व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय पाच

खंडणी—देवाची सर्वात मौल्यवान भेट

खंडणी—देवाची सर्वात मौल्यवान भेट

१, २. (क) एखादी भेट मौल्यवान कशावरून ठरते? (ख) खंडणीची भेट ही देवाने दिलेली सर्वात मौल्यवान भेट आहे, असं आपण का म्हणतो?

तुम्हाला मिळालेली सर्वात मौल्यवान भेट कोणती आहे? तुम्हाला कोणी एखादी भेटवस्तू देतं तेव्हा तुम्हाला खूप आनंद होतो. त्यातल्या त्यात तुम्हाला अगदी हवी असलेली वस्तूच जर त्याने दिली असेल तर तुम्ही त्याचे मनापासून आभार मानता.

देवानेसुद्धा आपल्याला अनेक भेटवस्तू दिल्या आहेत. पण त्या सर्व भेटींपैकी एक अशी भेट त्याने आपल्याला दिली आहे ज्याची आपल्याला खूपच गरज होती. मानवांना त्याने दिलेली ही भेट सर्वात मौल्यवान आहे. यहोवाने त्याचा पुत्र येशू याला या पृथ्वीवर आपल्यासाठी पाठवलं त्यामुळे आपण सर्वकाळ जिवंत राहू शकतो. (मत्तय २०:२८ वाचा.) येशूला पृथ्वीवर खंडणी म्हणून पाठवून यहोवाने, त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे हे सिद्ध केलं. या अध्यायात आपण खंडणीविषयी जास्त शिकणार आहोत.

खंडणी म्हणजे काय?

३. आपण का मरतो?

खंडणी म्हणजे, मानवांना पाप आणि मृत्यू यांपासून मुक्त करण्यासाठी यहोवाने केलेली व्यवस्था. (इफिसकर १:७) पण खंडणीची गरज का भासली, हे समजण्यासाठी आधी आपल्याला हजारो वर्षांपूर्वी एदेन बागेत काय झालं, ते पाहावं लागेल. आपले पहिले आईवडील, आदाम व हव्वा यांनी पाप केलं. पाप केल्यामुळे त्यांना मरण आलं. आदाम व हव्वा यांच्याकडून आपल्याला वारशाने पाप मिळाल्यामुळे आपणही मरतो.—अंत्यटीप ९ पाहा.

४. आदाम कोण होता आणि त्याला यहोवाने काय दिलं होतं?

यहोवाने पहिला मनुष्य आदाम याला बनवलं तेव्हा त्याला एक मौल्यवान गोष्ट दिली. ते होतं परिपूर्ण जीवन. म्हणजे त्याचं मन आणि त्याचं शरीर परिपूर्ण होतं. तो कधीच आजारी पडणार नव्हता, म्हातारा होणार नव्हता किंवा मरणारही नव्हता. यहोवाने आदामला निर्माण केलं असल्यामुळे तो त्याच्या पित्यासमान होता. (लूक ३:३८) यहोवा नेहमी आदामसोबत बोलायचा. आदामकडून यहोवाच्या काय अपेक्षा होत्या हे त्याने त्याला अगदी स्पष्ट सांगितलं होतं. शिवाय, त्याने त्याला असं काम दिलं जे आदाम आवडीने करायचा.—उत्पत्ति १:२८-३०; २:१६, १७.

५. आदामला देवाच्या प्रतिरूपात निर्माण करण्यात आलं होतं, असं जे बायबलमध्ये म्हटलं आहे त्याचा काय अर्थ होतो?

यहोवाने आदामला स्वतःच्या प्रतिरूपात निर्माण केलं होतं. (उत्पत्ति १:२७) त्यामुळे तोसुद्धा यहोवाप्रमाणे प्रेम, बुद्धी, न्याय व शक्ती हे गुण दाखवू शकत होता. शिवाय यहोवाने आदामला रोबोटसारखं बनवलं नव्हतं तर त्याला इच्छा स्वातंत्र्य दिलं होतं. त्यामुळे तो योग्य आणि अयोग्य यातली निवड करू शकत होता. त्याने जर देवाची आज्ञा पाळण्याची निवड केली असती तर तो त्या नंदनवनात सदासर्वकाळ जिवंत राहिला असता.

६. देवाची आज्ञा मोडल्यामुळे आदामने काय-काय गमावलं? आदामच्या पापामुळे आपल्यावर काय परिणाम झाला?

आदामने देवाची आज्ञा मोडण्याची निवड केली तेव्हा त्याला मोठी किंमत मोजावी लागली. यहोवाने त्याला मरणाची शिक्षा दिली. आज्ञा मोडल्यामुळे यहोवासोबत त्याचं खास मैत्रीचं नातं तुटलं आणि यहोवाने त्याला दिलेलं परिपूर्ण जीवन व नंदनवनात राहण्याची संधी त्याने गमावली. (उत्पत्ति ३:१७-१९) आदाम व हव्वा यांनी देवाची आज्ञा मोडण्याची निवड केल्यामुळे त्यांच्यासाठी कसलीच आशा उरली नाही. आदाममुळे “पाप जगात आले आणि पापाद्वारे मरण आले, त्याच प्रकारे मरण सर्व माणसांमध्ये पसरले, कारण त्या सर्वांनी पाप केले होते.” (रोमकर ५:१२) देवाची आज्ञा मोडून त्याने जणू काय स्वतःला आणि आपल्या सर्वांना पापाच्या व मृत्यूच्या गुलामीत ‘विकलं.’ (रोमकर ७:१४) मग आपल्यासाठी काही आशा आहे का? हो, यहोवाने आपल्यासाठी खंडणीची व्यवस्था केली.

७, ८. खंडणी म्हणजे काय?

खंडणी म्हणजे काय? खंडणीचे दोन अर्थ असू शकतात. एक म्हणजे एखाद्या व्यक्तीला सोडवण्यासाठी मोजली जाणारी किंवा एखादी गोष्ट पुन्हा विकत घेण्यासाठी दिलेली किंमत. दुसरा म्हणजे, एखाद्या गोष्टीची भरपाई म्हणून दिली जाणारी किंमत ही खंडणी असते.

आदामने पाप करून आणि आपल्या सर्वांवर मृत्यू आणून जे मोठं नुकसान केलं, त्याची भरपाई कोणताच मानव करू शकत नव्हता. पण यहोवाने आपल्याला पाप आणि मृत्यूपासून सुटण्याचा मार्ग दिला. खंडणी आपल्याला कशी लागू होते आणि त्याचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो ते आता आपण शिकू या.

यहोवाने खंडणीची व्यवस्था कशी केली?

९. खंडणी कशी दिली जाऊ शकत होती?

आदामने गमावलेल्या परिपूर्ण जीवनासाठी खंडणी आपल्यापैकी कोणीच देऊ शकलं नसतं. कारण आपण सर्व अपरिपूर्ण आहोत. (स्तोत्र ४९:७, ८) ही खंडणी दुसऱ्या परिपूर्ण मानवी जीवनाने देण्याची गरज होती. म्हणून त्याला “मोबदल्यात” दिलेली खंडणी असं म्हणण्यात आलं आहे. (१ तीमथ्य २:६) त्या जीवनाचं मोल हे आदामने गमावलेल्या जीवनाइतकंच असायला हवं होतं.

१०. यहोवाने खंडणीची व्यवस्था कशी केली?

१० यहोवाने खंडणीची व्यवस्था कशी केली? आपल्या सर्वात प्रिय पुत्राला त्याने पृथ्वीवर पाठवलं. सर्व सृष्टीची निर्मिती करण्याआधी त्याने या पुत्राला, म्हणजे येशूला निर्माण केलं होतं. (१ योहान ४:९, १०) येशूसुद्धा आपल्या पित्याला व स्वर्गातलं आपलं निवासस्थान सोडायला आनंदाने तयार झाला. (फिलिप्पैकर २:७) मग यहोवाने येशूचा जीव पृथ्वीवर असलेल्या मरीयाच्या गर्भात घातला. अशा प्रकारे येशू परिपूर्ण मानव म्हणून जन्माला आला. त्याच्यात पापाचा कसलाच अंश नव्हता.—लूक १:३५.

यहोवाने आपल्या सर्वात प्रिय पुत्राला आपल्यासाठी खंडणी म्हणून दिलं

११. एक मनुष्य अनेकांसाठी खंडणी कसा काय देऊ शकला?

११ पहिला मनुष्य आदाम याने यहोवाची आज्ञा मोडून सर्व मानवांसाठी असलेलं परिपूर्ण जीवन गमावलं. मग, फक्त एकच माणूस इतक्या लोकांना मृत्यूपासून सोडवू शकत होता का? हो, सोडवू शकत होता. (रोमकर ५:१९ वाचा.) कधीच पाप न केलेल्या येशूने स्वतःचं जीवन खंडणी म्हणून दिलं. (१ करिंथकर १५:४५) त्याच्या परिपूर्ण जीवनाच्या आधारावर आदामच्या सर्व मुलांना मृत्यूपासून सोडवणं शक्य झालं.—१ करिंथकर १५:२१, २२.

१२. येशूला इतकं दुःख का सहन करावं लागलं?

१२ येशूचा मृत्यू होण्याआधी त्याने किती यातना सहन केल्या त्याबद्दल बायबलमध्ये सांगितलं आहे. त्याला क्रूरपणे चाबकाचे फटके मारण्यात आले आणि एका वधस्तंभावर खिळे ठोकून लटकवण्यात आलं. यामुळे त्याला लगेच मृत्यू आला नाही. तशा अवस्थेत त्याला खूप यातना सहन कराव्या लागल्या आणि त्यानंतर त्याला मरण आलं. (योहान १९:१, १६-१८, ३०) येशूला इतकं दुःख का सहन करावं लागलं? कारण माणसांवर मोठी परीक्षा आली तर ते देवाला एकनिष्ठ राहणार नाहीत, असा दावा सैतानाने केला होता. परिपूर्ण मानवावर कितीही मोठी परीक्षा आली तरीसुद्धा तो देवाला एकनिष्ठ राहू शकतो, हे येशूने सिद्ध केलं. यहोवाला येशूबद्दल किती अभिमान वाटला असेल!—नीतिसूत्रे २७:११; अंत्यटीप १५ पाहा.

१३. येशूने खंडणीची किंमत कशी दिली?

१३ येशूने खंडणीची किंमत कशी दिली? येशूने त्याच्या परिपूर्ण जीवनाची किंमत त्याच्या पित्याला दिली. यहूदी कॅलेंडरनुसार इ.स. ३३ सालच्या निसान १४ तारखेला यहोवाने आपला पुत्र येशू याला त्याच्या शत्रूंच्या हाती मरू दिलं. (इब्री लोकांना १०:१०) तीन दिवसांनंतर यहोवाने येशूला पुन्हा जिवंत केलं. त्याने त्याला मानव नव्हे तर आत्मिक व्यक्ती म्हणून जिवंत केलं. येशूचं पुनरुत्थान होऊन तो स्वर्गात गेला तेव्हा त्याने स्वतःच्या परिपूर्ण जीवनाची किंमत यहोवाला खंडणी म्हणून दिली. (इब्री लोकांना ९:२४) आता खंडणी दिली गेली असल्यामुळे, आपल्याला पाप आणि मृत्यू यांपासून सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.रोमकर ३:२३, २४ वाचा.

तुम्हाला खंडणीचा फायदा कसा होऊ शकतो?

१४, १५. आपल्या पापांच्या माफीसाठी आपण केलं पाहिजे?

१४ देवाने दिलेल्या खंडणीच्या अमूल्य भेटीमुळे आपल्याला बरेच फायदे होतात. आज आपल्याला यामुळे कसे फायदे होऊ शकतात आणि भविष्यात कसे होणार आहेत ते आपण पाहू या.

१५ आपल्या पापांची क्षमा मिळेल. प्रत्येक वेळी योग्य ते करणं कठीण असतं. आपल्या हातून चुका होतात आणि कधीकधी आपल्या तोंडून असं काही तरी निघतं ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला वाईट वाटतं. (कलस्सैकर १:१३, १४) मग आपल्याला या गोष्टींसाठी माफी मिळेल का? आपल्या हातून घडलेल्या पापांबद्दल आपण मनापासून पश्‍चात्ताप तर केलाच पाहिजे, पण यहोवालासुद्धा आपल्याला माफ करण्याची नम्रपणे विनंती केली पाहिजे. तेव्हाच आपली पापं माफ केली जातील अशी आपण खातरी बाळगू शकतो.—१ योहान १:८, ९.

१६. आपला विवेक शुद्ध ठेवण्याकरता आपण काय केलं पाहिजे?

१६ आपला विवेक शुद्ध राहील. आपण एखादी चूक केली की आपला विवेक आपल्याला सतत दोष देत राहतो. मग आपल्या मनात अपराधीपणाच्या भावना येतात, कोणतीच आशा दिसत नाही आणि आपण काहीच कामाचे नाही, असं वाटू लागतं. अशा वेळी आपण निराश होऊ नये. आपल्याला माफ करावं, अशी यहोवाला आपण विनंती केली तर तो नक्की आपली याचना ऐकून आपल्याला क्षमा करेल. (इब्री लोकांना ९:१३, १४) आपण मनमोकळेपणे यहोवाला आपल्या समस्या आणि कमतरता सांगितल्या पाहिजेत, असं त्याला वाटतं. (इब्री लोकांना ४:१४-१६) असं केल्यामुळे देवापुढे आपला विवेक शुद्ध राहतो.

१७. येशू आपल्यासाठी मरण पावला त्यामुळे आपल्याला कोणते आशीर्वाद मिळू शकतात?

१७ आपल्याला सदासर्वकाळ जिवंत राहण्याची आशा मिळेल. “पापाची मजुरी मृत्यू आहे, पण देवाचे कृपादान, ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्याद्वारे सर्वकाळाचे जीवन हे आहे.” (रोमकर ६:२३) येशू आपल्यासाठी मरण पावला त्यामुळे आपण सदासर्वकाळ जिवंत राहू शकतो आणि चांगलं निरोगी जीवन जगू शकतो. (प्रकटीकरण २१:३, ४) हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल?

येशूच्या खंडणीवर तुम्ही विश्वास ठेवाल का?

१८. यहोवाचं आपल्यावर खूप प्रेम आहे हे आपण खातरीने का म्हणू शकतो?

१८ तुम्हाला जेव्हा कोणी एखादी सुंदरशी भेटवस्तू देतं तेव्हा तुम्हाला कसं वाटतं, याचा विचार करा. खंडणी ही देवाने आपल्या सर्वांना दिलेली सर्वात मौल्यवान भेट आहे. त्याबद्दल आपण यहोवाचे अगदी मनापासून आभार मानले पाहिजेत. योहान ३:१६ मध्ये म्हटलं आहे, की “देवाने जगावर इतकं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला.” खरंच, यहोवाचं आपल्यावर इतकं प्रेम आहे की त्याने आपल्यासाठी त्याचा प्रिय पुत्र दिला. येशूचंसुद्धा आपल्यावर प्रेम आहे, कारण तोसुद्धा आपल्यासाठी त्याच्या जीवनाचं बलिदान द्यायला तयार झाला. (योहान १५:१३) यहोवाने आणि येशूने आपल्याला दिलेल्या खंडणीच्या भेटीमुळे आपली खातरी पटते की या दोघांचं आपल्यावर खरोखर खूप प्रेम आहे.—गलतीकर २:२०.

यहोवाबद्दल शिकत राहिल्यास आपण त्याचे मित्र बनू शकतो आणि त्याच्यावरचं आपलं प्रेम वाढत राहील

१९, २०. (क) तुम्ही यहोवाचे मित्र कसे बनू शकता? (ख) येशूने दिलेल्या खंडणीवर तुमचा विश्वास आहे हे तुम्ही कसं दाखवू शकता?

१९ तुमच्यावर यहोवाचं किती प्रेम आहे हे तुम्हाला कळलं. मग आता तुम्ही त्याचे मित्र कसे बनू शकता? आपण ज्या व्यक्तीला ओळखत नाही तिच्यावर प्रेम करणं सोपं नसतं. म्हणून योहान १७:३ मध्ये म्हटलं आहे, आपण यहोवाला ओळखलं पाहिजे. यहोवाबरोबर तुम्ही ओळख वाढवली, की त्याच्याबद्दल तुमचं प्रेमही वाढेल. तुम्ही नेहमी त्याला आनंद होईल अशाच प्रकारे वागाल आणि त्याचे मित्र बनाल. म्हणून बायबलचा अभ्यास चालू ठेवून यहोवाविषयी शिकत राहा.—१ योहान ५:३.

२० येशूने दिलेल्या खंडणी बलिदानावर विश्वास ठेवा. “जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सर्वकाळाचं जीवन मिळतं,” असं बायबलमध्ये सांगितलं आहे. (योहान ३:३६) ‘विश्वास ठेवणं’ म्हणजे काय? म्हणजे, येशूने आपल्याला ज्या गोष्टी करायला शिकवल्या त्या करणं. (योहान १३:१५) ‘आमचा येशूवर विश्वास आहे,’ असं फक्त बोलून चालणार नाही. तर आपला खंडणीवर विश्वास आहे हे आपण कार्यातून दाखवलं पाहिजे. “विश्वाससुद्धा कार्यांशिवाय निर्जीव आहे,” असं याकोब २:२६ मध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे.

२१, २२. (क) दर वर्षी पाळल्या जाणाऱ्या येशूच्या मृत्यूच्या स्मारकविधीला आपण उपस्थित का राहिलं पाहिजे? (ख) अध्याय ६ व ७ मध्ये कोणती माहिती देण्यात आली आहे?

२१ येशूच्या मृत्यूच्या स्मारकविधीला उपस्थित राहा. आपण त्याच्या मृत्यूचा स्मारकविधी पाळला पाहिजे, असं येशूने त्याचा मृत्यू व्हायच्या आदल्या संध्याकाळी सांगितलं. हा स्मारकविधी दरवर्षी पाळला जातो. त्याला ‘प्रभूचं सांजभोजन’ किंवा “प्रभुभोजन” असंही म्हटलं जातं. (१ करिंथकर ११:२०; मत्तय २६:२६-२८) पाप आणि मृत्यूपासून आपल्याला सोडवण्याकरता येशूने त्याच्या परिपूर्ण जीवनाची खंडणी दिली, या गोष्टीची आपल्याला सतत आठवण राहावी, अशी त्याची इच्छा आहे. म्हणून तो म्हणाला: “माझ्या स्मरणासाठी हे करत राहा.” (लूक २२:१९ वाचा.) स्मारकविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून तुम्ही दाखवून देता, की खंडणीची आणि यहोवा व येशू यांनी आपल्याला दाखवलेल्या प्रेमाची तुम्हाला आठवण आहे.—लूक २२:१९. अंत्यटीप १६ पाहा.

२२ देवाने दिलेली खंडणीची भेट ही आपल्याला मिळालेल्या इतर सर्व भेटींपेक्षा कितीतरी पटीने महान आहे. (२ करिंथकर ९:१४, १५) आतापर्यंत मरण पावलेल्या कोट्यवधी लोकांनासुद्धा या भेटीचा फायदा होणार आहे. तो कसा, याबद्दलची अधिक माहिती अध्याय ६ व ७ मध्ये देण्यात आली आहे.