व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय सात

मृत लोक पुन्हा जिवंत होतील!

मृत लोक पुन्हा जिवंत होतील!

१-३. आपण सर्व कशाच्या कैदेत आहोत? यहोवा आपली सुटका कशी करणार आहे?

समजा, तुम्ही न केलेल्या एखाद्या गुन्ह्यासाठी तुम्हाला जन्मठेपेची शिक्षा दिली जाते. या शिक्षेतून सुटण्याचा कुठलाही मार्ग तुम्हाला दिसत नाही. तुम्हाला आशेचा कोणताच किरण दिसत नाही. परिस्थिती तुमच्या हाताबाहेर आहे. पण तेवढ्यात तुम्हाला अशी व्यक्ती भेटते जिच्याकडे तुम्हाला सोडवण्याची ताकद आहे आणि तुम्हाला सोडवण्याचं वचनही ती देते. आता तुम्हाला कसं वाटेल?

आपण सर्व मृत्यूच्या कैदेत आहोत. आपण कितीही प्रयत्न केले तरी मृत्यूपासून आपली सुटका होणं अशक्य आहे. पण यहोवाकडे आपल्याला मृत्यूपासून सोडवण्याचं सामर्थ्य आहे. “शेवटचा शत्रू म्हणजे मृत्यू नाहीसा केला जाईल,” असं तो आपल्याला वचनही देतो.—१ करिंथकर १५:२६.

मरणाची भीती आपल्या मनातून पूर्णपणे निघून जाईल, तेव्हा आपल्याला किती आनंद होईल याची कल्पना करा! यहोवा फक्त मृत्यूच काढून टाकणार नाही तर मेलेल्या लोकांना जिवंतही करणार आहे! विचार करा, या गोष्टीचा तुम्हाला कसा फायदा होईल? मृत लोक पुन्हा जिवंत होतील असं यहोवा वचन देतो. (यशया २६:१९) यालाच बायबलमध्ये ‘पुनरुत्थान’ म्हटलं आहे.

आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा

४. (क) आपल्या घरातल्या प्रिय व्यक्तीचा किंवा मित्राचा मृत्यू होतो तेव्हा आपल्याला सांत्वन कुठून मिळू शकतं? (ख) येशूची कोणासोबत चांगली मैत्री होती?

आपल्या घरातल्या कोणा व्यक्तीचा किंवा एखाद्या प्रिय मित्राचा मृत्यू होतो तेव्हा आपल्याला होणारं दुःख असहनीय असतं. आपल्या प्रिय व्यक्तीला पुन्हा जिवंत करण्यासाठी आपण काहीच करू शकत नाही, असं आपल्याला वाटतं. पण बायबलमध्ये आपल्याला खरं सांत्वन देण्यात आलं आहे. (२ करिंथकर १:३, ४ वाचा.) आपल्या मृत प्रिय जनांना पुन्हा जिवंत करण्यासाठी यहोवा आणि येशू खूप आतुर आहेत. हे समजण्यासाठी आपण एका उदाहरणावर विचार करू या. येशू पृथ्वीवर होता तेव्हा लाजर, मार्था आणि मरीया यांच्याबरोबर त्याची चांगली मैत्री होती. बायबलमध्ये म्हटलं आहे: “येशूचे मार्थावर आणि तिच्या बहिणीवर, तसेच लाजरवर प्रेम होते.”—योहान ११:३-५.

५, ६. (क) लाजरच्या कुटुंबातले आणि त्याचे मित्र शोक करत आहेत हे पाहिल्यावर येशूला कसं वाटलं? (ख) आपल्याला होणाऱ्या दुःखाची येशूला जाणीव आहे ही गोष्ट सांत्वन देणारी का आहे?

पण एके दिवशी लाजर मरण पावतो. येशू, मार्था व मरीया यांना सांत्वन देण्यासाठी जातो. येशू येत आहे हे समजल्यावर मार्था त्याला भेटायला जाते. शहराबाहेर ती त्याला भेटते तेव्हा तिला बरं वाटतं. ती त्याला म्हणते: “तू इथे असतास तर माझा भाऊ मेला नसता.” मार्थाला म्हणायचं होतं की, येशू तिथे काही काळ आधी आला असता तर लाजर मेला नसता. थोड्या वेळाने, येशू मरीयालाही रडताना पाहतो. येशूला त्या दोघींचं दुःख पाहून इतकं वाईट वाटतं, की तोही रडतो. (योहान ११:२१, ३३, ३५) अगदी प्रिय व जवळच्या व्यक्तीला गमावण्याचं असहनीय दुःख त्यालाही जाणवलं.

प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर आपल्याला होणारं दुःख येशूलाही जाणवतं या गोष्टीने आपल्याला किती सांत्वन मिळतं! कारण येशू त्याच्या पित्यासारखाच आहे. (योहान १४:९) मृत्यूला कायमचं काढून टाकण्याचं सामर्थ्य यहोवाकडे आहे आणि लवकरच तो तसं करणार आहे.

“लाजर, बाहेर ये!”

७, ८. गुहेच्या तोंडावरचा दगड काढू नये, असं मार्थाला का वाटलं, पण येशूने काय केलं?

लाजरचं शरीर एका गुहेत ठेवलं होतं आणि गुहेच्या दारावर एक मोठा दगड ठेवला होता. येशू तिथे येऊन लोकांना म्हणतो: “तो दगड बाजूला करा.” पण लोकांनी दगड हलवू नये असं मार्थाला वाटतं कारण चार दिवसांपासून लाजरचं शरीर कबरेत होतं. (योहान ११:३९) येशू लाजरला पुन्हा जिवंत करणार आहे, याची तिला कल्पना नसते.

लाजरला जिवंत झालेलं पाहून त्याच्या कुटुंबातल्या सदस्यांना आणि मित्रांना किती आनंद झाला असेल, याची कल्पना करा!—योहान ११:३८-४४

येशू लाजरला हाक मारतो: “लाजर, बाहेर ये!” पुढे जे घडलं ते पाहून मार्था व मरीया आश्चर्यचकित झाल्या. “जो मेला होता, तो बाहेर आला. त्याच्या हातापायांवर कापडाच्या पट्ट्‌या गुंडाळलेल्या होत्या.” (योहान ११:४३, ४४) लाजरला पुन्हा जिवंत करण्यात आलं होतं! तो पुन्हा आपल्या कुटुंबाला आणि मित्रांना भेटला. ते त्याच्याशी बोलू शकत होते, त्याला स्पर्श करू शकत होते. खरंच हा किती मोठा चमत्कार होता! येशूने लाजरचं पुनरुत्थान केलं होतं.

“मुली, मी तुला सांगतो, ऊठ.”

९, १०. (क) मृत लोकांना परत जिवंत करण्याची शक्ती येशूला कोणी दिली? (ख) बायबलमधले पुनरुत्थानांचे अहवाल आपल्यासाठी महत्त्वाचे का आहेत?

येशूने मेलेल्या लोकांना स्वतःच्या शक्तीने जिवंत केलं का? नाही. लाजरला पुन्हा जिवंत करण्याआधी त्याने यहोवाला प्रार्थना केली आणि यहोवाने लाजरला जिवंत करण्याची शक्ती त्याला दिली. (योहान ११:४१, ४२ वाचा.) पण, ज्याला परत जिवंत करण्यात आलं असा लाजर एकटाच नव्हता! बायबलमध्ये १२ वर्षांच्या एका मुलीविषयीसुद्धा सांगितलं आहे जी खूप आजारी होती. तेव्हा तिचे वडील याईर यांनी गयावया करून आपल्या मुलीला बरं करण्याची येशूकडे भीक मागितली. कारण ती त्यांची एकुलती एक मुलगी होती. तेवढ्यात काही लोक आले आणि याईरला म्हणाले: “तुमची मुलगी वारली! आता गुरुजींना त्रास का देता?” पण येशू याईरला म्हणाला: “भिऊ नकोस, फक्त विश्वास धर म्हणजे ती वाचेल.” मग ते सर्व याईरच्या घरी गेले. घराजवळ पोहचत असताना येशूला लोकांची गर्दी दिसली आणि त्यांच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. येशू त्यांना म्हणाला, “रडू नका, मुलगी मेली नाही, तर झोपली आहे.” येशू असं का बोलत आहे, हे याईर आणि त्याच्या पत्नीला समजलं नसावं. येशूने सर्वांना बाहेर जायला सांगितलं आणि तो, याईर व त्याची पत्नी, मुलगी ज्या खोलीत होती तिथे गेले. येशू अगदी हळूवारपणे मुलीच्या हाताला धरून तिला म्हणाला: “मुली, मी तुला सांगतो, ‘ऊठ!” कल्पना करा, आपल्या मुलीला लगेच उठून चालताना पाहून तिच्या आईवडिलांना किती आनंद झाला असेल! येशूने त्यांच्या मुलीला जिवंत केलं होतं! (मार्क ५:२२-२४, ३५-४२; लूक ८:४९-५६) यहोवाने येशूद्वारे त्यांच्यासाठी किती मोठा चमत्कार केला होता, याची आपल्या मुलीला पाहून त्यांना कायम आठवण राहिली असेल. *

१० येशूने जिवंत केलेले सर्व लोक शेवटी पुन्हा मरण पावले हे खरं आहे. पण हे अहवाल आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत कारण यांवरून आपल्याला एक खरी आशा मिळते. मेलेल्या लोकांना पुन्हा जिवंत करण्याची यहोवाची इच्छा आहे आणि तो तसं करणारही आहे!

पुनरुत्थानाच्या अहवालांवरून आपण काय शिकतो?

दुर्कस नावाच्या एका ख्रिस्ती बहिणीला प्रेषित पेत्रने जिवंत केलं.—प्रेषितांची कार्ये ९:३६-४२

एलियाने एका विधवेच्या मुलाला जिवंत केलं.—१ राजे १७:१७-२४

११. उपदेशक ९:५ या वचनानुसार, लाजरची अवस्था कशी होती?

११ “मृतांस तर काहीच कळत नाही,” असं बायबलमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे. लाजरच्या बाबतीत हेच खरं होतं. (उपदेशक ९:५) येशूने जसं म्हटलं त्याप्रमाणे लाजर झोपलेल्या अवस्थेत होता. (योहान ११:११) कबरेत असताना त्याला ‘काहीच कळत नव्हतं.’

१२. लाजरला पुन्हा जिवंत करण्यात आलं होतं हे आपण खातरीने का म्हणू शकतो?

१२ येशूने लाजरला जिवंत केलं तेव्हा पुष्कळ लोकांनी हा चमत्कार पाहिला. त्याने हा चमत्कार केला हे त्याच्या शत्रूंनाही माहीत होतं. लाजर जिवंत झाला होता आणि ही गोष्ट कोणीच नाकारू शकत नव्हतं. (योहान ११:४७) शिवाय, लाजरला भेटायला गेलेले पुष्कळ लोक असा विश्वास करू लागले, की येशूला देवानेच पाठवलं आहे. हे सर्व पाहून येशूच्या शत्रूंना मात्र आनंद झाला नाही. म्हणून त्यांनी, येशू आणि लाजर या दोघांनाही ठार मारायचा कट रचला.—योहान ११:५३; १२:९-११.

१३. मेलेल्या लोकांना यहोवा पुन्हा जिवंत करू शकतो, असं आपल्याला खातरीने का म्हणता येईल?

१३ येशूने म्हटलं: “स्मारक कबरींमध्ये” असलेल्या सर्वांना जिवंत केलं जाईल. (योहान ५:२८) म्हणजे, यहोवाच्या स्मरणात असलेल्या सर्वांना पुन्हा जिवंत केलं जाईल. पण एखाद्याला पुन्हा जिवंत करण्यासाठी यहोवाला त्या व्यक्तीविषयीची सर्व माहिती आठवायला हवी. पण, त्याला ते शक्य आहे का? आकाशात कोट्यवधी तारे आहेत आणि बायबलमध्ये म्हटलं आहे, की यहोवा त्या प्रत्येक ताऱ्याला नावाने हाक मारतो. (यशया ४०:२६ वाचा.) जर तो प्रत्येक ताऱ्याचं नाव लक्षात ठेवू शकतो, तर ज्यांना तो जिवंत करणार आहे त्यांच्याबद्दलची सर्व माहिती सहजपणे लक्षात ठेवू शकणार नाही का? शिवाय, हे सर्व त्यानेच तर बनवलं आहे. त्यामुळे, लोकांना पुन्हा जिवंत करण्याची शक्ती त्याच्याजवळ आहे, अशी आपण खातरी बाळगू शकतो.

१४, १५. ईयोबच्या शब्दांवरून आपल्याला पुनरुत्थानाच्या आशेविषयी काय समजतं?

१४ यहोवाचा विश्वासू सेवक ईयोब याचा पुनरुत्थानाच्या आशेवर विश्वास होता. त्याने असा प्रश्न केला: “मनुष्य मृत झाल्यावर पुनः जिवंत होईल काय?” पुढे तो यहोवाला म्हणाला: “तू मला हाक मारशील व मी तुला उत्तर देईन; मी जो तुझ्या हातची कृती त्या मजविषयी तुला उत्कंठा लागेल.” ईयोबला माहीत होतं की, यहोवा त्या वेळेची आतुरतेने वाट पाहत आहे जेव्हा तो मृत लोकांचं पुनरुत्थान करेल.—ईयोब १४:१४, १५.

१५ पुनरुत्थानाच्या आशेबद्दल वाचल्यावर तुम्हाला कसं वाटलं? कदाचित तुमच्या मनात प्रश्न येईल की, ‘माझ्या कुटुंबातल्या मृत झालेल्या सदस्यांचं आणि मित्रांचं काय? त्यांनाही पुन्हा जिवंत केलं जाईल का?’ मेलेल्या लोकांना पुन्हा जिवंत करण्यासाठी यहोवा अगदी आतुर आहे, ही आपल्यासाठी खूप सांत्वनदायक गोष्ट आहे. पण कोणाला जिवंत केलं जाईल आणि ते लोक कुठे राहतील याविषयी बायबलमध्ये काय सांगितलं आहे, ते आपण पाहू या.

“सर्व जण त्याची हाक ऐकून बाहेर येतील”

१६. भविष्यात ज्यांचं पृथ्वीवर पुनरुत्थान केलं जाईल त्यांचं जीवन कसं असेल?

१६ प्राचीन काळात, ज्यांचं पुनरुत्थान करण्यात आलं ते याच पृथ्वीवर आपल्या कुटुंबाला आणि मित्रांना भेटले. भविष्यातसुद्धा असंच होईल, पण तेव्हा पृथ्वीवरची परिस्थिती खूप चांगली असेल. असं आपण का म्हणू शकतो? कारण, ज्या लोकांना जिवंत केलं जाईल ते पुन्हा कधीच मरणार नाहीत. तर त्यांना या पृथ्वीवर कायम जगण्याची संधी असेल. तेव्हा परिस्थिती आजच्यापेक्षा फार चांगली असेल कारण तेव्हा युद्धं, गुन्हेगारी, आणि आजारपण नसेल.

१७. कोणाला पुन्हा जिवंत केलं जाईल?

१७ पण मग कोणा-कोणाला जिवंत केलं जाईल? येशूने म्हटलं: “स्मारक कबरींमध्ये असलेले सर्व जण त्याची हाक ऐकून बाहेर येतील.” (योहान ५:२८, २९) तसंच, प्रकटीकरण २०:१३ मध्ये म्हटलं आहे: “समुद्राने त्याच्यातील मृतांना बाहेर सोडले; तसेच, मृत्यूने आणि कबरेनेसुद्धा त्यांच्यातील मृतांना बाहेर सोडले.” होय, कोट्यवधी मृत लोकांना पुन्हा जिवंत केलं जाईल. प्रेषित पौलनेसुद्धा म्हटलं, की “नीतिमान आणि अनीतिमान अशा सर्व लोकांचं पुनरुत्थान होणार आहे.” (प्रेषितांची कार्ये २४:१५ वाचा.) पण याचा काय अर्थ होतो?

नंदनवनात मृत लोकांना पुन्हा जिवंत केलं जाईल आणि ते आपल्या प्रिय जनांना भेटतील

१८. ज्यांना पुन्हा जिवंत केलं जाणार आहे त्या “नीतिमान” लोकांमध्ये कोणाकोणाचा समावेश आहे?

१८ “नीतिमान” लोकांमध्ये यहोवाच्या अशा विश्वासू सेवकांचा समावेश आहे, जे येशूच्या काळाआधी या पृथ्वीवर जगले. उदाहरणार्थ नोहा, अब्राहाम, सारा, मोशे, रूथ, व एस्तेर यांसारख्या लोकांना पृथ्वीवर पुन्हा जिवंत केलं जाईल. ‘इब्री लोकांना’ या पुस्तकाच्या ११ व्या अध्यायात तुम्हाला आणखी विश्वासू स्त्री-पुरुषांबद्दल वाचायला मिळेल ज्यांचं पुनरुत्थान होणार आहे. पण मग, आज यहोवाची विश्वासूपणे सेवा करत असलेल्यांचा मृत्यू झाला, तर त्यांनाही पुन्हा जिवंत केलं जाईल का? हो, तेही “नीतिमान” आहेत आणि त्यांनाही जिवंत केलं जाईल.

१९. “अनीतिमान” लोक कोण आहेत? यहोवा त्यांना कोणती संधी देईल?

१९ “अनीतिमान” लोकांमध्ये अशा कोट्यवधी लोकांचा समावेश होतो, ज्यांना यहोवाविषयी जाणून घेण्याची संधी मिळाली नाही. ते मरण पावले असले तरी यहोवा त्यांना विसरलेला नाही. तो त्यांना जिवंत करून, त्याच्याविषयी जाणून घेण्याची व त्याची सेवा करण्याची संधी देणार आहे.

२०. सर्वांनाच पुन्हा जिवंत का केलं जाणार नाही?

२० याचा अर्थ सर्व मृत लोकांना पुन्हा जिवंत केलं जाईल का? नाही. येशूने म्हटलं, काही लोकांना पुन्हा जिवंत केलं जाणार नाही. (लूक १२:५) पण मग, कोणाला जिवंत करायचं आणि कोणाला नाही, हे शेवटी कोण ठरवणार? हा न्याय यहोवाच करेल. पण त्याने येशूलाही, “जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय” करण्याचा अधिकार दिला आहे. (प्रेषितांची कार्ये १०:४२) ज्यांचा दुष्ट म्हणून न्याय करण्यात येईल आणि जे बदलण्यास तयार नसतील अशांचं पुनरुत्थान होणार नाही.—अंत्यटीप १९ पाहा.

स्वर्गीय जीवनासाठी पुनरुत्थान

२१, २२. (क) स्वर्गीय जीवनासाठी पुनरुत्थान म्हणजे काय? (ख) स्वर्गीय जीवनासाठी सर्वात आधी कोणाचं पुनरुत्थान करण्यात आलं?

२१ बायबलमध्ये असंही सांगितलं आहे की, काही लोक स्वर्गात राहतील. जेव्हा एखाद्या व्यक्तीचं स्वर्गातल्या जीवनासाठी पुनरुत्थान करण्यात येतं तेव्हा त्यांना मानवी शरीर नाही, तर आत्मिक शरीर देण्यात येतं.

२२ सर्वात आधी स्वर्गीय जीवनासाठी येशूचं पुनरुत्थान करण्यात आलं. (योहान ३:१३) येशूला ठार मारल्याच्या तीन दिवसांनंतर यहोवाने त्याला पुन्हा जिवंत केलं. (स्तोत्र १६:१०; प्रेषितांची कार्ये १३:३४, ३५) पण त्याला मानवी शरीर देण्यात आलं नाही. “त्याला शरीरात ठार मारण्यात आले, पण आत्म्यात जिवंत करण्यात आले,” असं प्रेषित पेत्रने म्हटलं. (१ पेत्र ३:१८) येशूला शक्तिशाली आत्मिक व्यक्ती म्हणून जीवन देण्यात आलं. (१ करिंथकर १५:३-६) पण बायबलमध्ये म्हटलं आहे की, अशा प्रकारचं जीवन फक्त येशूलाच नव्हे तर आणखी काहींना मिळणार होतं.

२३, २४. येशूने “लहान कळपा,” असं कोणाला म्हटलं? या लहान कळपाची संख्या किती आहे?

२३ येशूच्या मृत्यूपूर्वी त्याने आपल्या विश्वासू शिष्यांना सांगितलं: “मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जात आहे.” (योहान १४:२) याचा अर्थ, येशूच्या काही शिष्यांना स्वर्गीय जीवन मिळाल्यानंतर ते त्याच्यासोबत स्वर्गात असतील. त्यांची संख्या किती असेल? येशूने त्यांना “लहान कळपा,” असं म्हटलं. म्हणजे, त्यांची संख्या कमी असेल. (लूक १२:३२) प्रेषित योहानने त्यांची अचूक संख्या सांगितली, जेव्हा त्याने दृष्टांतात येशूला “सीयोन पर्वतावर उभा असलेला . . . आणि त्याच्यासोबत १,४४,०००” जणांना पाहिलं.—प्रकटीकरण १४:१.

२४ या १,४४,००० जणांना केव्हा जिवंत केलं जाईल? येशूने स्वर्गात राज्य करायला सुरुवात केल्यानंतर त्यांना जिवंत केलं जाईल, असं बायबलमध्ये म्हटलं आहे. (१ करिंथकर १५:२३) आपण अगदी त्याच काळात जगत आहोत आणि १,४४,००० जणांपैकी बहुतेकांना स्वर्गीय जीवन मिळालं आहे. त्यांपैकी पृथ्वीवर आता जितके उरले आहेत, त्यांचा जेव्हा मृत्यू होतो, तेव्हा त्यांना त्याच क्षणी स्वर्गीय जीवनासाठी उठवलं जातं. पण बहुतेक लोकांना भविष्यात या पृथ्वीवर येणाऱ्या नंदनवनात कायम जगण्यासाठी जिवंत केलं जाईल.

२५. पुढच्या अध्यायात आपण आणखी कशाविषयी शिकणार आहोत?

२५ यहोवा देव खूप लवकर सर्व मानवांची मृत्यूपासून सुटका करणार आहे. यानंतर मृत्यू राहणार नाही. (यशया २५:८ वाचा.) पण मग ज्यांना स्वर्गीय जीवन मिळणार आहे ते स्वर्गात काय करतील? बायबलमध्ये असं म्हटलं आहे की, ते येशूसोबत स्वर्गीय राज्याचं सरकार चालवतील. या सरकाराविषयी आपण पुढच्या अध्यायात आणखी शिकणार आहोत.

^ परि. 9 बायबलमध्ये असे अनेक अहवाल आहेत ज्यात, तरुण व वृद्ध, स्त्री व पुरुष, इस्राएली व विदेशी लोकांना जिवंत केल्याचा वृत्तांत आहे. हे अहवाल तुम्ही पुढील शास्त्रवचनांत वाचू शकता: १ राजे १७:१७-२४; २ राजे ४:३२-३७; १३:२०, २१; मत्तय २८:५-७; मार्क ५:२२-२४, ३५-४२; लूक ७:११-१७; ८:४०-५६; प्रेषितांची कार्ये ९:३६-४२; २०:७-१२.