व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ १५

तुम्ही यहोवाबद्दल का शिकत राहिलं पाहिजे?

तुम्ही यहोवाबद्दल का शिकत राहिलं पाहिजे?

१. बायबलचा हा अभ्यास चालू ठेवल्यामुळे तुम्हाला कसा फायदा होईल?

बायबलमधल्या महत्त्वाच्या शिकवणी जाणून घेतल्यामुळे यहोवावरचं तुमचं प्रेम नक्कीच वाढलं असेल. पण हे प्रेम असंच वाढत राहावं म्हणून तुम्हाला सतत प्रयत्न करावा लागेल. (१ पेत्र २:२) यासाठी तुम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास करून, त्याच्यासोबत एक जवळचं नातं जोडायचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळेच तुम्हाला भविष्यात सर्वकाळाचं जीवन मिळेल.—योहान १७:३; यहूदा २१ वाचा.

देवाबद्दलचं तुमचं ज्ञान वाढेल, तसतसा तुमचा विश्‍वासही मजबूत होत जाईल. आणि यामुळे तुम्ही देवाला खूश करू शकाल. (इब्री लोकांना ११:१, ६) कारण या विश्‍वासामुळेच, तुम्हाला पश्‍चात्ताप करून जीवनात योग्य ते बदल करायची प्रेरणा मिळेल.—प्रेषितांची कार्यं ३:१९ वाचा.

२. देवाबद्दल तुम्ही जे शिकून घेत आहात त्यामुळे दुसऱ्‍यांना कसा फायदा होईल?

यहोवासोबत एक खास नातं जोडायची संधी तुमच्याजवळ आहे

आपल्याला एखादी चांगली बातमी कळते, तेव्हा आपल्याला ती इतरांना सांगावीशी वाटते. तुम्हालाही बायबलमधून शिकलेल्या चांगल्या गोष्टी इतरांना सांगाव्याशा वाटत असतील. बायबलचा अभ्यास करत राहिल्यामुळे तुम्हाला यहोवाबद्दल आणि आनंदाच्या बातमीबद्दल इतरांना बायबलमधून कसं सांगायचं, हे शिकायला मिळेल.—रोमकर १०:१३-१५ वाचा.

बरेच जण सगळ्यात आधी आपल्या मित्रांना किंवा नातेवाइकांना या आनंदाच्या संदेशाबद्दल सांगतात. कदाचित तुम्हीही सांगत असाल. पण आपल्या मित्रांशी किंवा नातेवाइकांशी बोलत असताना, त्यांच्या भावनांचा विचार करा. त्यांच्या धर्मात चुकीच्या गोष्टी शिकवल्या जातात असं म्हणण्याऐवजी, देव भविष्यात कोणकोणत्या चांगल्या गोष्टी करणार आहे, त्याबद्दल त्यांना सांगा. तसंच तुम्ही काय बोलता, यापेक्षा तुमच्या प्रेमळ वागणुकीचा लोकांवर जास्त प्रभाव पडतो, हे कधीही विसरू नका.—२ तीमथ्य २:२४, २५ वाचा.

३. तुम्ही देवासोबत कशा प्रकारचं नातं जोडू शकाल?

देवाच्या वचनाचा अभ्यास करत राहिल्यामुळे, तुम्ही देवाच्या आणखी जवळ जाल. आणि पुढे देवासोबत एक खास नातं जोडायची तुमच्याजवळ संधी आहे. तुम्ही त्याच्या कुटुंबाचा एक सदस्य बनाल. आणि यहोवा तुमचा पिता असेल.—२ करिंथकर ६:१८ वाचा.

४. तुम्ही पुढेही प्रगती कशी करत राहू शकता?

बायबलचा अभ्यास करत राहिल्यामुळे तुम्ही देवासारखा विचार करण्याच्या बाबतीत दिवसेंदिवस प्रगती करू शकाल. (इब्री लोकांना ५:१३, १४) बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?  या पुस्तकातून तुमच्यासोबत अभ्यास करायची यहोवाच्या साक्षीदारांना विनंती करा. कारण तुम्ही देवाच्या वचनातून जितकं शिकत राहाल, तितकं तुम्ही जीवनात आनंदी व्हाल.—स्तोत्र १:१-३; ७३:२७, २८ वाचा.

आपण जाणून घेतलेली आनंदाची बातमी, आनंदी देव यहोवा याने आपल्याला दिली आहे. त्याच्या आणखी जवळ जाण्यासाठी तुम्ही त्याच्या लोकांशी जवळचं नातं जोडलं पाहिजे. (इब्री लोकांना १०:२४, २५) यहोवाचं मन आनंदित करत राहा. असं केल्यामुळे, तुम्ही खरं जीवन म्हणजे सर्वकाळाचं जीवन मिळवू शकाल. खरंच, देवासोबत जवळचं नातं जोडण्याचा निर्णय, हा तुमच्या जीवनातला सगळ्यात चांगला निर्णय असेल.—१ तीमथ्य १:११; ६:१९ वाचा.