व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ३

आदाम आणि हव्वा यांनी देवाचं ऐकलं नाही

आदाम आणि हव्वा यांनी देवाचं ऐकलं नाही

एक दिवशी हव्वा एकटी असताना साप तिच्याशी बोलला. तो म्हणाला: ‘बागेतल्या कोणत्याच झाडाचं फळ खायचं नाही, असं देव तुम्हाला म्हणाला का?’ हव्वा म्हणाली: ‘असं काही नाही, आम्ही खाऊ शकतो. पण फक्‍त एकाच झाडाचं फळ आम्ही खाऊ शकत नाही. जर खाल्लं तर आम्ही मरू.’ मग साप म्हणाला: ‘तुम्ही नाही मरणार. याउलट तुम्ही जर ते खाल्लं तर तुम्ही देवासारखं बनाल.’ तुला काय वाटतं, साप जे बोलला ते खरं होतं का? नाही, तो खोटं बोलत होता. पण हव्वाला ते खरं वाटलं. हव्वा त्या फळाकडे बघतच राहिली. तिला ते हवंहवंसं वाटलं. त्यामुळे तिने ते फळ खाल्लं आणि आदामलाही दिलं. आदामला माहीत होतं, की त्यांनी देवाचं ऐकलं नाही तर ते मरतील. पण तरीसुद्धा आदामने ते फळ खाल्लं.

मग संध्याकाळी यहोवा आदाम आणि हव्वाशी बोलला. देवाने त्यांना विचारलं, की त्याने सांगितलेली गोष्ट त्यांनी का ऐकली नाही. तेव्हा हव्वा म्हणाली: ‘सापाने मला फळ खायला सांगितलं म्हणून मी ते खाल्लं.’ आणि जेव्हा यहोवाने आदामला विचारलं तेव्हा तो म्हणाला: ‘हव्वाने मला सांगितलं म्हणून मी ते फळ खाल्लं.’ आदाम आणि हव्वा यांनी देवाचं ऐकलं नाही म्हणून देवाने त्यांना बागेतून बाहेर काढून टाकलं. त्यानंतर, त्याने बागेच्या बाहेर देवदूतांना उभं केलं आणि एक आगीची तलवार ठेवली. त्यामुळे आदाम आणि हव्वा परत कधीच आत जाऊ शकले नाहीत.

मग जो हव्वाशी खोटं बोलला त्याचं काय झालं? त्यालाही शिक्षा केली जाईल, असं यहोवा म्हणाला. पण हव्वाशी खरंतर साप बोलला नव्हता. कारण यहोवाने बोलणारे साप बनवले नव्हते. एका वाईट देवदूताने सापाला बोलायला लावलं होतं. त्याने हव्वाला फसवण्यासाठी असं केलं. बायबलमध्ये त्या देवदूताला दियाबल सैतान म्हटलं आहे. पण यहोवा लवकरच सैतानाचा नाश करणार आहे. म्हणजे, तो आपल्याला वाईट गोष्टी करण्यासाठी कधीच फसवू शकणार नाही.

“सैतान . . . सुरुवातीपासूनच खुनी आहे आणि तो सत्यात टिकून राहिला नाही कारण त्याच्यामध्ये सत्य नाही.”—योहान ८:४४