व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय सोळा

देवाची उपासना करण्याचा योग्य मार्ग निवडा

देवाची उपासना करण्याचा योग्य मार्ग निवडा

१, २. तुम्ही स्वतःला कोणता प्रश्न विचारला पाहिजे आणि हे महत्त्वाचं का आहे?

बायबलचा अभ्यास करताना तुम्हाला दिसून आलं असेल, की देवाची उपासना करत असल्याचा दावा करणारे बहुतेक लोक खरंतर, देवाला घृणा आणणाऱ्या गोष्टी करतात किंवा शिकवतात. (२ करिंथकर ६:१७) म्हणूनच यहोवा आपल्याला खोटा धर्म म्हणजेच “मोठी बाबेल” यातून बाहेर पडण्याची आज्ञा देतो. (प्रकटीकरण १८:२, ४) मग तुम्ही काय करायला हवं? याबाबतीत प्रत्येकाने वैयक्तिक निर्णय घेण्याची गरज आहे. आपण स्वतःला विचारलं पाहिजे: ‘देव अपेक्षा करत असलेल्या मार्गाने मी त्याची उपासना करेन, की आजपर्यंत ज्या पद्धतीने करत आलो, तशीच करेन?’

खोट्या धर्मातून तुम्ही बाहेर पडला असाल किंवा तुमचं नाव तिथून काढून टाकलं असेल तर तुम्ही योग्यच केलं आहे. पण, खोट्या धर्माच्या काही प्रथा किंवा रीतिरिवाज तुम्हाला मनातल्या मनात अजूनही आवडतात का? मग आता आपण अशाच काही प्रथांची किंवा रीतिरिवाजांवर चर्चा करू आणि त्यांच्याबाबतीत आपण यहोवाचा दृष्टिकोन बाळगणं का महत्त्वाचं आहे ते पाहू.

मूर्तिपूजा व पूर्वजांची उपासना

३. (क) काही लोकांना मूर्तींशिवाय देवाची उपासना करणं अशक्य का वाटतं? (ख) देवाची उपासना करताना मूर्तींचा वापर करण्याबद्दल बायबल काय सांगतं?

काही लोक अनेक वर्षांपासून उपासनेसाठी आपल्या घरात मूर्तींचा आणि देवघराचा वापर करतात. तुमच्या बाबतीत जर ही गोष्ट खरी असेल, तर तुम्हालाही वाटेल की या गोष्टींशिवाय देवाची उपासना करणं शक्य नाही. पण खरंतर आपण देवाची उपासना कशी केली पाहिजे, हे स्वतः यहोवा देवच आपल्याला सांगतो. यहोवाची उपासना करताना आपण मूर्तींचा उपयोग करू नये, असं बायबल स्पष्टपणे सांगतं.—निर्गम २०:४, ५ वाचा; स्तोत्र ११५:४-८; यशया ४२:८; १ योहान ५:२१.

४. (क) मृत नातेवाइकांची उपासना करणं अयोग्य का आहे? (ख) मृत लोकांबरोबर बोलण्याचा प्रयत्न करू नका, अशी ताकीद यहोवाने आपल्या लोकांना का दिली होती?

काही लोक दर वर्षी त्यांच्या मृत नातेवाइकांना खूश करण्याच्या प्रयत्नात खूप पैसा आणि वेळ घालवतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर ते त्यांची उपासनाच करत असतात. पण आपण मागच्या अध्यायात शिकलो, की मृत लोक आपल्याला मदत करू शकत नाहीत किंवा त्रासही देऊ शकत नाहीत. ते कुठेही जिवंत नसतात. खरंतर, त्यांच्याबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करणं धोकादायक आहे. कारण, एखाद्या मृत नातेवाईकाकडून आलेला संदेश हा त्यांच्याकडून नसून दुरात्म्यांकडून असतो. म्हणूनच यहोवाने इस्राएली लोकांना, मृतांबरोबर बोलण्याचा प्रयत्न करू नका किंवा कुठल्याही प्रकारच्या भुताटकीत भाग घेऊ नका, अशी स्पष्ट ताकीद दिली होती.—अनुवाद १८:१०-१२; अंत्यटीप २६ आणि ३१ पाहा.

५. मूर्तींचा वापर करण्याबाबत आणि मृत नातेवाइकांची उपासना करण्याबाबत देवाच्या दृष्टिकोनानुसार वागण्यास कोणती गोष्ट तुम्हाला मदत करेल?

मूर्तींचा वापर करण्याबाबत आणि मृत नातेवाइकांची उपासना करण्याबाबत देवाच्या दृष्टिकोनानुसार वागण्यास कोणती गोष्ट तुम्हाला मदत करेल? बायबलचं वाचन केल्याने व या गोष्टींबद्दल यहोवाचा काय दृष्टिकोन आहे यावर विचार केल्याने तुम्हाला मदत मिळू शकेल. या गोष्टींना तो “वीट” आणणाऱ्या किंवा किळसवाण्या समजतो. (अनुवाद २७:१५) यहोवाला दररोज मदतीसाठी प्रार्थना करा म्हणजे तुमचाही दृष्टिकोन त्याच्याप्रमाणे होईल आणि तुम्हाला त्याच्या अपेक्षेनुसार त्याची उपासना करता येईल. (यशया ५५:९) खोट्या उपासनेशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टी तुमच्या जीवनातून काढून टाकण्याचं बळ यहोवा तुम्हाला नक्की देईल.

नाताळ साजरा करावा का?

६. येशूचा वाढदिवस साजरा करण्याकरता २५ डिसेंबर ही तारीख का निवडण्यात आली?

नाताळ हा जगातल्या प्रसिद्ध सणांपैकी एक आहे. हा येशूचा वाढदिवस आहे, असं बहुतेक लोक मानतात. पण नाताळाचा संबंध खरंतर खोट्या उपासनेशी आहे. एका विश्वकोशात असं म्हटलं आहे: मूर्तिपूजक रोमी लोक २५ डिसेंबर हा दिवस सूर्याचा वाढदिवस म्हणून साजरा करायचे. चर्चच्या पुढाऱ्यांची अशी इच्छा होती की, जास्तीत जास्त मूर्तिपूजक लोकांनी ख्रिश्चन बनावं. त्यामुळे येशूचा जन्म २५ डिसेंबर रोजी झाला नसला तरी त्यांनी येशूचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ही तारीख ठरवली. (लूक २:८-१२) येशूच्या शिष्यांनी कधीच नाताळ साजरा केला नाही. एका संदर्भ ग्रंथात म्हटलं आहे की त्याच्या जन्माच्या २०० वर्षांनंतरही, “त्याची नेमकी जन्म तारीख कोणालाच माहीत नव्हती; आणि कोणालाच ती जाणूनही घ्यायची नव्हती.” (सेक्रेड ओरिजिन्स ऑफ प्रोफाऊंड थिंग्ज) खरंतर, येशूचा जन्म होऊन शेकडो वर्षं झाल्यानंतर नाताळ सणाची सुरुवात झाली.

७. खरे ख्रिस्ती नाताळ का साजरा करत नाहीत?

अनेकांना माहीत आहे की नाताळ हा सण आणि त्याच्याशी संबंधित रीतीरिवाज, जसं की पार्ट्या करणं किंवा एकमेकांना भेटवस्तू देणं हे मूर्तिपूजक लोकांकडून आले आहेत. यामुळेच एकेकाळी हा सण इंग्लंड आणि अमेरिकेच्या काही भागांत पाळला जात नसे. तसंच, जर कोणी हा सण पाळला तर त्याला शिक्षा दिली जायची. पण मग काही काळाने लोकांनी पुन्हा नाताळ साजरा करण्यास सुरुवात केली. खरे ख्रिस्ती नाताळ का साजरा करत नाहीत? कारण, त्यांना प्रत्येक गोष्टीत देवाला संतुष्ट करण्याची इच्छा आहे.

आपण वाढदिवस साजरा करावा का?

८, ९. सुरुवातीचे ख्रिस्ती वाढदिवस साजरा का करत नव्हते?

अनेक लोक उत्साहाने आपला वाढदिवस साजरा करतात. पण ख्रिश्चनांनी वाढदिवस साजरा करावा का? बायबलमध्ये वाढदिवस साजरा केल्याचे फक्त दोन उल्लेख आहेत. ज्यांनी तो साजरा केला होता ते लोक यहोवाचे उपासक नव्हते. (उत्पत्ति ४०:२०; मार्क ६:२१) खोट्या देवतांचा सन्मान करण्यासाठी वाढदिवस साजरा केला जात असे. म्हणूनच, सुरुवातीचे ख्रिस्ती, “एखाद्याचा वाढदिवस साजरा करणं ही मूर्तिपूजक प्रथा आहे, असं मानायचे.”—द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिआ.

प्राचीन काळचे रोमी व ग्रीक लोक असं मानायचे, की आपल्या जन्माच्या दिवशी कोणत्या ना कोणत्या देवतेचा जन्मदिवस असतो. आणि ज्या आत्मिक व्यक्तीचा त्या देवतेशी संबंध असतो ती आत्मिक व्यक्ती आपल्या जन्माच्या वेळी हजर असते. त्या काळातले मूर्तिपूजक लोक असा विचार करायचे की, आपण वाढदिवस साजरा केला तर ती देवता आयुष्यभर आपलं संरक्षण करेल.

१०. ख्रिश्चनांनी वाढदिवस का साजरा करू नये?

१० खोट्या धर्माशी संबंधित असलेले सणवार यहोवाला पसंत आहेत असं तुम्हाला वाटतं का? (यशया ६५:११, १२) नक्कीच नाही. म्हणूनच आपण खोट्या धर्माशी संबंधित असलेले कोणतेही सण किंवा वाढदिवस साजरा करत नाही.

हे खरंच इतकं महत्त्वाचं आहे का?

११. काही लोक सणवार का साजरे करतात? तुमच्यासाठी कोणती गोष्टी महत्त्वाची असली पाहिजे?

११ नाताळ किंवा इतर सणांची सुरुवात मूर्तीपूजक लोकांकडून झाली आहे हे अनेकांना माहीत असूनही ते हे सण पाळत राहतात. त्यांना वाटतं की या सणांमुळे सर्व नातेवाइकांना एकत्र येण्याची आणि कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवण्याची चांगली संधी मिळते. तुम्हालाही असंच वाटतं का? कुटुंब मिळून एकत्र येणं चुकीचं नाही. यहोवा देवानेच कुटुंबाची सुरुवात केली आणि आपण सर्वांसोबत चांगलं नातं ठेवावं, अशी त्याची इच्छा आहे. (इफिसकर ३:१४, १५) पण खोटे धार्मिक सणवार पाळून आपल्या नातेवाइकांना आनंदी करण्यापेक्षा आपण यहोवासोबत चांगलं नातं जोपासण्याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. म्हणूनच प्रेषित पौलने म्हटलं: “प्रभूच्या दृष्टीत कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत याची खातरी करत जा.”—इफिसकर ५:१०.

१२. कोणते सणवार यहोवाला मान्य नाहीत?

१२ पुष्कळ लोकांना वाटतं की एखाद्या सणाची सुरुवात कुठून झाली यावर इतका विचार करण्याची गरज नाही, पण यहोवाला तसं वाटत नाही. खोट्या उपासनेतून आलेले सणवार पाळणं, राष्ट्रदिवस किंवा राष्ट्रीय प्रतिकं यांना जास्त महत्त्व देणं त्याला मान्य नाही. उदाहरणार्थ, इजिप्तचे लोक त्यांच्या खोट्या देवतांचे अनेक सण साजरे करायचे. इस्राएली लोक इजिप्तच्या गुलामीतून बाहेर निघाले तेव्हा त्यांनी इजिप्तच्या लोकांचा एक सण साजरा केला आणि त्याला “परमेश्वराप्रीत्यर्थ उत्सव”, असंही म्हटलं. पण यहोवाने याबद्दल त्यांना शिक्षा केली. (निर्गम ३२:२-१०) तेव्हा संदेष्टा यशयाने म्हटलं ते योग्यच आहे; त्याने म्हटलं, की आपण कोणत्याही “अशुद्ध वस्तूला शिवू” नये.—यशया ५२:११ वाचा.

इतरांबरोबर दयाळूपणे वागा

१३. तुम्ही सणवार साजरे न करण्याचा निर्णय घेता तेव्हा तुमच्या मनात कोणते प्रश्न येऊ शकतात?

१३ तुम्ही सणवार साजरे न करण्याचा निर्णय घेता तेव्हा तुमच्या मनात अनेक प्रश्न येतील. जसं की, माझ्या कामावरच्या सोबत्यांनी, ‘तुम्ही सण का साजरे करत नाही?’, असं विचारलं तर मी काय उत्तर देऊ? कोणी मला सणासुदीच्या वेळी भेटवस्तू दिली तर मी ती घ्यावी की नाही? माझ्या विवाह सोबत्याने मला एखादा सण साजरा करण्यास सांगितलं, तर मी काय केलं पाहिजे? वाढदिवस साजरा करत नाही म्हणून माझी मुलं नाराज झाली तर मी त्यांची समजूत कशी काढू?

१४, १५. जेव्हा कोणी तुम्हाला सणाच्या शुभेच्छा किंवा भेटवस्तू देतं तेव्हा तुम्ही काय करू शकता?

१४ प्रत्येक प्रसंग कसा हाताळायचा किंवा कसं उत्तर द्यायचं, हे ठरवण्यासाठी समजबुद्धीचा वापर करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, सणाच्या दिवशी लोक शुभेच्छा देतात तेव्हा त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी, तुम्ही फक्त “थँक्यू” किंवा “आभारी आहे,” म्हणू शकता. पण काही प्रसंगी लोक तुम्हाला त्यामागचं कारण विचारतील. तेव्हा तुम्ही सण का साजरा करत नाही ते त्यांना समजावून सांगावं लागेल. पण असं करताना नेहमी दयाळूपणे, आदराने व कुशलतेने बोला. “तुमचे बोलणे नेहमी प्रेमळ, मिठाने रुचकर केल्याप्रमाणे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसे उत्तर द्यावे हे तुम्हाला समजेल,” असं बायबलमध्ये म्हटलं आहे. (कलस्सैकर ४:६) तुम्ही त्यांना प्रेमाने समजावून सांगू शकता की इतरांबरोबर वेळ घालवायला किंवा भेटवस्तू द्यायला तुम्हालाही आवडतं, पण सणाच्या दिवशी नाही.

१५ सणाच्या दिवशी तुम्हाला कोणी भेटवस्तू दिली तर तुम्ही काय कराल? अशा प्रसंगी तुम्ही काय करावं आणि काय करू नये, याबद्दल बायबलमध्ये नियम दिले नाहीत. बायबल एवढंच सांगतं की आपण जो काही निर्णय घेऊ त्यामुळे आपला विवेक शुद्ध राहिला पाहिजे. (१ तीमथ्य १:१८, १९) तुम्ही अमुक सण साजरा करत नाही, हे कदाचित भेटवस्तू देणाऱ्याला माहीत नसावं किंवा तो म्हणेल, “तुम्ही सणवार साजरा करत नाही हे मला माहीत आहे तरीपण मला तुम्हाला भेटवस्तू द्यायचीच आहे.” परिस्थिती कोणतीही असो, भेटवस्तू घ्यायची किंवा नाही हे तुम्ही स्वतः ठरवलं पाहिजे. पण तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्यामुळे तुमचा विवेक शुद्ध राहील याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. आपण असं काहीही करणार नाही ज्यामुळे यहोवाबरोबरचा आपला नातेसंबंध बिघडेल.

तुम्ही आणि तुमचं कुटुंब

यहोवाची उपासना करणारे आनंदी असतात

१६. तुमच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांना सण साजरे करायचे असतील तर तुम्ही काय केलं पाहिजे?

१६ तुमच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांना सण साजरे करायचे असतील तर तुम्ही काय केलं पाहिजे? अशा वेळी तुम्ही त्यांच्याशी वाद घालण्याची गरज नाही. त्यांना काय करायचं आहे हे ठरवण्याचा त्यांना हक्क आहे. त्यांनी तुमच्या निर्णयांचा जसा आदर करावा अशी तुमची इच्छा आहे तसंच तुम्हीदेखील त्यांच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. (मत्तय ७:१२ वाचा.) पण सणाच्या दिवशी तुम्ही त्यांच्याबरोबर वेळ घालवावा, असं त्यांना वाटत असेल तर काय? कोणताही निर्णय घेण्याआधी, योग्य मार्गदर्शनासाठी यहोवाला प्रार्थना करा. त्या दिवशी काय-काय होऊ शकतं यावर आधीच विचार करा आणि त्याबद्दल आपल्या प्रकाशनांमध्ये संशोधन करा. पण लक्षात असू द्या की तुमचा मुख्य हेतू यहोवाला आनंदित करणं हाच असला पाहिजे.

१७. इतरांना सणवार साजरा करताना पाहून आपल्या मुलांना त्यांचा हेवा वाटू नये म्हणून तुम्ही काय करू शकता?

१७ इतरांना सणवार साजरा करताना पाहून आपल्या मुलांना त्यांचा हेवा वाटू नये, म्हणून तुम्ही काय करू शकता? तुम्ही अधूनमधून त्यांच्यासाठी काहीतरी खास करू शकता. तुम्ही त्यांना न सांगता एखादी भेटवस्तू आणून देऊ शकता. त्यांच्यासाठी सर्वात उत्तम भेटवस्तू म्हणजे त्यांच्यासोबत वेळ घालवणं आणि त्यांच्यावर भरभरून प्रेम करणं.

खरी उपासना करा

१८. आपण ख्रिस्ती सभांना उपस्थित का राहिलं पाहिजे?

१८ यहोवाला आनंदित करण्यासाठी आपण खोटा धर्म आणि त्याच्याशी संबंधित असलेले रीतीरिवाज आणि सणवार टाळले पाहिजेत. पण एवढंच करणं पुरेसं नाही. आपण खरी उपासना केली पाहिजे. ती आपण कशी करू शकतो? ख्रिस्ती सभांना नियमित रीत्या उपस्थित राहून आपण खरी उपासना करू शकतो. (इब्री लोकांना १०:२४, २५ वाचा.) ख्रिस्ती सभा खऱ्या उपासनेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. (स्तोत्र २२:२२; १२२:१) आपण सभांसाठी एकत्र येतो तेव्हा आपण एकमेकांना उत्तेजन देऊ शकतो.—रोमकर १:१२.

१९. तुम्ही बायबलमधून शिकलेली सत्य इतरांना सांगणं का महत्त्वाचं आहे?

१९ खरी उपासना करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे, तुम्ही बायबलमधून शिकत असलेल्या गोष्टी इतरांना सांगणं. जगात होत असलेल्या वाईट गोष्टींमुळे अनेक लोक निराश झाले आहेत. त्यांपैकी काही लोकांना तुम्ही ओळखतही असाल. तुम्ही त्यांना चांगल्या भविष्याच्या आशेबद्दल सांगू शकता. ख्रिस्ती सभांना नियमितपणे उपस्थित राहिल्याने व इतरांना बायबलमधली सत्यं सांगत राहिल्याने, तुम्हाला स्वतःहून खोटा धर्म व रीतीरिवाज सोडावेसे वाटतील. यामुळे तुम्ही खरंच आनंदी व्हाल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, देवाची उपासना करण्याचा योग्य मार्ग निवडून त्यानुसार वागण्यासाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांवर यहोवा अनेक आशीर्वाद देईल.—मलाखी ३:१०.