व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्न ५

मी त्रास देणाऱ्यांचा सामना कसा करू शकतो?

मी त्रास देणाऱ्यांचा सामना कसा करू शकतो?

हे जाणून घेणं महत्त्वाचं का आहे?

तुम्ही त्रास देणाऱ्यांना जशी प्रतिक्रिया देता त्यामुळे त्याचे चांगले किंवा वाईट परिणाम घडू शकतात.

तुम्ही काय केलं असतं?

कल्पना करा: थॉमसला आज शाळेत जायचं नाहीये. पण प्रश्न फक्त आजचा नाहीये त्याला शाळेत जायची इच्छाच नाहीये. पण का बरं? तीन महिन्यांआधी त्याच्या वर्गातील मुलांनी त्याच्याबद्दल खोटी अफवा पसरवली. त्यानंतर सर्व जण त्याला वेगवेगळ्या नावाने चिडवू लागले. कधीकधी तर थॉमस चालत असताना ते मुद्दामहून त्याच्या हातातली सर्व पुस्तकं पाडायचे आणि मग “सॉरी! चुकून धक्का लागला,” असं म्हणायचे. कधीकधी मुलं त्याला मागून धक्का मारायचे आणि मग काहीच झालं नाही असं वागायचे. थॉमसने वळून पाहिलं की त्याला कळायचं नाही की नेमकं आपल्याला कोणी धक्का मारला. आणि काल तर पाणी डोक्यावरूनच गेलं, थॉमसला कोणीतरी इंटरनेटवरून चक्क धमकावलं!

तुम्ही थॉमसच्या जागी असता तर काय केलं असतं?

थांबा आणि विचार करा!

घाबरून जाण्याची गरज नाही. तुम्ही हात न उचलता त्रास देणाऱ्यांचा सामना करू शकता? पण कसं?

  • लगेच प्रतिक्रिया देऊ नका. बायबलमध्ये असं म्हटलं आहे: “मूर्ख आपल्या मनांतील सर्व क्रोध व्यक्त करतो, पण सुज्ञ तो मागे आवरून ठेवतो.” (नीतिसूत्रे २९:११) होताहोईल तितकं शांत राहण्याचा प्रयत्न करा किंवा कमीत कमी शांत आहात असं दाखवण्याचा प्रयत्न करा. तेव्हा त्रास देणाऱ्यांना तुम्हाला पुन्हा सतावण्यात काहीच रस उरणार नाही.

  • जशास तसं वागू नका. बायबलमध्ये असं म्हटलं आहे: “वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका.” (रोमकर १२:१७) बदला घेतल्याने परिस्थिती आणखी बिघडू शकते.

  • चार हात लांब राहा. बायबलमध्ये असं म्हटलं आहे: “चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो.” (नीतिसूत्रे २२:३) जे लोक त्रास देतात त्यांच्यापासून लांब राहा. आपल्याला त्रास दिला जाऊ शकतो अशा ठिकाणी जाण्याचं होताहोईल तितकं टाळा.

  • काहीतरी अनपेक्षित करा. बायबलमध्ये असं म्हटलं आहे: “मृदू उत्तराने कोपाचे निवारण होते.” (नीतिसूत्रे १५:१) तुम्ही काहीतरी मजेशीर बोलू शकता. जसं की, तुम्हाला त्रास देणाऱ्यांनी “ए जाड्या!” असं चिडवलं तर तुम्हाला काहीच फरक पडला नाही हे दाखवण्यासाठी म्हणू शकता: “हो! आहे की नाही माझी भारी पर्सनॅलिटी.”

  • काही न बोलता तिथून निघून जा. “शांत राहिल्यानं तुम्ही दाखवून देता की तुम्ही एक समजदार व्यक्ती आहात आणि तुम्ही त्रास देणाऱ्यापेक्षा मजबूत आहात. तसंच, तुम्ही संयमी आहात हेही दिसून येतं.” असं नॉरा नावाची १९ वर्षांची मुलगी म्हणते.—२ तीमथ्य २:२४.

  • तुमचा आत्मविश्वास वाढवा. जे स्वतःबद्दल नकारात्मक विचार करतात आणि सहसा घाबरून काहीच उत्तर देत नाहीत अशांना हे त्रास देणारे लोक पटकन ओळखतात. याउलट जर तुम्ही दाखवून दिलं की तुमच्यावर त्यांची दादागिरी चालत नाहीये, तेव्हा ते लगेच माघार घेतात आणि तुम्हाला त्रास द्यायचं बंद करतात.

  • मोठ्यांना सांगा. एक रिटायर्ड शिक्षिका म्हणतात: “कोणाला त्रास दिला जात असेल तर मी त्याला असा सल्ला देते, की त्याने शांतपणे सहन करू नये तर मोठ्यांना सांगावं. कारण त्याने सांगितलं नाही तर उद्या दुसऱ्या कोणालातरी त्रास भोगावा लागेल.”

आत्मविश्वास आपल्याला ते बळ देईल जे सहसा त्रास देणाऱ्यांकडे नसते