व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ४

रागामुळे खून झाला

रागामुळे खून झाला

एदेन बागेतून बाहेर पडल्यानंतर आदाम आणि हव्वा यांना खूप मुलं झाली. त्यांचा पहिला मुलगा काइन शेतकरी होता. दुसरा मुलगा हाबेल मेंढपाळ होता. तो मेंढरांची काळजी घ्यायचा.

एक दिवस काइन आणि हाबेल यांनी देवासाठी अर्पणं आणली. तुला माहीत आहे अर्पण म्हणजे काय? अर्पण म्हणजे देवाला दिलेली एक खास भेट. यहोवाला हाबेलची भेट आवडली आणि तो खूश झाला. पण त्याला काइनची भेट आवडली नाही. त्यामुळे काइनला खूप राग आला. पण यहोवाने त्याला बजावून सांगितलं, की त्याचा राग चांगला नाही आणि यामुळे त्याच्या हातून काहीतरी चुकीचं घडू शकतं. पण काइनने यहोवाचं अजिबात ऐकलं नाही.

याउलट काइन हाबेलला म्हणाला: ‘मी शेतात चाललो आहे, माझ्याबरोबर चल.’ जेव्हा शेतात फक्‍त ते दोघंच होते, तेव्हा काइनने हाबेलवर हल्ला केला. त्याने त्याचा खून केला! मग यहोवाने काय केलं? यहोवाने काइनला शिक्षा केली. यहोवाने त्याला त्याच्या कुटुंबापासून खूप दूर पाठवलं. आता तो कधीच परत येऊ शकणार नव्हता.

यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही, तर आपल्याला राग येऊ शकतो. पण आपल्याला राग येत आहे, हे आपल्याला समजतं किंवा दुसऱ्‍याने आपल्याला सांगितलं, तर आपण लगेच आपला राग आवरला पाहिजे आणि शांत झालं पाहिजे. नाहीतर राग जिंकेल आणि आपण हरून जाऊ.

हाबेलचं यहोवावर प्रेम होतं आणि त्याने नेहमी चांगलं तेच केलं. त्यामुळे यहोवा त्याला कधीच विसरणार नाही. यहोवा जेव्हा या पृथ्वीला नंदनवन बनवेल, तेव्हा तो हाबेलला परत जिवंत करेल.

“आधी आपल्या भावाशी समेट कर आणि मग परत येऊन आपलं अर्पण दे.” —मत्तय ५:२४