व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्न ६

मी सोबत्यांच्या दबावाचा सामना कसा करू शकतो?

मी सोबत्यांच्या दबावाचा सामना कसा करू शकतो?

हे जाणून घेणं महत्त्वाचं का आहे?

तुम्ही जेव्हा तुमच्या मतांवर ठाम राहता, तेव्हा इतरांच्या दबावाला बळी न पडता, स्वतःच्या जीवनातील निर्णय स्वतः घेऊ शकता.

तुम्ही काय केलं असतं?

कल्पना करा: ब्रायनच्या शाळेतली दोन मुलं जसजसं त्याच्या जवळ येऊ लागतात, तसतसं त्याच्या पोटात भीतीने गोळा येऊ लागतो. या आठवड्यात दोनदा त्यांनी ब्रायनला सिगरेट पिण्यासाठी जबरदस्ती केली होती. आज हा त्यांचा तिसरा प्रयत्न.

पहिला मुलगा म्हणतो:

“अरे तू परत एकटाच? या माझ्या मित्राला भेट.”

तो “मित्र” हा शब्द म्हणताना डोळा मारतो आणि आपल्या खिशातून काहीतरी काढत ब्रायनच्या पुढे करतो.

ब्रायन त्याच्या हातातली सिगरेट बघतो आणि त्याच्या पोटातला भीतीचा गोळा आणखीच मोठा होतो.

ब्रायन म्हणतो, “नको! मी तुला आधीच सांगितलं आहे मी नाही . . . ”

तेवढ्यात दुसरा मुलगा मधेच बोलतो: “ए! भित्र्यासारखा काय वागतोस!”

“मी भित्रा नाहीये” ब्रायन कसंबसं बोलतो.

दुसरा मुलगा ब्रायनच्या खांद्यावर हात टाकून हळूच म्हणतो “काही नाही होत रे! एकदा घेऊन तर बघ.”

पहिला मुलगा सिगरेट ब्रायनच्या तोंडाजवळ आणत कुजबुजतो: “आम्ही कुणालाच सांगणार नाही, घाबरू नको! कुणालाच कळणार नाही.”

तुम्ही ब्रायनच्या जागी असता तर काय केलं असतं?

थांबा आणि विचार करा!

ब्रायनच्या शाळेतली मुलं काय करत आहेत याचा त्यांनी मनापासून विचार केला आहे का? त्यांनी स्वतःचे निर्णय स्वतः घेतले आहेत का? नाही. तेदेखील दुसऱ्यांच्या दबावालाच बळी पडले आहेत. सोबत्यांच्या ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी त्यांनीदेखील सोबत्यांसारखंच वागण्याचा प्रयत्न केला.

अशा प्रकारची परिस्थिती तुमच्यासमोर आली असती, तर तुम्ही वेगळा मार्ग निवडून सोबत्यांच्या दबावाचा यशस्वी रीत्या सामना कसा केला असता?

  1. १ धोका कुठून येऊ शकतो याबद्दल नेहमी सतर्क राहा

    बायबलमध्ये म्हटलं आहे: “चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो; भोळे पुढे जातात आणि हानी पावतात.”—नीतिसूत्रे २२:३.

    बऱ्याच वेळा पुढे धोका आहे याचा तुम्हाला आधीच अंदाज येतो. उदाहरणार्थ, तुम्हाला तुमचे शाळासोबती समोरून सिगरेट ओढत येताना दिसतात. आता पुढे धोका आहे हे माहीत असल्यामुळे, तुम्ही त्या गोष्टीचा सामना करायला आधीच तयार असाल.

  2. २ परिणामांचा आधीच विचार करा

    बायबलमध्ये म्हटलं आहे: “जे योग्य ते करा.”—१ पेत्र ३:१६, सुबोधभाषांतर.

    स्वतःला विचारा, ‘मी जर इतरांच्या मागे जाऊन त्यांच्यासारखा वागलो तर पुढे त्याचे परिणाम काय होतील?’ हे खरं आहे की कदाचित तुम्ही तुमच्या सोबत्यांना थोडा वेळ खुश करू शकाल. पण नंतर तुम्हाला कसं वाटेल? सोबत्यांनी तुम्हाला ग्रुपमध्ये घ्यावं म्हणून तुम्ही स्वतःची ओळख पूर्णपणे बदलायला तयार आहात का?—निर्गम २३:२.

  3. ३ निर्णय घ्या

    बायबलमध्ये म्हटलं आहे: “शहाणा नीट पाहून पाऊल टाकतो.”—नीतिसूत्रे १४:१५.

    आपल्याला कधी ना कधी निर्णय घ्यावाच लागतो आणि त्याच्या परिणामांनादेखील सामोरं जावं लागतं. बायबलमध्ये योसेफ, ईयोब आणि येशू यांच्याबद्दल सांगितलं आहे ज्यांनी योग्य निर्णय घेतले. आणि काइन, एसाव आणि यहूदा यांच्याबद्दल देखील सांगितलं आहे, ज्यांनी चुकीचे निर्णय घेतले. तुम्ही काय कराल?

बायबलमध्ये म्हटलं आहे: “जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळाविषयीही विश्वासू आहे.” (लूक १६:१०) जर तुम्ही होणाऱ्या परिणामांचा आधीच विचार करून ठाम निर्णय घेतला, तर तुम्हाला तुमचं मत मांडणं खूप सोपं जाईल आणि त्याचा फायदाही होईल.

चिंता करू नका—तुम्हाला तुमच्या सोबत्यांना समजावताना भाषण द्यायची गरज नाही. तुम्ही फक्त ठामपणे नाही म्हणू शकता. किंवा तुम्ही तुमचा निर्णय बदलणार नाही हे दाखवण्यासाठी, तुम्ही पुढील गोष्टी म्हणू शकता:

  • “या प्लॅनमध्ये, मला घेऊ नका”

  • “मी अशा गोष्टी करत नाही”

  • “अरे, तुम्ही मला चांगलं ओळखता तरी असं करायला सांगता?”

त्यांना लगेच आणि ठामपणे उत्तर देणं फार महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा तुम्ही असं उत्तर द्याल तेव्हा तुमचे सोबती किती पटकन माघार घेतील हे पाहून तुम्हालाच आश्चर्य वाटेल!

माझी थट्टा केल्यास मी काय करू?

जेव्हा तुम्ही सोबत्यांच्या दबावाला बळी पडता, तेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या इशाऱ्यांवर चालणाऱ्या रोबोटसारखे होता

तुमचे सोबती तुमची थट्टा उडवत असतील तर तुम्ही काय कराल? समजा त्यांनी असं म्हटलं, “काय झालं घाबरलास? भित्रा कुठला!” हे सर्व टोमणे किंवा अशी भाषा, दुसरं तिसरं काही नसून, सोबत्यांचा दबाव आहे. तुम्ही याचा सामना कसा करू शकता? तुमच्याकडे कमीतकमी दोन पर्याय आहेत.

  • ऐकून घ्या. (“हो तू बरोबर बोलतोयस, मी खरंच घाबरलो!” असं बोलून, तुम्ही एखाद्या गोष्टीला का नकार देता ते थोडक्यात सांगा.)

  • तुम्ही त्यांच्यावर दबाव टाकू शकता. तुम्ही एखाद्या गोष्टीला नकार का दिला याचं कारण समजावून सांगा. त्यानंतर त्यांच्याशी तर्क करण्याचा प्रयत्न करा. (“मला वाटलं नव्हतं, तुझ्यासारखा चांगला मुलगा सिगरेट ओढत असेल!”)

तुमचे सोबती जास्तच टोमणे मारत राहिले तर तिथून निघून गेलेलंच उत्तम! तुम्ही जितकं जास्त वेळ तिथं थांबाल तितका दबाव वाढतच जाईल. तिथून निघून गेल्याने तुम्ही दाखवता की काहीही झालं, तरी तुम्ही त्यांच्यासाठी आपल्या चांगल्या सवयी मोडणार नाही.

तसं पाहता दबावांचा सामना कधी न्‌ कधी तर करावाच लागतो. पण असं असलं तरी तुम्ही अशा परिस्थितीत काय कराल, हे तुम्हीच ठरवलं पाहिजे, त्यासाठी तुमचं मत स्पष्टपणे व्यक्त करा. असं केल्यानं तुमच्यावर कुणीही दबाव टाकू शकणार नाही. शेवटी काय करायचं, हा निर्णय फक्त तुमचाच आहे!—यहोशवा २४:१५.