व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय नऊ

जगाचा अंत जवळ आहे का?

जगाचा अंत जवळ आहे का?

१. आपल्याला भविष्याबद्दलची माहिती कुठून मिळू शकते?

‘या जगाची परिस्थिती आणखी किती वाईट होणार आहे?’ असा विचार बातम्या बघताना किंवा वाचताना तुमच्या मनात येतो का? आजच्या जगातली क्रूरता आणि होणाऱ्या दुःखद घटना बघून अनेक लोकांना वाटतं, की जगाचा अंत जवळ आला आहे. पण हे खरं आहे का? भविष्यात काय होणार आहे हे जाणून घेण्याचा काही मार्ग आहे का? हो. मानवांना जरी भविष्य जाणणं शक्य नसलं तरी यहोवाला ते शक्य आहे. आपलं आणि पृथ्वीचं भविष्य कसं असेल हे त्याने आपल्याला बायबलमध्ये सांगितलं आहे.—यशया ४६:१०; याकोब ४:१४.

२, ३. येशूच्या शिष्यांना काय जाणून घ्यायचं होतं, येशूने त्यांना काय उत्तर दिलं?

आपण बायबलमध्ये जेव्हा या जगाच्या अंताबद्दल वाचतो तेव्हा त्याचा अर्थ या पृथ्वीचा अंत नसून या जगातल्या दुष्टतेचा अंत असा होतो. येशूने शिकवलं की देवाचं राज्य या पृथ्वीवर येईल. (लूक ४:४३) त्याच्या शिष्यांना हे जाणून घ्यायचं होतं, की देवाचं राज्य या पृथ्वीवर कधी येईल. म्हणून त्यांनी त्याला विचारलं: “या गोष्टी केव्हा होतील आणि तुझ्या उपस्थितीचं आणि जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीचं चिन्ह काय असेल?” (मत्तय २४:३) येशूने त्यांना एखादी ठराविक तारीख सांगितली नाही, पण जगाचा अंत येण्यापूर्वी काय-काय घटना घडतील हे त्याने सांगितलं. येशूने ज्या घटनांबद्दल सांगितलं त्या आज आपल्यासमोर घडत आहेत.

या अध्यायात आपण, जगाचा अंत अगदी जवळ आहे याचे पुरावे पाहणार आहोत. पण त्याआधी आपल्याला स्वर्गात झालेल्या एका युद्धाबद्दल जाणून घ्यावं लागेल, तेव्हाच आपल्याला हे समजेल, की पृथ्वीवर आज इतकी वाईट परिस्थिती का आहे.

स्वर्गातलं युद्ध

४, ५. (क) येशू स्वर्गात राजा झाल्यावर लगेच तिथे कोणती घटना घडली? (ख) सैतानाला पृथ्वीवर फेकल्यानंतर काय होईल याबद्दल प्रकटीकरण १२:१२ मध्ये काय सांगण्यात आलं आहे?

आपण अध्याय ८ मध्ये शिकलो की १९१४ साली येशू स्वर्गात राजा झाला. (दानीएल ७:१३, १४) तेव्हा तिथे काय झालं ते प्रकटीकरणाच्या पुस्तकात सांगितलं आहे. तिथे म्हटलं आहे: “मग स्वर्गात युद्ध सुरू झाले; मीखाएल [येशू] व त्याचे दूत अजगराबरोबर [सैतानाबरोबर] युद्ध करण्यास निघाले, आणि त्यांच्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले.” * सैतान आणि दुरात्मे युद्धात हरले आणि त्यांना पृथ्वीवर फेकण्यात आलं. देवदूतांना किती आनंद झाला असेल, याची कल्पना करा. पण पृथ्वीवरच्या लोकांचं काय? बायबलमध्ये सांगितलं आहे, की पृथ्वीवर राहणाऱ्यांसाठी हा ‘विपत्तीचा’ काळ असणार होता. असं का? “कारण आपला फार कमी वेळ उरला आहे हे ओळखून दियाबल अतिशय क्रोधित” आहे.—प्रकटीकरण १२:७, ९, १२.

सैतान पृथ्वीवरच्या लोकांना त्रास देण्याचा आज पूर्ण प्रयत्न करत आहे. त्याच्याकडे फार थोडा वेळ आहे आणि लवकरच देव त्याला या पृथ्वीवरून काढून टाकणार आहे, हे माहीत असल्यामुळे तो खूप रागात आहे. शेवटच्या दिवसांतल्या घटनांबद्दल येशू काय म्हणाला याचं आता आपण परीक्षण करू.—अंत्यटीप २४ पाहा.

शेवटच्या दिवसांतली परिस्थिती

६, ७. युद्ध आणि दुष्काळ यांबद्दल येशूचे शब्द आज कसे खरे ठरत आहेत?

युद्ध. “एका राष्ट्रावर दुसरं राष्ट्र आणि एका राज्यावर दुसरं राज्य हल्ला करेल,” असं येशूने म्हटलं होतं. (मत्तय २४:७) इतिहासात कधी नव्हे इतके लोक आजच्या काळातल्या युद्धांत मारले गेले आहेत. जागतिक घटनांचं परीक्षण करणाऱ्या एका संघटनेच्या अहवालानुसार, १९१४ सालापासून युद्धांमध्ये १० कोटींपेक्षा जास्त लोक मारले गेले आहेत. पहिल्या शतकापासून एकोणीसाव्या शतकापर्यंत झालेल्या सर्व युद्धांमध्ये जितके लोक मारले गेले, त्याच्या तीन पट जास्त लोक विसाव्या शतकातल्या युद्धांमध्ये मारले गेले. खरंच, युद्धामुळे कोट्यवधी लोकांना किती दुःख आणि हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या आहेत!

उपासमार. येशू म्हणाला होता: “ठिकठिकाणी दुष्काळ पडतील.” (मत्तय २४:७) आज जरी जगभरात अन्नधान्याचं उत्पन्न खूप वाढलं असलं तरी, अनेक लोकांना खायला पुरेसं अन्न मिळत नाही. असं का? कारण त्यांच्याकडे अन्न विकत घेण्यासाठी एकतर पुरेसे पैसे नसतात किंवा शेती करण्यासाठी जमीन नसते. आज जगामध्ये १०० कोटींपेक्षा जास्त लोकांकडे रोजच्या खर्चासाठी लागणारे पैसेदेखील नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार दरवर्षी जगभरात लाखो मुलं कुपोषणामुळे मरतात.

८, ९. कोणत्या गोष्टी दाखवतात की भूकंपाबद्दल आणि रोगराईबद्दल येशूच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत?

भूकंप. येशूने अशी भविष्यवाणी केली होती: “मोठमोठे भूकंप होतील.” (लूक २१:११) जगभरात दरवर्षी भयानक भूकंप होतच असतात. १९०० सालापासून भूकंपांमध्ये जवळजवळ २० लाख लोक मारले गेले आहेत. आज जरी आधुनिक तंत्रज्ञानामुळे भूकंप कधी होणार हे माहीत करून घेणं सोपं झालं असलं, तरी अनेक लोक भूकंपांमध्ये मरत आहेत.

रोगराई. “रोगांच्या साथी येतील,” अशी येशूने भविष्यावाणी केली होती. अनेक भयंकर आजार पसरतील आणि अनेक लोक मरण पावतील असा त्याचा अर्थ होता. (लूक २१:११) एका अहवालामध्ये असं म्हंटलं आहे की, दरवर्षी लाखो लोक क्षयरोग (टी.बी.), मलेरिया, आणि कॉलरा यांसारख्या आजारांना बळी पडतात. आज जरी डॉक्टरांना अनेक रोगांवर उपाय मिळाले असले तरी, बऱ्याच रोगांवर कोणतीच औषधं उपलब्ध नाही. इतकंच नाही, तर गेल्या ४० वर्षांत ३० नवीन रोगांचा शोध लागला आहे. त्यांपैकी काहींवर कोणतेच उपचार उपलब्ध नाहीत.

शेवटच्या दिवसांत लोक कसे असतील?

१०. आज २ तीमथ्य ३:१-५ मधले शब्द कसे खरे ठरत आहेत?

१० बायबलमध्ये २ तीमथ्य ३:१-५ या वचनांमध्ये म्हटलं आहे: “शेवटच्या दिवसांत अतिशय कठीण काळ येईल.” प्रेषित पौलने शेवटच्या दिवसांत लोक कसे वागतील याचं वर्णन केलं. तो म्हणाला लोक

  • स्वार्थी

  • पैशावर प्रेम करणारे

  • आईवडिलांचं न ऐकणारे

  • बेइमान

  • कुटुंबाबद्दल आपुलकी नसणारे

  • असंयमी

  • क्रूर आणि रागीट

  • देवापेक्षा ऐशआरामाची आवड असलेले

  • देवाची भक्ती करण्याचा केवळ दिखावा करणारे असतील

११. स्तोत्र ९२:७ नुसार दुष्ट लोकांचं काय होईल?

११ तुमच्या आजूबाजूचे लोकदेखील असेच आहेत का? आज जगभरात बऱ्याच लोकांचा असाच स्वभाव आहे. पण देव लवकरच अशा लोकांचा न्याय करणार आहे. तो आपल्याला वचन देतो: “दुर्जन गवताप्रमाणे उगवले व सर्व दुष्कर्मी उत्कर्ष पावले, म्हणजे त्यांचा कायमचा विध्वंस [नाश] ठरलाच” आहे.—स्तोत्र ९२:७.

शेवटच्या दिवसांतला आनंदाचा संदेश

१२, १३. शेवटच्या दिवसांमध्ये यहोवाने त्याच्या लोकांना कोण-कोणत्या गोष्टींबद्दल शिकवलं आहे?

१२ शेवटच्या दिवसांचं वर्णन करताना बायबलमध्ये म्हटलं आहे, की त्या वेळी लोकांना खूप दुःख आणि हालअपेष्टा सहन कराव्या लागतील. पण बायबलमध्ये असंही सांगण्यात आलं आहे, की त्या काळात चांगल्या गोष्टीदेखील घडतील.

“राज्याचा हा आनंदाचा संदेश सर्व जगात घोषित केला जाईल.”—मत्तय २४:१४

१३ बायबलमधल्या ज्ञानाची समज वाढेल. संदेष्टा दानीएल याने शेवटल्या दिवसांबद्दल लिहिलं. तो म्हणाला: “[सत्याविषयी] ज्ञानवृद्धी होईल.” (दानीएल १२:४) म्हणजेच बायबलमधलं ज्ञान अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास देव आपल्या लोकांना मदत करेल. यहोवाने खासकरून १९१४ पासून त्याच्या लोकांना याबाबतीत मदत केली आहे. उदाहरणार्थ, त्याने आपल्या लोकांना त्याच्या नावाचं महत्त्व, पृथ्वीबद्दलचा त्याचा संकल्प, खंडणी बलिदानाबद्दलचं सत्य, मृत्यूनंतर आपलं काय होतं आणि पुनरुत्थान म्हणजे काय हे शिकवलं. आपण हेही शिकलो, की फक्त देवाचं राज्यच आपल्या सर्व समस्या काढून टाकणार आहे. तसंच, आपण समाधानी कसं राहू शकतो आणि देवाचं मन आनंदित करण्यासाठी काय करू शकतो हेदेखील आपल्याला शिकायला मिळालं. मग देवाचे सेवक हे सर्व शिकल्यावर काय करतात? या प्रश्‍नाचं उत्तर आणखी एका भविष्यवाणीत दिलं आहे.—अंत्यटीप २१ आणि २५ पाहा.

१४. राज्याचा आनंदाचा संदेश कुठे-कुठे सांगितला जात आहे आणि हे प्रचार कार्य कोण करत आहे?

१४ जगभरात चाललेलं प्रचार कार्य. शेवटच्या दिवसांबद्दल बोलत असताना येशूने असं म्हटलं: “राज्याचा हा आनंदाचा संदेश सर्व जगात घोषित केला जाईल.” (मत्तय २४:३, १४) खरंच, राज्याचा आनंदाचा संदेश आज २३० पेक्षा अधिक राष्ट्रांमध्ये आणि ७०० पेक्षा अधिक भाषांमध्ये सांगितला जात आहे! सर्व राष्ट्रांतले व वंशातले यहोवाचे साक्षीदार संपूर्ण पृथ्वीवर लोकांना देवाच्या राज्याबद्दल आणि हे राज्य मानवजातीसाठी काय करणार आहे त्याबद्दल सांगत आहेत. (प्रकटीकरण ७:९) हे सर्व शिक्षण ते मोफत देत आहेत. येशूने भविष्यवाणी केल्यानुसार पुष्कळ जण त्यांचा द्वेष व छळ करत असले, तरीसुद्धा त्यांचं हे प्रचार काम बंद होणार नाही.—लूक २१:१७.

तुम्ही काय ठरवलं आहे?

१५. (क) आपण शेवटच्या दिवसात जगत आहोत असं तुम्हालादेखील वाटतं का? समजावून सांगा (ख) जे यहोवाला आज्ञाधारक राहतात आणि जे राहत नाहीत त्यांचं काय होणार आहे?

१५ आपण शेवटच्या दिवसांत जगत आहोत असं तुम्हालादेखील वाटतं का? शेवटच्या दिवसांबद्दल बायबलमध्ये करण्यात आलेल्या अनेक भविष्यवाण्या आज खऱ्या ठरत आहेत. लवकरच यहोवा संपूर्ण पृथ्वीवर चाललेलं प्रचार कार्य थांबवण्याचा निर्णय घेईल. त्यानंतर “अंत येईल.” (मत्तय २४:१४) “अंत” म्हणजे काय? “अंत” म्हणजे हर्मगिदोन, जेव्हा यहोवा देव सर्व प्रकारच्या दुष्टतेचा अंत करणार आहे. यहोवा आणि त्याचा पुत्र येशू यांची आज्ञा पाळण्यास नकार देणाऱ्या लोकांचा यहोवा नाश करणार आहे. यासाठी तो येशू आणि त्याच्या शक्तिशाली देवदूतांचा उपयोग करेल. (२ थेस्सलनीकाकर १:६-९) यानंतर, सैतान आणि त्याचे दूत लोकांना फसवू शकणार नाहीत. जे देवाची आज्ञा पाळतात आणि त्याच्या राज्याचा स्वीकार करतात, ते लोक देवाने दिलेलं प्रत्येक वचन खरं होताना पाहतील.—प्रकटीकरण २०:१-३; २१:३-५.

१६. अंत खूप जवळ आला असल्यामुळे तुम्ही काय केलं पाहिजे?

१६ सैतान राज्य करत असलेल्या या जगाचा अंत लवकरच होईल. म्हणून आपण स्वतःला विचारू शकतो की, ‘मी काय केलं पाहिजे?’ यहोवाची इच्छा आहे की, तुम्ही बायबलमधून जास्तीत जास्त ज्ञान घेतलं पाहिजे. पण तुम्ही हा अभ्यास मनापासून केला पाहिजे. (योहान १७:३) दर आठवडी होणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांमध्ये बायबल समजण्यासाठी मदत केली जाते. या सभांना उपस्थित राहण्याचा तुम्ही पूर्ण प्रयत्न केला पाहिजे. (इब्री लोकांना १०:२४, २५ वाचा.) तुमच्या जीवनात बदल करण्याची गरज आहे, असं तुम्हाला जाणवल्यास न घाबरता ते बदल करा. जसजसं तुम्ही हे बदल कराल तसतसं यहोवासोबतची तुमची मैत्री आणखी घनिष्ठ होईल.—याकोब ४:८.

१७. अंत येईल तेव्हा बहुतेक लोक आश्चर्यचकित का होतील?

१७ प्रेषित पौलने म्हटलं की, बहुतेक लोकांना अपेक्षा नसेल अशाच वेळी दुष्टांचा नाश होईल, कारण “रात्रीच्या वेळी जसा चोर येतो” तसा विनाश अचानक येईल. (१ थेस्सलनीकाकर ५:२) आपण शेवटच्या दिवसांत जगत आहोत, याच्या पुराव्यांकडे लोक दुर्लक्ष करतील असं येशूने भविष्यवाणीत म्हटलं होतं. तो म्हणाला “नोहाच्या दिवसांत जसं होतं तसंच मनुष्याच्या पुत्राच्या उपस्थितीच्या काळातही [किंवा, शेवटच्या दिवसांत] घडेल. कारण जलप्रलय येण्याआधीच्या काळात, नोहा जहाजात गेला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, स्त्रीपुरुषांची लग्न होत होती आणि जलप्रलय येऊन ते सर्व त्यात वाहून जाईपर्यंत त्यांनी लक्ष दिलं नाही. तसंच मनुष्याच्या पुत्राच्या उपस्थितीच्या काळातही घडेल.”—मत्तय २४:३७-३९.

१८. येशूने कोणता इशारा दिला?

१८ येशू म्हणाला “अतिप्रमाणात खाणे व पिणे आणि जीवनाच्या चिंता” यांमध्ये आपण गुंतून बसू नये. कारण अंत “पाशाप्रमाणे अचानक” येईल. तसंच, “तो दिवस सबंध पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर येईल.” शेवटी तो म्हणाला “जागे राहा आणि घडणार असलेल्या या सर्व गोष्टींतून बचावून तुम्हाला मनुष्याच्या पुत्रासमोर उभं राहता यावं, अशी सतत याचना [किंवा, मनापासून प्रार्थना] करत राहा.” (लूक २१:३४-३६) आपण येशूच्या या इशाऱ्याकडे लक्ष देणं का महत्त्वाचं आहे? कारण, सैतानाच्या या दुष्ट जगाचा लवकरच नाश होणार आहे. फक्त ज्यांना यहोवा आणि येशू यांची स्वीकृती मिळेल, तेच या नाशातून वाचून नवीन जगात सदासर्वकाळ जगतील.—योहान ३:१६; २ पेत्र ३:१३.

^ परि. 4 ‘मीखाएल’ हे येशूचं दुसरं नाव आहे. अधिक माहितीसाठी कृपया अंत्यटीप २३ पाहा.