व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धडा ६

दावीद घाबरला नाही

दावीद घाबरला नाही

तुला भीती वाटते तेव्हा तू काय करतोस?— मम्मीकडं किंवा पप्पांकडं पळत जातोस, हो ना? पण मम्मी-पप्पांपेक्षा आणखी एक जण आहे जो तुला मदत करू शकतो. तो खूप शक्तिमान आहे. माहीतंय कोण आहे तो?— बरोबर. यहोवा देव. बायबलमध्ये दावीद नावाच्या एका माणसाबद्दल सांगितलंय. त्याला माहीत होतं, की यहोवा नेहमी त्याला मदत करतो म्हणून तो कधीच घाबरला नाही.

दावीद लहान होता तेव्हापासूनच त्याच्या आईबाबांनी त्याला यहोवावर प्रेम करायला शिकवलं. म्हणून कुठलीही गोष्ट मग ती घाबरवणारी असली तरी त्याला कधी भीती वाटली नाही. त्याला माहीत होतं, की यहोवा त्याचा मित्र आहे आणि त्याला नक्की मदत करेल. एकदा दाविदानं त्याच्या मेंढरांना चरायला नेलं होतं. तेव्हा एक मोठा सिंह तिथं आला आणि तो दाविदाच्या एका मेंढराला तोंडात धरून पळून जाऊ लागला. मग दाविदानं काय केलं माहीतंय? तो त्या सिंहाच्या मागे धावला आणि त्याची दाढी धरून त्याला असं जोरात मारलं की तो सिंह मरूनच गेला. आणखी एकदा एका अस्वलानं दाविदाचं एक मेंढरू उचलून नेलं तेव्हा दाविदानं त्या अस्वलालासुद्धा ठार मारून मेंढराला वाचवलं. दाविदाला अशी शक्ती कुणी दिली बरं?— बरोबर, यहोवा देवानं!

दाविदानं आणखी एकदा धाडस दाखवलं. इस्राएली लोक पलिष्टी लोकांबरोबर लढाई करत होते. त्यातला एक सैनिक खूप उंच आणि राक्षसासारखा मोठा होता. त्याचं नाव होतं गल्याथ. हा गल्याथ इस्राएली सैनिकांची आणि यहोवाची टिंगल करत होता. आणि या सैनिकांना म्हणत होता, ‘आहे का कुणाची हिंमत माझ्याबरोबर लढायला?’ पण सगळे इस्राएली लोक त्याच्याबरोबर लढायला भीत होते. मग दाविदानं जेव्हा हे ऐकलं तेव्हा तो गल्याथाला म्हणाला: ‘मी लढेन तुझ्याबरोबर. यहोवा मला मदत करेल आणि मी तुला हरवेन!’ किती धाडसी होता ना दावीद?— पुढं काय झालं बरं?

चित्रात दाविदाच्या हातात दिसतं तशा गोफणीत तो पाच गुळगुळीत दगड घेतो आणि त्या राक्षसाबरोबर लढायला जातो. दावीद त्या राक्षसासमोर एकदम टिंगू दिसत होता. त्याला पाहून गल्याथ त्याची थट्टा करत खूप हसला. पण दावीद त्याला म्हणाला: ‘तुझ्या हातात तलवार आहे, पण मी यहोवाचं नाव घेऊन तुझ्याबरोबर लढायला येतोय!’ आणि मग त्यानं त्याच्या गोफणीत एक दगड घातला आणि गल्याथाच्या दिशेनं पळत जाऊन त्याला मारला. तो दगड सरळ गल्याथाच्या दोन डोळ्यांच्या मधोमध त्याच्या कपाळावर असा लागला, की गल्याथ धाडकन्‌ जमिनीवर पडून मरूनच गेला! हे पाहून सर्व पलिष्टी सैनिक खूप घाबरले आणि धूम ठोकून पळून गेले. दावीद एक छोटा मुलगा होता तरीपण तो एका राक्षसाला कसं काय हरवू शकला बरं?— यहोवानं त्याला मदत केली. कारण यहोवा त्या राक्षसापेक्षासुद्धा खूप शक्तिमान आहे!

दावीद घाबरला नाही कारण त्याला माहीत होतं, की यहोवा त्याला नक्की मदत करेल

आपण दाविदाच्या कथेतून काय शिकतो बरं?— यहोवाकडं सगळ्यांपेक्षा जास्त ताकद आहे. आणि यहोवा आपला फ्रेंड आहे. तुला कधी भीती वाटली ना, तर यहोवा तुला धाडसी बनायला मदत करू शकतो!