व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रश्न ८

मला लैंगिक शोषणाबद्दल काय माहीत असलं पाहिजे?

मला लैंगिक शोषणाबद्दल काय माहीत असलं पाहिजे?

हे जाणून घेणं महत्त्वाचं का आहे?

दरवर्षी लाखो लोकांवर बलात्कार होतो किंवा त्यांचं लैंगिक शोषण केलं जातं आणि प्रामुख्यानं तरुण मुलामुलींना याचा सामना करावा लागतो.

तुम्ही काय केलं असतं?

अॅनेटवर हल्ला करणाऱ्याने, काय होत आहे हे कळण्याआधीच तिला जमिनीवर पाडलं. ती म्हणते, “मी त्याला रोखण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मी ओरडले पण माझ्या तोंडातून आवाजच निघेना! मी त्याला ढकललं, लाथा-बुक्क्या मारल्या, ओरबडलं. पण तेव्हाच मला माझ्या शरीरात चाकू घुसल्याचं जाणवलं आणि माझं सगळं शरीर भीतीनं थंड पडलं.”

तुम्ही जर अशा परिस्थितीत असता तर काय केलं असतं?

थांबा आणि विचार करा!

रात्री बाहेर प्रवास करताना, तुम्ही सतर्क असलात तरी तुमच्यासोबत वाईट गोष्टी घडू शकतात. बायबलमध्ये असं म्हटलं आहे, “वेगवंतांस धाव . . . साधत नाही, आणि . . . निपुणांस अनुग्रह प्राप्त होत नाही, परंतु समय व प्रसंग हे सर्वांना घडतात.”—उपदेशक ९:११, पं.र.भा.

अॅनेटसारख्या काही तरुणींवर अनोळखी व्यक्तींनी हल्ले केले. तर इतरांवर ओळखीच्या किंवा कुटुंबातील व्यक्तींनी हल्ले केले आहेत. फक्त दहा वर्षांची असताना नॅटेली नावाच्या मुलीचं, तिच्या घराजवळ राहणाऱ्या एका किशोरवयीन मुलाने लैंगिक शोषण केलं. ती म्हणते, “मी इतकी घाबरले होते आणि मला इतकी लाज वाटत होती की, मी सुरुवातीला ही गोष्ट कुणालाच सांगितली नाही.”

यात तुमचा दोष नाही

अॅनेटवर जो प्रसंग ओढवला त्यासाठी आजदेखील ती स्वतःलाच दोष देते. ती म्हणते, “त्या रात्री घडलेला प्रसंग सतत माझ्या डोळ्यापुढे येतो. मला वाटतं की मी त्याचा अजून प्रतिकार करायला हवा होता. पण चाकूने हल्ला झाल्यामुळे मी भीतीने सुन्न पडले होते. स्वतःचा बचाव करण्यासाठी मी काहीच करू शकले नाही. पण मला अजूनही वाटतं की मी काहीतरी करायला हवं होतं.”

नॅटेलीदेखील अशाच प्रकारच्या दोषी भावनांशी झुंजत आहे. ती म्हणते, “माझ्या आईवडिलांनी मला आणि माझ्या बहिणीला बजावलं होतं की जेव्हा आम्ही बाहेर खेळायला जाऊ तेव्हा दोघींनी एकत्र राहायला हवं. पण मी त्यांचं ऐकलं नाही. खरंतर, मी आमच्या शेजाऱ्यावर विश्वास ठेवायला नको होता. म्हणून सतत वाटतं, मला इजा करायची संधी मीच त्याला दिली. मला सर्वात जास्त या गोष्टीचा त्रास होतो की जे काही झालं त्याचा माझ्या कुटुंबाला फार त्रास सहन करावा लागला आणि त्यासाठी मीच जबाबदार आहे असं मला वाटतं.”

जर तुम्हालादेखील अॅनेट आणि नॅटेलीसारखं वाटत असेल, तर लक्षात ठेवा ज्या व्यक्तीवर हा अत्याचार होतो ती त्यात स्वतःहून सहभागी होत नसते. काही लोक चुकीची कारणं देऊन या समस्येचं गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न करतात. कदाचित ते म्हणतील, ‘शेवटी मुलंच ती, त्यांच्याकडून अशा चुका होणं साहजिकच आहे.’ किंवा ‘टाळी एका हातानं वाजत नाही यात त्या मुलीचीदेखील काहीतरी चूक असणार.’ कारण काहीही असो, कुणाचंही लैंगिक शोषण होणं किंवा त्यांच्यावर बलात्कार होणं चुकीचं आहे. जर तुम्ही अशा प्रकारच्या घृणित अत्याचाराला बळी पडला आहात, तर नेहमी लक्षात ठेवा यात तुमचा काहीच दोष नाही!

“यात तुमचा काहीच दोष नाही.” हे वाचणं जरी सोपं वाटत असलं तरी या गोष्टीवर विश्वास ठेवणं फार कठीण आहे. काही लोक झालेल्या गोष्टींवर सतत विचार करत राहतात, स्वतःला दोष देतात आणि नकारात्मक भावनांशी झुंजत राहतात. तुम्हाला काय वाटतं, गप्प राहून किंवा या गोष्टी मनात साठवून कुणाचा फायदा होईल? तुमचा, की ज्याने तुमच्यावर हा अत्याचार केला त्या व्यक्तीचा? गप्प राहू नका! स्वतःची मदत करा.

आपल्या मनातलं दुःख सांगा

बायबलमध्ये म्हटलं आहे, की ज्या वेळी विश्वासू ईयोबाच्या जीवनात सर्वात जास्त परीक्षा आल्या होत्या तेव्हा तो म्हणाला: “माझ्या जिवाला क्लेश होत आहे म्हणून मी बोलेन.” (ईयोब १०:१) तुम्ही तुमच्या दुःखाविषयी बोललात तर तुम्हालादेखील फायदा होईल. तुमच्या सर्वात जवळच्या, विश्वासू व्यक्तीशी बोलल्यामुळे झालेल्या गोष्टीचा सामना करण्यासाठी आणि दुःखातून सावरण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल.

तुमचं दुःख एकट्यानं सोसणं तुम्हाला जड जाईल. तेव्हा तुमच्या जवळच्या व्यक्तीशी बोलून मदत मिळवा

अॅनेटला या गोष्टीने मदत झाली. ती म्हणते: “मी माझ्या जवळच्या मैत्रिणीसोबत बोलले, तिने मला ख्रिस्ती मंडळीतील काही जबाबदार लोकांशी बोलायला सांगितलं. आणि बरं झालं मी त्यांच्याशी बोलले. ते मला खूप वेळा येऊन भेटले आणि त्यांनी माझी समजूत काढली. त्यांनी मला वारंवार हेच समजावलं की जे झालं त्यात माझा दोष नव्हता, माझी काही म्हणजे काहीच चूक नव्हती.”

नॅटेली तिच्यासोबत झालेल्या अत्याचाराबद्दल आपल्या आईवडिलांशी बोलली. ती म्हणते “त्यांनी मला धीर दिला, माझं सर्व बोलणं ऐकून घेतलं आणि त्यामुळे माझ्या मनातून राग काढून टाकायला आणि दुःखातून सावरायला मला मदत मिळाली.”

नॅटेलीला प्रार्थना केल्यानंदेखील सांत्वन मिळालं. ती म्हणते, “ज्या वेळी मला वाटायचं की मी कुणाच्याही समोर आपलं मन मोकळं करू शकणार नाही, त्या वेळी देवाशी बोलल्यानं मला बरं वाटायचं. आता मी प्रार्थनेत देवासमोर मन मोकळं करते. त्यामुळे माझं मन शांत राहतं.”

तुम्हालादेखील जाणवेल की “बरे करण्याची वेळ” असते. (उपदेशक ३:३) त्यामुळे स्वतःची शारीरिक आणि मानसिक काळजी घ्या. विश्रांती घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आपला “सर्व सांत्वनदाता देव” यहोवा याच्यावर भरवसा ठेवा.—२ करिंथकर १:३, ४.

जर तुमचं डेटिंग करण्याचं वय आहे

तुमचा बॉयफ्रेंड जर तुमच्यावर चुकीच्या गोष्टी करण्याचा दबाव टाकत असेल, तर तुम्ही ठामपणे म्हणू शकता, “हे मला आवडत नाही!” किंवा, “मला हात लावू नकोस!” तो तुम्हाला सोडून देईल या भीतीनं शांत राहू नका. आणि जरी सोडलं तरी वाईट वाटून घेऊ नका. कारण तो तुमच्यासाठी योग्य नव्हताच! जो तुमच्या शरीराचा आणि तुमच्या तत्त्वांचा आदर करतो तोच तुमच्यावर खरं प्रेम करतो.

क्विज

“शाळेमध्ये, मुलं मागून माझ्या ब्राचा बेल्ट ओढायचे आणि घाणेरडे कॉमेन्ट्स करायचे. जसं की मी त्यांच्याबरोबर एकदा सेक्स केलं तर मला किती मजा येईल.”—कोरेटा.

तुम्हाला काय वाटतं ती मुलं

  1. १. तिला चिडवत होती?

  2. २. तिच्यासोबत फ्लर्ट करत होती?

  3. ३. तिचा लैंगिक छळ करत होती?

“एकदा बसमध्ये, एक मुलगा माझ्याशी घाणेरडं बोलू लागला आणि त्याने मला पकडलं. मी त्याचा हात झटकला आणि त्याला दूर जायला सांगितलं. तेव्हा तो, मी जसं काय वेडी आहे असं माझ्याकडे बघू लागला.”—कॅन्डीस.

तो मुलगा कॅन्डीससोबत काय करण्याचा प्रयत्न करत होता असं तुम्हाला वाटतं?

  1. १. तिला चिडवत होता?

  2. २. तिच्यासोबत फ्लर्ट करत होता?

  3. ३. तिचा लैंगिक छळ करत होता?

“गेल्या वर्षी एक मुलगा मला सारखा म्हणायचा की मी त्याला आवडते आणि त्याला मला डेटवर घेऊन जायचं आहे. मी त्याला नेहमी नाही म्हणायचे. कधीकधी तो माझ्या हातावरून हात फिरवायचा. मी त्याला ‘असं करू नको’ म्हणायचे तरी तो थांबायचा नाही. मग एकदा तर मी वाकून माझ्या बुटाची लेस बांधत होते तेव्हा त्याने मला मागे एक फटका मारला.”—बेथनी.

तुमच्या मते हा मुलगा:

  1. १. तिला चिडवत होता?

  2. २. तिच्यासोबत फ्लर्ट करत होता?

  3. ३. तिचा लैंगिक छळ करत होता?

या सर्व प्रश्नांचं बरोबर उत्तर आहे पर्याय ३.

लैंगिक छळ करणं हे चिडवणं किंवा फ्लर्ट करणं यापेक्षा वेगळं कसं आहे?

लैंगिक छळ हा एकतर्फी असतो. छळ सहन करणाऱ्या व्यक्तीने तो थांबवण्यास सांगितलं तरी तो सुरूच राहतो.

लैंगिक छळ ही एक गंभीर गोष्ट आहे आणि त्यामुळे लैंगिक अत्याचारही होऊ शकतो.