व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ५

नोहाचं जहाज

नोहाचं जहाज

पृथ्वीवर बघता-बघता खूप लोक झाले. त्यांच्यापैकी बरेच लोक वाईट होते. फक्‍त लोकच नाही, तर काही देवदूतसुद्धा वाईट बनले. त्यांनी स्वर्गातलं आपलं घर सोडलं आणि ते या पृथ्वीवर आले. तुला माहीत आहे, ते या पृथ्वीवर का आले? त्यांना मानवांसारखं शरीर हवं होतं आणि स्त्रियांशी लग्न करायचं होतं.

देवदूतांनी स्त्रियांशी लग्न केलं आणि त्यांना मुलं झाली. ही मुलं मोठी झाल्यावर खूप शक्‍तिशाली बनली. ती लोकांना त्रास द्यायची. इतकंच नाही, तर ती लोकांना मारायचीसुद्धा. मग यहोवा हे सर्व असंच चालू देणार होता का? नाही. त्याने ठरवलं, की तो एक जलप्रलय किंवा मोठा पूर आणून सर्व वाईट लोकांचा नाश करून टाकेल.

पण सर्वच लोक वाईट नव्हते. एक माणूस होता जो इतरांपेक्षा वेगळा होता. त्याचं यहोवावर प्रेम होतं. त्याचं नाव होतं नोहा. त्याचं लग्न झालं होतं आणि त्याला तीन मुलं होती. त्यांची नावं होती शेम, हाम आणि याफेथ. त्यांचीसुद्धा लग्न झाली होती. यहोवाने नोहाला एक खूप मोठ्ठं जहाज बनवायला सांगितलं. पूर आल्यावर नोहा आपल्या कुटुंबासोबत त्यात राहणार होता आणि त्यांचा जीव वाचणार होता. ते जहाज एका मोठ्या बॉक्ससारखं असणार होतं. ते सहज पाण्यावर तरंगू शकणार होतं. यहोवाने नोहाला आणखीन एक काम दिलं. त्याला बरेचसे प्राणी त्या जहाजात आणायचे होते. कारण यहोवाला त्यांनासुद्धा वाचवायचं होतं.

नोहाने आणि त्याच्या कुटुंबाने लगेच जहाज बनवायला सुरुवात केली. ते बनवायला त्यांना जवळपास ५० वर्षं लागली. यहोवाने जसं सांगितलं होतं, अगदी तसंच त्यांनी ते बनवलं. यासोबतच, नोहाने आणखी एक काम केलं. मोठा पूर येणार आहे, हे त्याने लोकांना सांगितलं. पण त्याचं कोणीच ऐकलं नाही.

शेवटी जहाजाच्या आत जायची वेळ आली. मग पुढे काय झालं? ते आपण ६ व्या धड्यात पाहू या.

“कारण नोहाच्या दिवसांत जसं होतं तसंच मनुष्याच्या पुत्राच्या उपस्थितीच्या काळातही घडेल.” —मत्तय २४:३७