्यवहार केला, याची उदाहरणं आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळतात. या अहवालांवरून देवाचे वेगवेगळे गुण आपल्याला दिसून येतात. बायबल वाचल्यामुळे देव कशा प्रकारची व्यक्‍ती आहे, हे समजायला तुम्हाला मदत होईल. आणि त्याच्याशी जवळचं नातं जोडायला तुम्ही काय केलं पाहिजे, हेही तुम्हाला समजेल.—स्तोत्र १९:७, ११; याकोब २:२३; ४:८ वाचा.

४. तुम्हाला बायबल समजून घ्यायला कशामुळे मदत होईल?

येशू सहसा लोकांना शास्त्रवचनं सांगून, त्या “शास्त्रवचनांचा अर्थ” स्पष्ट करायचा. या माहितीपत्रकातसुद्धा याच पद्धतीचा उपयोग करण्यात आला आहे. त्यामुळे, हे माहितीपत्रक तुम्हाला बायबल आणखी चांगल्या प्रकारे समजून घ्यायला मदत करेल.—लूक २४:२७, ४५ वाचा.

देवाकडून असलेली आनंदाची बातमी खरंच खूप रोमांचक आहे! तरीपण, काही लोक तिच्याकडे दुर्लक्ष करतात आणि काहींना तर ती ऐकून रागही येतो. पण तुम्ही यामुळे निराश होऊ नका. कारण देवाला जाणून घेतल्यामुळेच तुम्हाला सदासर्वकाळाचं जीवन मिळेल.—योहान १७:३ वाचा.

 

^ परि. 3 सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक  हे माहितीपत्रक पाहा.