व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय चार

येशू ख्रिस्ताबद्दलचं सत्य

येशू ख्रिस्ताबद्दलचं सत्य

१, २. (क) एखाद्या व्यक्तीला जवळून ओळखण्यात फक्त तिचं नाव माहीत असणं पुरेसं आहे का? समजावून सांगा. (ख) येशूबद्दल लोक काय विचार करतात?

जगात अनेक नामवंत लोक आहेत. तुम्हाला कदाचित त्यांपैकी काहींची नावंही माहीत असतील. पण फक्त त्या लोकांचं नाव माहीत असलं म्हणजे तुम्ही त्यांना जवळून ओळखता असं म्हणता येईल का? त्यांच्या आवडी-निवडी काय आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

‘येशू ख्रिस्त’ हे नावसुद्धा तुम्ही ऐकलं असेल. सुमारे २,००० वर्षांपूर्वी तो या पृथ्वीवर जगला. बऱ्याच लोकांना त्याचं नाव माहीत असलं तरी, त्याचा स्वभाव कसा होता आणि तो कोण होता हे माहीत नाही. काही जण म्हणतात तो एक चांगला माणूस होता. काही म्हणतात तो देवाचा संदेष्टा होता. काही लोक तर म्हणतात की तो एक देव आहे. तो कोण होता असं तुम्हाला वाटतं?—अंत्यटीप १२ पाहा.

३. यहोवा देव आणि येशू ख्रिस्त या दोघांबद्दलचं सत्य माहीत करून घेणं महत्त्वाचं का आहे?

येशूबद्दलचं सत्य जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. पण ते महत्त्वाचं का आहे? बायबलमध्ये म्हटलं आहे: “सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी हे आवश्यक आहे, की त्यांनी एकाच खऱ्या देवाला, म्हणजे तुला आणि ज्याला तू पाठवलं त्या येशू ख्रिस्ताला ओळखावं.” (योहान १७:३) तुम्ही जर यहोवा देव आणि येशू यांच्याबद्दलचं सत्य जाणून घेतलं तर तुम्हाला नंदनवन झालेल्या पृथ्वीवर सर्वकाळ जगता येईल. (योहान १४:६) तसंच, येशूने आपल्यासमोर कसं जगायचं आणि इतरांसोबत कसं वागायचं याचं उत्तम उदाहरण मांडलं आहे. (योहान १३:३४, ३५) अध्याय १ मध्ये आपण देवाबद्दलचं सत्य माहीत करून घेतलं. या अध्यायात आपण येशूबद्दल बायबलमध्ये काय सांगितलं आहे ते शिकणार आहोत.

आम्हाला मसीहा सापडला आहे!

४. ‘मसीहा’ आणि ‘ख्रिस्त’ या दोन्ही पदव्यांचा काय अर्थ होतो?

येशूचा पृथ्वीवर जन्म व्हायच्या कित्येक वर्षांआधी यहोवा देवाने बायबलमध्ये अशी भविष्यवाणी केली होती, की तो मसीहाला किंवा ख्रिस्ताला पाठवेल. ‘मसीहा’ हा इब्री भाषेतला आणि ‘ख्रिस्त’ हा ग्रीक भाषेतला शब्द आहे. या दोन्ही पदव्यांचा अर्थ असा होतो की, देव मसीहाची निवड करून त्याच्यावर एक खास कार्य सोपवेल. मसीहा, देवाने दिलेली सर्व अभिवचनं पूर्ण करणार आहे. इतकंच नाही तर, येशू आजदेखील तुम्हाला मदत करू शकतो. पण येशूचा जन्म होण्याआधी अनेकांच्या मनात प्रश्न होता की ‘मसीहा कोण असेल?’

५. येशूच मसीहा आहे याविषयी त्याच्या शिष्यांच्या मनात शंका होती का?

येशूच वचन दिलेला मसीहा आहे याबद्दल त्याच्या शिष्यांच्या मनात कसलीही शंका नव्हती. (योहान १:४१) उदाहरणार्थ, शिमोन पेत्र येशूला म्हणाला: “तू ख्रिस्त . . . आहेस.” (मत्तय १६:१६) येशूच मसीहा आहे हे आपणही खातरीने का म्हणू शकतो?

६. मसीहाला ओळखण्यासाठी यहोवाने प्रामाणिक मनाच्या लोकांना कशी मदत केली आहे?

येशूचा पृथ्वीवर जन्म होण्याआधी देवाच्या संदेष्ट्यांनी मसीहाला ओळखण्याकरता बरीच माहिती दिली होती. याचा नंतर फायदा कसा होणार होता? हे समजण्यासाठी एका उदाहरणावर विचार करा. समजा तुम्हाला, बस स्टॉपवरून अशा व्यक्तीला आणायला सांगितलं जातं, जिला तुम्ही पूर्वी कधीच पाहिलं नाही. पण ती व्यक्ती कशी दिसते याबद्दल कोणी तुम्हाला अचूक माहिती दिली, तर तुम्ही तिला लगेच ओळखू शकाल. तसंच, यहोवा देवाने आपल्याला त्याच्या संदेष्ट्यांद्वारे मसीहा काय करेल आणि इतर लोक त्याच्याशी कसं वागतील याबद्दल सांगितलं. त्याच्याबद्दलच्या सर्व भविष्यवाण्यांच्या पूर्णतेमुळे प्रामाणिक मनाच्या लोकांना येशू हाच मसीहा आहे हे ओळखण्यास मदत होते.

७. कोणत्या दोन भविष्यवाण्यांवरून सिद्ध होतं की येशूच मसीहा आहे?

मसीहाविषयीच्या दोन भविष्यवाण्यांवर आपण विचार करू या. पहिली भविष्यवाणी येशूचा पृथ्वीवर जन्म व्हायच्या ७०० वर्षांआधी करण्यात आली होती. मसीहाचा जन्म बेथलेहेममधल्या एका लहानशा गावी होईल अशी भविष्यवाणी मीखा संदेष्ट्याने केली होती. (मीखा ५:२) येशूचा जन्म त्याच गावात झाला. (मत्तय २:१, ३-९) दुसरी भविष्यवाणी दानीएल संदेष्ट्याने केली. मसीहा इ.स. २९ साली प्रकट होईल असं त्यावरून सूचित झालं. (दानीएल ९:२५) आपण फक्त दोन उदाहरणं पाहिली. बायबलमध्ये अशा अनेक भविष्यवाण्या आहेत ज्यांवरून हे सिद्ध होतं की येशूच मसीहा आहे.—अंत्यटीप १३ पाहा.

येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तो मसीहा किंवा ख्रिस्त बनला

८, ९. येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी जे झालं त्यावरून येशू हाच मसीहा आहे हे कसं सिद्ध झालं?

येशू हाच मसीहा आहे हे यहोवा देवाने स्वतः स्पष्ट केलं. मसीहाची ओळख व्हावी म्हणून देवाने बाप्तिस्मा देणाऱ्या योहानला एक चिन्ह देण्याचं वचन दिलं. इ.स. २९ साली यार्देन नदीत येशूला बाप्तिस्मा दिल्यानंतर योहानने ते चिन्ह स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. त्याबद्दल बायबलमध्ये असं सांगितलं आहे: “बाप्तिस्मा झाल्यानंतर येशू लगेच पाण्यातून वर आला आणि पाहा! आकाश उघडले व देवाचा आत्मा कबुतरासारखा येशूवर उतरताना योहानला दिसला. त्याच वेळी स्वर्गातून असा आवाज ऐकू आला: ‘हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे.’” (मत्तय ३:१६, १७) योहानने हे चिन्ह पाहिल्यावर त्याची खातरी पटली, की येशूच मसीहा आहे. (योहान १:३२-३४) येशूच्या बाप्तिस्म्याच्या दिवशी यहोवाने आपला पवित्र आत्मा त्याच्यावर ओतला आणि येशू मसीहा झाला. त्यालाच देवाने राजा व नेता म्हणून निवडलं.—यशया ५५:४.

बायबलमधल्या भविष्यवाण्या, यहोवाने केलेली आकाशवाणी आणि येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी त्याने दिलेलं चिन्ह, सिद्ध करतात की येशूच मसीहा आहे. पण पृथ्वीवर येण्याआधी येशू कुठे होता? त्याचा स्वभाव कसा होता? याविषयी बायबलमध्ये काय सांगितलं आहे ते आपण पाहू या.

पृथ्वीवर येण्याआधी येशू कुठे होता?

१०. पृथ्वीवर येण्याआधी येशू कुठे होता याबद्दल बायबलमध्ये काय शिकवण्यात आलं आहे?

१० बायबलमध्ये सांगितलं आहे की पृथ्वीवर येण्याआधी बराच काळ येशू स्वर्गात होता. मसीहा “प्राचीन काळापासून” आहे, असं मीखाने म्हटलं. (मीखा ५:२) येशूनेदेखील अनेकदा म्हटलं, की पृथ्वीवर येण्याआधी मी स्वर्गात होतो. (योहान ३:१३; ६:३८, ६२; १७:४, ५ वाचा.) त्यामुळे पृथ्वीवर येण्याआधीच येशूचं यहोवासोबत एक जवळचं नातं होतं.

११. यहोवाचं येशूवर खूप प्रेम का आहे?

११ यहोवाचं येशूवर खूप प्रेम आहे कारण त्याने सर्वात आधी, म्हणजे सर्व सृष्टी निर्माण करण्याआधी येशूला बनवलं होतं. म्हणूनच त्याला “सर्व गोष्टींत प्रथम जन्मलेला” असं म्हटलं आहे. * (कलस्सैकर १:१५) यहोवाने स्वतः येशूला बनवलं असल्यामुळेही त्याचं येशूवर खूप प्रेम आहे. म्हणूनच त्याला “एकुलता एक पुत्र” असं म्हटलं आहे. (योहान ३:१६) शिवाय, यहोवाने इतर सर्व सृष्टी येशूद्वारेच घडवली. (कलस्सैकर १:१६) तसंच, फक्त येशूलाच “शब्द” असं म्हटलं जातं कारण यहोवाने देवदूत व मानव यांना आपले संदेश व सूचना कळवण्याकरता येशूचा उपयोग केला.—योहान १:१४.

१२. येशू आणि यहोवा हे दोघंही एक नाहीत, हे आपण खातरीने का म्हणू शकतो?

१२ येशू आणि यहोवा हे दोघंही एक आहेत, असं काही लोक मानतात. पण बायबल असं शिकवत नाही. बायबलमध्ये म्हटलं आहे, की येशूला देवाने निर्माण केलं. म्हणजे येशूला सुरुवात आहे. पण ज्याने सर्वकाही बनवलं त्या यहोवा देवाला सुरुवात नाही. (स्तोत्र ९०:२) देवाचा पुत्र असल्यामुळे येशूने कधीच देव बनण्याचा प्रयत्न केला नाही. उलट बायबलमध्ये असं स्पष्टपणे म्हटलं आहे की पिता पुत्रापेक्षा श्रेष्ठ आहे. (योहान १४:२८ वाचा; १ करिंथकर ११:३.) फक्त यहोवाच “सर्वसमर्थ देव” आहे. (उत्पत्ति १७:१) संपूर्ण विश्वात तोच सर्वात महान आणि सर्वात शक्तिशाली आहे.—अंत्यटीप १४ पाहा.

१३. बायबलमध्ये येशूला “अदृश्य देवाचे प्रतिरूप” असं का म्हटलं आहे?

१३ सृष्टीची निर्मिती करण्याच्या कोट्यवधी वर्षांआधीपासून यहोवा आणि येशू हे एकत्र होते. त्यामुळे त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. (योहान ३:३५; १४:३१) येशूने यहोवाचे गुण आपल्या वागण्याबोलण्यातून इतके हुबेहूब दाखवले, की बायबलमध्ये त्याला “अदृश्य देवाचे प्रतिरूप” असं म्हटलं आहे.—कलस्सैकर १:१५.

१४. यहोवाचा प्रिय पुत्र मानव म्हणून कसा जन्माला आला?

१४ यहोवाचा प्रिय पुत्र स्वर्ग सोडून पृथ्वीवर एक मानव म्हणून जन्म घेण्यास तयार झाला. तेव्हा यहोवाने त्याच्या पुत्राचा जीव चमत्काराने मरीया नावाच्या एका कुमारिकेच्या गर्भात घातला. त्यामुळे गर्भधारण करण्यासाठी कोणा मानवी पित्याची गरज पडली नाही. मरीयाने एका परिपूर्ण पुत्राला जन्म दिला व त्याचं नाव येशू ठेवलं.—लूक १:३०-३५.

येशू कसा व्यक्ती होता?

१५. तुम्ही यहोवाला चांगल्या प्रकारे कसं जाणू शकता?

१५ बायबलमधल्या मत्तय, मार्क, लूक व योहान या पुस्तकांना ‘शुभवर्तमानाची पुस्तकं’ म्हटलं जातं. या पुस्तकांतून तुम्हाला येशू, त्याचं जीवन आणि त्याचे गुण यांबद्दल बरंच काही शिकता येईल. येशूचा स्वभाव अगदी त्याच्या पित्यासारखाच असल्यामुळे, तुम्ही जेव्हा येशूबद्दल वाचाल तेव्हा तुम्हाला यहोवाबद्दल आणखी समजेल. म्हणूनच येशूसुद्धा असं म्हणू शकला: “ज्याने मला पाहिलं आहे, त्याने पित्यालाही पाहिलं आहे.”—योहान १४:९.

१६. येशूने काय शिकवलं? त्याने जे काही शिकवलं ते कोणाकडून होतं?

१६ खूप लोक येशूला “गुरुजी” असं म्हणायचे. (योहान १:३८; १३:१३) त्याने शिकवलेल्या महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे, “राज्याबद्दलचा आनंदाचा संदेश.” (मत्तय ४:२३) हे राज्य काय आहे? ते देवाचं सरकार आहे. या सरकारद्वारे देव स्वर्गातून संपूर्ण पृथ्वीवर राज्य करणार आहे आणि त्याच्या आज्ञा पाळणाऱ्या लोकांना आशीर्वाद देणार आहे. (मत्तय ४:२३) येशूने जे काही शिकवलं ते यहोवा देवाकडून होतं. त्यामुळे तो म्हणाला: “मी जे शिकवतो ते माझं स्वतःचं नसून, ज्याने मला पाठवलं त्याच्याकडून आहे.” (योहान ७:१६) देव पृथ्वीवर राज्य करणार आहे, हा आनंदाचा संदेश लोकांनी ऐकावा, अशी यहोवा देवाची इच्छा आहे हे येशूला माहीत होतं.

१७. येशू कुठेकुठे शिकवायचा? इतरांना शिकवण्यासाठी त्याने इतकी मेहनत का घेतली?

१७ येशू कुठेकुठे शिकवायचा? जिथे त्याला लोक भेटतील तिथे. गावात, गावाच्या बाहेर, शहरात, बाजारांत, मंदिरात, सभास्थानांत आणि लोकांच्या घरी जाऊन तो त्यांना शिकवायचा. लोकांनी आपल्याकडे यावं अशी त्याची अपेक्षा नव्हती, तर तो लोकांकडे जायचा. (मार्क ६:५६; लूक १९:५, ६) लोकांना शिकवण्यात त्याने बरीच मेहनत घेतली, पुष्कळ वेळ खर्च केला. पण, त्याने इतकी मेहनत का घेतली? कारण त्याला माहीत होतं की त्याने लोकांना शिकवावं अशी देवाची त्याच्याकडून अपेक्षा होती. त्याने नेहमी आपल्या पित्याची आज्ञा पाळली. (योहान ८:२८, २९) शिवाय, त्याला लोकांबद्दल कळवळा होता म्हणूनही त्याने प्रचारकार्य केलं. (मत्तय ९:३५, ३६ वाचा.) त्याला स्पष्ट दिसत होतं की धार्मिक पुढारी, देवाबद्दल आणि त्याच्या राज्याबद्दल सत्य शिकवत नव्हते. म्हणून होता होईल तितक्या लोकांना त्याला आनंदाचा संदेश सांगायचा होता.

१८. येशूचे कोणते गुण तुम्हाला सर्वात जास्त आवडले?

१८ येशूचं लोकांवर प्रेम होतं. त्याला त्यांची काळजी होती. तो दयाळू होता. त्याच्याशी कोणीही सहज बोलू शकत होतं. मुलांनासुद्धा त्याच्याकडे जायला आवडायचं. (मार्क १०:१३-१६) येशूने लोकांशी कधी भेदभाव केला नाही. त्याला भ्रष्टाचार आणि अन्याय पाहून चीड यायची. (मत्तय २१:१२, १३) त्याच्या काळात स्त्रियांना बऱ्याच गोष्टी करण्याचा अधिकार नव्हता आणि त्यांना आदराने वागवलं जात नसे. पण येशूने मात्र स्त्रियांना नेहमी आदराने व सन्मानाने वागवलं. (योहान ४:९, २७) येशू नम्रदेखील होता. त्याने एकदा असं काम केलं जे सहसा घरातले सेवक करायचे. त्याने आपल्या शिष्यांचे पाय धुतले.—योहान १३:२-५, १२-१७.

जिथेजिथे लोक भेटायचे तिथेतिथे येशू प्रचार करायचा

१९. लोकांना कशाची गरज आहे हे येशूला माहीत होतं आणि त्यांना मदत करण्याची त्याची इच्छा होती, हे कोणत्या उदाहरणावरून दिसून येतं?

१९ लोकांना कशाची गरज आहे हे येशूला माहीत होतं आणि त्यांना मदत करायची त्याची इच्छा होती. देवाच्या शक्तीचा उपयोग करून त्याने लोकांना चमत्काराने बरं केलं त्यावरून हे दिसून आलं. (मत्तय १४:१४) एकदा, कुष्ठरोग झालेला एक माणूस त्याच्याजवळ येऊन म्हणाला: “तुमची इच्छा असेल, तर तुम्ही मला शुद्ध करू शकता.” या माणसाचं दुःख आणि त्रास पाहून येशूला खूप वाईट वाटलं म्हणून त्याने त्याची मदत केली. येशूने आपला हात पुढे करून त्या माणसाला स्पर्श करत म्हटलं: “माझी इच्छा आहे! शुद्ध हो.” त्याला स्पर्श केल्याबरोबर तो माणूस बरा झाला. (मार्क १:४०-४२) या माणसाला कसं वाटलं असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता का?

आपल्या पित्याशी नेहमी विश्वासू राहिला

२०, २१. देवाशी आज्ञाधारक राहण्याबाबतीत येशूने आपल्यापुढे सर्वोत्तम उदाहरण कसं मांडलं?

२० देवाशी आज्ञाधारक राहण्याबाबतीत येशूने आपल्यापुढे सर्वोत्तम उदाहरण मांडलं. तो सर्व परिस्थितीत आपल्या पित्याशी विश्वासू राहिला. त्याच्या शत्रूंनी त्याचा छळ केला तरीसुद्धा त्याने देवाला सोडलं नाही. सैतानाने त्याला मोहात पाडायचा प्रयत्न केला तेव्हाही त्याने पाप केलं नाही. (मत्तय ४:१-११) त्याच्या कुटुंबातल्या काही लोकांनी तो मसीहा आहे, यावर विश्वास ठेवला नाही. “त्याला वेड लागलं आहे” असंदेखील ते म्हणाले, तरीही तो देवाचं काम करत राहिला. (मार्क ३:२१) त्याचे शत्रू त्याच्याशी क्रूरपणे वागले तरीसुद्धा त्याने सूड घेतला नाही तर सर्वकाही सहन करत देवाशी विश्वासू राहिला.—१ पेत्र २:२१-२३.

२१ येशूच्या मृत्यूच्या वेळी त्याला खूप यातना आणि वेदना सहन कराव्या लागल्या, तरीही तो देवाशी विश्वासू राहिला. (फिलिप्पैकर २:८ वाचा.) त्याच्या मृत्यूच्या दिवशी त्याला किती सहन करावं लागलं याचा विचार करा. त्याला अटक करण्यात आली, तो देवाच्या नावाची निंदा करत आहे असा त्याच्यावर खोटा आरोप लावण्यात आला, भ्रष्ट न्यायाधीशांनी त्याला मृत्युदंड दिला, लोकांनी त्याची थट्टा केली, सैनिकांनी त्याचा छळ केला आणि शेवटी त्याला वधस्तंभावर खिळण्यात आलं. त्याच्या शेवटच्या श्वासाला तो म्हणाला: “पूर्ण झालं आहे!” (योहान १९:३०) येशूला मरून तीन दिवस झाल्यानंतर यहोवाने त्याला पुन्हा जिवंत केलं आणि आत्मिक शरीर दिलं. (१ पेत्र ३:१८) काही आठवड्यानंतर येशू स्वर्गात गेला आणि त्याला राजा म्हणून नियुक्त करेपर्यंत तो “देवाच्या उजवीकडे बसला.”—इब्री लोकांना १०:१२, १३.

२२. येशू त्याच्या पित्याशी विश्वासू राहिल्यामुळे आज आपल्याकडे कोणती संधी आहे?

२२ येशू त्याच्या पित्याशी विश्वासू राहिल्यामुळे, यहोवाच्या संकल्पानुसार आपल्याला नंदनवन झालेल्या पृथ्वीवर सदासर्वकाळ जगण्याची संधी आहे. पण येशूच्या मृत्यूमुळे आपल्याला सदासर्वकाळ जगण्याची संधी कशी मिळते, ते आपण पुढच्या अध्यायात पाहू या.

^ परि. 11 यहोवा आपला निर्माणकर्ता असल्यामुळे त्याला पिता म्हटलं आहे. (यशया ६४:८) यहोवाने येशूची निर्मिती केली असल्यामुळे त्याला देवाचा पुत्र म्हटलं आहे. देवदूत आणि पहिला पुरुष आदाम यांनादेखील ‘देवपुत्र’ किंवा ‘देवाचा पुत्र’ असं म्हटलं आहे.—ईयोब १:६; लूक ३:३८.