व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय आठ

देवाचं राज्य काय आहे?

देवाचं राज्य काय आहे?

१. या अध्यायात आपण कोणत्या एका प्रसिद्ध प्रार्थनेबद्दल चर्चा करणार आहोत?

“हे आमच्या स्वर्गातील पित्या,” किंवा ‘प्रभूची प्रार्थना’ म्हणून ओळखली जाणारी प्रार्थना अनेकांना माहीत आहे. प्रार्थना कशी करायची हे शिकवण्यासाठी येशूने आपल्या शिष्यांना ही प्रार्थना नमुना म्हणून दिली होती. त्याने कोणत्या गोष्टींसाठी प्रार्थना केली? ही प्रार्थना आज आपल्यासाठी महत्त्वाची का आहे?

२. येशूने कोणत्या तीन गोष्टींबद्दल आपल्याला प्रार्थना करायला शिकवलं?

येशूने अशी सुरुवात केली: “तेव्हा अशा प्रकारे प्रार्थना करा: ‘हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझं नाव पवित्र मानलं जावो. तुझं राज्य येवो. तुझी इच्छा जशी स्वर्गात पूर्ण होत आहे, तशी पृथ्वीवरही होवो.’” (मत्तय ६:९-१३ वाचा.) येशूने आपल्याला या तीन गोष्टींबद्दल प्रार्थना करायला का शिकवलं?—अंत्यटीप २० पाहा.

३. देवाच्या राज्याविषयी आपण काय माहीत करून घेतलं पाहिजे?

आपण देवाचं नाव ‘यहोवा’ आहे हे शिकलो. तसंच, मानव आणि पृथ्वी यांच्यासाठी त्याचा काय संकल्प आहे हेही आपण शिकलो. पण प्रार्थनेत येशूने जेव्हा “तुझं राज्य येवो” असं म्हटलं, तेव्हा त्याचा काय अर्थ होतो? देवाचं राज्य काय आहे, ते काय करणार आहे आणि या राज्यामुळे देवाचं नाव कसं पवित्र होणार आहे, हे आता आपण शिकू या.

देवाचं राज्य काय आहे?

४. देवाचं राज्य म्हणजे काय? आणि याचा राजा कोण आहे?

यहोवाने एक स्वर्गीय सरकार स्थापन केलं आणि त्याचा राजा म्हणून येशूला नियुक्त केलं. या सरकारला बायबलमध्ये ‘देवाचं राज्य’ म्हटलं आहे आणि येशू हा “राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे.” (१ तीमथ्य ६:१५) कुठल्याही मानवी शासकापेक्षा येशू खरंतर लोकांचं जास्त भलं करू शकतो; आणि त्याच्याकडे सर्व मानवी शासकांपेक्षा जास्त शक्ती आहे.

५. देवाचं राज्य कुठून राज्य करेल? ते कशावर राज्य करेल?

देवाने येशूला जिवंत केलं आणि चाळीस दिवसांनंतर तो पुन्हा स्वर्गात गेला. काही काळानंतर यहोवाने त्याला राजा बनवलं. (प्रेषितांची कार्ये २:३३) देवाचं राज्य स्वर्गातून पृथ्वीवर राज्य करेल. (प्रकटीकरण ११:१५) म्हणूनच बायबलमध्ये देवाच्या या राज्याला ‘स्वर्गीय राज्य’ म्हटलं आहे.—२ तीमथ्य ४:१८.

६, ७. कुठल्याही मानवी शासकापेक्षा येशू महान का आहे?

बायबलमध्ये म्हटलं आहे की, येशू कुठल्याही मानवी शासकापेक्षा महान आहे कारण “तो एकटाच अमर आहे.” (१ तीमथ्य ६:१६) मानवी शासक कधी ना कधी मरण पावतात. पण येशू कधीच मरणार नाही. येशू आपल्यासाठी ज्या चांगल्या गोष्टी करेल त्या कायम टिकतील.

बायबलमधल्या भविष्यवाण्यांत असंही म्हटलं होतं, की येशू न्यायी व दयाळू राजा असेल. “परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याजवर राहेल; परमेश्वराचे भय त्याला सुगंधमय होईल; तो डोळ्यांनी पाहील तेवढ्यावरूनच न्याय करणार नाही. कानांनी ऐकेल तेवढ्यावरूनच न्याय करणार नाही, तर तो दुबळ्यांचा [गरिबांचा] न्याय यथार्थतेने करेल.” (यशया ११:२-४) तुम्हालाही असाच राजा हवा आहे का?

८. येशू एकटाच राज्य करणार नाही हे आपल्याला कशावरून कळतं?

येशूबरोबर स्वर्गीय सरकारात राज्य करण्यासाठी देवाने मानवांपैकी काहींना निवडलं आहे. जसं की, प्रेषित पौलने तीमथ्यला म्हटलं: “आपण जर सहन करत राहिलो, तर त्याच्यासोबत राज्यही करू.” (२ तीमथ्य २:१२) येशूसोबत किती जण राज्य करतील?

९. येशूसोबत किती जण राज्य करतील? देवाने त्यांना निवडायला कधी सुरुवात केली?

आपण अध्याय ७ मध्ये पाहिलं की, प्रेषित योहानला एक दृष्टांत दिसला. त्यात त्याने येशू स्वर्गात राजा असल्याचं आणि त्याच्यासोबत १,४४,००० सहराजांना पाहिलं. हे १,४४,००० जण कोण आहेत? योहानने त्यांच्याबद्दल म्हटलं की “ज्यांच्या कपाळांवर कोकऱ्याचे [येशूचे] व त्याच्या पित्याचे नाव लिहिलेले होते.” आणि “कोकरा जिथे जिथे जातो, तिथे तिथे त्याच्यामागे जाणारे ते हेच आहेत. त्यांना . . . मानवजातीतून विकत घेण्यात आले होते.” (प्रकटीकरण १४:१,  वाचा.) हे १,४४,००० विश्वासू ख्रिस्ती आहेत ज्यांना देवाने येशूसोबत “राजे या नात्याने पृथ्वीवर राज्य” करण्यासाठी निवडलं आहे. जेव्हा त्यांचा मृत्यू होतो तेव्हा लगेच त्यांना स्वर्गीय जीवनासाठी पुनरुत्थित केलं जातं. (प्रकटीकरण ५:१०) पहिल्या शतकापासून यहोवाने या १,४४,००० विश्वासू ख्रिश्चनांना निवडायला सुरुवात केली.

१०. यहोवाने आपल्यावर राज्य करण्यासाठी येशू आणि १,४४,००० मानवांची निवड केली यावरून त्याला आपली काळजी आहे हे कसं दिसून येतं?

१० यहोवाला आपली काळजी असल्यामुळेच त्याने, येशूसोबत राज्य करायला मानवांची निवड केली. येशू एक उत्तम शासक असेल कारण त्याला आपल्या भावना समजतात. मानव म्हणून दुःख भोगणं म्हणजे काय हे त्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे. पौलने म्हटलं की, येशूला आपल्या दुःखांची जाणीव आहे कारण “आपल्या दुर्बलतांविषयी सहानुभूती दाखवू शकणार नाही असा आपला महायाजक नाही, तर त्यालाही आपल्याप्रमाणेच सर्व बाबतींत पारखण्यात आले.” (इब्री लोकांना ४:१५; ५:८) येशूसोबत राज्य करणाऱ्या १,४४,००० जणांनाही मानवांचं दुःख समजतं. त्यांनीही अपरिपूर्णतेचा व आजारपणाचा सामना केला आहे. त्यामुळे आपण अशी खातरी बाळगू शकतो की, आपल्या मनात कोणत्या भावना येतात आणि आपल्याला कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं, हे येशू आणि १,४४,००० जण चांगल्या प्रकारे समजू शकतात.

देवाचं राज्य काय करेल?

११. स्वर्गात नेहमीच सर्व देवाची इच्छा पूर्ण करत होते का?

११ जशी स्वर्गात देवाची इच्छा पूर्ण होत आहे तशी पृथ्वीवरही व्हावी अशी प्रार्थना करायला येशूने आपल्या शिष्यांना का शिकवलं? अध्याय ३ मध्ये आपण शिकलो, की सैतानाने देवाविरुद्ध बंड केलं. बंडाळीनंतर यहोवाने सैतानाला व अविश्वासू देवदूतांना काही काळ स्वर्गात राहू दिलं. जोपर्यंत सैतान आणि त्याचे दूत स्वर्गात होते तोपर्यंत तिथे सर्वच देवाची इच्छा पूर्ण करत नव्हते. आपण सैतान आणि त्याचे दूत यांच्याविषयी १०व्या अध्यायात आणखी शिकणार आहोत.

१२. प्रकटीकरण १२:१० या वचनांत कोणत्या दोन महत्त्वपूर्ण घटनांचं वर्णन आहे?

१२ येशूला देवाच्या राज्याचा राजा बनवल्यानंतर लगेचच तो सैतानाविरुद्ध लढणार होता, असं बायबलमध्ये म्हटलं आहे. (प्रकटीकरण १२:७-१० वाचा.) १० व्या वचनात दोन महत्त्वपूर्ण घटनांबद्दलचं वर्णन आहे. येशू ख्रिस्त राजा म्हणून देवाच्या राज्यात राज्य करण्यास सुरुवात करतो आणि सैतानाला स्वर्गातून पृथ्वीवर फेकलं जातं. आपण पुढे शिकणार आहोत की, या दोन्ही घटना आधीच घडल्या आहेत.

१३. सैतानाला स्वर्गातून काढून टाकल्यानंतर तिथे काय झालं?

१३ सैतान आणि त्याच्या दूतांना स्वर्गातून काढून टाकल्यानंतर तिथे झालेल्या आनंदाचं वर्णन बायबलमध्ये करण्यात आलं आहे. “स्वर्गांनो आणि त्यात राहणाऱ्यांनो आनंद करा!” (प्रकटीकरण १२:१२) आता स्वर्गात सर्व जण देवाची इच्छा पूर्ण करत असल्यामुळे तिथे शांती आणि एकता आहे.

सैतानाला व त्याच्या दूतांना स्वर्गातून पृथ्वीवर टाकण्यात आल्यामुळे पृथ्वीवर खूप दुःख आहे. पण या दुःखाचा लवकरच अंत होणार आहे

१४. स्वर्गातून सैतानाला काढून टाकल्यामुळे पृथ्वीची परिस्थिती कशी झाली?

१४ पण पृथ्वीवरची परिस्थिती मात्र याच्या अगदी उलट झाली. कारण “आपला फार कमी वेळ उरला आहे हे ओळखून दियाबल अतिशय क्रोधित होऊन खाली तुमच्याकडे आला आहे.” (प्रकटीकरण १२:१२) त्याला स्वर्गातून काढून टाकल्यामुळे आणि त्याचा लवकरच नाश होणार आहे, हे माहीत असल्यामुळे तो खूप रागात आहे. तेव्हा तो पृथ्वीच्या लोकांवर दुःख, त्रास आणि समस्या आणण्याचा शक्य तितका प्रयत्न करतो.

१५. पृथ्वीसाठी देवाची काय इच्छा आहे?

१५ पण पृथ्वीबद्दल देवाची इच्छा बदललेली नाही. नंदनवन झालेल्या पृथ्वीवर परिपूर्ण मानवांनी सदासर्वकाळ जगावं, अशी त्याची आजही इच्छा आहे. (स्तोत्र ३७:२९) मग देवाच्या राज्यात त्याची ही इच्छा कशी पूर्ण होईल?

१६, १७. दानीएल २:४४ या वचनातून आपल्याला देवाच्या राज्याविषयी काय समजतं?

१६ दानीएल २:४४ वचनातल्या भविष्यवाणीत म्हटलं आहे: “त्या राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करेल, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसऱ्याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करेल व ते सर्वकाळ टिकेल.” या भविष्यवाणीनुसार आपल्याला देवाच्या राज्याविषयी काय समजतं?

१७ पहिली गोष्ट, देवाचं राज्य “त्या राजांच्या अमदानीत” राज्य करण्यास सुरुवात करणार होतं. म्हणजे, देवाचं राज्य सुरू होईल, तेव्हा पृथ्वीवर इतरही सरकारे राज्य करत असतील असं भविष्यवाणीत सांगण्यात आलं होतं. दुसरी गोष्ट, देवाचं राज्य सर्वकाळ टिकेल आणि त्या जागी कधीच दुसरं सरकार येणार नाही. आणि तिसरी गोष्ट, देवाचं राज्य आणि जगातली इतर सरकारे यांच्यात एक युद्ध होईल. यात देवाचं राज्य विजयी ठरेल आणि तेच या पृथ्वीवर कायम राज्य करेल. या राज्यासारखं दुसरं कोणतंच उत्तम सरकार पूर्वी लोकांनी पाहिलं नसेल.

१८. देवाचं राज्य आणि जगातली सरकारे यांच्यात होणाऱ्या शेवटच्या युद्धाचं नाव काय आहे?

१८ देवाचं राज्य पृथ्वीवरचा राज्यकारभार आपल्या हाती कसा घेईल? ‘हर्मगिदोन’ म्हटल्या जाणाऱ्या शेवटच्या युद्धाआधी, दुरात्मे “पृथ्वीवरील राजांकडे जाऊन त्यांना सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या युद्धासाठी एकत्र करतात.” मानवी सरकारे देवाच्या राज्याविरुद्ध लढतील, पण शेवटी देवाच्या राज्याचाच विजय होईल.—प्रकटीकरण १६:१४, १६. अंत्यटीप १० पाहा.

१९, २०. पृथ्वीवर देवाच्या राज्याची गरज का आहे?

१९ पण आपल्याला देवाच्या राज्याची गरज का आहे? याची आपण तीन कारणं पाहू. पहिलं कारण, आपण पापी असल्यामुळे आजारी पडतो व मरण पावतो. पण देवाच्या राज्यात आपण सदासर्वकाळ जगू, असं बायबलमध्ये म्हटलं आहे. योहान ३:१६ म्हणतं: “देवाने जगावर इतकं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्वकाळाचं जीवन मिळावं.”

२० दुसरं कारण म्हणजे, आपल्या आवतीभोवती वाईट लोक आहेत. ते खोटं बोलतात, लोकांना फसवतात, अनैतिक कामं करतात. या वाईट लोकांना काढण्याची शक्ती आपल्याजवळ नाही पण देवाजवळ आहे. जे लोक वाईट कामं करतात त्यांचा हर्मगिदोनच्या युद्धात नाश केला जाणार आहे. (स्तोत्र ३७:१० वाचा.) तिसरं कारण म्हणजे, मानवी सरकारांमध्ये चांगले बदल घडवण्याची शक्ती नाही, ती क्रूर आणि भ्रष्टही असतात. लोकांना देवाची आज्ञा पाळण्यासाठी ही सरकारे मदत करत नाहीत. बायबलमध्ये असं म्हटलं आहे, “एक मनुष्य दुसऱ्यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करतो.”—उपदेशक ८:९.

२१. देवाच्या राज्याद्वारे या पृथ्वीवर त्याची इच्छा कशी पूर्ण होईल?

२१ हर्मगिदोनच्या युद्धानंतर, देवाचं राज्य या पृथ्वीवर त्याची इच्छा पूर्ण करेल. जसं की, सैतान आणि त्याचे दूत यांना काढून टाकलं जाईल. (प्रकटीकरण २०:१-३) त्यानंतर कोणीच आजारी पडणार नाही किंवा मरण पावणार नाही. येशूच्या खंडणीच्या आधारावर, सर्व विश्वासू लोकांना पृथ्वीवरच्या नंदनवनात सदासर्वकाळ जगता येईल. (प्रकटीकरण २२:१-३) या राज्यामुळे देवाचं नाव पवित्र होईल. याचा काय अर्थ होतो? देवाचं राज्य पृथ्वीवर राज्य करू लागेल तेव्हा सर्व जण यहोवाच्या नावाचा आदर करतील.—अंत्यटीप २१ पाहा.

येशूला राजा कधी बनवण्यात आलं?

२२. येशू पृथ्वीवर असताना आणि स्वर्गात गेल्यावर लगेच राजा झाला नाही हे आपण कशावरून म्हणू शकतो?

२२ येशूने आपल्या शिष्यांना “तुझं राज्य येवो,” अशी प्रार्थना करायला शिकवलं. म्हणजे, देवाचं हे सरकार भविष्यात राज्य करायला सुरू करणार, हे निश्‍चित होतं. यहोवा आधी ते राज्य स्थापन करणार होता आणि येशूला त्याचा राजा बनवणार होता. येशू पृथ्वीवरून स्वर्गात गेल्यावर लगेच त्याला राजा बनवण्यात आलं का? नाही. पेत्र आणि पौल या दोघांनी येशूच्या पुनरुत्थानाच्या काही काळानंतर, हे स्पष्ट केलं की त्याला काही काळ थांबावं लागेल. त्यांनी स्तोत्र ११०:१ मध्ये दिलेल्या भविष्यवाणीच्या आधारावर हे सांगितलं. तिथे असं म्हटलं आहे: “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखालचे आसन करेपर्यंत माझ्या उजव्या हाताला बस.” (प्रेषितांची कार्ये २:३२-३५; इब्री लोकांना १०:१२, १३) पण येशूला राजा म्हणून नियुक्त होण्यासाठी किती काळ थांबावं लागणार होतं?

लवकरच देवाचं राज्य त्याची इच्छा संपूर्ण पृथ्वीवर पूर्ण करेल

२३. (क) देवाच्या राज्याचा राजा म्हणून येशूने राज्य करायला केव्हा सुरुवात केली? (ख) पुढच्या अध्यायात आपण काय शिकणार आहोत?

२३ प्रामाणिक ख्रिश्चनांच्या एका गटाला १९१४ च्या अनेक वर्षांआधीच हे समजलं होतं, की हे वर्ष बायबल भविष्यवाणीमध्ये एक महत्त्वाचं वर्षं आहे. त्या वर्षापासून सुरू झालेल्या जगातल्या घटनांवरून हे सिद्ध झालं, की त्यांचा निष्कर्ष योग्य होता. येशूने याच वर्षापासून राज्य करायला सुरुवात केली. (स्तोत्र ११०:२) त्यानंतर लगेच सैतानाला खाली पृथ्वीवर टाकण्यात आलं आणि आता त्याचा “फार कमी” वेळ उरला आहे. (प्रकटीकरण १२:१२) आज आपण त्याच काळात जगत आहोत, याचे पुरावे आपण पुढच्या अध्यायात पाहू. आपण हेही शिकणार आहोत की, लवकरच देवाचं राज्य संपूर्ण पृथ्वीवर त्याची इच्छा कशी पूर्ण करेल.—अंत्यटीप २२ पाहा.