व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय पंधरा

देवाची उपासना करण्याचा योग्य मार्ग

देवाची उपासना करण्याचा योग्य मार्ग

१. देवाची उपासना करण्याचा योग्य मार्ग आपल्याला कोण सांगू शकतं?

बहुतेक धर्म दावा करतात की ते देवाबद्दल सत्य शिकवतात. पण ते शक्य नाही कारण, देव कोण आहे आणि आपण त्याची उपासना कशी करायला हवी, याबद्दल सर्व धर्मांची वेगवेगळी मतं आहेत. देवाची उपासना करण्याचा योग्य मार्ग कोणता, हे आपण कसं ओळखू शकतो? आपण यहोवाची उपासना कशी करायला हवी ते आपल्याला फक्त तोच सांगू शकतो.

२. देवाची उपासना करण्याचा योग्य मार्ग आपण कसा शिकू शकतो?

आपण यहोवाची उपासना योग्य मार्गाने करावी म्हणून त्याने आपल्याला बायबल दिलं आहे. त्यामुळे आपण बायबलचा अभ्यास केला पाहिजे. आपण शिकत असलेल्या गोष्टींमुळे आपल्याला फायदा व्हावा, म्हणून यहोवा आपली मदत करेल कारण त्याला आपली काळजी आहे.—यशया ४८:१७.

३. आपण काय करावं अशी देवाची इच्छा आहे?

काही लोक म्हणतात की देव सर्व धर्मांचा स्वीकार करतो, पण येशूने आपल्याला याबद्दल काय शिकवलं? तो म्हणाला: “मला ‘प्रभू, प्रभू,’ म्हणणारा प्रत्येक जण स्वर्गाच्या राज्यात जाणार नाही, तर स्वर्गातील माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करणाराच त्या राज्यात जाईल.” तेव्हा आपल्याला देवाची इच्छा काय आहे, ते शिकणं आणि त्याप्रमाणे वागणं गरजेचं आहे. ही एक गंभीर गोष्ट आहे, कारण जे देवाची आज्ञा पाळत नाहीत ते “वाईट कामं” करणारे, म्हणजेच अपराध्यांसारखे आहेत असं येशूने म्हटलं.—मत्तय ७:२१-२३

४. देवाच्या इच्छेप्रमाणे कार्य करण्याबद्दल येशूने काय म्हटलं?

देवाच्या इच्छेप्रमाणे कार्य करताना अडचणी किंवा समस्या येतील याची सूचना येशूने आधीच दिली होती. तो म्हणाला: “अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाणारा दरवाजा रुंद आणि रस्ता पसरट आहे व त्यातून जाणारे बरेच जण आहेत; तर जीवनाकडे जाणारा दरवाजा अरुंद आणि रस्ता अडचणीचा आहे व फार कमी लोकांना तो सापडतो.” (मत्तय ७:१३, १४) अडचणीचा रस्ता, किंवा देवाची उपासना करण्याचा योग्य मार्गच आपल्याला सर्वकाळाच्या जीवनाकडे नेतो. पसरट मार्ग किंवा देवाची उपासना करण्याचा अयोग्य मार्ग आपल्याला मृत्यूकडे नेतो. पण कोणाचाही नाश व्हावा, अशी यहोवाची इच्छा नाही. तो सर्वांनाच त्याच्याबद्दल शिकण्याची संधी देतो.—२ पेत्र ३:९.

देवाची उपासना करण्याचा योग्य मार्ग

५. देवाची सेवा योग्य मार्गाने करणाऱ्यांना आपण कसं ओळखू शकतो?

योग्य मार्गाने देवाची उपासना करणाऱ्यांना आपण ओळखू शकतो असं येशू म्हणाला. आपण त्यांना, त्यांच्या विश्वासांवरून आणि कार्यांवरून ओळखू शकतो. त्याने म्हटलं: “तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल.” तो असंही म्हणाला: “प्रत्येक चांगलं झाड चांगलं फळ देतं.” (मत्तय ७:१६, १७) देवाची सेवा करणारे कधीच चुकणार नाहीत, असा याचा अर्थ होत नाही. पण योग्य तेच करण्याचा ते सतत प्रयत्न करतात. अशा लोकांना ओळखण्यासाठी कोणत्या गोष्टी आपल्याला मदत करतील, ते आता आपण पाहू.

६, ७. खरी उपासना बायबलवर का आधारित आहे? येशूच्या उदाहरणावरून आपण काय शिकतो?

आपली उपासना बायबलवर आधारित असली पाहिजे. बायबलमध्ये असं सांगितलं आहे: “संपूर्ण शास्त्र देवाच्या प्रेरणेने लिहिलेले असून ते शिकवण्यासाठी, ताडन देण्यासाठी, सुधारणूक करण्यासाठी, न्यायनीतीनुसार शिस्त लावण्यासाठी उपयोगी आहे, यासाठी की देवाचा मनुष्य सर्व बाबतींत कुशल आणि प्रत्येक चांगले काम करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असावा.” (२ तीमथ्य ३:१६, १७) प्रेषित पौलने ख्रिश्चनांना असं लिहिलं: “जेव्हा तुम्ही आमच्याकडून देवाचे वचन ऐकले तेव्हा तुम्ही ते माणसांचे वचन म्हणून नाही तर देवाचे वचन म्हणून स्वीकारले; आणि ते खरोखर देवाचेच वचन आहे.” (१ थेस्सलनीकाकर २:१३) खरी उपासना फक्त देवाच्या वचनावर, म्हणजे बायबलवर आधारित आहे; ती माणसांच्या विचारांवर, परंपरांवर किंवा इतर कोणत्याही गोष्टींवर आधारित नाही.

येशूने जे काही शिकवलं ते देवाच्या वचनावर आधारित होतं. (योहान १७:१७ वाचा.) तो नेहमी शास्त्रवचनांचा उल्लेख करायचा. (मत्तय ४:४, ७, १०) देवाचे खरे सेवक येशूच्या पावलांवर पाऊल ठेवून चालतात आणि त्यांच्या सर्व शिकवणी बायबल आधारित आहेत.

८. यहोवाची उपासना कशी करायची याबद्दल येशूने आपल्याला काय शिकवलं?

आपण फक्त यहोवाची उपासना केली पाहिजे. स्तोत्र ८३:१८ [पं.र.भा.] मध्ये म्हटलं आहे: “ज्या तुझे नाव यहोवा असे आहे तो तूच मात्र अवघ्या पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांनी जाणावे.” येशूने लोकांना देवाचं नाव सांगितलं, कारण त्याची अशी इच्छा होती की खरा देव नक्की कोण आहे हे त्यांनी ओळखावं. (योहान १७:६ वाचा.) येशूने म्हटलं: “तू केवळ तुझा देव यहोवा याचीच उपासना कर आणि केवळ त्याचीच पवित्र सेवा कर.” (मत्तय ४:१०) देवाचे सेवक या नात्याने आपण येशूच्या उदाहरणाचं अनुकरण केलं पाहिजे. त्यामुळे आपण फक्त यहोवाची उपासना करतो, त्याचं नाव वापरतो, आणि इतरांना त्याच्या नावाबद्दल व तो आपल्यासाठी काय करणार आहे हे शिकवतो.

९, १०. आपण एकमेकांसाठी प्रेम कसं दाखवतो?

आपलं लोकांवर खरं प्रेम असलं पाहिजे. येशूने आपल्या शिष्यांना एकमेकांवर प्रेम करायला शिकवलं. (योहान १३:३५ वाचा.) आपला देश, संस्कृती आणि आर्थिक परिस्थिती जरी वेगवेगळी असली, तरी एकमेकांवर प्रेम असल्यामुळे आपण भावंडांसारखे राहतो. (कलस्सैकर ३:१४) म्हणूनच आपण युद्धात भाग घेऊन लोकांचा जीव घेत नाही. बायबलमध्ये म्हटलं आहे: “देवाची मुले कोण आणि सैतानाची मुले कोण, हे यावरून दिसून येते: जो कोणी नीतीने चालत नाही तो देवापासून नाही, तसेच जो आपल्या बांधवावर प्रेम करत नाही तोही देवापासून नाही.” पुढे असं म्हटलं आहे: “आपण एकमेकांवर प्रेम केले पाहिजे; आपण काइनसारखे होऊ नये, जो त्या दुष्टापासून होता आणि ज्याने आपल्या भावाची हत्या केली.”—१ योहान ३:१०-१२; ४:२०, २१.

१० आपण आपला वेळ, शक्ती आणि भौतिक गोष्टींचा वापर, एकमेकांच्या मदतीसाठी आणि एकमेकांना प्रोत्साहन देण्यासाठी करतो. (इब्री लोकांना १०:२४, २५) आपण सर्वांचं भलं करण्याचा प्रयत्न करतो.—गलतीकर ६:१०.

११. येशूद्वारे आपलं तारण होऊ शकतं यावर आपण का विश्वास ठेवला पाहिजे?

११ आपण येशूची आज्ञा पाळली पाहिजे कारण त्याच्याद्वारेच तारण होऊ शकतं. बायबलमध्ये असं म्हटलं आहे: “तारण आणखी कोणाच्याही द्वारे मिळणं शक्य नाही, कारण ज्याद्वारे आपलं तारण होऊ शकेल, असं आकाशाखाली माणसांमध्ये दुसरं कोणतंही नाव देण्यात आलेलं नाही.” (प्रेषितांची कार्ये ४:१२) यहोवाने येशूला आपलं जीवन आज्ञाधारक लोकांकरता खंडणी म्हणून देण्यासाठी पाठवलं, हे आपण या पुस्तकाच्या ५ व्या अध्यायात शिकलो. (मत्तय २०:२८) पृथ्वीवर राज्य करण्यासाठी यहोवाने येशूला राजा म्हणून निवडलं आहे. यामुळेच बायबल असं म्हणतं की, आपल्याला सर्वकाळाचं जीवन हवं असेल तर आपण येशूच्या आज्ञेत राहिलं पाहिजे.योहान ३:३६ वाचा.

१२. आपण राजकारणात भाग का घेत नाही?

१२ आपण राजकारणात भाग घेत नाही. येशूने राजकारणात भाग घेतला नाही. जेव्हा त्याच्यावर खटला चालला होता तेव्हा त्याने रोमी शासक पिलात याला सांगितलं: “माझं राज्य या जगाचा भाग नाही.” (योहान १८:३६ वाचा.) येशूसारखंच आपणही देवाच्या स्वर्गीय राज्याशी एकनिष्ठ आहोत. त्यामुळे आपण कुठल्याही देशात राहत असलो तरी राजकारणात भाग घेत नाही. असं असलं तरी आपण “वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या” म्हणजेच सरकारांच्या अधीन राहावं अशी आज्ञा बायबलमध्ये दिली आहे. (रोमकर १३:१) आपण ज्या देशात राहतो त्या देशातला कायदा आपण पाळतो. पण जेव्हा एखादा कायदा देवाच्या आज्ञेच्या विरोधात असतो तेव्हा आपण प्रेषितांचं अनुकरण करतो. त्यांनी म्हटलं: “आम्ही माणसांपेक्षा देवाला आपला शासक मानून त्याची आज्ञा पाळली पाहिजे.”—प्रेषितांची कार्ये ५:२९; मार्क १२:१७.

१३. देवाच्या राज्याबद्दल आपण काय प्रचार करतो?

१३ देवाचं राज्यच जगातल्या सर्व समस्या काढेल असा आपला विश्वास आहे. येशूने म्हटलं “राज्याचा हा आनंदाचा संदेश” सर्व जगात गाजवला जाईल. (मत्तय २४:१४ वाचा.) कोणतंही मानवी सरकार करू शकत नाही ते देवाचं राज्य आपल्यासाठी करणार आहे. (स्तोत्र १४६:३) येशूने आपल्याला देवाच्या राज्यासाठी प्रार्थना करायला शिकवलं. तो म्हणाला: “तुझं राज्य येवो. तुझी इच्छा जशी स्वर्गात पूर्ण होत आहे, तशी पृथ्वीवरही होवो.” (मत्तय ६:१०) देवाचं राज्य सर्व मानवी सरकारांचा नाश करेल आणि “ते सर्वकाळ टिकेल,” असं बायबलमध्ये सांगितलं आहे.—दानीएल २:४४.

१४. तुमच्या मते देवाची उपासना योग्य प्रकारे कोण करत आहे?

१४ या सर्व मुद्द्‌यांचा अभ्यास केल्यानंतर स्वतःला विचारा: ‘कोणाच्या शिकवणी बायबलनुसार आहेत? लोकांना देवाच्या नावाबद्दल कोण सांगतं? एकमेकांवर खरं प्रेम कोण करतं व देवाने आपल्या तारणासाठी येशूला पाठवलं असा विश्वास कोण बाळगतं? राजकारणात कोण भाग घेत नाहीत? आणि कोण असा प्रचार करतं की देवाचं राज्यच आपल्या समस्या सोडवू शकतं?’ फक्त यहोवाचे साक्षीदार.—यशया ४३:१०-१२.

तुम्ही काय कराल?

१५. देवाने आपली उपासना कबूल करावी यासाठी आपण काय केलं पाहिजे?

१५ देव अस्तित्वात आहे या गोष्टीवर विश्वास करणं इतकंच पुरेसं नाही. देव आहे असं दुरात्मेदेखील मानतात, पण ते देवाच्या आज्ञा पाळत नाहीत. (याकोब २:१९) जर आपल्याला वाटतं की देवाने आपली उपासना कबूल करावी, तर फक्त त्याच्या अस्तित्वावर विश्वास असून चालणार नाही, तर आपण त्याच्या आज्ञादेखील पाळल्या पाहिजेत.

१६. आपण खोट्या धर्माला का नाकारलं पाहिजे?

१६ देवाने आपली उपासना स्वीकारावी यासाठी, आपण खोट्या धर्माला नाकारलं पाहिजे. “तेथून निघून जा . . . तुम्ही आपणास शुद्ध करा,” असं संदेष्टा यशयाने लिहिलं. (यशया ५२:११; २ करिंथकर ६:१७) यामुळेच, आपण खोट्या उपासनेशी संबंधित सर्व गोष्टी नाकारल्या पाहिजेत.

१७, १८. “मोठी बाबेल” म्हणजे काय आणि तिच्यातून लगेच बाहेर पडणं इतकं गरजेचं का आहे?

१७ खोटा धर्म म्हणजे काय? असा कोणताही धर्म जो आपल्याला देवाच्या वचनाविरुद्ध त्याची उपासना करायला शिकवतो. बायबलमध्ये खोट्या धर्माला “मोठी बाबेल” म्हटलं आहे. (प्रकटीकरण १७:५) असं का? कारण नोहाच्या दिवसांतल्या जलप्रलयानंतर बॅबिलॉन शहरात अनेक खोट्या धार्मिक शिकवणींची सुरुवात झाली. याच खोट्या शिकवणी जगभरात पसरल्या. उदाहरणार्थ, बॅबिलॉनमध्ये राहणारे लोक त्रिदेवांची उपासना करायचे. आजदेखील अनेक धर्म शिकवतात की देव त्रैक्य आहे, पण बायबलमध्ये हे स्पष्टपणे शिकवलं आहे की एकच खरा देव आहे, ज्याचं नाव यहोवा आहे आणि येशू हा त्याचा पुत्र आहे. (योहान १७:३) बॅबिलॉनमध्ये राहणारे लोक असादेखील विश्वास करायचे की एक व्यक्ती मेल्यावर तिचं शरीर नष्ट होतं, पण तिच्यातलं काहीतरी पुढेही जिवंत राहतं आणि ते नरकात यातना भोगू शकतं. पण हे खरं नाही.—अंत्यटीप १४, १७ आणि १८ पाहा.

१८ देवाने भविष्यवाणी केली आहे की लवकरच सर्व खोट्या धर्मांचा नाश केला जाईल. (प्रकटीकरण १८:८) खोट्या धर्मातून लगेच बाहेर पडणं इतकं गरजेचं का आहे, हे तुम्हाला समजलं का? कारण उशीर होण्याआधी तुम्ही त्यातून बाहेर पडावं, अशी यहोवा देवाची इच्छा आहे.—प्रकटीकरण १८:४.

तुम्ही यहोवाच्या लोकांबरोबर त्याची सेवा करता तेव्हा एका जागतिक कुटुंबाचे भाग बनता

१९. जेव्हा तुम्ही यहोवाची सेवा करण्याचा निर्णय घेता, तेव्हा तो तुम्हाला कसा सांभाळतो?

१९ तुम्ही खोटा धर्म सोडून यहोवाची सेवा करण्याचा निर्णय का घेतला हे कदाचित तुमच्या मित्रांना किंवा कुटुंबातल्या सदस्यांना समजणार नाही. ते तुमचा खूप विरोधही करतील. पण यहोवा तुम्हाला कधीच सोडणार नाही. शिवाय तुम्ही लाखो लोक असलेल्या एका जागतिक कुटुंबाचा भाग बनाल ज्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. तसंच, तुमच्याकडे देवाच्या नवीन जगात सर्वकाळाचं जीवन जगण्याची आशादेखील असेल. (मार्क १०:२८-३०) आज जे मित्र आणि कुटुंबातले सदस्य तुमचा विरोध करतात, तेही कदाचित पुढे जाऊन बायबलचा अभ्यास करू लागतील.

२०. देवाची योग्य प्रकारे उपासना करणं महत्त्वाचं का आहे?

२० लवकरच यहोवा जगातल्या सर्व दुष्टतेचा नाश करणार आहे आणि त्याचं राज्य या पृथ्वीवर येणार आहे. (२ पेत्र ३:९, १३) खरंच तो किती आनंदाचा काळ असेल! यहोवाला जशी हवी तशीच उपासना सर्व जण करतील. म्हणून तुम्ही आजच देवाची उपासना योग्य प्रकारे करण्यासाठी पाऊल उचलण्याची गरज आहे.